"आणि मग एके दिवशी.." (नसीरुद्दिन शाहचे आत्मचरित्र)
लेखनप्रकार
नटनट्यांची आत्मचरित्रे म्हटली की ती खमंग मसालेदार गॉसिपने भरलेली असणार असा एक रूढ समज आहे. काही अंशी तो खरा असेलही. पण त्याच्याशी फक्त अभिनेता असण्या-नसण्याचाच संबंध नसतो. प्रामाणिकपणा आणि वाचनीयता हे दोन गुण कोणत्याही आत्मचरित्रात असावे लागतात आणि सगळ्यांना ते जमत नाही. परिणामी ती रटाळ, नीरस आणि लबाड होऊन जातात. खासकरून राजकीय नेत्यांची आत्मचरित्रे.
सत्यकथनाची हिम्मत नसेल तर फिल्मी आत्मचरित्रेही "फ्लॉप" होऊ शकतात. उदा. देव आनंदचे 'Romancing The Life' हे पुस्तक. ही त्याच्या आयुष्यातील अगोदरच सर्वविदीत असलेल्या घटनांची निव्वळ जंत्री आहे. लहानपणीचा काही काळ वगळता नवे हाती काहीच लागत नाही. कदाचित तो आधीच इतका बेफाम प्रसिध्द असल्यामुळे त्याच्याकडे नवे काही सांगायला राहिले नसेल. पण त्याचा अस्सल 'आवाज' काही त्या पुस्तकातून ऐकू येत नाही. जो ऐकू येतो, तो पटत नाही. समकालीन कलाकार, चित्रपट यांचे तो मूल्यमापन करू जात नाही. स्वतःबद्दलही तो फार परखड होत नाही. त्याच्या अनेक अजरामर व्यावसायिक चित्रपटांपैकी एखाद्याची घडण कशी झाली ही प्रक्रिया कुठे विस्ताराने सांगितली जात नाही. सिनेजगतात इतकी दशके काढून, इतका मोठा स्टार होऊनही देव आनंदची कलाविषयक समज ही सुमार राहिली, हेच त्या पुस्तकातून दिसून येते. म्हणजे सुबोध मुखर्जी, गुरुदत्त आणि विजय आनंदसारखे दिग्दर्शक नसते, तर देवबाबाचे काही खरे नव्हते! त्याहून पुढे जाऊन असेही म्हणता येईल की देव आनंदची सामूहिक कल्पनाविश्वातील प्रतिमा इतकी सशक्त होती -आहे- की स्वतः देव आनंदच तिला बळी पडला आणि त्याला आपले असे अस्तित्वच उरले नाही.
पडद्यावर परिपूर्ण, अतिरंजित, काल्पनिक महाव्यक्तिमत्वे रंगवणारा कलाकार हा वास्तवात तुम्हाआम्हांसारखा गुणदोषांनी युक्त असा मृत्तिकाचरण माणूस असतो. पण बहुतेक यशस्वी कलाकारांकडे हे मान्य करण्याची हिम्मत, नजर आणि प्रांजळपणा शिल्लक रहात नाही. याला एक स्वागतार्ह अपवाद म्हणजे नुकतेच प्रकाशित झालेले नसीरुद्दिन शाहचे आत्मचरित्र "And Then One Day".
शाह हा देव आनंदइतका लोकप्रिय अभिनेता नसला, तरी तितका प्रसिद्ध नक्कीच आहे. आपली मते व्यक्त करण्यास न कचरणारा अशी त्याची ख्याती आहे. जिथे आयुष्य काढले त्या हिंदी चित्रपटसृष्टीला आणि चित्रपटांनाही त्याने पूर्वी बिनधास्तपणे शिव्यांची लाखोली वाहिलेली आहे. शिवाय एक चतुरस्र, अभिरुचीसंपन्न कलाकार म्हणून त्याला कितीतरी जास्त मान्यता आहे. त्यामुळे हे पुस्तक हाती घेताना उच्च अपेक्षा निर्माण होतात.
