मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तुम्ही अनावर व्हा....

शिव कन्या · · जे न देखे रवी...
रणरणत्या दुपारी एक पक्षी सिमेंटच्या गॅलरीत आला. तहानेने हा हा करीत होता. ‘ तहान तर संपत नाही. सहन काहीच होत नाही. उडू कसा, जगू कसा? एक झाड सापडत नाही!’ मी म्हणाले, ‘रहा माझ्या घरात!’ काचेच्या तावदानावर चोच मारीत म्हणाला, ‘आमच्या बापजाद्यांनी ते ही केलं. आरशांच्या मागे, दाराखिडक्यांच्या वर, अगदी तुमचे संडासबाथरूम ही सहन केले. आता, घरांनाही तेवढे उबदार कोपरे राहिले नाहीत.’ कोरडे डोळे पाणावत जराशाने म्हणाला, ‘भर दुपारी, निष्पर्ण वृक्षावर अंडी घालायची हिम्मत आता होत नाही. इतकं उडून दूरदुरून अन्न पाणी आणण्याची शक्ती आमच्यात आता राहिली नाही. आम्हाला सुखाने मिटू द्या. अखेरच्या श्वासासाठी एखादे पान शिल्लक ठेवा. तसेही, चोची घाशीत किती जगायचे! आम्ही मरू आणि सुटू. आम्ही संपलो, आमचा वंश संपला. आमचा वंश संपला, आमची जमात संपली. या पृथ्वीवरचा आमचा अंश संपला! तुम्ही सुखेनैव जगा. वाढू देत तुमच्या वंशावळी. ----- अगणित व्हा. अनावर व्हा.’ मी विनवले, ‘ इतका निष्ठूर होऊ नकोस. शापवाणी उच्चारू नकोस.’ कसलंसं हसून म्हणाला, ‘ बाई,इवल्याशा पाखराचा कलरव शाप होत नाही. अरे, आम्ही उगीच इथे बोलत बसलो! खरंतर ज्या दिवशी आमचा जोडीदार परतला नाही, त्याच दिवशी आमचेही पंख मोडीत निघाले आत्ता दिसतेय ती केवळ फडफड!’ एवढे बोलून पक्षी उडून गेला........ काचेचे तावदान तडकलेले आहे.

वाचने 1387 वाचनखूण प्रतिक्रिया 3