माझं खोबार... भाग ३

बिपिन कार्यकर्ते's picture
बिपिन कार्यकर्ते in जनातलं, मनातलं
11 Oct 2008 - 7:18 am

माझं खोबार... भाग १ , ... भाग २ , ... भाग ३ , ... भाग ४ , ... भाग ५ , ... भाग ६ , ... भाग ७ , ... भाग ८

*************

७.३० वाजले, ७.४५ वाजले, ८ वाजले तरी काही काउंटर उघडेना आणि कसली घोषणा पण होईना. एयरलाईन्सचे कर्मचारी पण कुठे दिसत नव्हते. माझ्या मनात खरं सांगायचं तर एकच भावना होती ..... प्रच्चंड कंटाळा. काय व्हायचं ते होऊन जाऊ दे पण सोडवा बाबा या धावपळीतून. आम्ही ताटकळून बसलो होतो. आणि तेवढ्यात अनाउन्समेंट झाली,

*************

"सौदी अरेबियन एयरलाईन्स च्या SVxxx ने दम्माम ला जाणार्‍या प्रवाशांनी लक्ष द्या. काही तांत्रिक बिघाडामुळे, दम्मामवरुन आलेले विमान उड्डाण करू शकत नाहिये. विमान दुपारी १२.३० ला उड्डाण करेल. चेक-इन काउंटर्स ९.३० वाजता उघडतील. प्रवाश्यांना होणार्‍या त्रासाबद्दल आम्ही क्षमा मागतो."

घ्या. आत्ताशी कुठे ८ वाजले आहेत सकाळचे. अजून कमीत कमी ४.३० तास? आणि ती बया तर क्षमा वगैरे मागून (आम्ही क्षमा केली आहे की नाही याची फिकिर न करता) निघून गेली. आणि आता पकडायचं तरी कुणाला? तसेच बसलो वाट बघत. तेवढ्यात मी आणि पत्नी, एक लांब चक्कर मारून आलो. जास्त काही बोलायच्या स्थितीत नव्हतो तरी तेवढेच बरे वाटेल (तिला) हा उद्देश. परत आलो तरी ९ च वाजले होते. वाट बघत होतो पण अजूनही पुढची घोषणा काही होत नव्हती. शेवटी १० वाजता घोषणा झाली की विमानाची दुरूस्ती चालूच आहे आणि विमान अजून थोड्या उशिराने निघेल. आणि ११ वाजता घोषणा झाली की विमान काही दुरूस्त होत नाहिये, दम्मामहून दुसरे विमान मागवले आहे आणि विमान दुपारी ४.३० ला सुटेल. पण एकच चांगली गोष्ट म्हणजे त्यांनी चेक-इन काउंटर चालू केला. मी सामान चेक-इन केलं. घर जवळच असल्याने सरळ निर्णय घेतला, घरी परत जायचं, दुपारी ३.३० पर्यंत विमानतळावर परत यायचं. त्या प्रमाणे आमची वरात निघाली परत. एका वेगळ्याच वातावरणात सकाळी घर सोडलं होतं, कधी परत येऊ त्याची निश्चिती नव्हती. तेच घर ५ तासात परत दिसणार याची कल्पनाच नव्हती. :) जसे आम्ही घरी आलो परत तसे सगळे शेजार पाजारचे बघत होते. मला पण एकदम काहितरी विचित्र वाटत होतं. घरी येऊन आराम करायचा विचार होता पण इतका दमलो होतो की झोपही येत नव्हती. सकाळच्या अनुभवामुळे ३ वाजता सौदियाच्या विमानतळ कार्यालयात खात्री करण्यासाठी फोन केला. फोन केला ते बरंच झालं. त्यानी सांगितलं की विमान संध्याकाळी ७.३० वाजता सुटेल. आता मात्र मी पूर्ण वैतागलो, पण करतो काय. शेवटी एकदाचे ६.३० वाजता पोचलो. या वेळी मात्र सगळे सुरळीत पार पडले. आत्ता पर्यंत इतकं काही झालं होतं सकाळपासून की मी 'प्रथमग्रासे मक्षिकापातः' या विचाराने बर्‍यापैकी धास्तावलो होतो. पण अजून एक धक्का बाकी होता.

झालं असं होतं की, विमान एवढं लांबलं होतं म्हणून सौदियाने काही प्रवाश्यांना रियाधच्या दुपारच्या विमानात बसवून दिलं होतं. आणि आमचं विमान जवळजवळ मोकळंच होतं. मी बोर्डिंग पास हातात घेऊन उभा होतो तसा एक सौदिया कर्मचारी आला आणि म्हणाला की 'तुम्हाला अपग्रेड हवे आहे का?' मला काहिच कळेना, तेवढ्यात तो म्हणाला, 'तुम्हाला फर्स्टक्लास मधून जायला आवडेल का?'.... मी गार. नेकी और पूछ पूछ? कोणाला नाही आवडणार हो? मी होकार दिला. फर्स्टक्लास बर्‍यापैकी रिकामा असल्यामुळे, त्यांनी काही एकट्या प्रवाशांना असे अपग्रेड केले होते. ७ वाजता मी त्या बोगद्यातून सौदियाच्या त्या मोठ्ठ्या बोईंग-७४७ मधे प्रवेश केला. जीना चढून ऐटीत वरच्या मजल्यावर फर्स्टक्लास मधे गेलो.