हे एक स्वच्छ अंतःकरणाने आणि ठाम भूमिकेतून लिहिलेले मनोगत आहे. प्रसंगी उद्धट, प्रसंगी भावुक पण क्वचितच आदरयुक्त. 'वाचनीयता' या मापकावर शाहला पैकीच्या पैकी गुण मिळतात. पुस्तक हाती घेतले की आपण न थांबता पुढे वाचत जातो. शाहची लेखनशैली थेट आणि प्रवाही अशी आहे. इंग्रजी भाषेवर त्याची उत्तम मांड आहे. (पुस्तक त्याने स्वतःच लिहिले असून पिशाच्च-लेखक वापरलेला नाही असे प्रस्तावनेतून ध्वनीत होते). त्याची बुद्धिमत्ता, मूल्ये आणि कलाविषयक दृष्टिकोन हे पुस्तकातून व्यवस्थितपणे परावर्तित होतात.
सर्वात महत्वाचे म्हणजे तो हातचे राखून न ठेवता, भीडभाड न बाळगता, लोक काय म्हणतील याची फिकीर न करता आपली जीवनकथा सांगतो. वयानुसार आणि अनुभवातून प्राप्त झालेल्या परिप्रेक्ष्याचा (Perspective) योग्य वापर करत तो आपले भूतकाळातील वर्तन आणि निर्णय यांचे कठोरपणे परीक्षण करतो. मोजक्या व्यक्तींची नावे वगळता इतर काही तो लपवून ठेवत नाही. उत्तर प्रदेशातील सरंजामी कुटुंबातले बालपण, ओसरत्या सरंजामशाहीचे दिवस, वडिलांचा धाक आणि त्यामुळे निर्माण झालेले अंतर, निवासी शाळेतला काळ, शैक्षणिक अपयशामुळे घरात निर्माण झालेले तणाव हे सर्व वर्णन अतिशय ओघवत्या भाषेत येते. शालेय जीवनात प्रत्येकाला खाणारी मानसिक असुरक्षितता आणि अपरिमित न्यूनगंड हे त्यालाही भासत होते. मोठे भाऊ हुशार व अभ्यासू निघाल्यामुळे परिस्थिती अधिक बिकट होती! (एक भाऊ सेनादलात जनरल पदापर्यंत चढला.)
निवासी शाळेच्या दिनक्रमानुसार, आठवड्यातून एक इंग्रजी चित्रपट दाखवला जाई. त्या आभासी कृष्णधवल जगतात रममाण होणे शाहला आवडू लागले. नाट्यकलेच्या प्रसाराला वाहून घेऊन भारतभर गावोगाव फिरणारा नाटकवेडा जेफ्री केंडाल आणि त्याची 'शेक्स्पीअरवाला' थेटर कंपनी यांची शाहला विद्यार्थीदशेतच भुरळ पडली होती. त्यातून पुढे त्याने शालेय नाटकात भाग घेतला आणि जे व्यसन जडले ते कायमचेच. हा मानसिक प्रवास पुस्तकात फारच सुंदररीत्या आणि बारकाव्याने चितारला गेला आहे. हा धागा पुढे पुन्हा पकडत शाह विभिन्न अभिनयशैली, रंगमंचतंत्रे आणि नाट्यशास्त्राची सूत्रे या विषयांवर थोडक्यात पण नेमके, वेधक बोलतो.
अर्थात शाहच्या मते हिंदी सिनेमा हा तेव्हाही (६०च्या दशकात) कलादृष्ट्या एक हीन प्रकार होता. व्यावसायिक हिंदी चित्रपट पाहणे हा आपल्याला आजतागायत एक वैतागवाणा अनुभव वाटत आलेला आहे हे तो नमूद करतो. ("त्यामुळे की काय, मला बॉलीवूडमध्ये कधीही कुणाबद्दल आदर वाटलेला नाही. एकमेव अपवाद म्हणजे राजकुमार. अभिनेता म्हणून फारच भयंकर असला तरी तो आख्ख्या इंडस्ट्रीला फाट्यावर मारून स्वतःला हवं तेच करायचा आणि तरीही लोक त्याच्या विनवण्या करकरून त्याला आपल्या चित्रपटात घ्यायचे. या कारणामुळे मला त्याचा अपार आदर वाटत आलेला आहे", ही खास शालजोडीतली भेट!)
