बौद्ध दर्शन
लेखनप्रकार
बौद्ध दर्शन
खरे म्हणजे दर्शने हा काही वाचकप्रिय होण्यासारखा विषय नव्हे. त्या करिता एखादी जुनी, आपल्याला आवडलेली कविता घ्यावी, त्यात आपल्याला काय "भावले" सांगावे, मिपाकर (बहुधा पहिल्यांदीच वाचत असल्यामुळे असेल म्हणा वा सज्जन आहेत म्हणूम म्हणा !) "छान" म्हणतात, आपुन तरी खुष. दर्शनांचे तसे नाही. तो माझ्या आवडीचा विषय. पण डोके खाणारा. तेव्हा सुरवातीला विचार केला " लिहून तर बघू, १०० जंणांनी वाचला तर पुढे जावू, नाही तर दिले सोडून. सुरवातीचा प्रतिसाद सुखकारक वाटला म्हणून "तंत्रा" पर्यंत लिहले व थांबलो. थोडक्यात गोडी, एवढे नक्की कळते. नंतर आमचे मित्र श्री. माहीतगार यांच्यामुळे "सांख्य" झाले व आज श्री. मांत्रिक यांच्या सांगण्यावरून " बौद्ध दर्शन " बघू.
दर्शन म्हजे "तत्वज्ञान". धर्माचे दोन भाग असतात. आचार आणि तत्वज्ञान. बौद्ध धर्म आचारप्रधान आहे.बुद्धाने स्वत: तत्वज्ञानाला फारच कमी महत्व दिले. तो माणुस काय करतो व काय जाणतो यांत पहिल्याला महत्व देत होता. करणे आणि जाणणे यात कर्माला प्राधान्य. कोणत्याही दर्शनात आत्मा, परमात्मा व सृष्टी यांचा एकमेकांशी संबंध, माणुस मेल्यावर काय होते इत्यादींचा विचार असतो. बुद्धाचे म्हणणे "तुम्ही यांचाच विचार करत बसलात तर सगळे आयुष्य संपेल पण याची उत्तरे मिळतीलच असे नाही. सोडून द्या. कर्मावर जोर द्या. ब्रह्मचर्य, वैराग्य, निवृत्ती, उपशम ,अभिज्ञान,संबोध, प्रसाद आणि निर्वाण यांच्याशी या प्रश्नांचा संबंध येत नाही. मी दु:खाचे कारण व दु:खनिवारण यां विषयी ज्ञान दिले आहे." बुद्धाला या प्रश्नांचे ज्ञान असेल वा नसेल पण त्याने त्यावर स्वत: काहीच सांगितलेले नाही. दर्शने त्याने अव्याकृत म्हणजे अनिर्णित म्हणून सोडून दिली.त्याने आपल्या धर्मोपदेशात ईश्वराचे नावही घेतले नाही. त्याने हिंदुधर्मातील जन्मांतरवाद व कर्मफलवाद जसाच्या तसा घेतला व आत्म्याला मात्र नाकारले.
पण या प्रश्नांचा चा विचार विचारवंत करणारच. बुद्धाच्या मृत्युनंतर लागलीच त्याच्या शिष्यांनी बौद्ध दर्शनाच्या मांडणीला सुरवात केली..आता आपण सरळ बौद्ध दर्शनाकडे वळू.
प्रतित्यसमुत्पाद : याचा अर्थ एखाद्या वस्तूची उत्पत्ती होणे. बीज जमिनीत पुरले की ते अंकरून त्याचा वृक्ष होतो. पृथ्वी, सूर्य पाऊस अंकुरण्यास मदत करतात, बीज हे मुख्य कारण पृथ्वी, सूर्य .. ही गौण कारणे. तर अशा मुख्य व गौण कारणांनी एखादी वस्तु निर्माण झाली के ती दुसर्या एखाद्या वस्तुचे मुख्य वा गौण कारण बनते व हे चक्र चालू रहाते. भूत, वर्तमान व भविष्य या तीन्ही कालात हा नियम लागू आहे. अपवाद फक्त आकाश, प्रतिसंज्ञानितोध वप्रतिसंज्ञानिरोध या असंस्क्रुत धर्माचा. प्रत्यक्ष बुद्धालाही प्रतित्यसमुत्पाद चुकला नाही.याची बारा अंगांची शृंखला असून पहिले कारण व दुसरे कार्य असते. (१) अविद्या, (२) संस्कार, (३) विज्ञान, (४) नामरूप, (५) श्ढडायतन, (६) स्पर्श, (७) वेदना,(८) तृष्णा, (९) उपादान, (१०)भव, (३) ते (१०) ही जीवाच्या वर्तमान जन्माशी संबंधित आहेत. (११) जाती भावी जन्मासाठी मातेच्या गर्भात जीव प्रतिष्ट होतो व आपल्या सुकृत-दुष्कृताची फळे भोगण्याची योग्यता प्राप्त करून घ्बेतो, (१२) जरा-मरण , भावी जन्मात जीवाला वार्धक्य व मरण अनुभवावे लागते.
