Skip to main content

तो क्या करे... अख्तर शिरानी यांची ग़ज़ल

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 26/08/2015 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, उर्दू काव्यजगतातल्या आणखी एका शायरची आणखी एक ग़ज़ल आणि मला उमगलेला तिचा अर्थ इथे लिहीत आहे. हा शायर म्हणजे अख्तर शिरानी. यांचं मूळ नाव मुहम्मद दावूद खान. लाहोर ला वाढलेल्या या शायरचं काव्य हे विलक्षण तरूण आहे. त्यांची ही ग़ज़ल विरहानंतरच्या, ताटातुटीनंतरच्या हतबलतेचं अत्यंत ह्र्द्य वर्णन करते. मत्ला असा आहे, काम आ न सकी अपनी वफा़एं तो क्या करे उस बेवफ़ा को भूल न जाए तो क्या करे प्रेमभंग आणि विश्वासघात हातात हात घालूनच असतात. आपण सर्वस्व अर्पावं आणि दुस-याने त्या विश्वासाला तडा द्यावा याचं दु:ख वाट्याला आलं की काय करावं सुचत नाही. नेमकी हीच भावना मत्ल्यात व्यक्त होते. ही ग़ज़ल वाचताना मराठीत काहीतरी सुचलं, प्रत्येक शेराबरोबर ते देत आहे. करू काय की तुजवरचा विश्वास सार्थ नाही करू काय की या माझ्या प्रेमास अर्थ नाही मुझको ये एतराफ़ दुआओं में है असर जाए न अर्श पर जो दुआए तो क्या करे प्रार्थनेचं फळ मिळतं हे जरी मी मानलं, तरी त्या हाका देवापर्यंत पोचल्याच नाहीत तर मी काय करू? अगतिकतेमधे देवावरचा विश्वास उडू ही शकतो आणि बळावू ही शकतो. सहसा तो उडतोच. कारण जेंव्हा गोष्टी आपल्याला हव्या तशा होताना दिसत नाहीत तेंव्हा प्रश्न पडतो की होऊनि मी अगतिक मारावी तुला हाक पोचावी ना तुला ती पण यास अर्थ नाही एक दिन की बात हो तो उसे भूल जाए हम नाज़िल हो रोज दिल पे बलाए तो क्या करे नाज़िल होणे म्हणजे पडणे, लादलं जाणे या अर्थी. अर्थ साधाच आहे की ही एका दिवसाची गोष्ट असती तर तिला विसरलोही असतो. पण मनावर रोजच ही संकटं येणार असतील तर मी काय करू? खरं तर 'न विसरण्याची' कारणं स्वतःच स्वतःला देणं ही अवस्था या शेरात दिसते. समजून खेळ याला मी खेळलोही असतो पण रोजच्या अशा या खेळास अर्थ नाही शब भर को उनकी याद में तारे गिना किये तारे से दिन को भी नजर आए तो क्या करे तिच्या आठवणीत रात्रीही जागतो; आकाशातले तारे मोजत. आणि दिवसाही मग डोळ्यासमोर तारेच चमकतात. रात्रीच्या शीतलतेत स्वप्न बघितली जातात; पण दिवसाची प्रखरता जेंव्हा वास्तव समोर आणते, तेंव्हा दृष्टीला ते सहन होत नाही. दिवसा जिथे दिपावे डोळेच वास्तवाने रात्री अशात तारे बघण्यास अर्थ नाही अहद-ए-तरब की याद में रोया किये बहोत अब मुस्कुराके भूल ना जाए तो क्या करे अहद-ए-तरब म्हणजे चांगल्या दिवसांचं, सुखाचं वचन. 'सगळं नीट होईल'... कुणाच्या तरी अशा वचनाला आठवून खूप अश्रू ढाळून झाले. आता (ते सगळं खोटं होतं याची जाणीव झाल्यावर, आपल्याच फजितीवर) हसून ते विसरून जाऊ नको तर आणखी काय करू? रडलो कितीक त्याच्या वचनास आठवूनि हसतो कळून असल्या रडण्यास अर्थ नाही अब जी में है के उनको भुलाकर ही देख ले वो बार बार याद जो आए तो क्या करे तलत अज़ीज़ ने गायलेली एक ग़ज़ल आठवते, बहोत याद आए भुलाते भुलाते. त्यात एक शेर असाच आहे 'भुलानेकी तुमको निकालेंगे सूरत; बहाने बनेंगे बनाते बनाते' विसरायचं म्हटलं की ती व्यक्ती, ती गोष्ट अजून अजून आठवायला लागते. विसरण्यासाठी आठवावं लागणारच ना? याच व्हिशियस सर्कल मधे शायर अडकलाय. ठरवून टाकले मी विसरून जायचेही पण नित्य आठवून विसरण्यास अर्थ नाही वादे के ऐतबार में तस्कीं-ए-दिल तो है अब फिर वोही फरेब न खाए तो क्या करे सगळं कळूनही माणूस तीच चूक करतो. ठाऊक आहे की कुणीतरी दिलेल्या वचनामुळे मन उल्हसित आहे, मोदित आहे. पण याचीही कल्पना आहे की पुन्हा दगा मिळू शकतो. तरीही त्या ख-या/खोट्या आशेवर आनंदी राहण्यातच आनंद आहे. आहे जरी मला त्या वचनात समाधान मी जाणतो की असल्या वचनास अर्थ नाही ग़ज़लचा मक्ता, (म्हणजे शेवटचा शेर, ज्यात शायर आपली ओळख, तखल्लुस देतो) तर्क़-ए-वफ़ा भी जुर्म-ए-मुहब्बत सही 'अख्तर' मिलने लगे वफ़ा की सज़ाए तो क्या करे तर्क़-ए-वफ़ा - म्हणजे निष्ठेचा शेवट, प्रेमाची अखेर. प्रेम हा गुन्हा असेल, तर प्रेमाचा केलेला शेवट हाही त्या गुन्ह्याचाच म्हणजे प्रेमाचाच भाग झाला. पण त्या निष्ठेच्या शिक्षा मिळायला लागल्या तर मी काय करू? अंती कळून चुकले प्रेमास अंत नाही अंतास प्रेम 'अपूर्व' नेण्यास अर्थ नाही प्रेमात पडलेला माणूस, प्रेम केलेला माणूस दु:खाला चुकला नाही हे सत्य त्रिकालाबाधित आहे. असा कवी, असा लेखक विरळाच की ज्याने प्रेमावर कविता केली नाही. तुमचं आमचं सेम असलं तरीही ते वेगळंच असतं. म्हणूनच प्रेम या एका विषयावर आज अगणित साहित्यकृती अस्तित्वात आहेत, आणि त्या घडत राहतील. असो; जाता जाता अख्तर शिरानी यांचे काही अशारः आरज़ू वस्ल की रखती है परेशां क्या क्या क्या बताऊं मेरे दिल में है अरमां क्या क्या कुछ तो तनहाई की रातों मे सहारा होता तुम न होते न सही ज़िक्र तुम्हारा होता मेहदी हसन ने गायलेली 'मस्ताना पिये जा यूंही' ही ग़ज़ल यांचीच.
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 4016
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

