मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

थरार : नको इतका जवळून !!

चिगो · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
धिक्कार ते अधिकार नावाची माझी लेखमाला मिपावर यायला आता चार वर्ष झालीत. ह्या चार वर्षांत मिपाच्या आणि माझ्या आयुष्याच्या पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. "अधिकारानंतरचं वाचायला उत्सुक आहे" म्हणणारे श्रामो आणि यकु माझे हे अनुभव वाचायला नाहीत, ही बोचही आहेच. पण आयुष्याच्या पुलाखालून वाहणार्‍या ह्या पाण्यात रक्ताचा गढूळ रंग आता मिसळायला पाहतोय म्हटल्यावर विचार केला की चला, काही अनुभव लिहून ठेवुयात.. किसे पता, कल हो ना हो ! ----------------------------------------------------------------------------------------- मेघालयात सव्वा वर्षं काम केल्यावर शेवटी साहेबानी साऊथ गारो हिल्स नावाच्या, अगदी बांग्लादेशच्या सीमेवर असलेल्या जिल्ह्यात जिल्हाधिकार्‍यांच्या खुर्चीवर आपलं बुड टेकवलं. इथे येण्याआधीच त्याला इथल्या खटपटी, लटपटींची माहिती मिळालेली होती. भारत-बांग्लादेश सीमेवर घातलेल्या कुंपणाच्या भुमी अधिग्रहणात, लोकल हिल कौंसिलने जी जबरदस्त किंमत लावली होती, ती पाहिल्यावर "विकेंद्रीकरणामुळे आणि जनतेच्या सहभागामुळे भ्रष्टाचारास कसे बळ मिळते" ह्याची खात्री पटावी. पंधरा एकर जंगली जमिनीची किंमत तब्बल साडेबावीस कोटी! जर त्या जमिनीवर असलेल्या झाडांची संख्या मोजली, तर दर वर्गफुटाला दिड झाड येईल. म्हणजे एका डायनिंग टेबलवर २५ झाडे ! आल्याआल्या साहेबाला "हे लैच इंपॉर्टन्ट हाये, बघा.. जनता आंदोलन करायचं म्हणतीय." असं म्हणून सह्या ठोकायला लावण्याचा प्रयत्न झाला. सरकारी कामात "नाही" म्हणून चालत नाही. त्यातल्या त्यात जनता जनार्दन.. मग साहेबानी धाडले पत्र शेतकी विभागाला आणि वन विभागाला की बाबा, ह्या ह्या झाडांची नियोजीत आणि जंगली वाढ झाल्यास दर एकरी किती झाडे असतील? दिड वर्ष व्हायला आलीत, अजून उत्तर नाही.. दरम्यान, हायकोर्टात धावूनही झालं "पिडीतांचं". पण कोर्टासमोर खोटेपणा करताहेत हे सिद्ध केल्याने चरफडत केस परत घ्यावी लागली. जिल्ह्यात कोळसा भरपुर.. "पारंपारीक अधिकारां"च्या नावाखाली आपापल्या जमिनीत कोळश्याच्या खाणी चालवायची परवानगी दिलीय नोकमांनी. (नोकमा म्हणजे गावाचा मुखिया) ह्या खाणकामावर कुणाचंच नियंत्रण नाही. साहेब आल्यानंतरही ३-४ अपघात झाले. साहेबानी ह्या अपघातांची जबाबदारी आणि त्यांना रोखण्यासाठी काय केल्या जाऊ शकते, ह्याचा धुंडाळा घ्यायचा प्रयत्न सुरु केला. पण ह्या खाणींचा आणि त्यातल्या अपघातांचा कुणीच वाली नाही, म्हणे. म्हणजे खाण-खनिज विभाग आहे. तो रॉयल्टीपण घेतो, पण खाणी कशा चालतात ह्याची जबाबदारी त्यांची नाही. कामगार विभाग म्हणे, साहेब, खाणी नोंदवलेल्या नाहीत त्यामुळे आमची जबाबदारी नाही. एकंदरीत चेंडू इकडून तिकडे टोलवल्या जात होता.. शेवटी, साहेबानेच शहाणपणा करायचे ठरवले, आणि CrPC च्या कलम १३३ अंतर्गत कोळसा खाणींना "डेंजरस प्रोफेशन" म्हणून खाणकाम करायला बंदी आणली. त्याला इतिहास होता तो पावसाळ्यात खाणी खचून होणार्‍या अपघातांचा आणि मृत्युंचा.. झालं, ही ऑर्डर आल्याआल्या बोंबाबोंब सुरु झाली. पहील्यांदा फोन आला तो आमदारांचा.. "साहेब, पहिलेच आहात का तुम्ही इथं येणारे? आणि काय पहिल्यांदाच अपघातात मरुन राह्यलेत काय लोक? हे असं होतच असते, साहेब.." साहेब भो@#डीचा अडेल! म्हणे, "पहिल्यांदाच नसेल होत, पण मी असतांना नाही चालणार.." आत्ता? पुन्हा आले ना आपले "पिडीत" ! "अरे साहेब.. ह्याच्यावरच तर पोटपाणी आहे आमचं.. आता आम्ही खावं काय? आणि हे असे अपघात झाल्यानंच कळते आम्हाले, जड मशिनरी वापरतांना काय काळजी घ्यावं ते ! आणि तिकडे जैंतिया हिल्समधेही तर होतात अपघात. मग आम्हा गारोंवरच अन्याय का?" साहेब साला ढिम्मच.. मग काही दिवसांनी दुसरा पवित्रा. "साला हा साहेब आमच्या रितीरीवाजांना, अधिकारांना मानत नाही. ह्याचा हा निर्णय म्हणजे आमच्या अधिकारांची पायमल्ली आहे. आम्ही ह्याच्या विरोधात प्रदेशव्यापी असहकार आंदोलन, बंद करु." साहेब साला मानेचना. शेवटी कामगारांच्या सुरक्षिततेचे उपाय, नियमीत यंत्रतपासणी आणि अपघातग्रस्तांना/मृतांना मदत इत्यादी गोष्टी मान्य केल्यावर पावसाळा संपल्यावर, जवळजवळ डिसेंबर महीन्यात साहेबानी आपली ऑर्डर सशर्त मागे घेतली.. (कायदेशीररित्या जे केलं, तेदेखील करायची पॉवर नाहीय. कदाचित "शॉक फॅक्टर"वरच एवढं काही करता आलं, हे साहेबाला नंतर बड्या साहेब लोकांनी सांगितलं..) तसंही ऑर्डर काढली म्हणजे तिची काटेकोरपणे अंमलबजावणी होईलच, असेही नाही. शेवटी साहेब काही दांडकं घेऊन प्रत्येक ठिकाणी जाणार नव्हताच. त्यामुळे जंगलातल्या निबीड भागात खाणकाम सुरु होतंच. तश्यातच जून महीन्यात बाजूच्या जिल्ह्यात एका मुस्लिम मजुराला कुठल्यातरी गारो मुलीची छेड काढल्याच्या कारणावरुन जमावाने मारपीट करुन हत्या केली, आणि साहेबाच्या बुडाखाली आग लागली. सगळ्या जिल्ह्यातून मुस्लिम मजुरांना जमा करुन त्यांच्या जवळच्या पोलिस स्टेशनला न्या, तिथे त्यांचे पत्ते नोंदवून त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करून त्यांना गाड्यांमधे भरुन आसामातल्या त्यांना हव्या त्या ठीकाणावर सुखरुप पोहचवा, हे सगळं सुरु झालं. तीन-चार दिवसांत जवळपास ३००० मजुरांना (अख्ख्या जिल्ह्याची लोकसंख्या जेमतेम दिड लाख! हसू नका.) असं सुखरुप पोहचवून झाल्यावर २३ जूनला साहेबांना आमदाराचा फोन "साहेब, आम्ही आमच्या इलाकातल्या सगळ्या लोकांना सांगितलंय की सगळ्या मजूरांना सुखरुप पोचवायचं. सी.एम. साहेबांनी सांगितलंय की कुणाला काही व्हायला नको. आम्ही पुर्ण मदतीला तयार आहोत, साहेब.." बरं ब्वॉ! आता टेंशन संपलं असेल, म्हणून साहेब सुस्कारा सोडतो न सोडतो, तोच... एका सकाळी साहेबाला एस.पी.