त्या फाइव्हस्टार वातावरणात एक हवाईसुंदरी आणि एक हवाईसुंदर्‍या (पर्सरला काय प्रतिशब्द आहे हो मराठीत?) उभे होते. त्यांनी दात दाखवून स्वागत केले, 'अहलान मरहबा' .... 'या, आपलं स्वागत आहे'. अजून ४-५ लोक आले. थोड्या वेळाने ती ताई एक सुंदर सुरई आणि छोटे छोटे कप घेऊन आली. ते इतके छोटे कप बघून मला वाटलं "ही काय आता इथे भातुकली मांडते की काय?" पण नाही, सुटलो, तिने एक छोटा कप नाजूकपणे माझ्या समोर ठेवला आणि त्या सुरईमधून त्या कपात एक गरम वाफाळणारं काहितरी ओतलं आणि परत एकदा दात दाखवून निघून पण गेली. मी हळूच त्या कपात डोकावून बघितलं तर त्यात हलक्या गढूळ रंगाचं पाणी होतं. कपभर पाण्यात ४-५ चिमट्या माती घातली तर कसा रंग येईल, अगदी तस्सा. मला पटकन कळेना की हे आता प्यायचं की अजून काही येतंय त्यात घालायला. एवढ्या गढूळ पाण्यात फिरवायला तुरटी नको? बरं विचारणार तरी कसं? शेवटी हळूच आजूबाजूला बघितलं. एक अरब नवरा बायको होते पुढच्या रांगेत. त्या गाउनवाल्याने (सगळेच सौदी पुरूष हे पांढरे पायघोळ झगे घालतात आणि डोक्यावर ती काळी रिंग... एक लोकप्रिय जोकः त्यांच्या डोक्यात फारसं काही नसतं म्हणून ती रिंग ते घट्ट दाबून बसवतात, म्हणजे आत जे काही आहे ते कापरासारखं उडून जाऊ नये :) ), तर त्या माणसाने ते पाणी गटकन् पिऊन टाकले. मग मी पण त्या तुरटीचा नाद सोडला आणि लावला कप तोंडाला.

काय आश्चर्य... त्या पाण्याची चव थोडी तुरट, पण खूपशी ओळखीची होती पण नक्की काय आहे ते कळत नव्हतं. त्यातला केशर - वेलदोड्याचा स्वाद मात्र लगेच ओळखू येत होता. पण माल कडक होता. थोडा वेळ का होईना तरतरी आली. पुढे कळले की ते पेय म्हणजे 'काहवा'. कॉफी बियांपासून बनवतात. थोड्या वेळाने त्या ताईचा साथीदार एका सुंदर नाजूक काचेच्या बशीत छान रसरशीत खजूर घेऊन आला. हे तर आपल्या ओळखीचं होतं. पूर्ण लक्ष मी तिकडे वळवलं. अरब, उंट आणि खजूराची झाडं हे समीकरण आपल्या डोक्यात एकदम फिट्टं असतं. त्या पैकी अरब भेटला (तो पुढच्या रांगेतला), खजूर मिळाले आता उंट कधी दिसतात त्याची उत्सुकता लागली होती.

त्या खजूरांच्या नादात विमान कधी रिव्हर्स मधे मागे आलं, हळूहळू धावपट्टीवर गेलं ते कळलंच नाही. धावपट्टीवर मात्र त्या विमानाने वेग घेतला आणि भानावर आलो. खिडकीतून बाहेर बघितलं, त्या विमानाचे प्रचंड पंख खेळण्यातल्यासारखे पण एका मंद लयीत वर खाली होत होते आणि एका क्षणात विमानाने आकाशात झेप घेतली. ज्या मुंबईत आत्तापर्यंतचे आयुष्य घालवले ती मुंबई हळूहळू लहान होत गेली. मुंबईची चमक दमक एका मोठ्या अंधार्‍या खाईने गिळून टाकली, उरला फक्त अंधार आणि खाली समुद्रात लुकलुकणारे बोटींचे अंधुक होत जाणारे दिवे... मला एकदम जाणीव झाली... आता मी एकटा. मोठा झालो, लग्न झालं तरी मी कायम आप्त-मित्रांच्या मधे होतो. गरज लागली तर पटकन धावून येणारे भाऊ होते, आधाराला आई-वडिल आणि इतर लोक होते, मित्र होते. एका क्षणात हे सगळं नाहीसं झालं, उरलो मी एकटा. मग विचार आला की, काय होईल? नविन ठिकाणी परत उभे राहू, तिथे गोतावळा जमवू. एक उमेद होती मनात. मला जाणवत होतं, आज पर्यंत नुसताच वयाने मोठा झालो, त्या ३ तासाच्या प्रवासात मात्र मी 'मी' म्हणून मोठा होत होतो. मनात विचारांचा नुसता गुंता झाला होता, विमान खोबारच्या, माझ्या खोबारच्या दिशेने उडत होतं, मी मात्र इतका थकलो होतो की परत सणसणून ताप चढला. गोळी घेतली आणि डोळे बंद केले.

*************

पुढच्या दोन-अडिच तासात काय चाललंय काही कळत नव्हतं, जेवण बहुतेक मी नाहीच घेतलं. थेट पुढची आठवण म्हणजे त्या खजूर देणार्‍या साहेबांनी मला हलवून जागं केलं आणि (परत) दात दाखवत म्हणाला, "वी हॅव अराइव्ड सर... आपण पोचलो आहोत." विमान कधी उतरलं काही कळलं नाही. थोडं चुकल्या सारखं झालं. एखादं शहर आकाशातून बघायला छान वाटतं. आणि विमान उडताना पेक्षा विमान उतरताना तो नजारा जरा जास्त वेळ बघायला मिळतो. कोई बात नही. फिर कभी. अभी तो आना जाना लगा रहेगा.

आमच्या खोबारचा विमानतळ त्या वेळी खूपच लहान होता. खोबारला लागूनच 'धाहरान' नावाचं एक गाव आहे. तिथे सौदी हवाईदलाचा एक भला मोठा तळ आहे. तोच तळ नागरी हवाई वाहतुकीसाठी पण वापरला जात असे. (आपल्या कडे पुण्याला पण सध्या अशीच व्यवस्था आहे.) विमानाच्या बाहेर आलो. शिडी वरून खाली उतरलो. सगळ्यात पहिलं काय जाणवलं असेल तर अतिशय बोचरी आणि कडक थंडी. मला सांगण्यात आले होते की थंडी असेल चांगली, गरम कपडे वगैरे घेऊन ये. पण इतकी थंडी असेल असं नव्हतं वाटलं. वाळवंटाची ही एक खासियत आहे. तिथे दोनच ऋतू. उन्हाळा आणि हिवाळा. आणि दोन्ही महाभयंकर.


