Skip to main content

सोराक

लेखक दिपक.कुवेत यांनी सोमवार, 06/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
सोराक हि गोवन लोकांची एक पारंपारीक, साधी, सोपी ओला नारळ घालून केलेली एक लाल ग्रेव्हि आहे जी खासकरुन पावसाळ्यात करतात. कोसळणार्‍या पावसात जेव्हा ताजी मासळी मिळणं दुरापास्त असतं तेव्हा अश्या वेळी सुखी मासळी आणि जोडिला हे कालवण करतात. व्हेजवाले ह्यात त्यांच्या आवडिच्या भाज्या (उदा. बटाटा - हिरवी सिमला मिरची, तोंडली, फरसबी ई.) घालू शकता पण हे असचं प्लेन मस्त लागतं (स्वानुभव आहे!!!). खरं तर हे सोराक भाज्या घालून किंवा न घालताहि छान लागतं...पण ते दुसर्‍या दिवशी अधीक चवदार लागतं कारण कच्च्या कैरीचा आंबटपणा पुरेपुर उतरतो. sorak 1 साहित्यः १. खवलेलं ओलं खोबरं - १ बाउल २. लसुण ३ पाकळ्या ३. कांदा - १ मध्यम वाटणासाठि आणि १ मध्यम चिरलेला ४. सुख्या लाल मिरच्या (बिया काढलेल्या) - ४ ते ५ ५. तिखट - १ चमचा, हळद - पाव चमचा ६. मसाला - २ चमचा ७. मधुन चिरलेल्या हिरव्या मिरच्या - ३ ८. टोमॅटो - १ मध्यम चिरलेला ९. जिरं - १ चमचा १०. आख्खे धणे - २ चमचे ११. कच्च्या कैरीच्या फोडि - ६ १२. तेल - १/२ वाटि (चित्रात कमी आहे पण नंतर जास्त घेतलं) १३. चवीनुसार मीठ, बारीक चीरलेली कोथींबीर sorak 2 कॄती: १. मिक्सर मधे ओलं खोबरं, १ कांदा, टोमॅटो, धणे, जीरं, सुख्या लाल मिरच्या आणि लसुण घालुन गरजेप्रमाणे पाणी घालुन मुलायम वाटुन घ्या sorak 3 २. मंद आचेवर एका नॉनस्टिक कढईत तेल तापलं कि चिरलेला कांदा आणि हिरव्या मिरच्या घालुन कांदा मउ होईस्त परतत रहा. आता वाटलेली पेस्ट घाला. एक ५ मि. हळद, तिखट आणि मसाला घालून बाजुच्या कडेने तेल सुटेस्त पेस्ट सतत परतत रहा. आता आंब्याच्या फोडि घालून त्या मउ होईस्त परतुन घ्या. sorak 4 sorak 5 ४. चवीप्रमाणे मीठ आणि गरजेप्रमाणे पाणी घालुन मंद आचेवर एक ५-७ मि. ग्रेव्हि उकळू द्या. ५. ५-७ मि. गॅस बंद करुन गरमागरम सोराक वाफाळणार्‍या भातासोबत वाढा. sorak 6 टीपा: १. जोडिला वांग्याचे काप, लोणचं/पापड हा बेत फक्कड जमेल - गोड कोळाच्या शेंगांची तिखट बाजु :) २. कच्ची कैरी न मिळाल्यास आंबटपणासाठि चिंच किंवा कोकम घालू शकता

वाचने 17326
प्रतिक्रिया 48

प्रतिक्रिया

व्वा! अत्यंत चवदार आणि नेत्रसुखद कालवण. केल्याशिवाय कसा राहीन? लवकरच.

In reply to by विजुभाऊ

चिंच भिजत घालावी लागेल. काहि ठिकाणी चिंच वाटणातहि घालतात. कोकमं पेस्ट बरोबर वाटायचं झाल्यास अगदि १ घ्या नाहितर करी फार आंबट होईल आणि कदाचीत रंगहि बदलेल. आख्खे घातल्यास २-३ घालू शकता पण मग दुसर्‍या दिवशी पर्यंत ठेवु नका...आमसुलं कच्च्या कैरीच्या मानाने फार आंबट असतात. नाहितर दुसर्‍या दिवशी दात फार आंबतील :D

In reply to by कंजूस

तिरफळांचा वापर कोकणी/मालवणी जेवणात मुख्यत्वे होतो/करतात. गोवन करीज मधे तिरफळं निदान मी तरी अजुन पाहिली नाहियेत.