नविन गज़ल कळाली. तुमची मराठी गजलही छान.

वादे के ऐतबार में तस्कीं-ए-दिल तो है अब फिर वोही फरेब न खाए तो क्या करे याचा अर्थ, दिलेल्या वचनावर विश्वास ठेवल्याने मन शांत(तस्कीं) तरी रहाते, आता ते ही परत धोका खायला तयार नाही, आता काय करू...असा वाटतो आहे... शायर "ति"ला विसरायच्या प्रयत्नांबद्द्ल लिहितो आहे असे वाटते, त्याचा एक मार्ग पुन्हा नव्याने प्रेमात पडणे. पण आता ते ही शक्य नाही कारण मन दुसर्‍यांदा प्रेमात पडायला तयार नाही, कुणावर विश्वासच ठेवायला धजावत नाही.

गझल आणि तिचा भावानुवाद खूप आवडला.

मूळ ग़ज़ल आणि तुम्ही केलेले रसग्रहण दोन्हीही खूप आवडले.

तुमचे सर्वच भावानुवाद मस्त आहेत तर्क़-ए-वफ़ा भी जुर्म-ए-मुहब्बत सही 'अख्तर' मिलने लगे वफ़ा की सज़ाए तो क्या करे याचा मला सुचलेला भावानुवाद (तुमचेच नाव वापरून ) जाणून घे अपूर्व, आहे गुन्हा अटळ हा होईल त्या सजेतून सुटण्यास अर्थ नाही

Unki yaad mey lagaaye tthe tanhaii ke gu.nche, Der na lagi inke gulzar ban gaey Meri kabr pe laate hain ab wahi.n se phuul taaje Ab woh yaad karkey hamey, toh iya kiije.

खुप सुंदर ऐ दिल वो आशिकी के फसाने कहॉ गए वो उम्र क्या हुइ वो जमाने कहॉ गए उजडे पडे है दश्त गजलो पे क्या बनी सुने है कोह्सर दिवाने कहा गए वो हिज्र मे वस्ल की उम्मीद क्या हुइ वो रंज मे खुशी के बहाने किधर गए दिन रात मैकदे मे गुजरती थी जींदगी अख्तर वो बेखुदी के जमाने किधर गए

अख्तर गजब थी अहदे जवानी की दास्तान आखो के आगे एक परीखाना आ गया खुदा ने बख्श दिए मेरे दिल को गम इतने की अब मै अपने गुनाहो पे शर्मसार नही आओ बेपर्दा तुम्हे जल्वा-ए-पिनहॉ की कसम हम ना छेडेंगे हमे जुल्फे परेशॉ की कसम