मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माळी पुनेव

ऊध्दव गावंडे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
माळी पुनेव! माळी पुनेवचा चंद्र जशी पन्हावली गाय धारा लागल्या दुधाच्या भिजते धरनी माय चांदन्याचं वावरातं डोले पीक हिर्वं गारं पाना पानाऊनं झरे गोळं अमृताची धारं कन्सा कन्सा वरं झाली चांदन्याची आबादानी कन्सातला दाना कसा हासे तान्ह्या पोरा वानी नयतुर्न्या पोरी वानी चंद्र हरखूनं जाये वायत्या पान्यातं नदीच्या रूपं निरखूनं पाये धुंद झाली चांदन्यानं मैना फूगळी धरते धरनीच्या मळक्यातं रई गर्गरं फिरते

वाचने 5164 वाचनखूण प्रतिक्रिया 26

अभ्या.. Mon, 10/26/2015 - 23:16
अहाहाहा. अप्रतिम
धरनीच्या मळक्यातं रई गर्गरं फिरतेधरनीच्या मळक्यातं रई गर्गरं फिरते
काय ती शब्दकळा. जणू नजर लागल अशी कलदार. उध्दवराव. माय सरसोती प्रसन्न हाये तुमच्यावर बर्का.

चांदणे संदीप Mon, 10/26/2015 - 23:30
खूपच छान लिहिली आहे! आवडली! अवांतर : (खरं तर नको इतक्या छान कवितेत...पण आठवल आहे तर...) पुलंची ती पाहुण्यांना 'ळ' चा 'ड' करून 'फडे' खायला सांगणा-या मुलाची कथा आठवली!

चाणक्य Tue, 10/27/2015 - 07:25
एकदम लयीत आहे. कुठली भाषा आहे ही? अहिराणी? (अज्ञानाबद्दल क्षमस्व)

बोका-ए-आझम Tue, 10/27/2015 - 07:42
माळी पुनेवचा चंद्र जशी पन्हावली गाय धारा लागल्या दुधाच्या भिजते धरनी माय
आणि
नयतुर्न्या पोरी वानी चंद्र हरखूनं जाये वायत्या पान्यातं नदीच्या रूपं निरखूनं पाये
हे तर अफलातून!

नाखु Tue, 10/27/2015 - 10:33
कन्सा कन्सा वरं झाली चांदन्याची आबादानी कन्सातला दाना कसा हासे तान्ह्या पोरा वानी
आबादानी लई दिसानी भेटला हा शब्द!! साक्षात दंडवत शब्दकळेसाठी....... नकाश्यातच गाव शिल्लक असलेला नाखुस कांक्रीट जंगलवाला

राही Tue, 10/27/2015 - 19:09
बहिणाबाई चौधरींच्या 'धरित्रीच्या कुशीमध्ये बींयबियाणी निजली' ची आठवण झाली. 'टाया वाजविती पानं, दंग देवाच्या भजनी जशी करती करोना, होऊ दे रे आबादानी' कविता आवडली.