मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एका नव्या इतिहासाची सुरुवात ( अंतिम )

सस्नेह · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
पूर्वसूत्र : एका नव्या इतिहासाची सुरुवात -१ एका नव्या इतिहासाची सुरुवात -२ एका नव्या इतिहासाची सुरुवात -३ एका नव्या इतिहासाची सुरुवात -४ नऊ महिने अगदी सुरळीतपणे पार पडले. तणावाच्या छायेखालूनही तिच्या गौर तनूचे असामान्य गर्भतेज लपत नव्हते. काळोखाचा पडदा दाट झाला आणि ज्या क्षणाची दोन्ही पातळ्यांवर उत्कंठापूर्ण प्रतीक्षा होती, तो अखेर येऊन ठेपला ! अकलिप्ताला प्रसववेदना सुरु झाल्या. शांतन्यने गाडी काढली आणि आईच्या सोबतीने तिला दवाखान्यात नेले. डॉक्टर अन नर्सेसची धावपळ उडाली. प्रसववेदना हा अनुभव तिला नवीन होता. वेदनांचे लोळ कोसळत आले..एक एक कळ आकांत माजवून जाऊ लागली. सर्वच ‘मानवी’ अनुभव जरी तिला नवीन असले, तरी या वेळी तीव्रपणे जाणवणारी, पायाखालचा आधार सुटल्याची भावना तिलाही हादरवून गेली ! ...आणि एक क्षण असा आला की तिला सर्व सृष्टीचक्राचा तोल गेल्यासारखे वाटले. डोळे उघडले तरी अंधार मिटेना. जणू ती तारका-चक्रातून अनंत अवकाशाच्या पोकळीत दूरवर भिरकावली जात होती. काही आकार तिच्या आसपासच्या आसमंतातून जवळ येत होते. त्या दीप्तिमान मुद्रा...कुठे बरं पाहिल्या आहेत.... ? बुद्धी, स्मृती, धैर्य काम करेनाशी झाली अन तिने हताश होऊन सर्व प्रयत्न सोडून दिले ! ...ते चेहेरे, ती प्रकाशांकित अस्तित्वे, तिला काहीतरी सांगू पाहत होती. वेदेनेच्या कल्लोळातूनही तिला ते जाणवले. पुन्हा एकदा सर्व शक्ती एकवटून तिने त्या संवेदनांना मन खुले केले आणि त्यांचे शब्द ( ? ) तिच्या मनात उमटू लागले. ‘अकलिप्ता, तुला आणखी एक संधी दिली जात आहे..’ ‘होय, तुझ्या इच्छेप्रमाणे होईल. तू आणि वृत्तार-८ नव्या इतिहासासाठी निवडले गेले आहात...’ ‘मी, यास्थज्ञ, युगशास्ता , तुला तुझ्या विहित कार्यात यश चिंततो..!’ ...ताण जणू असह्य झाला आणि त्याच क्षणी अवकाशाच्या दूरवरच्या एका टोकावर एक नि:शब्द स्फोट झाला. ...तिने एका दैदिप्यमान पुत्राला जन्म दिला ! --**--**-- कसलीही जीवसृष्टी अन सृजनाची क्षमता नसलेल्या दूरवरच्या त्या ताऱ्याच्या, एका प्रलयकारी स्फोटासरशी अगणित ठिकऱ्या झाल्या आणि अनंत अवकाशात दूरवर भिरकावल्या गेल्या. त्या स्फोटाची कुठल्यातरी पातळीवर सूक्ष्म नोंद घेतली गेली. ..करडा अवकाश आता यशाची शुभ्र धवल, समाधानाची सोनेरी, संतोषाची गहिरी निळी, अशा अनेक विस्तृत छटांनी झगमगू लागला. ‘योजना यशस्वी झाली आहे, महाराज !’ ‘हम्म.. ! ती आता येणार नाही तेव्हा काही प्रहर पर्यंत तिचे इथले कार्य अंगिराकडे सोपवा...’ ‘होय, महाराज.’ ‘..वृत्तार-८ चेही कार्य काही काळ इतरांमध्ये विभागून द्या. ’ ‘होय’ ‘पुढची छेदरेषा आणखी सुमारे नऊ प्रहरांनी म्हणजे तिथल्या पंचेचाळीस वर्षांनी आहे. तोपर्यंत अकलिप्ताचे तिथले कार्य पूर्ण होईल. वृत्तार-८ ला मात्र आणखी सात प्रहर व्यतीत करावे लागतील, महाभारताची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी ! त्यांनतर त्याच्या पुनरागमनासाठी छेदरेषेची योजना आणि उर्जानिर्मितीची व्यवस्था आतापासूनच करावी लागेल.’ ‘जशी आज्ञा, महाराज ! ’ ‘मी आता स्वामींना याचा वृत्तांत देण्यासाठी प्रस्थान करत आहे.’ अवकाशातले रंग, गंध, नाद निमाले. करड्या मेघाच्या अंतरंगात खोलवर एक समाधानाची सोनेरी छटा विलसली अन विरून गेली. काही तारका झोपेतून जाग्या झाल्याप्रमाणे लुकलुकल्या. कृष्णमेघांमध्ये सोनेरी सूर्यकिरणांचे कवडसे लकाकले . फुलपाखरांना रंगीत स्वप्ने पडली. ....काही पळे थांबलेले एक अव्याहत चक्र पुन्हा सुरु झाले. ..**..**.. पुत्रजन्माचा आनंद शांतन्यच्या नजरेत मावत नव्हता. आई तर नातवाचे आगळेवेगळे तेजस्वी रूप पाहून भान हरपून गेली. ...नुकतीच शुद्धीवर आलेल्या अकलिप्ताने एकवार आपल्या, त्रिभुवनात एकमेव असलेल्या सानुल्याला डोळे भरून पाहिले अन छातीशी लावले. एका आगळ्या वेगळ्या मंगल भावनेने तिचे हृदय भरून गेले. बाळाच्या परिचित भासणाऱ्या चेहेऱ्याकडे ती अतीव हर्षाने पाहू लागली. त्याच्या निळ्या नितळ डोळ्यात ओळख शोधू लागली. त्याचा तेजस्वी चेहेरा मन भरून पाहताना सहजच तिच्या ओठावर शब्द आले... 'देवव्रत असताना तुला घडवू शकले नाही आणि ते अनर्थकारी महाभारत घडले. पण आता अकलिप्ता होऊन त्या चुकीची भरपाई करणार आहे, रे राजसा ! तू आणि मी एक नवा इतिहास घडवणार आहोत...तयार आहेस ना वृत्तार-८ .. ?' ...एक नवा इतिहास घडवण्याचे त्याचे सामर्थ्य अन त्यासाठी 'त्याला' घडवण्याचे, तिला दिले गेलेले आव्हान तिने स्वीकारले होते ! ( समाप्त )

वाचन 20222 प्रतिक्रिया 0