मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

निरोप........

एक एकटा एकटाच · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
आभाळही आज जरा भरुन आलयं डोळ्यांमध्ये आठवणींचा पाऊस दाटलायं विशेष असं काही नाही, फक्त आज एक बाप आपल्या मुलीला निरोप देऊन आलायं साताजन्मांची पुण्याई एकसाथ फळाला आली जेव्हा एक इवलिशी नाजुक परी माझ्या पदरी आली स्मरते तुझ्या चिमुकल्या बोटांची पकड घट्ट विश्वासावर जिच्या तुझी माझ्याशी नाळ जोडली गेली तुझ्यावर ठरवूनही कधी मला नाही चिडता आले तुझ्या लाडीगोडीने सदा माझ्या रागावर मात केली नाही घातला कधी तडजोडीचा लगाम तुझ्या हौसेला केवळ तुझ्या हट्टापायी लग्नाचीही सगळी सरबराई केली गोड बातमीची वाट बघता बघता वर्षे उलटली वांझपणाच्या ओझ्याखाली माझी छकुली दबून गेली तोंड दाबून बुक्क्यांचा मारा निमुटपणे सहन करताना 'आपला पप्पा अजुन जिवंत आहे' हे कसं बरं विसरून गेली ? दोष तुझा नाही, मीच आंधळा झालो होतो तुझ्या हसर्‍या नजरेतली व्याकुळता कधी दिसलीच नाही तुझे गप्प रहाणे ,तुझा पोक्तपणा समझलो पण ती वादळापुर्वीची शांतता होती हे कधी कळलेच नाही लहानपणी हट्टाने सोबतीने फिरणारा माझा बछडा आज इतक्या दूरच्या प्रवासाला एकटाच निघुन गेलाय बाकी विशेष असं काही नाही...फक्त आज एक बाप आपल्या मुलीला कायमचा निरोप देऊन आलायं........

वाचने 2052 वाचनखूण प्रतिक्रिया 10

अत्रुप्त आत्मा 30/06/2015 - 21:41
:(

तुडतुडी 01/07/2015 - 15:49
तोंड दाबून बुक्क्यांचा मारा निमुटपणे सहन करताना 'आपला पप्पा अजुन जिवंत आहे' हे कसं बरं विसरून गेली ?>>> टचकन पाणी आलं डोळ्यात . जगात फक्त आईवडील सोडून कोण कुणाचं असतंय ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 01/07/2015 - 16:23
कवितेतला आशय थेट पोहचला. -दिलीप बिरुटे
"वांझपणाच्या ओझ्याखाली माझी छकुली दबून गेली" स्त्रीलाच प्रत्येक गोष्टीचा दोष द्यायचं आपण कधीपासून सोडणार? कालच फेसबुकवर एका नरपुंगवाचा घाणेरडा जोक वाचला. डोक्यात अशी तिडिक उठली. त्याला त्याची लायकी दाखवून देणा-या क्मेंट्स टाकल्या. आणि त्याला ब्लॉक केला. त्यानं स्वतःच्या प्रोफाइल पिक म्हणुन एका अभिनेत्याचा फोटो टाकला होता. म्हणजे आपलं थोबाड ४ जणांनी बघायच्याही लायकीचं नाही याची त्याला खात्री असणार! तरीही स्त्री विषयक इतकी घाणेरडी कशी बोलू शकतात हे लोक?

कविता१९७८ 02/07/2015 - 11:47
तरीही स्त्री विषयक इतकी घाणेरडी कशी बोलू शकतात हे लोक?>> आणि हेच लोक स्त्रीमुक्ती , स्त्री स्वातंत्र्य आणि स्त्रीवरील अन्याया विरुद्ध होणार्‍या निषेधात भाग घेउन आपण कीती चांगले आहोत याचे प्रदर्शन करत असतात.

एक एकटा एकटाच 06/07/2015 - 16:20
सगळ्यांचे मनपुर्वक आभार