चा फोन. " जवळच्या एका भागात खोल जंगलात आठ मुस्लिम मजुरांना कापून मारलंय. सगळ्यांचा पगारही लुटण्यात आलाय आणि ८० हजार रुपयांचा दरोडापण झालाय. पोलिस तपास घेत आहेत." झालं, साहेबाच्या पायाखालची जमीन सरकली. आठ मजुरांचा निघृण खून? गळ्याखाली थूंकीपण उतरेना.. जातीय तणावापायी हत्या म्हणाव्या तर रिअ‍ॅक्शनची भिती. दरोड्यापायी हत्या म्हणाव्या तर केवळ ८० हजार रुपयांसाठी एवढ्या लोकांच्या मृत्युचं काय स्पष्टीकरण देणार? तिकडे आमदाराची तंतरलेली.. त्याला मुख्यमंत्र्यांना जाब द्यायचा होता. इकडे गृहमंत्री बाई साहेबाला म्हणतेय की आम्हाला कंपेंसेशन तर द्यायचंय, पण जातीय तणावापायी हत्या झाल्याचं सांगून टेंशनपण वाढवायला नकोय. मायला, म्हणजे चित मैं जिती और पट तू हारा! आसामवाले म्हणताहेत, की आम्ही आधीच सांगितलंय की मेघालय सरकार परीवारांना आर्थिक मदत देणार, त्यामुळे आता द्यायलाच लागेल. आमदाराचं वेगळंच तुणतुणं, "आता कसं करायचं?" साहेब बोलला, "एक काम करा. तुम्ही तुमच्याकडून आर्थिक मदत द्या मृतांच्या परीवारांना. सरकारी मदतराशी आली तर मग बघू काय करायचं ते." आमदारसाहेबाने ८ लाख उभे केले त्याच्या लोकांकडून. इकडे ह्या दरोडा की जातीयवादी ह्त्या ह्यातून मार्ग काढत साहेबाने आपला अहवाल पाठवला की "जरी प्रथमदर्शी ह्या हत्या दरोड्यापायी झाल्या आहेत असे दिसतेय, तरी फक्त ८० हजारांसाठी आठ मजुरांना मारण्यासारखी परीस्थिती वाटत नाही. त्यामागे प्रदेशातील जातीयरित्या तप्त वातावरण आणि भडकलेल्या भावनाच असाव्यात. करीता, ह्या हत्यांना जातीय हिंसेतून घडलेल्या हत्या मानून मृतांच्या परीवारांना मदत राशी देण्यात यावी." झालं, सरकारनी सुटकेचा श्वास घेतला आणि प्रत्येकी ३-३ लाख रुपयांची मदत घोषित केली. साहेबानी शेजारच्या जिल्हाधिकार्‍याच्या मदतीने २४ लाख कॅश जमा करुन मृतांच्या नातेवाईकांना भेटायला जायचे नक्की केले. इकडे सरकारी मदत मिळालीय म्हटल्यावर आमदारसाहेबांच्या लोकांनी "आता आम्ही उधार दिलेले ८ लाख परत करा" असे टुमणे लावले. साहेबाने मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात द्यायच्या आधी मुख्यमंत्र्यांना फोन लावला. "साहेब, माझ्याकडे खाणमालकांकडून मदत मिळालेले ८ लाख रुपये आहेत. जर आपण प्रत्येक परीवाराला, त्यांच्या कमावत्या सदस्याच्या जाण्यामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई म्हणून आणखी एक-एक लाख रुपये जास्त दिलेत, तर त्यांना लागलेला आर्थिक धक्का आपण तितकाच कमी करु शकतो.." मुख्यमंत्री म्हणे, द्या. साहेबानी आमदारांना फोन लावला की तुम्ही दिलेले पैसे हे मृतांच्या परीवारांना तुमच्यातर्फे मदत म्हणून देण्यात येत आहे. ती आमच्यावर उधारी-बिधारी काही नाही.. आणि ४-४ लाख रुपये प्रत्येकी रोख रक्कम परीवारजनांच्या ताब्यात देण्यात आली. पोलिस आणि बाकीचे काही लोक इतके नालायक की म्हणे साहेबाने आता इतकी नुकसान-भरपाई दिल्यावर बाहेरचे लोकपण आता मेलेल्याला बाघमारात फेकतील, पैसे मिळतील म्हणून.. :-( (गेलेल्या व्यक्तीची भरपाई कुठलाच आणि कितीही पैसा करु शकत नाही.. सांगण्याचे तात्पर्य हे, की अशा घटनांमध्ये सरकारतर्फे अपेक्षित असलेली मदत जर लगेच मिळाली नाही तर जनक्षोभ वाढण्याची भिती असते. यापूर्वी पाहिलेल्या अश्याच दंगलींमध्ये पहिल्या एक-दोन हत्यांनंतर घोषित केल्या गेलेल्या मदतीत आणि ती प्रत्यक्ष मिळण्यात जवळपास २०-२५ दिवसांचे अंतर होते. त्या २०-२५ दिवसांत आणखी बाराएक हत्या झाल्या. वरील घटनेत मात्र जनक्षोभातून एकही हत्या झाली नाही. संकट टळल्यामुळे पैसा सरकारी गतीने दोन महीन्यांनी साहेबाकडे आला. त्या दोन महीन्यात साहेब आणि त्यांना मदत करणारे उधार देणार्‍यांच्या शिव्या खात बसले होते..) आणखी सहा एक महिन्यांनंतर महीन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यातल्या सगळ्याच विभागीय अधिकार्‍यांना Garo National Liberation Army (GNLA) ह्या प्रतिबंधीत अतिरेकी संघटनेकडून खंडणीची मागणी करणारी पत्रे आली. त्यातील एक साहेबाच्या टेबलावर पण येऊन पडले, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून.. साहेब तरुण, सळसळत्या रक्ताचे इत्यादी.. त्यांनी वरीष्ठांना फोन लावला. पोलिसातले एक वरीष्ठ म्हणे, "तुम्ही ललकारा त्यांना.. म्हणावं, आम्ही खंडणी देणार नाही. आम्ही तुम्हाला संरक्षण देऊ.." साहेब तापले. अरे म्हणे हाट! भांचूत, बघतोय ह्यांना साल्यांना.. ५ नोव्हेंबरला साहेबाने जनसभा घेऊन घोषणा केली, "मी किंवा माझ्या जिल्ह्यातील कुठलाही अधिकारी अतिरेक्यांना एक पैदेखील खंडणी देणार नाही." त्याच दिवशी, सभेच्या अगदी थोडावेळच आधी अतिरेक्यांनी ५ पोलिस जवानांना अ‍ॅम्बुश करुन निघृणपणे मारले. त्यामुळे ह्या जनसभेची आणि चॅलेंजची बातमी झाली नाही, पण ते अतिरेक्यांच्या कानावर गेलं असेल, हे नक्की.. नंतर ३ महिन्यांनी साहेब शिलाँगवरुन, राजधानीहून निवडणूकीबद्दलची मिटींग करुन परत येत होता. हेडक्वार्टरपासून १०-१२ किमीवर असतांना त्याच्या गाडीला एकानी थांबवलं. "साहेब, पुढे एनकाऊंटर सुरु आहे. गोळयांचा आवाज ऐकू आला होता मघाशी.." साहेबानी एस.पी.ला फोन लावला. एस्पी म्हणे की असलं कुठलंच एनकाऊंटर किंवा गोळीबार झाला किंवा होत असल्याचं आमच्या माहितीत नाही. ह्या माहितीनंतर दहाएक मिनीटं थांबून साहेबानी गाडी पुढे घ्यायला सांगितली. बाघ्मारापासून सहाएक किमीवर असतांना रस्त्यावर दुतर्फा उभ्या असलेल्या ट्रक्समुळे गाडी थांबवावी लागली. गाडी थांबवतांनाच समोरच्या सीटवर बसलेल्या गार्डची नजर बंदूका घेऊन असलेल्या चार-पाच जणांवर पडली. त्याने लगेच ड्रायव्हरला गाडीचे लाईट्स बंद करुन गाडी रिव्हर्स करायला लावली. पण तोपर्यंत बंदुकधार्‍यांची नजरही गाडीवर पडलेलीच होती. त्यांनी लगेच आरडाओरडा करत, गाडी थांबवायला सांगितलं. पण ड्रायव्हर तरी अत्यंत चलाखीने त्या अंधार्‍या, वेड्यावाकड्या पहाडी रस्त्यांवर गाडी रिव्हर्स करतच राहीला. हे बघून त्या अतिरेक्यांनी चारपाच गोळ्या झाडल्या. सुदैवाने कुठलीही गोळी गाडीला लागली नाही. सुमारे दिड-दोनशे मीटर गाडी रिव्हर्स घेतल्यावर एका मोक्याच्या ठीकाणावरुन ड्रायव्हरने गाडी वळवली. २-३ किमी घटनास्थळापासून मागे आल्यावर साहेबाने एस.