मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

.....पाऊस गात आहे .....

चुकलामाकला · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
विस्तीर्णशा नभाला सोडून जात आहे पाऊस भोवताली, पाऊस आत आहे ... ठरले कधीच होते, नयनी पुन्हा न पाणी मी कोरडा तरीही पाऊस न्हात आहे ... शब्दात लपविलेली दु:खे क्षणात कळती शब्दाविना सूरांनी , पाऊस गात आहे ... राजांस वाचवाया, खिंडीत झुंजलेला, रक्तात पेटलेला पाऊस ज्ञात आहे ... कर्जात बुडलेला, गळफास लावताहे आई जमीन त्याची, पाऊस तात आहे ...

वाचने 4310 वाचनखूण प्रतिक्रिया 23

मिसळलेला काव्यप्रेमी 23/06/2015 - 11:09
हे
शब्दात लपविलेली दु:खे क्षणात कळती शब्दाविना सूरांनी , पाऊस गात आहे ..
आणि हे
कर्जात बुडलेला, गळफास लावताहे आई जमीन त्याची, पाऊस तात आहे ...
खासचं

वेल्लाभट 23/06/2015 - 13:06
टेक अ बो ! केवळ अप्रतिम ! शब्दच नाहीत..... एक अन एक शेर खलास.

In reply to by दमामि

वेल्लाभट 23/06/2015 - 15:04
वाह. राहवत नाही म्हणून... झाले कठीण सारे काही विकल्प नुरला जमले तसे करूनी मॅगीच खात आहे

In reply to by वेल्लाभट

चुकलामाकला 24/06/2015 - 10:01
:):)

In reply to by वेल्लाभट

आमचेयेथे मॅगीचे चार पुडे उरले आहेत. एकावर तिन फ्री. कुणाला हवेत तर व्यनि करा. कुर्डुवाडी कट्ट्याला घेऊन येईन.

वेल्लाभट 23/06/2015 - 14:53
आता न दाबतो मी, ओठांत भावनेला ही मीच काढलेली माझी वरात आहे का नाव गाव रूप, का शब्द कुणी तोला वृत्तीत धर्म माझा, ह्रदयात जात आहे

विशाल कुलकर्णी 25/06/2015 - 16:43
छानच गझल... मक्ता तेवढा सुधारून घ्याल. मक्त्याच्या उला मिसर्‍यात एक मात्रा कमी पडतेय, त्यामुळे वृत्तभंग होतोय. :)

In reply to by चुकलामाकला

वेल्लाभट 25/06/2015 - 16:57
कर्जात बुडाला जो, गळफास लावताहे आई जमीन त्याची, पाऊस तात आहे किंवा कर्जात बुडालेला, गळफास लावताहे आई जमीन त्याची, पाऊस तात आहे

In reply to by चुकलामाकला

विशाल कुलकर्णी 26/06/2015 - 09:23
हा हे बरोबर आहे आता. सर्व कडव्यांची लगावली "गागाल गालगागा गागाल गालगागा' अशी आहे. फक्त 'कर्जात बुडलेला.... मध्ये "गागाल ललगागा गागाल गालगागा" झाला होतं :)

In reply to by वेल्लाभट

विशाल कुलकर्णी 26/06/2015 - 09:25
वेल्लाभट, तुम्ही दिलेला पर्याय मात्रावृत्ताच चालु शकेल. पण ही गझल अक्षरगणवृत्तातली आहे, त्यामुळे इथे शब्दांचा क्रम समानच हवा. :)

सटक 25/06/2015 - 18:06
सुंदर! राजांस वाचवाया, खिंडीत झुंजलेला, रक्तात पेटलेला पाऊस ज्ञात आहे ... क्या बात!

यशोधरा 25/06/2015 - 21:31
राजांस वाचवाया, खिंडीत झुंजलेला, रक्तात पेटलेला पाऊस ज्ञात आहे ... कर्जात बुडलेला, गळफास लावताहे आई जमीन त्याची, पाऊस तात आहे ..