In reply to by दिपक.कुवेत

बांगड्याचे हुमण आणि भाज्यांचे खतखते तिरफ़ळे घालूनच करतो आम्ही. शिवाय गोव्यातली पाकृ आणि मिरी कुठे गेली?

In reply to by पैसा

अगं तु घालत असशील कि मी कुठं नाहि म्हटलयं. आमच्या ऑफिस मधे जे गोवन त्यांच्याबद्दल बोलतोय मी. काळी मिरी होती पाकृत पण आधीच मसाला/तिखट असल्याने तिला फाटा दिला.

In reply to by दिपक.कुवेत

तिरफळे मिळत नसतील तिकडे. आणि मिरी घालून पुन्हा एकदा करून बघ, जास्त चांगले होणार!

In reply to by पैसा

आहेत गं. ह्या वेळी भारतातुन येताना एक पाकिट आणलं आहे आणि मिरी घालून आता परत एकदा करुन पाहिन.

मस्त. पुर्वी खाल्लेली आहे. उडदा-मेथीच्या आमटीची, कोयांडाची पण पाकृ टाक जमेल तेव्हा. चुलत आजी मस्त करायची हे प्रकार. खासच

अयोयो!! काय कलर आलाय वो!! तुमच दुधी-सोडे दादल्याला लय आवडलयं. (पोर सुक्कट म्हंटल की तोंड वाकडी करतात) आता ह्ये बी शिजवुन पाह्यते.

अगदी तों.पा.सु. पाककृती.

यात असलेला मसाला कसला आहे. काळा मसाला किंवा गरम मसाला दिसत नाहिय्ये. घरी नेहमी असतो तो कांदालसूण मसाला घालायचा म्हणले तर सोबत तिखट आणि मिरच्या सुद्धा दिलेल्या आहेत.

In reply to by विजुभाऊ

अहो हा मसाला स्पेशल अश्याच रश्श्यांचा आहे (विकन, मटण, फिश). मागे स्नेहातै / जागु नी ह्या मसाल्याची डिट्टेल पाकृ दिलेली. जागु च्या माश्यांच्या पाकृ मधे बघा हा मसाला असतोच असतो. ग्रेव्हि ईतकि टेम्टींग होते ना....काय विचारु नका.

In reply to by दिपक.कुवेत

जागुताईंनी पाककृती दिलेला हा मसाला वापरलाय का? बाकी भन्नाट रंग आलेला पाककृतीतला हा रस्सा करण्याचा प्रयत्न नक्की करण्यात येणार! धन्यवाद!

In reply to by बहुगुणी

हाच मसाला. पण आमच्या काय घरी करत नाहि सो भारतवारी झाली कि येताना ह्या मसाल्याचं एक मोठं पाकिट घेउन येतो. एरव्हि उसळि वैगैरे पण मस्त चविष्ट होतात.

मिपा प्रथेप्रमाणे सोमवारी नविन पाकृ आलेली बघुन धन्य झालो. :) पाकृ आणि फोटो लई आवडले.

दिपक शेफ अभ्यास नीट करा. भारतात चार पाच राज्यांत होम स्टे घ्याच. बाकी मांडणी सादरीकरण यात तुमचा हात धरणारं कोणी असेल असं वाटत नाही. आणखी एक आक्षेप पण तो व्यनीतून.

बुम !! कल्ला !! रापचिक !! जहबहराट !!

अपर्णाचं बरोबर आहे यात सोडे टेस्टी लागतील. पावसाळ्यात कैर्या कुठे मिळाल्या ?

हा सोराक शब्द म्हणजे बहुतेक 'शिवराक' चा गोवन क्रिस्टिअन उच्चार असावा. गोव्यात आणि दक्षिण कोंकणात मांस-मासेविरहित अश्या जेवणास 'शिवराक' म्हणतात. अर्थात त्यात कांदा-लसूणही नसते. क्रिस्तिअनांमध्ये कदाचित फक्त मासळीविरहित किंवा फक्त ताजी मासळीविरहित जेवणास सोराक म्हणत असावेत.

In reply to by राही

आमच्या ऑफिसातल्या ख्रिश्चन शिपायाने मासे शिवराक म्हणून सांगितले होते. दारू पण शिवराक म्हणे. फक्त चिकन, मटण मांसाहारात जमा. =))

तुमच्या बरोबरच्या डोंबोलीतल्या ३० दिवस सतत होणार्‍या कट्ट्याच्या पदार्थांत अजून एका पदार्थाची भर पडली..

व्वा. करून बघणार आता.

आवडेश करण्यास सोपी व दिसण्यास लय भारी