दिसली समद्यांना ...

आतिवास जनातलं, मनातलं
आयने हाक मारली, लगीच उटले आज. शाण्यासारखं पटापट आवरलं. दोन वेण्या घालून दिल्या आयने. साळंत जाऊन पयल्या रांगेत बसली. परारथनेला डोळे बंद. समदी बोल्ले. गुर्जीनी सांगितलेले पाडे बराबर लिवले. पाटीवर बेश मोर काडला. गुर्जी हसले. अंक्या, भान्या, निम्मी .. समदी होती. रोजच्यावानी. गुर्जी म्हन्ले, “आज आन्जी एकदम शहाणी मुलगी झालीय. आज तिला कविता म्हणायला सांगू.” म्या पुडं आले, कविता बराबर बोल्ली. जाग्यावर जाऊन बसली. मंग रडू यायलं. गुर्जींना काई समजना. मंग खाल मानेनं म्या हळू माज्या रिबनीचं फूल ओडलं. “ओ गुर्जी, आन्जीची नवी रिबन बगा, कसली लाल हाय...” राज्या म्हन्ला. समदे आले भवती. कवाधरनं ती दावत व्हते! दिसली आता समद्यांना! * शतशब्दकथा
वर्गीकरण
लेखनप्रकार

51 टिप्पण्या 21,705 दृश्ये

Comments

आदूबाळ नवीन

छानच! अटेन्शन सीकिंगची आन्जीची ऐड्या भारीच आहे.

रेवती नवीन

कसली गोड आहे ती! बर्‍याच मुलींना लहानपणी मोठे केस असण्याची व त्याला रिबन बांधण्याची हौस असते, मलाही होती. ही ही, एकदम गोड वाटले.

काउबॉय नवीन

आन्जी भेट्ल्याने बरं वाटल...! अगदी तसच बरं जस आन्जिला तुम्ही मोझाम्बिकहुन परतल्यावर वाटलं असेल ;)

चित्रगुप्त नवीन

अतिशय सूक्ष्म-भावदर्शी, हळुवार, मजेदार लेखन.

प्रभाकर पेठकर नवीन

आन्जीच्या शुद्ध आणि निरागस हेतूने मन कौतुकाने भरून आले. आन्जीची लाल रिबन आवडली सांगा, तिला.

ज्ञानोबाचे पैजार नवीन

निरागस अंजी.... तिचा सांगा हा निरागस पणा असाच जपुन ठेव, पैजारबुवा,

स्पंदना नवीन

माझी बाय ती! नव्वी नव्वी रिब्बन घातली का? मस्तच हो! आन्जीला सगळच शोभुन दिसत.

चिगो नवीन

आंजी मंजी एकदम ब्येष्ट.. लै मंजे लैच गोड पोरगी हाय, बघा..

सविता००१ नवीन

ही आन्जी खरच खूप गोड आहे. लहानपणात घेउन जाते लगेच...

प्यारे१ नवीन

In reply to by बॅटमॅन

लंपनची कौटुंबिक पार्श्वभूमी थोडी चांगली आहे, ब्राह्मणी तोंडवळा आहे. अनुभव विश्व सीमित आहे आणि लंपन प्रचंड निरागस आहे. त्यामानानं आन्जी गरीब घरातली नि बहुजन वर्गातली आहे, गरीबीमुळं आलेला थोडा वेगळा थोडासा निलाजरा बेरकेपणा (चाबरट म्हणतात तसं. पण दुसर्‍याचं नुकसान न होईल इतपत) ही आन्जीची वैशिष्ट्यं. हे मला जाणवलेलं. चुक बरोबर ठाऊक नाही. लेखिका अधिक भर घालतीलच.

बॅटमॅन नवीन

In reply to by प्यारे१

हम्म, अगदी नेमके आहे. लंपनने ते विश्व जसे उभे केले तसेच आंजीने हे वेगळे विश्व उभे केले या अर्थी म्हणालो इतकेच.

आदूबाळ नवीन

In reply to by प्यारे१

लंपनचं अनुभवविश्व सीमित? सायकलचं दुकान असणार्‍या दोस्तापासून ते जुगारापर्यंत ते जवळच्या माणसांच्या वियोगापर्यंत असं विस्तृत अनुभवविश्व लाभलं आहे लंपनला. बाकीबद्दल अर्थातच सहमत आहे. लंपनप्रमाणेच आन्जीही पुस्तकरूपात यावी हे जुनंच टुमणं / हट्ट / मागणी यानिमित्ताने परत नोंदवतो.

बहुगुणी नवीन

In reply to by आदूबाळ

आन्जी पुस्तकरूपात यावी हे जुनंच टुमणं / हट्ट / मागणी यानिमित्ताने परत नोंदवतो. इथे मिपावरच अभिजित (अभ्या) सारखे अप्रतिम कुंचलेकार उपस्थित आहेत आन्जीला चित्रबद्द करायला, एक सुंदर 'कॉफी टेबल बुक' तयार होईल. मनावर घ्याच.

बॅटमॅन नवीन

In reply to by आदूबाळ

हम्म, रैट्ट सार. अन टुमणे/हट्ट/मागणी याबद्दल सहमत आहे हेवेसांनल. ग्रामीण साहित्य या रूपात पुढं आलं तर अजून मज्या यील.

आतिवास नवीन

In reply to by बॅटमॅन

लंपनप्रमाणेच आन्जीही पुस्तकरूपात यावी हे जुनंच टुमणं / हट्ट / मागणी यानिमित्ताने परत नोंदवतो. मान्य आहे. पण ते कधी होईल ते माहिती नाही, होईल का नाही हेही सांगता येत नाही. पुस्तक काढायचं तर पुरेशा कथा (किमान ५० तरी माझ्या मते) लिहायला हव्यात. उगाच आकडा गाठायचा म्हणून लिहित सुटले तर त्या कथा कंटाळवाण्या होतील एरवी या कथा आवडणा-या वाचकांनाही. त्यामुळे आपली मागणी लक्षात आहे पण पुरवठा कधी होईल ते मात्र सांगता येत नाही :-)

विजुभाऊ नवीन

ब्याटमुनी तुमचे विचार करणे सुयोग्य आहे. अन्जी पहिल्यान्दा वाचली तेंव्हा अस्मादिकंच्या मस्तकातदेखील हेच विचार रुंजी़ घालत होते.

डॉ सुहास म्हात्रे नवीन

सरस ! वाचकांच्या मनात आंजीची व्यक्तीरेखा (अगदी स्वभावासकट) तयार झाली आहे... यापेक्षा लिखाणाचे जास्त यश ते काय असणार ?

आतिवास नवीन

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार!

सखी नवीन

आवडली हीपण शतशब्दकथा, आन्जी तर नेहमीच आवडीची.

आयुर्हित नवीन

अप्रतिम लेख! लई हुश्शार आहे बघा ही आंजी!