राधा कृष्ण....... जर...
लेखनविषय:
काव्यरस
"राधा"
घननीळा, का अवेळीच तू
या राधेला परत भेटला?
विराण आता झाले गोकुळ
जुना पुराणा कदंब वठला
अता न उरली स्वप्नामधली
तरल अनामिक धूसर नाती
कुठे पाहसी कृष्णा मधुबन
भयाण या अवसेच्या राती
कालिंदीचे उदासले जळ
अता लोपली त्याची खळखळ
नि:शब्दाचे पिसाट वारे
ठेवून फिरते उरात खळबळ
अता न उरल्या काठावरच्या
कुरणातिल चरणाऱ्या गायी
टपोर त्यांच्या डोळ्या मधली
दूर हरवली वत्सल आई
तुझ्या करातील सुस्वर मुरली
आठवते केवळ प्राचीनता
चैतन्याचा सूर हरवूनी
फक्त विराणी गाते आता
सांग, कशी मग मी तरी येऊ
आठवुनी मागिल संमोहन
अता कुठे उरला राधेचा
तो पूर्वीचा घननिळ मोहन?
आणि इकडे कृष्ण ........
मी शोधतोच आहे माझ्या मनात राधा
युग संपले तशी का गेली लयास बाधा?
सर्वस्व सोडले मी, हा धर्म रक्षिण्याला
कल्पांत भोगताना पण राहिलो अकेला
मी वेड लाविले का केले मलाच वेडे?
जन्माहुनी निराळे पडले अगम्य वेढे
हे कोणते किनारे? येथे विराट लाटा
अभिशापिता परी या उध्वस्त सर्व वाटा
मी गुंतलो कसा, या गुंत्यास थांग नाही
एकांत भोगणाऱ्या जन्मास अंत नाही
भोवंडुनी दिशा या गाती मला विराणी
स्वप्नात काळनिद्रा स्मरते जुनी कहाणी.....!
वाचने
3585
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
सांग, कशी मग मी तरी येऊ
जगाच्या कल्याणासाठी झटणार्या
राजे!!! मिपावर वाचक आणि
In reply to राजे!!! मिपावर वाचक आणि by मांत्रिक
ककविताअप्रतीम!
In reply to ककविताअप्रतीम! by अत्रुप्त आत्मा
३ मूड कुठल्ले हो गुर्जी!!!
अप्रतिम!!
सुरेख !
अता?????
धन्यवाद हो सर्वाना. सूचना
वाह... सुंदर !
सुंदर कविता. या वरून आठवले