धाहरान आंतरराष्ट्रिय विमानतळ

कुडकुडतच बस मधे चढलो. बरीच वळणं घेत घेत ती बस टर्मिनलच्या दारापाशी आली. लष्करी तळ असल्याने खूपच कडक सुरक्षा होती. आता कुठे खरं सौदी अरेबिया दिसायला लागलं होतं. इमारती मधे शिरून इमिग्रेशनच्या हॉल पाशी आलो. तिथे प्रचंड मोठ्या रांगा लागल्या होत्या. जवळजवळ वीसेक मिनिटांनी माझा नंबर आला. काउंटर वर एक दाढीवाला बुवाजी बसला होता. (गाउन आणि रिंग सकट). मी पासपोर्ट दिला त्याच्या हातात. त्याने उलटसुलट करून बघत असतानाच एकदम मला विचारलं, "हिंदी?" मला वाटलं की तो मला भाषेबद्दल विचारतो आहे की तुला हिंदी येते का? मी पण त्याला ऐटीत म्हणलं, 'ऑफ कोर्स'. (पुढे मला कळलं की अरबी भाषेत 'हिंद' म्हणजे 'भारत / इंडिया' आणि हिंदी म्हणजे आपण भारतिय. नशीब दोन्हीही अर्थाने माझे उत्तर बरोबर होते, नाही तर काही उलट अर्थ झाला असता तर? पण अज्ञानात सुख आणि हिंमत दोन्ही असतात. तो ठप्पा उठवून मी पुढच्या पडावाकडे निघालो.

आता कस्टम्स हॉल मधे जायचं. सगळीकडे अरबी आणि इंग्लिश मधे पाट्या होत्या. पण लोंढ्याबरोबर ढकलले जाण्याची मुंबईतली सवय इथे कामाला आली. पाट्या बघायचं कामच नाही. सगळेच प्रवासी एका दिशेने जात होते. मीही निघालो. तो कस्टम्सचा हॉल म्हणजे एक भलं मोठं मंगल कार्यालय वाटत होतं. भयानक गर्दी, त्या बरोबर येणारा तो प्रचंड गोंगाट. केवळ अरबी लोकांचा येतो तसला सुवास. कधी तिथून बाहेर पडतोय असं झालं होतं

जसं माझं सौदीला जायचं नक्की झालं तसं सामान काय न्यायचं, काय न्यायचं नाही या बाबत बर्‍याच लोकांनी माझं प्रबोधन केलं. थोडीफार चौकशी केल्यावर असं लक्षात आलं की अजिबात न्यायचे नाहीत असे दोनच प्रकार. एक, कुठल्याही प्रकारचं धार्मिक साहित्य (फोटो, मूर्ती, पुस्तकं, काही पण) आणि दुसरं कुठल्याही प्रकारची पिठं (अंमली पदार्थांच्या भितीमुळे). पुढे माझ्या एका मित्राची बायको तिथे येताना कसलं तरी पीठ घेऊन आली होती तर तिला २-३ तास बसवून ठेवलं आणि दर १५ मिनिटांनी ते पीठ तिला थोडं थोडं खायला घालत होते आणि तिच्या वर काय परिणाम होतोय ते बघत होते. ;) तर मूळ मुद्दा असा की मी सगळं नीट विचार करूनच आणलं होतं सामान. त्या मुळे नि:शंक होतो. पण २-३ मराठी पुस्तकं होती माझ्या कडे. एका रांगेत निमूटपणे उभा राहिलो. आजूबाजूला बहुतेक चेहरे भारतिय / पाकिस्तानी दिसत होते. एक ते अरबी भाषेतल्या पाट्या सोडल्या तर परदेशात आल्याचं काहीच फिलींग येत नव्हतं. आणि त्या विमानतळा पेक्षा आमच्या कुर्डूवाडीचा यश्टीटँड बरा म्हणायची पाळी होती. रांग भलति म्हणजे भलतिच हळू हळू पुढे सरकत होती, पुढे काउंटरवर प्रत्येक सामानाची कसून चौकशी होत होती. आजूबाजूच्या काही अनुभवी लोकांच्या बोलण्यावरून कारण लक्षात आले. आमच्या विमानाच्या थोडे पुढे मागेच पाकिस्तान इंटरनॅशनल एयरलाईन्सचे विमान पण आले होते. पाकिस्तानी लोकांची सौदी मधे जरा विशेषच तपासणी होते म्हणे. कारण तेच आपले नेहमीचे सुप्रसिद्ध... अंमली पदार्थांची तस्करी. या बाबतीत काही लोक भलतेच तरबेज असतात. असो.