शाहला चित्रपटात सुखासुखी यश मिळाले नाही. त्याअगोदर वर्षानुवर्षे त्याने खस्ता खाल्ल्या. अभिनयाची ओढ आणि मनातील स्वप्न याशिवाय हातात काहीच नव्हते. सुरुवातीला तो हजारो तरुणांसारखा रिकाम्या खिशावर मुंबईला आला. जुजबी ओळखीवर एका प्रस्थापित अभिनेत्याच्या नातेवाईंकाकडे (नटाचे नाव गुलदस्त्यात! वाचकांनी अंदाज बांधावेत) बेशरमपणे ठाण मांडून (त्याच्याच शब्दात!) काही महिने राहिला. गर्दीच्या सीनमधे एक्स्ट्राची कामे करत संधी शोधण्याचे प्रयत्न केले. काही काळ त्याने चक्क दिलीपकुमारच्या बंगल्यात आऊटहाऊसमध्ये काढला ("पुढे अनेक वर्षांनंतर मी त्याच्याबरोबर एका गल्लाभरू पिक्चरमधे काम केलं"). खिमापाववर दिवस काढले. लोकलमध्ये बिनतिकीट प्रवास केले. अखेर निभाव लागेना म्हणून घरी परतला.
अर्थात नोकरीधंदा करून पोट भरणे ही कल्पना एव्हाना अशक्य झालेली होती आणि अभिनय हेच आपले भागविधेय आहे ही त्याची खात्री पटलेली होती. त्यामुळे त्याने दिल्लीच्या एन एस डीत प्रवेश मिळवला. तिथलाही अभ्यासक्रम अर्धा सोडून तो पुण्याला एफ टी आय आयमध्ये गेला.
ओम पुरी हा शाहचा नाट्यशालेतील सहपाठी. अभिनेता म्हणूनही तो समकालीन. दोघांचे oeuvre (मराठी प्रतिशब्द सुचवावा. 'कलासंपदा'..?) समदर्जाचे. या माणसाबद्दल शाह फार आपुलकीने बोलतो. पुरीने एन एस डीमध्ये केलेल्या एका जपानी नाटकाचे वर्णन "मी पाहिलेल्या सर्वोत्कृष्ट अभिनयापैकी एक" असे करतो. व्यक्ती म्हणूनही त्याची प्रशंसा करतो.
शाह एफ टी आय आयमध्ये असताना तिथे विद्यार्थ्यांचा एक मोठा संप झाला. शाह त्यात सामील होता. हा संप 'विद्यार्थी विरुद्ध विद्यार्थी' असा होता. तो अपयशी होणार हे ठरलेलेच होते. तसा तो फुटला आणि शाहला 'तत्वे' सोडून माघार घ्यावी लागली. सध्या चालू असलेल्या एफ टी आय आय वादाच्या पार्श्वभूमीवर हा भाग मुद्दाम वाचावा असा आहे. अर्थात शाहने केलेल्या रोखठोक मीमांसेसकट.
शाहने कलात्मक आणि तद्दन धंदेवाईक अशा दोन्ही प्रकारचे चित्रपट केले आहेत. तो अजूनही कलाक्षेत्रात सक्रीय आहे. (गेल्याच आठवड्यात त्याचा अनिल कपूर- नाना पाटेकरसोबतचा एक उथळ विनोदी चित्रपट प्रदर्शित झाला). पण आपली व्यावसायिक चित्रपट-कारकीर्द तो फारशी अभिमानास्पद मानत नसावा. 'निशांत' या आपल्या पहिल्या चित्रपटाबद्दल तो जरा विस्ताराने बोलतो (पहिल्या चित्रपटाशी पोचेपर्यंत अर्ध्याहून अधिक पुस्तक संपते). पण त्यापुढच्या पानावरच 'शोले'ची चांगली बिनपाण्याने करतो (दोन्ही सिनेमे १९७५मधलेच). अमिताभ, धर्मेंद्र आणि संजीवकुमार या सुपरस्टारबद्दल तो टीकात्म लिहायला कचरत नाही (मात्र 'शोले'च्या संदर्भात नव्हे). 'जुनून' आणि 'मंथन'मधील शाहचे काम सर्व रसिकांना भावले असले तरी त्याला स्वतःला ते आवडत नाही. 'सुनयना'चीही तो धिंड काढतो. 'स्पर्श' आणि 'मासूम'बद्दल जिव्हाळ्याने बोलतो पण 'कथा'ला जवळजवळ अनुल्लेखाने मारतो.
