मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आरोग्यवर्धक पा. क्रु. क्रमांक ३ .... तंबीटाचे लाडू......

मुक्त विहारि · · पाककृती
कालच मी सीकेपी खाद्य जत्रेला गेलो होतो.त्याचा व्रुत्तांत मिपावर टाकला.नेहमीप्रमाणे तो बायकोने वाचला.ती मुलतः कर्नाटकातली तर मी मराठी मातीतला.आपला नवरा कर्नाटकी प्रेमीच असावा, ह्यासाठी ती अधून-मधून तंबीटाचे लाडू,सुसला तर करत असतेच शिवाय चटणी पुडी,चित्रान्ना,बिशी बेळी भात हे पण होत असतेच.मी व्रुत्तांत लिहीत असतांनाच स्वैपाक घरातून किसणीचा आवाज ऐकला.भर दुपारी आपली बायको, काय किसत आहे? हे बघावे म्हणून गेलो तर, बायकोने गूळ चिरून ठेवलेला आणि खोबरे पण किसून तयार होते. तिला विचारले, काय करतेस? तर म्हणाली, तंबीटाचे लाडू. मी म्हणालो, मग ठीक आहे.मला वाटले, तू काय कानोले वगैरे बनवतेस की काय? ती म्हणाली, मी कशाला कानोले वगैरे बनवू? त्यापेक्षा तुम्हीच एखादी कानोले बनवणारी स्वैपाकीण शोधा. (आमची बायको, मिपाचे कट्टा व्रुत्तांत वाचते, आणि त्यातील मौलिक माहिती, कधी कधी वदते.) मी म्हणालो, ठीक आहे.मग तू ही रेसीपी टाक आपल्या मिपावर. ती म्हणाली, हे असले धागे काढायचा शौक तुम्हाला.मी इतक्यात काही लिहीणार नाही मिपावर. आता बायकोने नकार दिल्यामुळे ही तंबीटाच्या लाडवाची पा.क्रु. लिहायची जबाबदारी आम्हाला घ्यावीच लागली.काय करणार? तर ते असो.... आता प्रथम साहित्य. २ वाट्या डाळं भाजून घ्या. १ वाटी खोबर्‍याचा कीस, अरे हो, सुक्या खोबर्‍याचाच कीस. ३ चमचे तीळ १ चमचा खसखस ५ चमचे तूप गूळ चवी नुसार. पाव चमचा वेलदोडा पूड , , , क्रुती: प्रथम डाळ भाजून घ्या.ते मिक्सरमध्ये घाला.लगेच पुड करायला घेवू नका.आता मंद गॅस वर खोबरे भाजून ताटलीत काढा.मग तीळ भाजून घ्या.आणि तो पण ताटलीत काढून घ्या.गॅस बंद करा.आता त्याच कढईत ५ चमचे तूप घाला आणि किसलेला गूळ घाला. आणि आता डाळ्याची पूड करा.तोपर्यंत कढईतला गूळ आणि तूप थोडे विरघळले असेल. , , गूळ जर विरघळलेला नसेल, तर थोडा वेळ मंद गॅस वर ठेवून गूळ विरघळवून घ्या.पाक करू नका. , आता ह्या विरघलेल्या गूळात डाळ्याचे पीठ्,खोबर्‍याचा कीस्,तीळ, खसखस आणि वेलदोडा पूड टाका. , आणि उलथन्याने थोडे हलवून सारखे करून घ्या. , तापमान थोडे आटोक्यात आले, की, सरळ हाताने मळून घ्या आणि लाडू वळायला घ्या.लाडवाचा आकार थोडा मध्यभागी खोलगट ठेवा. , कर्नाटकांत हे लाडू नागपंचमीला करतात.

वाचन 14721 प्रतिक्रिया 28

जेपी Mon, 02/17/2014 - 18:05
पाक्रु आवडली . पणा डाळं मंजे डाळव/दाळव का ? नसल्यास कोणची डाळ . अवांतर -हरभर्याचे फुटाणे केल्यावर त्यामध्ये जे असत त्याला दाळव मणतात .

गवि Mon, 02/17/2014 - 20:31
वा वा वा वा.. आले का तंबिटलाडू.. दिलातच फुटला हा लाडू एकदम. धन्यवाद रेव..अम.. मुवि.. ;)

रेवती Mon, 02/17/2014 - 21:58
देवाऽऽऽ! किती दिवसांनी पावलास! ;) तंबिटाचे वेगळ्या पद्ध्तीचे लाडू छान दिसतायत. इथे येऊन 'हुश्श्य!' असे म्हणणार होते पण आमच्याकडे तांदळाचे लाडू असतात व त्याबरोबर तिळाचा लाडू असतोच लहानसा! लाडूंचा आकार अगदी अस्स्साच करून त्या खळग्यात तिळाचा लाडू ठेवून तीळ, तंबीटाची जोडी प्रसादाची म्हणून वाटायची असते. अभीभी म्येरा काम बाकीच है अयसा दिखताय.

In reply to by रेवती

गवि Tue, 02/18/2014 - 10:56
मिक्सर होनेकु मंगताय .. ट्राय मारेला था.. जम्या नै.. काय गं तुमची ही भाषा. सिनेमाचे परिणाम सगळे. ते काही नाही. उद्या सरळ सार्वजनिक वाचनालयात जायचं आणि ह.ना. धांदरफळेनी लिहीलेलं पुस्तक घेऊन यायचं. "सिनेमा - एक शाप."

In reply to by रेवती

मुक्त विहारि Tue, 02/18/2014 - 12:01
व्यक्ती तितक्या व्रुत्ती आणि व्यक्ती तितक्या पाक-क्रुती साधी पुरणपोळी देखील विविध प्रकारे बनवली जाते आणि तितक्याच विविध प्रकारे खाल्ल्या जाते.मग त्या बचार्‍या लाडवांनी तरी काय घोडे मारले आहे? आमच्या कडे डाळ्याचे पीठ वापरून लाडू केल्या जातात.तर तुमच्या कडे तांदूळाचे पीठ वापरुन. त्यामुळे, तुमच्या लाडवांची पण क्रुती येवू द्यांत. वाटल्यास तुम्ही क्रुती द्या. आम्ही करून बघतो.

In reply to by सूड

मुक्त विहारि Wed, 02/19/2014 - 13:36
आणि मुख्यत: थकवा पळाला का? तूप, गूळ आणि डाळं अधिक खसखस,खोबरे आणि तीळ असल्याने कष्टकरी जनतेसाठी हे लाडू बेस्ट. उगाच ते आपले मल्टी व्हिटॅमिनच्या गोळ्या घेण्यापेक्षा, हे असले पदार्थ खावेत.

पैसा Sun, 02/23/2014 - 15:50
वेगळीच पाकृ! मला तंबिटाचे लाडू म्हणजे तांदुळाच्या पिठाचे माहिती होते.