पी.ला पुन्हा फोन लावला आणि सगळा घटनाक्रम सांगितला. त्यांनंतर तासभराने पोलिसताफ्याने येऊन साहेबाला घरी पोहचवले. ह्या सगळ्या घटनाक्रमात सगळ्यात जास्त तंतरली होती, ती गार्डची. म्हणजे हा आता हार्ट-अटॅकनी मरतोय का काय, अशी परिस्थिती होती. साहजिकही आहे, म्हणा.. त्याच्या हातात बंदूक आहे म्हटल्यावर सगळ्यात जास्त धोका त्यालाच होता.. दुसर्‍या दिवशी पोलिसांनी त्या घटनेला "दरोड्याचा/ वाटमारीचा प्रयत्न आणि त्यातून साहेबाची सुखरुप सुटका" म्हणून विषय संपवला.. आतातरी साहेबाला अक्कल यावी का नको? पण नाही. पुन्हा पंगे सुरु. बुडाखाली कायद्याची आग लागल्याप्रमाणे साहेबाने सगळे टोल गेट्स, फॉरेस्ट कलेक्शन गेट्स, मार्केट टॅक्स गेट्स इ. "योग्य कायदेशीर मान्यता असल्याचे प्रमाणित होईपर्यंत" बंद केले. आता हे गेट्स म्हणजे अमुकतमुक, हा-तो, आणि मुख्य म्हणजे अतिरेकी संघटनांनापण खंडणी मिळण्याची दुकाने.. आता गप की भाड्या जरा, म्हणत पुन्हा जुन्या खेळ्या सुरुच राहील्या. पण साहेबाच्या डोक्याच्या जागी गोटा असल्याने त्याला झटका बसेल अशी घटना घडायलाच हवी होती, आणि ती घडलीच.. त्यानंतरच्या निवडणुकांत सुरळीत आणि शांतिपुर्ण वातावरणात निवडणूका झाल्यावर साहेब आपल्या गावाला भेट देऊन गावाहून परत आला होता. निवडणूकीदरम्यान पिद्दा पडल्याने साहेबाचा सेकंड-इन-चार्ज आजारी होता. त्यामुळे, जवळच्या जिल्ह्यातले एक वर्कशॉप करुन साहेब परत बाघमाराला निघाला होता. वर्कशॉप संध्याकाळी ५ ला संपल्याने त्याला निघायला सव्वापाच झाले होते. रस्ता तीन तासांचा, साडेआठला घरी.. दरम्यान, निवडणूकांसाठी पोलिस फोर्स बाहेर पाठवावी लागल्यामुळे आणि पोलिसांच्या मते तसाही साहेबाला काहीच धोका नसल्याने त्याच्यासोबत दोनच पिएसओ होते. पाठीच्या दुखण्यापायी आजकाल साहेब पुढच्या सीटवर बसायचा. तर हेडक्वार्टरच्या रस्त्यावर असताना रात्रीचे पावणेआठ झालेले.. साहेब मस्तपैकी गाणी ऐकत बसलेला. मागच्या सिटवर दोन्ही पिएसओ.. एका ब्लाईंड टर्ननंतर साहेबाला दिसलं, की समोर रस्त्यावर दोन ट्रक आडवे लावलेयत. रस्ता घाटासारखा.. आधी त्याला वाटलं, की अपघात झाला असावा. तोपर्यंत गाडी ट्रक्सपासून सुमारे ४०-४५ फुटावर पोहचलेली.. आणि ट्रक्सच्या मागून दोघेजण बाहेर आले. त्यांच्याजवळ बंदूका.. साहेबाला एकाच्या हातातली बंदूक चमकतांना दिसली. तो अतिरेकी बंदूक घेऊन रस्त्याच्या मध्यभागी उभा झाला, आणि त्याने पहीली गोळी झाडली. तोपर्यंत ड्रायव्हरने गाडी रिव्हर्स करायला सुरुवात केलेली.. पहिली गोळी झाडताच "ओह शिऽऽट" म्हणत साहेब खाली झुकला आणि दुसरी गोळी सणकऽन् येऊन विंड्शिल्ड तोडत ड्रायव्हरचा हात फोडून "रिकोशेट" झाली, आणि साहेबाच्या झुकलेल्या डोक्याच्या, कानाच्या काही इंचावरून सणसणत मागे बसलेल्या पिएसओच्या छातीत जाऊन रुतली ! जिथे जनरली साहेब बसतो, तिथे ! त्याही रक्ताळलेल्या परिस्थितीत ड्रायव्हरने गाडी पुन्हा शिताफीने रिव्हर्स करत मागे आणली. पिएसओने देखील गोळी लागलेल्या अवस्थेतही दोन गोळ्या झाडल्या, पण मग त्याची बंदूक जाम झाली! थोडं मागे आल्यावर साहेबाला एक जागा दिसली जिथून "यु टर्न" घेता येईल. त्याने सांगितल्याप्रमाणे ड्रायव्हरने गाडी वळवली आणि जवळच्या सिमा चौकीत जाऊन नजिकच्या इस्पितळात प्रथमोपचार केले.. आता साहेबाला टेंशन होतं ते जखमी झालेल्या ड्रायव्हर आणि पीएसओचं. सिमा चौकीतून सिमा सुरक्षा बलाच्या तुकडीच्या संरक्षणात जखमींना तुराच्या म्हणजेच जवळच्या जिल्ह्यातल्या इस्पितळात आणायला रात्रीचा पाऊण झाला. म्हणजे गोळी लागून जवळपास ५ तास उलटले होते. दैवकृपेने, कुणीही गंभीररित्या जखमी झाला नव्हता. दुसर्‍या तिसर्‍या दिवशी, जेव्हा जखमींवर इलाज झाले होते, ड्रायव्हर हातावर शस्त्रक्रियेसाठी मोठ्या शहरातल्या इस्पितळात पाठवून झाले आणि त्याची सगळी सोय करुन झाली.. तेव्हा साहेबाच्या मनात विचार आला, "जर गाडीत बायको आणि चिमुकली लेक असती, तर?" आणि सगळा संयमाचा बुरखा गळून, साहेब उन्मळून रडायला लागला... ----------------------------------------------------------------------------------------- हा लेख लिहीण्यामागे, "साहेब पहा कसा कर्तव्यकठोर, शुरवीर" हा आविर्भाव किंवा हेतूपण नाहीये. साहेबाने भरपुर चुकाही केल्या असतील, आहेत. कानापासून तीन इंचावरुन सणाणत गेलेली गोळी आयुष्यातल्या बर्‍याच " डेफिनेशन्स अ‍ॅन्ड प्रायोरिटीज" कश्या बदलून टाकते, हेपण तो अनुभवतो आहे. मात्र, चार रेतीच्या गाड्या थांबवल्याने कुणालातरी हिरो/ होरोईन बनवणार्‍या आमच्या जनतेपर्यंत बर्‍याच गोष्टी कशा पोहचत नाही, हे सांगण्याचा एक प्रयत्न. खुद्द साहेबाच्या आईला, ही घटना एका हिंदी दैनिकाच्या ४सेमी*४सेमीच्या साईड स्क्रोलमधून कळली. (साहेबाने मुद्दामच सांगितली नव्हती.) तिची आणि घरच्यांची परिस्थिती कल्पनेबाहेरची आहे. त्यामुळे, पुढच्या वेळी कुठल्याही व्यक्तीला "तो काय भडवा सरकारी गाड्या उडवतोय. मागंपुढं हजार जण आहेत हलवायला.." म्हणायच्या आधी त्याची परिस्थिती आपण मानतो त्यापेक्षा अत्यंत वेगळी असू शकते, हे ध्यानात यावं, म्हणून हा लेखनप्रपंच.. ----------------------------------------------------------------------------------------- जाता जाता : पोलीस श्रेष्ठींच्या मते साहेबाला अजूनही कुठला धोका नाहीच आहे. हा पण दरोडाच होता, म्हणे. आता साहेबाचा संबंध आलेल्या ह्या दोन "दरोड्यांना" सोडून त्याच्या जिल्ह्यात इतर कुठलाच दरोडा नोंदवलेला नाहीय, ही गोष्ट अलहीदा.. -----------------------------------------------------------------------------------------