माझा नंबर आला एकदाचा. माझी ती महाकाय बॅग चढवली त्या टेबलावर. पुढे जे काही घडले त्याला मी अजिबात तयार नव्हतो. तो कष्टम साहेब एवढे कष्ट देईल असे वाटलेच नव्हते. त्याने माझी बॅग अक्षरशः चेव आल्या सारखी उघडली आणि उपसली. उपसली म्हणजे दोन्ही हात बाजूने आत घुसवून सगळं सामान लहान मुलांच्या बोरन्हाणात बोरं, गोळ्या, चॉकलेटं उधळतात तसं उधळलं. माझा संताप अनावर झाला. मी काही बोलणार तेवढ्यात कोणीतरी हळूच माझा हात दाबला. मी वळून बघतो तर एक पोर्टर माझ्या बाजूला उभा होता. मला हळूच म्हणाला "उ जो करता है करने दो... आप चूप रहो. हाम सांभाल लेगा". त्याच्या बोलण्या वरून तो बंगाली वाटत होता. आणि त्या अनोळखी वातावरणात मला तो एकदम आधार वाटला. बांग्लादेशी होता तो. माझ्या सामानाची यथेच्छ उडवाउडव केल्या वर त्याला ती २-३ पुस्तकं दिसली. अतिशय आनंदी मुद्रेने माझ्या कडे बघत ती पुस्तकं त्याने हवेत नाचवली आणि अरबी भाषेत काहितरी विचारलं. पोर्टरसाहेब हरहुन्नरी होते. ते लगेच दुभाष्याच्या भूमिकेत शिरले. मला म्हणाले, "उ पूचता है की ये क्या है? ये किताब मे क्या लिखा है? तुम्हारा मजहब का कुछ है?" मी म्हणलं, "ये तो कहानी का किताब है." लगेच भाषांतर झाले. पण तेवढ्याने काही त्या साहेबाचे समाधान झाले नाही. त्याने माझा पासपोर्ट काढून घेतला आणि त्या पुस्तकांबरोबर त्याच्या टेबलाच्या एका खणात ठेवून दिला. आणि मला तिथनं फुटायचा इशारा केला. काही बोलणं नाही, सांगणं नाही, नुस्तं जा. माझं डोकं फुटायची वेळ आली. पण पोर्टर साहेबांवर पूर्ण निष्ठा ठेवून मी कशी बशी ती बॅग आणि सामान उचललं आणि एका कोपर्‍यात जाऊन ते सगळं नीट लावायला गेलो. (त्या शिवाय ती बॅग बंदच झाली नसती. ;) ) तिथे माझ्या सारखे बरेच कमनशिबी लोक त्याच कार्यात गुंतले होते. मी पण गतानुगतिक होऊन तिथे शांतपणे जमिनीवर फतकल मारली आणि बॅग नीट लावली. मला तिथे सोडून तो पोर्टर आत्ता येतो म्हणून गायब झाला होता. अर्धा तास होऊन गेला तरी त्याचा काही पत्ता नाही. खरं सांगतो आयुष्यात एवढं असहाय्य कधीच वाटलं नव्हतं. माझं शिक्षण, माझा अनुभव त्या क्षणी सगळं झूट होतं. तो पोर्टर माझा देव / मालक काय म्हणाल ते झाला होता.

तेवढ्यात मी एक भारी दृष्य बघितलं. एक भलीमोठी पाकिस्तानी फॅमिली (२-३ पुरूष, ४-५ बायका आणि २-३ लहान पोरं, एका बाईच्या हातात एक तान्हं मूल) पोलिसांच्या कडक पहार्‍यात घेऊन चालले होते. माझं टेन्शन अजूनच वाढलं. (या घटनेची पूर्ण माहिती मला दुसर्‍या दिवशी वर्तमानपत्रात वाचायला मिळाली. पण, ते नंतर)

बर्‍याच वेळाने स्वारी आली आणि मला खूण करून त्याच्या मागे यायला सांगितले. मी निघालो. त्याने एका ऑफिस सारख्या खोली समोर मला आणले आणि आत जायची खूण केली. मी घुसलो. तर आत मधे भली मोठ्ठी दाढी असलेला एक गाउन बसला होता पण डोक्याला रिंग नव्हती. त्याच्या टेबलावर मला माझी पुस्तकं आणि पासपोर्ट दिसला. मला अंदाज आला की आता इथे पण चौकशी होणार तर. पोर्टर महाराज हळूच शिरलेच होते आत. त्या दाढीधार्‍याने मला चक्क इंग्लिश मधे विचारलं, "हे काय आहे?" मी म्हणलं, "नॉव्हेल".

पुढचा प्रश्न, "मुस्लिम?"
मी "नो"
"ख्रिश्चन"
"नो"
"देन?" त्याच्या लेखी धर्म संपले होते. (ज्यूंना व्हिसाच देत नाहीत त्या मुळे तो ऑप्शन बाद होता).
"हिंदू"

त्याने अतिव करूणेने / तिरस्काराने माझ्या कडे बघितले आणि ती पुस्तकं चाळून बघितली. परत प्रश्न,

"लँग्वेज?"
"मराठी"

त्याने हे नाव कधीच ऐकले नसावे, त्याला मल्याळम माहिती असणार पण नक्की.... खूप लांब आंबट चेहरा करत माझा सगळा माल मला परत केला आणि जायची आज्ञा केली. मी पण एक सुटकेचा नि:श्वास टाकत तिथून सटकलो. पोर्टर साहेबांनी त्यांच्या मैत्रीची वाजवी किंमत वसूल केली आणि मी मुख्य दरवाज्याच्या दिशेला सरकलो. मला घ्यायला माझे दोन सहकारी येणार होते. सगळं नीट ठरलं होतं. त्यांनी कधी मला बघितलं नव्हतं पण ते हातात पाटी घेऊन उभे राहणार म्हणाले होते. त्यामुळे ती काही चिंता नव्हती. ते प्रवासाचे दिव्य पार पडले होते. आता सरळ गाडीत बसायचं आणि तडक मुक्कामी जाऊन आडवं व्हायचं. त्या मुख्या दरवाज्याची सरकती दारं उघडली आणि...

क्रमशः

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

अभिजीत's picture

11 Oct 2008 - 7:31 am | अभिजीत

वाचून खूपच मजा आली.

>>खरं सांगतो आयुष्यात एवढं असहाय्य कधीच वाटलं नव्हतं
परक्या देशात सुरुवातीलाच असा अनुभव आल्यावर डोकं फिरणारच ..
पुढच्या भागासाठी शुभेच्छा ..

