मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बाप्पाचा नैवेद्य : खरवस

भुमी · · पाककृती
खरवस ( गाईच्या/म्हशीच्या ) चिकाची वडी- गाय किंवा म्हैस व्यायल्यावर सुरुवातीचे काही दिवस घट्ट दूध देतात, त्याला चीक असे देखील म्हणतात. या दुधात जास्त प्रमाणात प्रथिने असतात. साधारण पहिल्या, दुसर्‍या, तिसर्‍या दिवसाचा चीक खरवसाच्या वड्या करण्या साठी वापरतात. पहिल्या दिवसाचा चीक घट्ट असतो. खालील कृतीत त्याच दिल्या आहेत. दुसर्‍या, तिसर्‍या दिवशीचा करताना साधे दूध कमी प्रमाणात वापरावे. साहित्य - गाईचे अथवा म्हशीचे खरवसाचे दूध (चीक)१/२ लिटर, गाईचे किंवा म्हशीचे साधे दूध १/२ लिटर १०० ते १२५ ग्रॅम साखर किंवा गूळ, याचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. केशर काड्या १०-१२, वेलची पूड कृती- गाईचा चीक पातळ असतो पण म्हशीचा घट्ट असतो, त्यामुळे म्हशीच्या दुधाचा करताना साध्या दुधाचे प्रमाण वाढवावे लागते. गाईचा करताना जेवढं चीक तेवढाच दूध वापरायचं. १/२ लि चिकाला १/२ ली दूध मिक्स करायचं त्यात चवीप्रमाणे गुळ किंवा साखर घालायची. गूळ जास्त छान लागतो. चांगलं ढवळून विरघळवायचा. मग गाळून घ्यायचं. आणि वेलची पूड घालून परत ढवळायचं . कूकरच्या डब्यात हे दूध अर्ध्यापर्यंत ओतायचे, वरून केशर काड्या पसरवाव्यात. नंतर मोठ्या पातेल्यात पाणी तापत ठेवायचं त्यात स्टँड ठेऊन कुकरचा डबा ठेवायचा. पातेलं वरून झाकायचं. (water bath) झाकणावर जड वस्तू ठेवायची म्हणजे वाफेवर चांगलं शिजेल. १५ मि. चांगले उकडायचे. नंतर डबा बाहेर काढून गार होऊ द्यायचा. मग वड्या कापायच्या. गाईच्या वड्या मऊ होतात. चीक पातळ असेल तर दूध न घालता केल्या तरी चालतात. म्हशीच्या वड्यांना दूध लागतेच. नाहीतर वड्या कडक होतात. गरम खायच्या नाहीत तोंड येते. उष्ण पडतात. kharwas

वाचने 17447 वाचनखूण प्रतिक्रिया 33

मदनबाण 19/09/2015 - 08:57
आहाहा... लयं भारी ! :) काही जण गूळाच्या जागी साखर घालुन खरवस करतात, पण मला मात्र गूळाचाच खरवस आवडतो. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Ganpati Aarti :- रमा माधव

भयंकर, प्रचंड वगैरे वगैरे आवडतो.. ठाण्यात गोखले रोडला स्वीट हनुमान नावाचे एक दुकान आहे, सुरभी, मयेकर ऑप्टिशियन च्या रांगेत, त्याच्याकडे खरवसाची पावडर मिळाली होती मागच्या भारतभेटीत.. आणि मग दुधाची तहान ताकावर, आता जर्मनीत हवा तेव्हा खरवस खाता येईल ह्या आनंदाने ती आणली.. आणि बरा झाला होता. 'खरवस' खाल्ल्यासारखे वाटत होते. स्वाती

मस्त पदार्थ. जास्त खाल्यास गरम पडतो त्यामुळे मन आवरावे लागते. गोरेगावात आरे कॉलनीत नेहमी मिळतो. चीक कींवा तयार खरवस दोन्ही मिळते.

रेवती 20/09/2015 - 05:08
खरवस खाण्याची आवड बेताची आहे. गूळ घातलेलाच आवडतो. तरी आमच्या एक नातेवाईक वेगळ्या पद्धतीने साखरेच्या पाकातील किसलेला खरवस करत असत ते आठवले. तो आवडायचा. फोटू दिसला नाही.