वाचन 38663 वाचनखूण प्रतिक्रिया 117

आतिवास Tue, 05/06/2014 - 22:54
अवघड आहे. :-( प्रत्यक्ष काम करणं खरंच नेहमी अवघड असतं. काळजी घ्या स्वतःची. शुभेच्छा आहेतच नेहमी.

आत्मशून्य Tue, 05/06/2014 - 23:00
काळजी घ्यावी... खरं तर काहीही सुचत/समजत नाही. नशीब आपले साथ देत राहो हीच माझी इश्वराकडे प्रार्थना.

पैसा Tue, 05/06/2014 - 23:11
साहेबा, त्या दिवशी फेसबुकवर लिहिलं होतंस ती फक्त झलक होती! त्याच्या मागे एवढं रामायण... वाटलं होतंच की तू कोणाच्या तरी शेपटीवर पाय दिला असणार. मला तिथले पोलीस, राजकारणी, लोक कोणाचाच विश्वास वाटत नाही. कोणाचाही कसलाही दबाव टाकून परत यायचं बघ. ३/४ महिन्यात २ जिवावरचे हल्ले... दर वेळेला नशीब साथ देईल का? खड्ड्यात गेली ती नोकरी. दोन्ही वेळी पोलीस चोरीचा प्रयत्न म्हणतात म्हणजे त्यांना काही करायचं नाहीये. आणि "कल हो न हो" म्हणू नको. बायको पोराबरोबर अख्खं आयुष्य जायचंय अजून. तिथून कसं बाहेर पडता येईल हाच पहिला विचार कर.

In reply to by पैसा

आत्मशून्य Tue, 05/06/2014 - 23:31
एक तर स्ट्रेटेजिकली त्वरीत काही बंधने किंचीत सौम्य करुन (तातपुरत्या) माघारीचे Gesture द्यावे, त्यांना इतर कार्यात गुंतवता येइल ते बघावे. आणी बळकट सुरक्षा व्यवस्था बाळगुन ठेवीले अनंते तैसेची रहावे मानत फार बदल करायच्या फंदात न पडता चालु कालखंड व्यतीत करावा. जमेल ती चांगली कामे ताकतवान विरोधक निर्माण न करताच शक्य असेल तरच पार पाडुन संधी येताच बाजुला व्हावे. खरे तर साहेबांना सल्ला द्यायचा हक्कच/लायकीच नाही. अतिशय लहान तोंडी मोठा घास घेतलाय, अडखळलाय, ठसकाही आहे, पण त्यामागे फक्त भावनीकता आहे, साहेबांच्या अडचणीवर उपाय माहीत असल्याचे (चुकुनही) प्रदर्शन वा आशा नाही :(

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्य Tue, 05/06/2014 - 23:44
ताबडतोप दिर्घ रजा टाकायला हवी. हा पळपुटेपणा नाहीये, पण जर सोबतची मोठी व्यवस्थाच(लोकंच) आपला पध्दतशीर बळीचा बकरा बनवु पहात आहे तर एकट्याने लढत देण्यात तरी काय उपयोग. कठीण आहे.

In reply to by आत्मशून्य

@आपला पध्दतशीर बळीचा बकरा बनवु पहात आहे तर एकट्याने लढत देण्यात तरी काय उपयोग. कठीण आहे.>>>> हेच...हेच मनात येतं आहे.

हे लिहितांना सगळ्या प्रसंगाची पुनरावृत्ती तुमच्या स्मृती पटलावरून तराळून गेली असेल. आमच्यापर्यंत हा अनुभव पोहोचवल्याबद्दल आभार.

अर्धवटराव Wed, 05/07/2014 - 01:23
सर्कारी लोक्स अगदी एकजात भ्रष्ट. म्हणुन तर एकदम नवी कोरी सिस्टीम आणणार आहोत आम्हि. अवांतर( खरं तर महत्वाचं) : सायबानु.. जरा जपुन. इथे सर्वच रात्री वैर्‍याच्या आहेत. :(

संदीप चित्रे Wed, 05/07/2014 - 01:32
असं आता आमच्या आय्.टी. क्षेत्रातला कुणीही म्हणाला की हा लेख आठवेल आणि त्या माणसाची कींव वाटेल! बाकी काळजी घ्या! सल्ला वगैरे देऊ शकत नाही कारण अशाप्रकारे काम करण्याचा अनुभवही नाहीये!

काय प्रतिक्रिया देणार खरंच. विचार करूनही अस्वस्थ वाटतं. आणि हा थरार इतका जवळून अनुभवून तुम्ही तो अत्यंत शांतपणे आणि संयमाने इथे मांडलाय यासाठी +१. अनेकानेक शुभेच्छा!

दिव्यश्री Wed, 05/07/2014 - 01:46
शिक्षण , अनुभव ई. सगळ्याच बाबतीत लहान आहे मी आपल्यापेक्षा . फक्त एकच गोष्ट सांगावीशी वाटते कि स्वतःची काळजी घ्या . चेपुवर वाचायची हिम्मत सुद्धा झाली नाही माझी तर . देव करो माझ आयुष्य तुम्हाला लाभो .

बहुगुणी Wed, 05/07/2014 - 01:55
प्रतिकूल परिस्थितीतही चांगलं काम करणार्‍या 'आळश्यांचा राजा', तुम्ही, अशा ध्येयवादी आदर्श व्यक्तिंचा अभिमान वाटतो. पण तुम्ही लोकं असा जीवाला धोके गृहीत धरता याचं वाईटही वाटतं आणि खेदही वाटतो. आसाम-मेघालयातली परिस्थिती हळूहळू सुधारेलही कदाचित तुमच्यासारख्यांच्या कामाने, पण व्यक्तिशः तुमच्यापुरतं सामाजिक कर्तव्यपालन पुरेसं करून झालंय असं वाटतं. शिर सलामत तो पगडी पचास! ध्येय-निष्ठा वगैरे ठीक आहे, पण लहान मूल आणि वाट पहाणारे कुटुंबिय असतील तर मला वाटतं तुम्ही इतरत्र 'पोस्टींग' शोधावं जिथे तुमच्या कामाची किंमत ठेवणारे आणि तुमच्या मार्गात असे अडथळे न आणणारे वरिष्ठ/ पोलिस आधिकारी असतील.

In reply to by बहुगुणी

स्पंदना Wed, 05/07/2014 - 03:40
हो चिगो! तुमचच वाक्य तुम्हाला सांगते
गेलेल्या व्यक्तीची भरपाई कुठलाच आणि कितीही पैसा करु शकत नाही.
समाजाला मिळतील कार्यकर्ते पण घरच्यांना कोण हो? टाका रजा अन निघा तेथुन. वाचवत नाही आहे. प्रचंड राग येतो आहे नपुसंक शासनाचा. किती किती खाणार आहेत हे लोक?

निनाद Wed, 05/07/2014 - 05:23
बापरे! किती जबरदस्त काम करत आहात याचा प्रत्यय येतो आहे. मात्र यात पोलिस व्यवस्था तुमच्या बाजूने कशी उभी राहील हे पाहणेही जरूरीचे आहे असे वाटते. आपल्या बाजूने सिस्टिम नसेल तर काम करणे अजून कठीण कठीण आहे. घेतलेले कार्य अवघड आहे हे दिसतेच आहे. काही व्यक्तिगत बैठका घेऊन पोलिस दलास आपल्या बाजूला वळवणे, त्यांच्याशी चांगले संबंध राखणे अतिआवश्यक वाटते आहे. तसेही जिल्हाधिकारी या पदाने पोलिसदल आणि न्याय प्रशासन (काही प्रमाणात) तुमच्या अधिकारात असले पाहिजेत ना? मग त्यावर तुमचा दबाव असला पाहिजे. ते फक्त दरोड्या प्रयत्न असा गुन्हा नोंदवण्याची मनमानी कसे काय करू शकतात? दोन वेळा असा प्रयत्न झाल्याने आता 'खुनाचा प्रयत्न' हा गुन्हा नोंदवण्यासाठी तुम्ही आग्रही रहायला पाहिजे असे माझे मत आहे.

In reply to by निनाद

चिगो Wed, 05/07/2014 - 09:02
मान्य आहे, मित्रा.. दबाव आणू शकतो, पण आतापर्यंत तरी पोलिसांच्या कामात कधीच आडकाठी घातली नाही किंवा ढवळाढवळ केली नाही. जे मी माझ्या बाबतीत होणं नापसंत करतो, ते मी दुसर्‍यांच्या कामाच्या बाबतीत कसा करु? पण आता ढवळाढवळ नाही तरी किमान दखल घ्यायला लावावीच लागेल, हे कळतंय आणि वळतंय. बघुयात, काय करता येईल ते आणि होतंय ते.. धन्यवाद..

In reply to by चिगो

निनाद Wed, 05/07/2014 - 09:08
तुम्ही त्यांच्या कामात ढवळाढवळ करत नाही आहात. ते तुम्च्या कामात करतायेत! गोळी तुमच्यावर झाडली गेली आहे. तुम्ही म्हणायला हवे की की हा खुनाचा प्रयत्न आहे. आता गोळी झाडली गेली आहे. तीही तुमच्या दिशेने. देवाच्या कृपेने वाचलात! अजून काय मोटिव्हेशन मिळायची वाट पाहायची खुनाचा प्रयत्न हा गुन्हा नोंदवण्यासाठी? (फक्त गवगवा टाळा किंवा करा - जे तुमच्या साठी त्या भागात योग्य असेल ते.)