टारझन's picture

11 Oct 2008 - 10:18 am | टारझन

बिप्पीन भौ .. या भागात खरं तर मी तुमचे विक पॉइंट बघुन तुम्हाला जरा पॉझिटीव्ह कम निगेटिव्ह रिस्पाँस देणार होतो .. पण आय कुडंट .. ज ह ब ह र्‍या .... एयरपोर्ट वरून रीटर्न आल्यावर शेजार्‍यांसमोर कसलं बेक्कार फीलींग आलं असेल .. नाकं मुरडणारे हळूच .. "आला ग बाइ परत .. विमान चुकलं वाट्ट, जाताना मारे मिरवत होता .. आता बस्स म्हणा तेल लावत " असं कुजबुजताहेत असं उगाच वाटतं ... बाकी हा अनुभव पण बेष्ट

आमची कनेक्टींग फ्लाईट होती इथोपिया वरून , तिथे माझा असाच गोंधळ... आणि एकदा नैरोबी एयरपोर्टावर तुमच्या पोर्टर सारखं मला पण एक कल्लु भेटलेलं .. साला आय ऍम युवर फ्रेंड म्हणत इमिग्रेशन पार केल्याचे ५० डॉलर मागत होता ... मी त्याला असला चुना लावला ना ... त्याला म्हणालो ब्र्दर यु हेल्प मी समबडी स्टिल माय वॉलेट .. मी मायसेल्फ शॉर्ट ऑफ मनी . . तो इतका इमोशनल झालेला की मलाच केनियन शिलींग्स देत होता .. म्हंटलं राहु दे राजा कंपनीचा माणूस आलाय ...

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...

डॉ.प्रसाद दाढे's picture

15 Oct 2008 - 9:47 am | डॉ.प्रसाद दाढे

बिपिनराव, तिन्ही भाग आत्ताच वाचले. बेहद्द आवडले. तुम्ही खूप छान लिहिता.
एखादा चित्रपट पाहतो आहे असे वाटले. अतिशय ओघवती व रसाळ शैली आहे. फारच आवडले. पुढील भाग लवकर टाका..

नंदन's picture

11 Oct 2008 - 7:33 am | नंदन

हा भागही ओघवता झालाय, बिपिनराव. दर १५ मिनिटांनी पीठ खायला लावायचा किस्सा वाचून गंमत वाटली, पण तिची बिचारीची फार वाईट अवस्था झाली असेल. बाकी मराठी पुस्तकं न्यायची नाहीत, हा तर जुलूम झाला. नशीब त्या कस्टमच्या दिव्यातून पार पडून ती पुस्तकं परत मिळाली.

अवांतर - पर्सरला काय प्रतिशब्द आहे हो मराठीत? - पुलंनी सुंद आणि उपसुंद मधला सुंद वापरला आहे :). हवाईसुंदरी आणि हवाईसुंद

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

प्रमोद देव's picture

11 Oct 2008 - 9:42 am | प्रमोद देव

मस्तच !!!!!!!

मदनबाण's picture

11 Oct 2008 - 7:42 am | मदनबाण

व्वा बिपिनजी,, वल्ला क्या सॉलिड लिखती तुम..पढनेको बहुत मजा आती..

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

प्राजु's picture

11 Oct 2008 - 8:25 am | प्राजु

बिपिनदा,
तुझी अवस्था काय झाली असेल याची कल्पना करू शकते.
आणि हे काय रे नविनच सुरू केल आहे? आणि....... ही काय पद्धत झाली अशा ठिकाणी भाग संपवायची?
पुढचा भाग या विकेंडलाच येऊदे.
लवकर लिही.
धावपट्टीवर मात्र त्या विमानाने वेग घेतला आणि भानावर आलो. खिडकीतून बाहेर बघितलं, त्या विमानाचे प्रचंड पंख खेळण्यातल्यासारखे पण एका मंद लयीत वर खाली होत होते आणि एका क्षणात विमानाने आकाशात झेप घेतली. ज्या मुंबईत आत्तापर्यंतचे आयुष्य घालवले ती मुंबई हळूहळू लहान होत गेली.

मी जेव्हा सर्वप्रथम अमेरिकेला मुलाला घेऊन एकटी आले ना, तेव्हा माझीही अवस्था काहीशी अशीच झाली होती. विमानाने रनवे वरून टेक ऑफ घेतल्यानंतर.. माझा माझ्या मातीशी संबंध तुट्ला... ही भावना खूप ओरखडे करून गेली हृदयावर.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Oct 2008 - 1:13 am | बिपिन कार्यकर्ते

मी जेव्हा सर्वप्रथम अमेरिकेला मुलाला घेऊन एकटी आले ना, तेव्हा माझीही अवस्था काहीशी अशीच झाली होती. विमानाने रनवे वरून टेक ऑफ घेतल्यानंतर.. माझा माझ्या मातीशी संबंध तुट्ला... ही भावना खूप ओरखडे करून गेली हृदयावर.

तो क्षण, विशेषतः पहिल्या प्रवासाच्या वेळचा, काहितरी विचित्रच असतो. ज्ञात सोडून अज्ञाताकडे निघालो असतो आपण. आपलं घर सोडून जायचं त्याची हूरहूर असते, त्याच बरोबर नविन जगाबद्दल उत्सुकता, कुतूहल, भिती असं काहितरी मिश्रण असतं. छ्या: .....

तू ओरखडा शब्द छान वापरला आहेस. ओरखडा हा नेहमी असा असतो की त्यामुळे खूप मोठी जखम तर होत नाही पण एक सेकंदाकरता का होईना पण थेट डोक्यापर्यंत कळ जाते.

बिपिन.

अनिल हटेला's picture

11 Oct 2008 - 8:42 am | अनिल हटेला

>>मी कायम आप्त-मित्रांच्या मधे होतो. गरज लागली तर पटकन धावून येणारे भाऊ होते, आधाराला आई-वडिल आणि इतर लोक होते, मित्र होते. एका क्षणात हे सगळं नाहीसं झालं, उरलो मी एकटा. मग विचार आला की, काय होईल? नविन ठिकाणी परत उभे राहू, तिथे गोतावळा जमवू. एक उमेद होती मनात. मला जाणवत होतं, आज पर्यंत नुसताच वयाने मोठा झालो, त्या ३ तासाच्या प्रवासात मात्र मी 'मी' म्हणून मोठा होत होतो. मनात विचारांचा नुसता गुंता झाला होता,

अगदी योग्य शब्दात वर्णन केलत ,राव !!