अनात्मवाद :हिंदु दर्शनात आत्मा हा नित्य मानला असल्याने पुनर्जन्माचा स्विकार सोपा आहे. माणुस जुनी वस्त्रे टाकून नवी धारण करतो त्या प्रमाणे आत्मा जुने शरीर टाकून नवे धारण करतो. बुद्धाने आत्मा नाकारला व पुनर्जन्म स्विकारल्यावर थोडी अडचण येते. याचे निवारण पुढील प्रकारे केले आहे. प्रथम आत्मा नाकारतांना तो म्हणतो. "आत्मवादी पुरुष आत्मस्वरूप न जाणता त्याच्या कल्याणाकरिता प्रयत्न करतो. हे करणे म्हणजे रंग, रूप, गून, नाम, गोत्र माहिती नसलेल्या स्त्रीवर प्रेम करण्यासारखे आहे. अशा पुरुषाला माहीत नसलेल्या स्वर्गातील सुखांकरिता यज्ञ कराणार्या पुरुषासारखे मूर्खच म्हटले पाहिजे. उपनिषदांत आत्मा नित्य, शुद्ध, बुद्ध व अपरिवर्तनशील मानला आहे. तो कर्माचा कर्ता नसून कर्मफलांचा भोक्ता आहे. परिवर्तनशील प्रकृतीशी संबंध आल्यावर अनित्य विश्वाचा पसारा निर्माण होतो. बुद्धाचे म्हणणे अपरिवर्तनशीलाचा परिवर्तनशीलाशी संयोग होऊच शकत नाही.आत्मा नाहीच. मी व माझे या प्रकृतीला आधारभूत अशी ती केवळ एक कल्पना आहे. नागसेन-मिलिंद संवादात हे छान दाखविले आहे. राजा मिलिंद नागसेनाकडे येतो. नागसेन मिलिंदाला विचारतो ’तू पायी आलास कां ?" राजा म्हणतो " नाही, मी रथातून आलो". नागसेन ..हा दांडा म्हणजे रथ कां? राजा :"नाही". नागसेन :" आंस म्हणजे रथ कां?" राजा " नाही". नागसेन :" ही चाके म्हणजे रथ ?" राजा " नाही". नागसेन " रथ अशी गोष्टच नाही दंड, आंस, चाके अशा अवयवांच्या आधारावर केवळ
व्यवहारासाठी त्या सर्वांना मिळून रथ असे म्हणतात. आत्म्याचे तसेच आहे.तो केवळ समुच्चयमात्र आहे.
आत्मा नाकारूनही पुनर्जन्म कसा स्विकारता या साठी पुढील उदाहरण दिले आहे. मिलिंद नागसेनाला विचारतो "जो जन्मतो तो तोच असतो की दुसरा ? " नागसेन म्हणाला " तो तोच नसतो आणि दुसराही नसतो." राजा विचारतो "असे कसे ?" नागसेन ;"दिव्याचे उदाहरण घे. एक माणुस रात्री दिवा लावतो.पण तो एकच दिवा रात्रभर जळत राह्तो कांय ? मुळीच नाही. दिवा लावते वेळी जी दीपज्योत प्रज्वलित झाली, ती वेगळी आणि दुसर्या, तिसर्या प्रहरी इतकेच नव्हे तर प्रत्येक क्षणी जी जळून गेली ती वेगळी.पण असे असले तरी एकच दिवा जळत राहिला असे आपणास वाटते.दिवा एकच खरा, पण त्याची ज्योत प्रत्येक क्षणी परिवर्तन पावते.आत्म्याच्या बाबतीथी हाच नियम लागू आहे.कोणत्याही वस्तूच्या अस्तित्वाच्या बाबतीत एक अवस्था उत्पन्न होते , त्याच क्षणी एका अवस्थेचा लय म्होतो.प्रवाहाच्या या दोन अवस्थांमध्ये एका क्षणाचेही अंतर असत नाही.कारण एकीचा लय होतो न होतो तोच दुसरी अवस्था उत्पन्न होते.याच कारणामुळे पुनर्जन्माच्या वेळी जीव तोच राहत नाही,दुसराही होत नाही. एका जन्माच्या अंतिम विज्ञानाचा लय होतो न होतो तोच दुसर्या जन्माचे प्रथम विज्ञान पुढे उभे राहते.प्रत्येक क्षणी कर्म नष्ट होत जाते; पण त्याची वासना पुढच्या क्षणात अनुस्यूत रूपाने प्रवाहित होते."