In reply to by निनाद

चिगो Wed, 05/07/2014 - 09:40
आता पुन्हा एकदा सगळ्या एफ आर आय पाहिल्या.. केलीय. भादंवि कलम ३०७ खाली नोंद केलीय. (आता त्यासाठी स्वतः तक्रार करेपर्यंत वाट पाहीलीय, ही गोष्ट अलहीदा.. दोन्ही-तिन्ही गुन्हे दखलपात्र असल्याने पोलिस स्वतःच गुन्हा नोंदवू शकतात खरेतर) सरकारची मजबुरीपण समजू शकतो मी, धोका आहे हे उघडपणे मान्य न करण्याची.. आणि म्हणूनच प्रेससमोर ह्या दोन्ही घटना " किरकोळ गुन्हेगारांद्वारे केलेल्या दरोड्याच्या / वाटमारीच्या घटवाटमारीच्या दाखवण्यात आल्यात. आता पुढे काय करायचं आणि करतात, ते बघुयात. पुन्हा एकदा सांगतोय. ही काही कुण्या "प्रामाणिक अधिकार्‍याची सिस्टमविरुद्धची लढाई किंवा कैफीयत" नाहीये. मी सिस्टमचाच भाग आहे, आणि सिस्टमच्या क्षमते/कमतरतेनुसारच मला काम करावं लागेल हेपण ठाऊक आहे.. कदाचित हा असला काहीतरी लेख लिहीणे हे सुद्धा चुकीचे असेल. मुद्दा तोच आहे, जो शेवटी मांडलाय. कुणाहीबद्दल मत बनवतांना नाण्याला दुसरी बाजू असते, हे लक्षात ठेवावं. किंवा त्याही पेक्षा कुणीतरी बोलल्याप्रमाणे "Everything has three sides. Mine, yours and the true one.." धन्यवाद..

In reply to by चिगो

पैसा Wed, 05/07/2014 - 10:06
ही काही कुण्या "प्रामाणिक अधिकार्‍याची सिस्टमविरुद्धची लढाई किंवा कैफीयत" नाहीये. मी सिस्टमचाच भाग आहे,
अगदी मान्य आहे, आणि सिस्टीम बदलणे एकदुकट्याचं काम नव्हेच. हेच म्हणते, तू शक्य तेवढं चांगलं काम करायचा प्रयत्न केलास, पण हुतात्मा व्हायची काही गरज नाही. सैन्यात जाणार्‍या मुलाच्या आईला माहिती असतं की आपल्या मुलाचा जीव सतत संकटात असणार आहे, एका सरकारी अधिकार्‍याच्या आईने त्या टेन्शनखाली का रहावं? सरकारला काय आणि तिर्‍हाईताला काय अ च्या जागी ब एवढाच फरक पडणार असतो. काही झालं तर लोक जरा हळहळतात आणि आपल्या कामाला लागतात. परिणाम होतो तो जवळच्या माणसांवर. तिथल्या लोकांची अपेक्षाही जिल्ह्याला एक अधिकारी पाहिजे एवढीच असावी. शिवाय बांगला देश बॉर्डर, आणि चिन्यांचा हस्तक्षेप काय काय ब्रह्मांड असेल देवजाणे. || कौन कहता है, के आसमां में सुराख नही होता? इक पत्थर तो तबियत से उछालों , यारों || तू दगड मारून बघितलास. तो परत आपल्या अंगावर येऊन पडता कामा नये.

In reply to by पैसा

मदनबाण गुरुवार, 05/08/2014 - 11:48
तू शक्य तेवढं चांगलं काम करायचा प्रयत्न केलास, पण हुतात्मा व्हायची काही गरज नाही. पै ताय शी सहमत ! स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घ्या... जाता जाता :- सिर सलामत तो पगडी पचास !

In reply to by चिगो

स्पंदना Wed, 05/07/2014 - 10:14
चिगो तुम्ही एकटे नाही तुमच्या बरोबर असणारे तुमच्या सहकार्‍यांच्या जीवाला सुद्धा धोका नाही का? ही गोश्ट तुम्ही समजुन घेउन पोलीसांवर दबाव आणला पाहीजे. कारण आता म्हणु नये अन देव न करो पण त्या जागी हजर असणार्‍या सगळ्यांनाच धोका असणार आहे ना? म्हणुन तुमच्यासाठीच नव्हे तर इतरांसाठीपण तुम्ही तुमचा अधिकार वापरला पाहिजे. सच्च्या बरोबर सच्च अन खोट्या बरोबर खोटच वर्तन ठेवा बा! त्याच्याशी कशाला सच्चं वागायच?

श्रीरंग_जोशी Wed, 05/07/2014 - 07:49
इशान्य भारतात एक कर्तव्यदक्ष सनदी अधिकारी आपल्या अधिकारकक्षेत राहून मर्यादित साधनांच्या मदतीने न्याय्य कामे करू पाहतो ही खरच सकारात्मक बाब आहे. त्याच वेळी व्यवस्थेतील ज्या इतर घटकांनी त्याची साथ द्यायला हवी तेच आपल्या कर्तव्यात कसर ठेवताहेत हे अत्यंत दुर्दैवी. तुमचे अनुभवकथन वाचून एका तपापूर्वी वाचलेले ज्युलिओ रिबेरो यांचे बुलेट फॉर बुलेट हे पुस्तक आठवले.

अजया Wed, 05/07/2014 - 07:57
तुम्ही रोज दिसेपर्यंत किंवा तुमचा फोन येइपर्यंत घरच्यांचे काय होत असेल, कल्पनाच करवत नाही. काळजी घ्या ,स्वत:साठी आणि त्यांच्यासाठी देखिल.

साहेब, अनौपचारिक ग्प्पात चिगोवर हल्ला झाला असं कळलं होतं आणि चिंता लागलीच होती. लेख वाचला भीती, थरार, आणि जीवन मरणाचा अनुभव हे सर्व वेगळंच आहे...! साहेब, वर पैने जसा सल्ला दिला तसाच मीही देतो. मंत्री-संत्रीला भेटून वशीला लावून सुरक्षीत झोनमधे बदली करुनच घ्या. असं जीवावर बेतणा-याला प्रसंगाला सामोरं जायचं यापुढे कारण नाही. निनाद म्हणतो तसा पोलीस आपल्या ताब्यात आहेत, सुरक्षीतता याला आपण महत्त्व द्यावं अस्सच मला वाटतंय. साहेब, व्यवस्था साली लै बरबटलेली आहे, आपल्या एकट्याने आपण हे सर्व स्वच्छ करताय. केवळ सिंपली ग्रेट. पण कधी कधी वाटतं. आपलं आयुष्य धोक्यात घालून असल्या नसत्या झकमा-या नको, असं माझं मत आहे, हे नावडणारं मत आहे, हे मला माहिती आहे. साहेब, तब्येत सांभाळा. काळजी घ्या. मिपावर मनमोकळेपणाने बोललात...आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. पण असली रिस्क नको बस... आणि साहेब, तृतीयपुरुषी निवेदन उत्तम जमलंय. लिहित राहा. बोलत राहा. वी आर अल्वेज वीथ यु...! -दिलीप बिरुटे

चिगो Wed, 05/07/2014 - 10:48
धन्यवाद, दोस्तहो ! पैसातै, तू बोलतेयस ते अगदी योग्य आहे..
सैन्यात जाणार्‍या मुलाच्या आईला माहिती असतं की आपल्या मुलाचा जीव सतत संकटात असणार आहे, एका सरकारी अधिकार्‍याच्या आईने त्या टेन्शनखाली का रहावं?
हेच मी माझ्या वरिष्ठांना सांगितलं, की साहेबलोक्स, गोळ्या खाणे हा माझा "ऑक्युपेशनल हजार्ड" नाहीये..
काही झालं तर लोक जरा हळहळतात आणि आपल्या कामाला लागतात.
मी जिथं आहे, तिथं लोकांच्या हळहळण्याची पण खात्री देता येत नाही. माझ्यासमोर इलेक्ट्रोक्युशननी मेलेल्या माणसाची भाऊ आणि बहीण पंधरा मिन्टात स्वतःला सावरुन त्याला गाडायला घेऊन गेले, पंचनामा झाल्या झाल्या.. मी अर्धा तास थरथरत होतो. रात्रीची झोप उडाली ती वेगळीच. मारणे आणि मरणे इज नॉट अ‍ॅट ऑल अ बिग डील, बॉस..
परिणाम होतो तो जवळच्या माणसांवर.
हे प्रत्यक्षच अनुभवतोय..
चिगो तुम्ही एकटे नाही तुमच्या बरोबर असणारे तुमच्या सहकार्‍यांच्या जीवाला सुद्धा धोका नाही का?
हेच मला म्हणायचंय आणि सांगायचंय, अपर्णातै.. गोळी कुणासाठी होती आणि जखमी कोण झालंय? प्राडॉ, निनाद, पैतै, अर्धवटराव, आत्मशून्य आणि सगळ्या प्रतिसादक मित्र/मैत्रिणी/ ताई/माई/ दादा लोक्स.. तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद.. चला, येतो.. अजून निवडणुकीचा निकाल लावायचा आहे जिल्ह्यात बसून..