>>माझा नंबर आला एकदाचा. माझी ती महाकाय बॅग चढवली त्या टेबलावर. पुढे जे काही घडले त्याला मी अजिबात तयार नव्हतो. तो कष्टम साहेब एवढे कष्ट देईल असे वाटलेच नव्हते. त्याने माझी बॅग अक्षरशः चेव आल्या सारखी उघडली आणि उपसली. उपसली म्हणजे दोन्ही हात बाजूने आत घुसवून सगळं सामान लहान मुलांच्या बोरन्हाणात बोरं, गोळ्या, चॉकलेटं उधळतात तसं उधळलं.

सगळे कस्टम वाले सारखेच साले !!!
हाँगकॉंग कस्टम वाल्यानी पन २ तास पीडल होत मला ......

येउ देत खोबार चा पूढला भाग !!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

फटू's picture

11 Oct 2008 - 9:13 am | फटू

हा भाग तर एकदम जबराट लिहला आहेस रे...

वाचताना असं वाटत होतं की आपण एखादा वेगवान चित्रपट अगदी सीटचे दोन्ही दांडे गच्च पकडून पाहत आहोत...

बाकी "तिकडे " जात होता तर भीती ही वाटली असेल ना :P

सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

चतुरंग's picture

11 Oct 2008 - 9:26 am | चतुरंग

ट्रकवाल्या डायवरांच्या भाषेत बोलायचं तर 'एकदम मस्त मौसम पकडला आहेस'.
(तुझी सकाळची फ्लाईट रात्री निघालेली वाचून, आमची मुंबईहून रात्री ९.३० वा. निघणारी एअर इंडियाची फ्लाइट तब्बल दुसर्‍या दिवशी सकाळी साडेसातला निघालेली आठवली आणि अंगावर काटा आला!
आम्ही तर पुण्याहून आलेले असल्याने परत घरी जाणे वगैरे बातच सोड. चिडचिड, वैताग, संताप, अतिशय टोकाचा राग, असहायता, हतबलता, नैराश्य आणि शेवटी वैराग्य अशा सर्व भावनातून केवळ १० तासात आम्हाला नेण्याचे महान काम एअर इंडियाने केले होते!)

पहिल्या उड्डाणातली हुरहुर समजण्याजोगी.

दर १५ मिनिटानी पीठ खायला लागणे म्हणजे वैतागच की रे!

उपसली म्हणजे दोन्ही हात बाजूने आत घुसवून सगळं सामान लहान मुलांच्या बोरन्हाणात बोरं, गोळ्या, चॉकलेटं उधळतात तसं उधळलं.
हे लईच भारी जमलंय वाक्य! ;)
लगे रहो! पुढचं लवकर लवकर टाक रे.

(खुद के साथ बातां : रंग्या, पुढचा भाग जर एक दिवसात आला नाही तर बिपिनला दर १५ मिनिटांनी पीठ खायची शिक्षा द्यायची का? B) )

चतुरंग

वैशाली हसमनीस's picture

11 Oct 2008 - 9:29 am | वैशाली हसमनीस

जबरदस्त अनुभव आणि जबरदस्त वर्णन ! उत्सुकता वाढत चालली आहे.

सहज's picture

11 Oct 2008 - 9:38 am | सहज

माशाल्ला.

हा भाग देखील सुरेख. ओघवते वर्णन.

वाचायला मजा येते आहे.

विसोबा खेचर's picture

12 Oct 2008 - 9:54 am | विसोबा खेचर

हा भाग देखील सुरेख. ओघवते वर्णन.

हेच म्हणतो....

बिपिनशेठ, छानच लिहिताय तुम्ही. लगे रहो....

तात्या.

झकासराव's picture

11 Oct 2008 - 9:38 am | झकासराव

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
आज पर्यंत नुसताच वयाने मोठा झालो, त्या ३ तासाच्या प्रवासात मात्र मी 'मी' म्हणून मोठा होत होतो>>>>>
क्या बात है. :)
सही चाललय.
जरा भाग लवकर लवकर येवु देत. :)

चन्द्रशेखर गोखले's picture

11 Oct 2008 - 10:02 am | चन्द्रशेखर गोखले

छान किसताय ! चालू द्या!! मस्त वाटतय वाचायला !!!

जैनाचं कार्ट's picture

11 Oct 2008 - 10:15 am | जैनाचं कार्ट (not verified)

जबरा विपीन !

मस्त वेगवान लेखन झालं आहे ... आवडलं बॉ !

लवकर लिही पुढील भाग !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

भाग्यश्री's picture

11 Oct 2008 - 2:22 pm | भाग्यश्री

सहमत..

विनायक प्रभू's picture

11 Oct 2008 - 3:14 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
ह्याला म्हणत्तात पिप इन कार्यकर्ते. मग इतके दिवस फक्त वाचन मात्र का?

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Oct 2008 - 1:21 am | बिपिन कार्यकर्ते

मग इतके दिवस फक्त वाचन मात्र का?

काही खास कारण नाही हो मास्तर. लिहावसं वाटलं म्हणून लिहिलं...

बिपिन.

ऋषिकेश's picture

11 Oct 2008 - 4:25 pm | ऋषिकेश

सुंदर भाग! नेहेमीप्रमाणे ओघवता....
नव्या देशाच्या वर्णना मुळे अनुभव, संदर्भ सारेच बदलते.. :)
खूपच रोचक शैली.. हा भागही आवडला.. पुढील भाग येऊ दे!

हवाईसुंदर्‍या (पर्सरला काय प्रतिशब्द आहे हो मराठीत?)