अनीश्वरवाद बुद्धाने ईश्वर नाकारला..तसा तो बहुतेक हिंदु दर्शनांनीही नाकारलाच आहे. ईश्वर या कल्पनेला कुठल्याही तर्काचा आधार नाही असे म्हणून न पाहिलेल्या, न ऐकलेल्या ईश्वराच्या सर्वकर्तृत्वावर भर दिल्याने मनुष्याचा आत्मविश्वास खचतो असे त्याला वाटत होते.अनुयायांना ईश्वराच्या जोखडातून बुद्धाने मुक्त केले. मात्र अनात्मवादी व अनीश्वरवादी असूनही बुद्ध भौतिकवादी नव्हता. त्याने भौतिकवादाचा विरोध केला आहे. भौतिकवाद इंद्रियनिरोध व समाधी यांना प्रतिबंधक होतो. माणुस मुलत: साधू नाही, त्याला त्या कोटीला जावयाचे आहे; त्याकरिता निर्मल आचार, विचार, उच्चार यांची गरज आहे.
बौद्ध तंत्र : पौर्वात्य माणसावर तंत्राचा प्रभाव फार झटकन पडतो. तेव्हा बौद्ध दर्शनात तंत्र लवकरच शिरले. त्यातही शैव तंत्राचा प्रभाव जास्त दिसतो. जास्त माहिती तंत्र दर्शना सारखीच.
विकास : दर्शन हा धर्माचा एक भाग. धर्मात परिवर्तन घडले की दर्शनाची दिशा बदलणारच. बुद्धाच्या मृत्युनंतर लगेचच धर्मात बदल व्हावयास सुरवात झाली. निरीश्वरवादी बुद्धालाच ईश्वर बनवले गेले व हिंदु देवतांपेक्षा जास्त देवता बौद्ध धर्मात घुसल्या ! इ.स.च्या सुरवातीला जशा अवैदिक देवता निर्माण होऊ लागल्या तशा त्यांना तोंड देण्याकरिता बौद्ध देवताही वाढल्या. शेवटी सामान्य माणसाला देव पाहिजे असतो, तत्वज्ञान नव्हे. बौद्ध दर्शनाचा विकास इ.स.५०० ते १५०० असा जवळजवळ १००० वर्षांत झाला (बुद्धानंतर १००० वर्षांनी!) त्याचा थोडासा परिचय वर दिला आहे. आज जगात मंगोलिया, चीन, जपान, इन्डोनेशिया इत्यादी विस्तृत प्रदेशात बौद्ध धर्म प्रचलित आहे सहाजिकच आहे की चीनमधील बुद्ध धर्म निराळा, जपानमधला निराळा ! तेव्हा तेथील बुद्ध दर्शन निराळे. आज तुम्ही जालावर पाहिले तर असे आढळून येईल की चीनमधील बौद्ध धर्मावर झेन तत्वज्ञानाचा गाढा पगडा आहे. तेव्हा वरील माहिती ही भारतातील बौद्ध दर्शनावर आधारित आहे. इति अलम् ! .
शरद
कृष्णा बोल का रे क्रुष्णा डोल का रे !
घडिये घडिये घडिये गुज बोल का रे !!
वाचने
6096
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
तत्त्वज्ञानात लैच अंतर्विरोध
In reply to तत्त्वज्ञानात लैच अंतर्विरोध by प्यारे१
सदरील विवेचन ही माझी समजुत
In reply to सदरील विवेचन ही माझी समजुत by द-बाहुबली
हे थोडेसे मेट्रिक्स सारखे वाटते.
In reply to हे थोडेसे मेट्रिक्स सारखे वाटते. by ज्ञानोबाचे पैजार
वरील थिअरी बरोबर असेल तर मग
माहिती त्रोटक आहे. परंतु हेही
In reply to माहिती त्रोटक आहे. परंतु हेही by एस
तंत्राचा प्रभाव असलेली तिसरी
In reply to तंत्राचा प्रभाव असलेली तिसरी by प्रचेतस
बौद्ध धम्मावर एक अत्यंत
In reply to बौद्ध धम्मावर एक अत्यंत by बिपिन कार्यकर्ते
मला हवेय. :)
In reply to मला हवेय. :) by प्रचेतस
मिळेल.
लेख नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट पण
धन्यवाद शरदसाहेब. बौद्ध
In reply to धन्यवाद शरदसाहेब. बौद्ध by मांत्रिक
माहिती उत्कृष्टच आहे. म्हणजे
हे करणे म्हणजे रंग, रूप, गून,
आवडली माहिती!
छान लेखन
In reply to छान लेखन by सत्याचे प्रयोग
बोधिसत्व, तारा, भ्रुकूटी,
माहीती फार आवडली.
शून्यवाद
In reply to शून्यवाद by शरद
बुद्ध हा अद्वैतवादी होता.