मृत्युन्जय Wed, 05/07/2014 - 11:51
तुम्हाला अनेक शुभेच्छा. तसा तुम्हाला काही धोका नाही म्हणा. पोलिसच तसे म्हणतात म्हणजे नसावाच ;). पण तरीही सांभाळुन रहा आणि हो आता ट्र्कपासुन १०० फूट लांब राहत जा :)

In reply to by मृत्युन्जय

चिगो गुरुवार, 05/08/2014 - 17:43
पोलिसच तसे म्हणतात म्हणजे नसावाच ;-)
आक्षी बरुबर..
आणि हो आता ट्र्कपासुन १०० फूट लांब राहत जा
हा हा.. हे एकदम बरोबर बोललात.. आता मला "ट्रकोफोबिया" व्हायला लागलाय. ;-) म्हणजे, ट्रकच्या मागे गाडी थांबवायला लागली की आपोआप ठोके वाढतात आणि नर्व्हस व्हायला होतं. बघुया, किती दिवस राहतो हा फोबिया ते..

बाबा पाटील Wed, 05/07/2014 - 12:00
खर तर पहिले तुमच्या हिमतीला सलाम पण विनाकारण शहिद होण्याचा प्रयत्न करु नका स्वतःच्या सुरक्षिततेची अधिकादिक काळजी घ्या,तुम्ही डी.एम.च्या पोस्ट वर आहात तर एस.पी.तुमच्या अंडर काम करतात अश्या वेळी पोलिसखाते अश्याप्रकारे वागतय हे अनाकलनिय आहे कारण तुमच्या आदेशाशिवाय त्यांना काहीही काम करता येणे अवघड आहे,आता पुर्वांचल मध्ये कशा प्रकारे नियम आहेत याची मला कल्पना नाही. तरी जर तिथले पोलिस प्रशासन जिल्हाधिकारांची सुरक्षा करु शकत नसेल तर तुम्हाला सरळ तेथिल मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करता येइल आणी माझ्या माहिती प्रमाणे त्याची अतिशय तातडीने त्याची दखल घेण्यात येइल. समजा जर मुख्यमंत्रीही जर कानाडोळा करत असतील तर तुम्ही दिल्लीत सरळ गृहमंत्र्यांना भेटता येइल.आणी जे आपल्या सुदैवाने महाराष्ट्रीयन आहेत व जे मराठी अधिकार्‍यांना सहजासहजी वार्‍यावर सोडत नाहीत.दुसरी गोष्ट समजा काही कारणाने त्यांचीही वेळ मिळु शकली नाही तर थोरल्या पवारांची नक्की वेळ मिळेल आणी हा माणुस त्यांच्या संपर्कात आलेल्या कुठल्याच मराठी अधिकार्‍याला बाहेरच्या ठिकाणी अडचणीत येवु देत नाही.असा आतापर्यंतचा तरी अनुभव आहे. समजा १७ नंतर सरकार जरी बदलले तरी गडकरी तेथे सत्तास्थानात असतील ते आणी पवार या बाबतीत सारखेच आहेत्,फक्त गडकरींच्या पुढे उभे राहिल्यावर थोड्याफार रांगड्या वर्‍हाडी शब्द एकण्याची तयारी ठेवावी. तुमच काम निच्छितच चांगल आहे फक्त सद्य परिस्थितीनुसार अस दिसतय की तुम्ही तुमचे अधिकार योग्य रित्या वापरत नाही. नाही तर अशी वेळ आली नसती. दुसरे म्हणजे जर आपली मराठी माणसे दिल्लीत अतिशय वरिष्ठ पदावर असताना त्यांच्या पदाचा योग्य दबाव तुम्ही निर्माण करत नसाल तर ते दुर्देव आहे.प्रशासनात जर तुम्हाला निर्भिड पणे काम करावयाचे असेल तर तुम्हाला या गोष्टी करण भाग आहे.तुमच्या पाठीवर कोनाचातरी वरदहस्त निर्माण केलाच पाहिजे.अन्यथा हकनाहक बळी पडाल दुसरे काही नाही. व त्याचा परिणाम त्या संपुर्ण जिल्ह्यावर नाही तर राज्यावर होइल. मग कुठलाच अधिकारी निर्भिडपणे काम करणार नाही. थोडासा भगवान कृष्ण आणी आपले शिवछत्रपती समजावुन घ्या योग्य उत्तरे मिळतील.त्यांच्या वर हल्ले झाले नाहीत का ? ,नक्कीच झाले होते पण ते हात त्यांच्या पर्यंत पोहचण्या आधीच कलम केले जायचे,याचा मतितार्थ समाजावुन घ्या. बाकी तुमच्या कार्यास सुयश मिळो हिच ईश्वरचरणी प्रार्थना.

In reply to by बाबा पाटील

चिगो गुरुवार, 05/08/2014 - 12:32
पाटील, तुम्ही म्हणता ते योग्य आहे.
फक्त सद्य परिस्थितीनुसार अस दिसतय की तुम्ही तुमचे अधिकार योग्य रित्या वापरत नाही.
असू शकेल, आता तुम्ही म्हणताच आहात तर. जेव्हा पोलिसांनी हा पण हल्ला हलक्यात घ्यायला पाहीलं, तेव्हा मी माझ्या अधिकारांचा योग्य तो वापर केला. आणि सिक्युरीटी वाढवून घेतली. कसं आहे ना, पाटील.. माणसानं जीवाला जपावं, नक्कीच जपावं. पण मी जर प्रत्येकाकडेच संशयानं पाहायला लागलो, तर ह्या नोकरीतरी काम करणं अशक्य आहे मला. स्वतःकडे दुर्लक्ष केल्याची अक्षम्य चुक झाली म्हणा, पण ती सुधारावी म्हणतो आता.. रोखठोक प्रतिसादासाठी धन्यवाद..

In reply to by चिगो

बाबा पाटील गुरुवार, 05/08/2014 - 13:23
तुम्हा लोकांची या देशासाठी गरज आहे.माझ्या आयुष्यात मी फार कमी निस्पृह आणी धाडसी अधिकारी पाहिलेत्,आणी वेड धाडस करणार्‍यांच काय होत ते ही पाहिलय.काळजी वाटली म्हणुन लिहील.बाकी समर्थ आहातच.आई भवानी संभाळुन घेइल.

मैत्र Wed, 05/07/2014 - 12:11
तुमच्या जिद्दीला आणि कर्तव्यनिष्ठेला! आमच्यासारखे शहरी नोकरदार तुम्हाला काय सल्ला देणार? काळजी घ्या. स्ट्रॅटेजिकली भिडा. प्रत्येक वेळी थेट लढून मंजूनाथ शण्मुगम होऊन काय उपयोग.. तुमचे कुटुंबिय, मित्रपरिवार आणि मिपाकर हळहळतील. पण काम अपुरं राहील. माझ्या दुर्दैवाने तुमची लेखमाला आजवर वाचली नव्हती. ती वाचली आणि तुमच्या जिद्द आणि चिकाटीची कल्पना आली. त्यात एका प्रतिसादात तुम्ही स्वतः एक वाक्य लिहिलं आहे -- ," Success is not absence of failures. It means reaching your ultimate goal. It is about winning the War, not every battle." तुमचे श्रद्धास्थान तुळजा भवानी तुम्हाला उदंड आयुष्य आणि सामर्थ्य देवो ..

मृत्यू केव्हा आणि कसा यावा हे आपल्या हातात नाही. सबब, निडरपणे कार्यरत राहा. मागे हटणं एखाद्याच्या स्वभावातच नसतं आणि तू तसा आहेस. तस्मात, जोपर्यंत आहोत, तोपर्यंत विवेकबुद्धीला सार्थ वाटेल, ते करणं श्रेयस. अतिरेकी पैशासाठी काम करतो आणि तो मार्ग चुकलेला असतो. विकासाची संधी मिळाली तर कुणी हिंसक होणार नाही. निर्लज्ज नेत्यांना जनताच पदच्युत करू शकते ही जाणीव लोकांना व्ह्यायला हवी. गारो हिल्समध्ये, अतिरेकी चिगोला मित्र मानोत आणि हिंसेपासून परावृत्त होवोत, वंचीतांसाठी चिगो देव बनो आणि त्याच्या प्रयत्नातून त्या भूमीत शांतता आणि सौहार्द नांदो अशी अस्तित्वाकडे प्रार्थना करतो.