हवाईसुंदर्‍या नको हो अगदी (उंदर्‍या सारखं वाटतं ;) ).. पुलंचा हवाईसुंद आहेच नाहितर हवाईदेखणा चालेल ;)
इंडियन एयरलाईन्स / एअर इंडिया मधे हवाईकाकू असतात तत्सम पुरुषप्रकाराला हवाईकाका कसा वाटातो ;)

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Oct 2008 - 1:25 am | बिपिन कार्यकर्ते

देखणा...

मस्तच. मी असं म्हणेन की एअर इंडिया / इंडियन एयरलाईन्स असेल तर हवाई काका / काकू आणि इतर कुठलीही असेल तर हवाई सुंदरी / देखणा.

बिपिन.

चतुरंग's picture

14 Oct 2008 - 2:14 am | चतुरंग

नकोरे, मग हिंदीत 'हवाईचाचा!' म्हणावे लागेल!! अर्थाचा अनर्थ ;)

चतुरंग

रामदास's picture

11 Oct 2008 - 4:45 pm | रामदास

वाचला लेख .सगळे लेख परत वाचले.
लेखांची चढती कमान छान जमली आहे.
प्रत्येक लेख एकटा वाचला तरी छान वाटतोय.
लिहीत रहा .तुमचा फॅन क्लब तयार झाला आहे.

सुहास कार्यकर्ते's picture

11 Oct 2008 - 4:51 pm | सुहास कार्यकर्ते

(वाह खुपच चान सम्पुर्न लिहुन त्याच्या कौपिज काधुन थेव

सर्वसाक्षी's picture

11 Oct 2008 - 5:37 pm | सर्वसाक्षी

खोळंबा, सरकारी सोपस्कार ... परदेशात काय हे स्वागत!
आता बाहेर पडल्यावर काय? एकदम मालिकांसारखे - पुढील भागात पाहा:)
झकास लेखन

रेवती's picture

11 Oct 2008 - 6:52 pm | रेवती

सर्वात छान जमलाय. आता क्रमशः ची आपल्याला चांगलीच सवय झाली आहे. लेख कुठे संपवायचा हे बरोब्बर कळले आहे.
पुढचा भाग वाचायची उत्सुकता आहे.

रेवती

पिवळा डांबिस's picture

11 Oct 2008 - 8:19 pm | पिवळा डांबिस

ह्यावेळेचं खोबरं ही चांगलं आहे....

(पुढला नारळ कधी फुटेल याची वाट पहाणारा)
डांबिसकाका

(अवांतरः या प्रवासात तुमच्याबरोबर तुमच्या सौ. ही होत्या का हो? नाही म्हणजे विमानतळावर होत्या, नंतर गायब झालेल्या दिसतायत! असत्या तर कस्टम्सने तुमची बॅग उपसल्यावर झालेली त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यात जरा मजा आली असती...)
:)

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Oct 2008 - 1:35 am | बिपिन कार्यकर्ते

अहो...

ती फक्त मला सोडायला आली होती विमानतळावर. मी एकटाच गेलो होतो सुरवातीला. आणि तिथे काहिही झाले तरी त्या क्षणी कोणाच्याही मनात एकच भावना असते, भयंकर घाबरल्याची. पहिल्यांदा सौदीला जाताना प्रत्येक जण घाबरलेला असतो जाम. :)

बिपिन.

स्वाती दिनेश's picture

11 Oct 2008 - 10:14 pm | स्वाती दिनेश

मस्त झालाय हा भाग सुध्दा.. आवडला.
स्वाती

चित्रा's picture

12 Oct 2008 - 8:09 am | चित्रा

मुंबईची चमक दमक एका मोठ्या अंधार्‍या खाईने गिळून टाकली, उरला फक्त अंधार आणि खाली समुद्रात लुकलुकणारे बोटींचे अंधुक होत जाणारे दिवे... मला एकदम जाणीव झाली... आता मी एकटा.

एकदम पहिल्या परदेशी विमानप्रवासाची आठवण आली. लेखन आवडले.

यशोधरा's picture

12 Oct 2008 - 11:37 am | यशोधरा

मस्त चाललाय लेखन प्रवास!

घासू's picture

12 Oct 2008 - 5:26 pm | घासू

अहो पहिल्या परदेश प्रवासाच्यावेळीच तुम्ही ५० प्रवासा॑चा अनुभव गाठीशी बाध॑लात की, एका क्षणी अस वाटल॑ की आपणच आता सौदी अरेबियात उतरतो की काय? पण मानल॑ बुआ तुम्हाला एकदम झकास लिहिता.

शितल's picture

12 Oct 2008 - 5:33 pm | शितल

प्रवास आवडला.
:)

मृदुला's picture

12 Oct 2008 - 10:03 pm | मृदुला

लेखांक आवडला. तुमच्या पत्नी सुरुवातीला विमानतळावर होत्या व नंतर विमानातून उतरताना नव्हत्या हे काही कळले नाही.

प्राजु's picture

12 Oct 2008 - 10:14 pm | प्राजु

तुमच्या पत्नी सुरुवातीला विमानतळावर होत्या व नंतर विमानातून उतरताना नव्हत्या हे काही कळले नाही.
त्यांच्या पत्नी पोटूश्या होत्या ना. विमानतळावर बिपिनदा ला बाय बाय करायला आल्या होत्या.. त्यामुळे बाय बाय झाल्यावर घरी परतल्या आणि विमानातून उतरताना बिपिनदा एकटाच होता.. सोप्प आहे हो.. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Oct 2008 - 1:51 am | बिपिन कार्यकर्ते

बरोब्बर...

कित्ती कित्ती हुश्शार तुम्ही असं तुमच्या ख.व. मधे लिहिलं जाईल. ;)

बिपिन.

भडकमकर मास्तर's picture

13 Oct 2008 - 12:33 am | भडकमकर मास्तर

बिपिनभौ, तीन्ही लेख वाचले...
एकदम मस्त झालेत...
...
पुढचे येउद्यात हो लवकर लवकर... :)
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

आनंदयात्री's picture

13 Oct 2008 - 12:12 pm | आनंदयात्री

पुढच्या भागाची वाट पहातोय.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Oct 2008 - 12:20 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

खोबरागडचे बिपीनचंद्रराजे, लवकर टाका हो पुढचे भाग!