शाहची कलाविषयक मते विपुल प्रमाणात, सढळहस्ते येतात. ती सगळी प्रत्येकाला पटतील असे नाही. पण जेवढी परखड टीका तो इतरांवर करतो, त्याहून नखभर जास्तच स्वतःवर करतो. आपले पहिले लग्न आपल्या निर्दयी, अन्यायकारक व बेजबाबदार वागण्यामुळे धुळीला मिळाले हे तो धैर्याने मान्य करतो. त्या काळातल्या आपल्या वर्तनाची अंतर्बाह्य चिकित्सा करतो. वडिलांसोबतचे अस्वस्थ नाते व उडालेला पहिला भडका, मित्रांसोबत केलेले अंमली द्रव्यांचे प्रयोग, सहकलाकारांसोबतचे वाद हे सर्व तो सांगतो. वाढत्या तारुण्याच्या दिवसात आपण अनेकदा वेश्यागमन केले हेही निखळपणे वदतो. आयुष्यात आलेल्या अन्य स्त्रियांबद्दल (अर्थात त्यांची नावे न घेता) सांगतो. नाट्यशालेतील त्याचा जिवाभावाचा मित्र जसपाल हा पुढे त्याचा जन्माचा वैरी झाला. शाहवर खुनी हल्ला करण्यापर्यंत त्याची मजल गेली. हा भागही पुस्तकात संदर्भांसहित येतो. आपण व्यावसायिक हिंदी चित्रपटात अपयशी का ठरलो, याचा शाह सखोल विचार करतो आणि निर्भयपणे तो कागदावर उतरवतो.
हे सारे निर्भीड, व्यक्तिगत सत्यकथन वाचताना आपण आपली पांढरपेशी मूल्ये लावणे योग्य होणार नाही हे उघड आहे. पण पुस्तक वाचून संपल्यावर चित्रपटांच्या झगमगत्या दुनियेचा देखावा तितकासा आकर्षक रहात नाही. लोकप्रियतेच्या आणि यशाच्या शिखरावर पोचलेले कित्येक नटनटी, निर्माते, लेखक, दिग्दर्शक आपल्याला माहीत असतात. शाहची जीवनकथा वाचल्यावर आपल्यासमोर, या सर्वांनी आयुष्यात कायकाय पाहिले असेल, स्वतःला कसे विकले असेल, कसले कडू घोट गिळले असतील आणि कोणत्या तडजोडी केल्या असतील असे प्रश्न येऊ लागतात. कदाचित कुणाच्या मनातला शाहबद्दलचा आदरही कमी होण्याची शक्यता आहे.
पण ते एकतर्फी आणि अन्यायकारक होईल, नाही का? एकटे चित्रपटविश्वच नव्हे, तर बाकीच्या कमी चकाकत्या अशा सामान्य नोकरी-धंद्यातही माणसे पदोपदी लज्जास्पद तडजोडी करत असतात, इतरांच्या डोक्यावर पाय देऊन वर चढतात. ते एक उघड गुपीत मानले जाते आणि कुणी त्याचा उल्लेखही करीत नाही.
स्वतःच्या आयुष्याचा स्पष्ट लेखाजोखा इतक्या निष्पक्ष, त्रयस्थ नजरेने आणि सुरस भाषेत मांडल्याबद्दल शाह अभिनंदनास पात्र आहे.
वाचन
11868
प्रतिक्रिया
61
ह्म्म
फार च छान परिचय करुन दिलात.
In reply to फार च छान परिचय करुन दिलात. by स्रुजा
धन्यवाद
पुस्तकपरिचय आवडला. कदाचित हे
सखोल परिचय
In reply to सखोल परिचय by बहुगुणी
मुलाखत खुपच वाचनीय आहे.