In reply to by संजय क्षीरसागर

चिगो गुरुवार, 05/08/2014 - 16:26
आशावादासाठी धन्यवाद, संक्षी.. पण
गारो हिल्समध्ये, अतिरेकी चिगोला मित्र मानोत आणि हिंसेपासून परावृत्त होवोत, वंचीतांसाठी चिगो देव बनो आणि त्याच्या प्रयत्नातून त्या भूमीत शांतता आणि सौहार्द नांदो
हे होणे नाही ! मागच्या तीन वर्षांपासून ह्या भागात काम करतोय आणि परिस्थिती बघतोय, तेव्हा ही भाबडी आशा मी तरी ठेऊ शकत नाही.. त्यातल्या त्यात इथे दिड वर्ष म्हणजे कुण्याही ऑफीसरच्या पोस्टींगच्या डोक्यावरुन पाणी! मी इथे जे काही करतोय, केलंय ते "स्वांतसुखाय" केलंय. त्यामागे ना देव बनण्याची इच्छा होती ना आहे.. देश आणि प्रदेश असे जादुची कांडी फिरवल्यासारखे बदलत नाही, हे पण चांगलंच ठावूक आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तुमच्या सदिच्छेसाठी आणि प्रार्थनेसाठी धन्यवाद.. पर शहीद होके जंग जिती नहीं जाती, हेपण ठाऊक असल्याने "थॅन्क्स बट नो थॅन्क्स.."

In reply to by चिगो

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 05/08/2014 - 18:26
पर शहीद होके जंग जिती नहीं जाती १०००% खरं. माझ्या अत्यंत आवडीचं जनरल पॅटनचं वाक्य... "No bastard wins war by dying for his country; but by making the other bastard die for his !" * यातली शिवीगाळ सोडा (पॅटन लईच फाटक्या तोंडाचा होता)... पण भावनाओंको समझो !

In reply to by चिगो

संजय क्षीरसागर गुरुवार, 05/08/2014 - 21:34
हे मान्य. आणि मृत्यू आपल्या हाती नसला तरी चांगल्या कामासाठी कुणी शहीद व्हावं असाही प्रतिसादाचा अर्थ नाही. पण मग हे असंच चालायच का? How an officer like you looks at the situation?

In reply to by संजय क्षीरसागर

संजय क्षीरसागर गुरुवार, 05/08/2014 - 23:43
एकदम `शहीदगी' किंवा मग `काहीही होणार नाही' या दोन पराकोटींमधे काही तरी पर्याय असायला हवा ना? माझा आशावाद दुर्दम्य असेल पण आशाच संपली तर मग हातात काय उरतं? आपणच निराश झालो तर बदल घडणं असंभव होणार नाही का?

In reply to by संजय क्षीरसागर

चिगो Fri, 05/09/2014 - 17:13
आपणच निराश झालो तर बदल घडणं असंभव होणार नाही का?
मान्य.. पण परिस्थिती फार आशादायी नाही, हे सत्य मी जवळून अनुभवतोय ना मालक.. असो. आशावाद आवडला, हे मान्यच आहे.. :-)

समीरसूर Wed, 05/07/2014 - 12:23
चिगोसाहेब, मानलं तुम्हाला. इतक्या दुर्गम भागातल्या अतिरेकी संघटना, तिथली स्थानिक मंडळी, मुख्यमंत्री, आमदार, गुंतागुंतीचं राजकारण आणि समाजकारण, तिथली हिंसा, मृत्यूचं भय, कुटुंबाची काळजी, अतिशय निराळं वातावरण आणि अतिशय वेगळी संस्कृती...आणि तिथल्या समस्या, तिथला भ्रष्टाचार, तिथले प्रश्न सोडवण्याची तुमच्या शिरावर (शीर सलामत राहिलच याची शाश्वती नसतांना) असलेली महाकर्मकठीण जबाबदारी! हिकमतीने तुम्ही हे सगळं करताय हे वाचून अभिमान वाटला. आयुष्यात काम करणे ही व्याख्या अक्षरशः जगताय तुम्ही. अर्थात तुमची कुवत, बुद्धिमत्ता, प्रशिक्षण सगळंच असामान्य असल्याने तुमच्याशिवाय ही जबाबदारी कुणी पेलू शकत नाही. वर दिलेल्या प्रतिसादांप्रमाणे मलादेखील असेच वाटते; आपली सिस्टीम बदलवण्याचा फार हट्ट धरणे म्हणजे जीवाला कायमाचा धोका! कुटुंबाला धोका! देव न करो, काही बरे-वाईट झाल्यास नंतर 'शहीद' म्हणून चार लोकांची कोरडी सहानुभूती! हा सौदा परवडत नाही. अजिबात परवडत नाही. आपल्या देशात याला सौदाच म्हणावे लागते यासारखे दुर्दैब नाही. आपल्या कष्टाने आणि प्रामाणिकपणाने होणारा बदल बघणे खूप समाधानकारक असावे पण आपल्या देशात वृत्तीमधला बदल होण्यासाठी कित्येक दशके-शतके जाऊ द्यावी लागतील. इज इट वर्थ पुटींग युअर लाईफ अ‍ॅट रिस्क? इज इट वर्थ पुटींग युअर फॅमिलीज पीस ऑफ माईंड अ‍ॅट रिस्क? विचार करा...काही गोष्टी सोडून दिलेल्या बर्‍या असतात. काही बदल आपल्या स्वप्नांमधून काढून टाकणेच योग्य असते. बाकी तुमच्या कामाच्या आवाक्याची कल्पना आल्यावर मी काय करतोय याची लाज वाटली. मी सध्या बेंचवर आहे. टाईमपास चालू आहे. टिवल्या-बावल्या, टंगळ-मंगळ, टाईमपास असं सगळं चालू आहे. कुवत नसली की असं काम वाट्याला येतं. :-) तुम्हाला खूप शुभेच्छा! पण जरा जपून...

नि३सोलपुरकर Wed, 05/07/2014 - 12:52
काय प्रतिक्रिया देउ कळत नाहिय .... चिगो ,सलाम! तुमच्या जिद्दीला आणि कर्तव्यनिष्ठेला! केवळ _/\_. बाकी शब्द नाहीत.

पिलीयन रायडर Wed, 05/07/2014 - 13:18
अहो चिगो.. सांभाळुन हो.. तुमच्या मागे बायको पोरं आहेत.. माझा नवरा रोज २० किमी गाडी वर जातो तर मी रोज फोन करुन चेक करते की नीट पोहोचला ना.. तुमची बायको हे सगळं कसं सहन करतेय? त्यांना सलाम..!! घरात बसुन उगाच चिंता करत काळ घालवणं फार फार तापदायक असतं.. कितीही म्हणलं तरी मनात भलते सलते विचार येत रहातात.. घरच्यांच्या मनःस्वास्थ्याची काळजी घ्या..

माधुरी विनायक Wed, 05/07/2014 - 13:35
सलाम तुमच्या कर्तव्यनिष्ठेला आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा... वाट बिकट आहे, जपा...

प्यारे१ Wed, 05/07/2014 - 13:40
चिगो, मध्ये भेट होईल न होईल, तुझ्या रिटायरमेण्टला नक्कीच भेटू! :) >>> महायत्न सावधपणे| समई धारिष्ट धरणे| अद्भुतचि कार्य करणे| देणे ईश्वराचे|| दासबोध १८-६-१५ >>> जैशास तैसा जेव्हा भेटे| तेव्हा मज्यालसि धाटे| इतुके होते परी धनी कोठे| दृष्टीस न पडे|| दासबोध १९-०९-३१ बहुत काय लिहीणे, आपण सूज्ञ आहातच. चेपु वर अथवा इथं वाचताना तुम्हाला जीवावर बेतावं अथवा आपसुक धाक निर्माण होऊन तुम्ही 'बाजूला' व्हावं अशीच हल्लेखोरांच्या सूत्रधारांची इच्छा दिसतेय. थोडं बॅकफूटवर जाऊन आवश्यक तेवढ्या समाजसुधारणा कराव्यात. ज्या समाजामध्ये मंदिरा च्या समोरच्या चपला सुरक्षित रहात नाहीत त्या समाजाला नेता अथवा अधिकार्‍यांनी सुधारण्यापेक्षा घरातल्या आईबापांनी स्वतः सुधारण्याची जास्त गरज आहे. सावध आहातच. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! असो. लायकी नसताना खूप लिहीलं.

In reply to by प्यारे१

चिगो Fri, 05/09/2014 - 17:23
मध्ये भेट होईल न होईल, तुझ्या रिटायरमेण्टला नक्कीच भेटू!
माझ्याकडून पार्टी तेव्हा तुला, दोस्ता..