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Oct 2008 - 1:43 am | बिपिन कार्यकर्ते

आधी (कौतुकाची एखादी सुंदर) प्रतिक्रिया टाका, मग पुढचे भाग मागा. लिखाण काय फुकटात येतं? मेहेनत लागते त्या साठी कळ्ळं?

X(

बिपिन.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Oct 2008 - 9:53 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

आधी (कौतुकाची एखादी सुंदर) प्रतिक्रिया टाका, मग पुढचे भाग मागा. लिखाण काय फुकटात येतं? मेहेनत लागते त्या साठी कळ्ळं?
व्वा! काय मस्त लिहिलंत हो बिपीनचंद्रराजे तुम्ही! मी तर एकदम फ्यान झाल्ये तुमची! पण तो विमानतळावरून परत जाणं, फर्स्टक्लासमधे प्रवास करायला मिळणं वगैरे काय भारी भारी कल्पना सुचल्यात हो तुम्हाला, मान गये मुघल-ए-आझम! कसं काय हो सुचतं तुम्हाला एवढं सगळं? तुम्ही रोज सकाळी दूध-बदाम खात असाल नाही??

बाकी तुम्ही काय म्हणा मोठे राजे, राजकारणी लोकं; तुम्ही जे कराल त्याला आम्ही सामान्य जनता चांगलंच म्हणणार.
बिपीनभौ आगे बढो, हम तुम्हारे साथ है!
जीतेगा भाई जितेगा, बिपीनकुमार जितेगा!

(आणि सगळ्यात शेवटी, ह.घ्या असं लिहिलेलं नसेल तरी ते लिहिलेलं आहे असं समजा, आणि टाका पटापट पुढचे भाग; एला, मला छळत असतात एलियनचं काय झालं, एलियन आता काय करणार म्हणून!)

अदिती

टारझन's picture

14 Oct 2008 - 1:56 am | टारझन

लवकर टाका हो पुढचे भाग!
काय हो आज्जी ? सगळेच लोकं खगोलशास्त्रज्ञ नसतात ... बिपीन भौंना काम करावं लागतं हापिसात ... चाल्ले मोठे ..
" भाग टाका भाग " ... काय जिल्ब्या आहेत का बुंदी आहे ? पटपट टाकायला .. बिप्पीन भौ .. उशीर झाला चालेल .. पण क्वालिटी ठेवा ... नाय तर ... ( हे सां. न. ल. )

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...

भिंगरि's picture

13 Oct 2008 - 10:54 pm | भिंगरि

हा भाग देखील सुरेख. ओघवते वर्णन.

+१ हेच म्हणते.

काहिहि कारण नसताना निव्वळ त्रास द्यायचा म्हणुन देणारे अधिकारि सगळिकडेच असतात हे समजण्यासारख आहे पण तुमचा अनुभव वाचुन परत एकदा संताप आला.

धनंजय's picture

14 Oct 2008 - 2:17 am | धनंजय

आता पुढच्या भागात उंट!

(हा कहवा प्रकार करून बघायला पाहिजे. मागे कोणीतरी पाकृ दिली होती...)

मनस्वी's picture

14 Oct 2008 - 12:01 pm | मनस्वी

छान झालाय हा भाग.

तिला २-३ तास बसवून ठेवलं आणि दर १५ मिनिटांनी ते पीठ तिला थोडं थोडं खायला घालत होते

हे काहीतरीच! पण, मि.इंडियातला तेजा आठवला. :)

मनस्वी

सुनील's picture

14 Oct 2008 - 3:04 pm | सुनील

झक्कास प्रवासवर्णन बिपिनभौ!

आयला दोन्-चार मराठी कादंबर्‍यांपायी ही फरफट? कमाल आहे सौदीवाल्यांची.

आणि दर पंधरा पंधरा मिनिटांनी कच्चे पीठ खाणारीची तर दया येते हो! अपचन झालं असेल दुसर्‍या दिवशी!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

डॉ.प्रसाद दाढे's picture

15 Oct 2008 - 9:55 am | डॉ.प्रसाद दाढे

आणि दर पंधरा पंधरा मिनिटांनी कच्चे पीठ खाणारीची तर दया येते हो! अपचन झालं असेल दुसर्‍या दिवशी!!

नशीब ते 'हि॑गाष्टक चूर्ण' नव्हते ! :)

llपुण्याचे पेशवेll's picture

14 Oct 2008 - 4:11 pm | llपुण्याचे पेशवेll

मला खरेतर मुंबईवरून उडालो तेव्हा तर असे काही वाटले नव्हते पण जेव्हा विमान मध्यंतरासाठी ब्रुसेल्स ला थांबले व तेथून परत उड्डाण केले तेव्हा मला खरे एकटे एकटे वाटले. आणि या गोष्टीचीही जाणीव झाली की आता परतीचे दोर तुटले आहेत कमीत कमी काही महिन्यांसाठी तरी. तुमच्या मागच्या २-३ लेखांमुळे या सर्व्याची परत आठवण झाली..

पुण्याचे पेशवे

संदीप चित्रे's picture

15 Oct 2008 - 12:19 am | संदीप चित्रे

चला पहिल्याच विमान प्रवासात प्रथम दर्जा ! ते बोरन्हाणाचं वाक्यं खूपच आवडलं.
परदेशात आल्यावर एकटेपणाची जाणीव, निदान सुरूवातीला तरी, खूपच कुरतडते :(
त्यातही पहिला महिना विस्फारलेल्या नजरेने सगळं टिपण्यात जातो आणि मग दुसर्‍या महिन्यात घराच्या आठवणी खूपच तीव्र होतात ! तिसर्‍या महिन्यात मन स्वतःची समजूत काढून स्वतःला घट्ट करतं !!