उत्तम!
अत्मचरित्र म्हणजे तद्दन
In reply to अत्मचरित्र म्हणजे तद्दन by कॅप्टन जॅक स्पॅरो
कॅप्टन सेम हिअर
ऑ! मागच्या वर्षी प्रसिद्ध
In reply to ऑ! मागच्या वर्षी प्रसिद्ध by विशाखा पाटील
हो
छान परिचय आहे.
आवडले
In reply to आवडले by राही
धन्यवाद
In reply to आवडले by राही
हेच म्हणायचे होते....
आत्मचरित्र
In reply to आत्मचरित्र by बोका-ए-आझम
चमत्कार बाबत असहमत.
In reply to चमत्कार बाबत असहमत. by कॅप्टन जॅक स्पॅरो
अजून एक नसीरने अप्रतिम काम केलेला चित्रपट
In reply to आत्मचरित्र by बोका-ए-आझम
+१
In reply to आत्मचरित्र by बोका-ए-आझम
तसे तो स्वतःच म्हणतो
In reply to आत्मचरित्र by बोका-ए-आझम
पटले नाही, माफ करा.
In reply to पटले नाही, माफ करा. by चलत मुसाफिर
माझ्या लिहिण्यातून मला तसं म्हणायचंय
In reply to माझ्या लिहिण्यातून मला तसं म्हणायचंय by बोका-ए-आझम
समजले
In reply to समजले by चलत मुसाफिर
यावरून आय.एस.जोहर
In reply to आत्मचरित्र by बोका-ए-आझम
+१
In reply to आत्मचरित्र by बोका-ए-आझम
अमिताभ चे लाल बादशहा अकेला आज
नासिरचा आइनस्टाइन अफलातून
आपण मिठाई खावी
नसीरुद्दिन शाह Stupid Common Man ?
In reply to नसीरुद्दिन शाह Stupid Common Man ? by मदनबाण
+१
In reply to नसीरुद्दिन शाह Stupid Common Man ? by मदनबाण
+११११
In reply to +११११ by मास्टरमाईन्ड
बाकी व्यावसायिक कलाकाराने
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sur Niragas Ho... :- Katyar Kaljat Ghuslमातीचे कुल्हे असलेला अप्रतिम कलाकार.
In reply to मातीचे कुल्हे असलेला अप्रतिम कलाकार. by प्रभाकर पेठकर
पेठकर साहेब
In reply to पेठकर साहेब by सुबोध खरे
सहमत.
उत्कृष्ठ परिक्षण.
खूप छान पुस्तक ओळख. आवडली.
एक नंबर पुस्तक परीक्षण. नक्की
छान!
पुस्तक परीक्षण सुंदर जमले आहे
पुस्तक खरंच वाचनीय आणि
In reply to पुस्तक खरंच वाचनीय आणि by मनिष
लाल बादशाह आणि मृत्यूदाता
In reply to लाल बादशाह आणि मृत्यूदाता by बोका-ए-आझम
ह्या उत्तरार्धातल्या
In reply to ह्या उत्तरार्धातल्या by मनिष
अमिताभची चित्रपटाबाबतची जाण
In reply to अमिताभची चित्रपटाबाबतची जाण by कानडाऊ योगेशु
खरंय! अतिशय सुसंस्कृत आणि
उत्तम परिचय
पुस्तक परीक्षण असं असावं.
सुंदर परीक्षण!छान ओळख करुन
जाने भी दो यारो
परीक्षण आवडलं. माझ्या यादी
In reply to परीक्षण आवडलं. माझ्या यादी by आकाश खोत
नाही
आता हे वाचलच पाहीजे. छान
छान परीक्षण!
छान परीक्षण...!!
"पुढे अनेक वर्षांनंतर मी
In reply to "पुढे अनेक वर्षांनंतर मी by जव्हेरगंज
अवतरण चिन्हे
सुंदर ओळख करून दिली आहे.
चांगला नट
उत्तम परिचय
अत्मचरित्र म्हणजे तद्दन
हा लेख वाचून