In reply to by प्यारे१

मध्ये भेट होईल न होईल, तुझ्या रिटायरमेण्टला नक्कीच भेटू! मी तर म्हणेन, लवकर भेट व्हावीच एखाद्या कट्ट्याला आणि रिटायरमेण्टचा जंगी कट्टा तर १००% नक्की !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्यारे१ Sat, 05/10/2014 - 18:37
सावित्री सत्यवान 'ष्टुरी' मध्ये यम सावित्रीला एकच वर माग म्हणतो... अंध सासूसासर्‍यांबरोबर राज्य गमावलेली निपुत्रिका असलेली सावित्री आपल्या पतीच्या शवाजवळ बसलेली असते. ती एकच वर मागते. म्हणते, माझ्या मुलांनी केलेलं राज्य माझ्या सासूसासर्‍यांनी बघू दे! वरची इच्छा अशीच मल्टी'पदरी' आहे. तू व्यवस्थित धडधाकट असावासच त्याबरोबर मी सुद्धा जिवंत असावं. खाता पिता असावा नि आपले संबंध पार्टी करण्याइतपत दृढ असावेत ;)

In reply to by प्यारे१

प्यारे१ Sat, 05/10/2014 - 18:41
बाअकी लवकरात लवकर भेट होण्याबाबत सहमत असलो तरी गणपती किंवा दिवाळीपर्यंत थांबावं लागेलच असं दिसतंय. :( (मी भारताबाहेर असतो हे बराक ओबामाला आणि सूडला सुद्धा ;) माहिती आहे)

In reply to by प्यारे१

(मी भारताबाहेर असतो हे बराक ओबामाला आणि सूडला सुद्धा Wink माहिती आहे) काळजी करू नका हो. श्रीयूत Abdelaziz Bouteflika यांची ओळख काढू आपण.

चाणक्य Wed, 05/07/2014 - 14:23
सलाम तुम्हाला आणि तुमच्यासारख्या खरे नायक असणा-या अधिका-यांना. जपून रहा. अजून काय सांगणार.

गुलाम Wed, 05/07/2014 - 15:03
सलाम तुमच्या धैर्याला!! अजुन काय बोलु.. तुमच्यासारखे काही लोक आहेत म्हणुनच सिस्टीमवरचा विश्वास अजुन पुर्ण उडाला नाहिये. तुमची परवानगी असेल तर फेसबुकवर या लेखाची लिंक शेअर करावी म्हणतोय..

In reply to by गुलाम

चिगो गुरुवार, 05/08/2014 - 16:31
तुझ्या सदिच्छेसाठी धन्यवाद, मित्रा, पण अजूनतरी "कंडक्ट रुल्स"च्या लफड्यात पडायची इच्छा नाही, म्हणून चेपुवर असूच दे. वाटल्यास मित्रांना वाचायला सांगू शकतोस मेसेजेसमधून.. धन्यवाद..

कुसुमावती Wed, 05/07/2014 - 15:29
तुम्हाला काही सल्ला देण्याची माझी लायकी नाही. _/\_ पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

चतुरंग Wed, 05/07/2014 - 16:15
पेपरात अशा गोष्टी वाचतो तेव्हा त्याच्याशी इतके जोडलेले नसतो परंतु आपल्या ओळखीचा चेहेरा यात गुंतलेला असणे याचा धक्का काहीच्याकाही जास्त असतो. सलाम__/\__. काळजी घ्या. अगदी जवळचा नातेवाईक तुमच्यासारख्याच पोस्टमधून कामे केलेला असल्याने ताण काय असतो याची कल्पना आहे. आणखी काय सांगू? माझ्या मित्राने त्याच्या मावसभावाबद्दल सांगितलेली घटना आठवली. तो भाऊ आणि एक सहकारी काश्मीर बॉर्डरवर गस्त घालत होते. तिन्हीसांजेची वेळ. पाकिस्तान साईडने गोळीबार झाला. गोळ्यांचा आवाज ऐकताच दोघे जमिनीवर झेपावून आडवे पडले. पडत असतानाच दगडावरुन रिकोशे होऊन आलेली एक गोळी त्याच्या सहकार्‍याच्या उजव्या कानशिलावर लागली. तो जोरात ओरडला. काही मिनिटे गेल्यावर सहकारी हालचाल करत नाही हे बघून भावाने त्या पालथ्या शरीराला उताणे केले तर त्याच्या डोक्याचा डावा भाग पूर्णपणे उध्वस्त झालेला त्याला दिसला (रिकोशे झालेली गोळी फिरत जाते त्यामुळे ज्याबाजूने बाहेर पडते तो भाग पूर्ण फाटून निघतो!). त्याही स्थितीत सहकार्‍याला खांद्यावर टाकून हा पठ्ठ्या कसाबसा बेसला पोचला आणि अति मानसिक ताणाने आजारीच पडला. त्याला ताबडतोब महिन्याची रजा देऊन पुण्याला पाठवून दिला त्याच्या साहेबाने!:(

काळा पहाड गुरुवार, 05/08/2014 - 00:05
त्या अफझल गुरू ला अर्धवट राहिलेलं काम पुरं कर म्हणायला हवं होतं. साले निदान ५४४ हरामखोर तरी संपले असते. बाकी तुम्हाला मंत्र्याला/राजकारण्यांना भेटायला मिळत असेल ना? "गायब" करता येतं का बघा एखाद्याला दरोडा घातला होता म्हणून सांगून. तेवढीच देशसेवा.

भडकमकर मास्तर गुरुवार, 05/08/2014 - 00:41
आपण वाचत आहोत ते थरारक प्रकरण सत्य आहे हे वाचाताना सतत जाणवत राहिले... फेबुवरती गाडीचे फोटो पाहिले होते ... अजून काय लिहिणार? .काळजी घ्या राव...

साती गुरुवार, 05/08/2014 - 08:47
तुमच्या धडाडीबद्दल कौतुक. काळजी घ्या. तुमच्या कार्याबद्दल आदर. पण सरकारी सेवेत कार्यरत असताना तुम्हाला अशी माहिती प्रसिद्ध करायला परवानगी आहे का? जर नसेल तर फेसबुक/ ब्लॉगवरचे लेखन वाचून तुमच्यावर कोणी कारवाई करू शकेल का? माझ्यामते इतके डिटेल्स पब्लिक फोरमवर टाकू नयेत. कोण त्यांचा आपल्याविरुद्ध कसा वापर करेल सांगता येत नाही. बाकी तुमच्याबद्दल काय म्हणणार? इतका पराक्रमी शिवाजी जन्माला यावा तर दुसर्यांच्या घरी असे वाटते. आमच्या मिपाकुटूंबातल्या कुणावर असा शिवाजी व्हायची वेळ आली तर मात्रं आमचं धाबं दणाणतं. काळजी घ्या. जोपर्यंत तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटतोय आणि अजून चांगले काम करायची इच्छा आहे तोपर्यंत तुमच्या प्रत्येक कामात यश आणि सुरक्षितता मिळो ही सदिच्छा!

In reply to by साती

पैसा गुरुवार, 05/08/2014 - 10:22
लिखाण कोणा साहेबाबद्दल आहे. फेसबुकवरची पोस्ट ही एखाद्या पेपरमधे बातमी येते तशी आणि तेवढीच होती. शिवाय साहेब, चिगो आणि फेसबुकवर लिहिणारा हे एकच आहेत असं कोणी म्हणू शकत नाही.

In reply to by पैसा

साती गुरुवार, 05/08/2014 - 12:53
चिगो यांच्या मिपा प्रोफाईलमध्ये त्यांचे खरे नाव आणि इतर काही खाजगी माहिती आहे. तसेच साहेबांवरच्या हल्ल्याचे डीटेल्स इथे तारीखवार गावासकट आहेत. खालील प्रश्नांना चिगोंनी स्वतः उत्तरे दिली आहेत. आणि अगदी टोपण्नावानेही हे प्रसिद्ध करणे रिस्कीच. पुरावा संपर्कातून पाठवत आहे.

In reply to by साती

आत्मशून्य गुरुवार, 05/08/2014 - 15:48
सरकारी सेवेत कार्यरत असताना तुम्हाला अशी माहिती प्रसिद्ध करायला परवानगी आहे का?
जी माहिती जनतेला मिळायचा हक्क आहे ती इथे आली तर फार त्रास नसावा. तुम्ही स्वत: एफ आय आर ची प्रत पहायला मागु शकता. त्यामुळे इथे काही बोलले गेले तर फरक पड़त नसावा, राहिली गोष्ट सरकार दरबारी नोंद नसलेल्या माहितीची ती सुधा देशाच्या सुरक्षेला बाधा आणत नसेल तर आत्मचरित्र म्हणून साहेब उघड करू शकत असावेत