मॉर्निंग वॉल्क ! माझगावचा डोंगर !!
आज सकाळी सहा वाजता भारत-न्यूझीलंडचा सामना बघायला उठलो पण घरच्यांच्या ओरडा कम सूचनेनंतर प्लॅन चेंज करत कधी नव्हे ते मॉर्निंग वॉल्कला बाहेर पडलो. मस्त ट्रॅक पॅंट घातली, वर नवे कोरे पांढरे स्पोर्ट्स टीशर्ट. पायातले स्पोर्ट्सशूज मात्र जुनेच. एक फारसे वापरात नसलेले पण बर्यापैकी छान स्पोर्ट्सवॉच सुद्धा धुंडाळले. सकाळी साडेसहाला उन्हाचा पत्ता नसल्याने गॉगलचा मोह तेवढा आवरला. गाणी ऐकायला म्हणून हॅण्सफ्री कानात टाकले. एकंदरीत सज धज के घरापासून साडेसात मिनिटांच्या अंतरावर असलेल्या माझगावच्या डोंगराकडे कूच केले. वाटेत सव्वाचार मिनिटांनी भमरसिंग मिठाई अन फरसाणवाला लागतो, येताना त्याच्याकडे खादाडी करून घरच्यांसाठी पण गरमागरम सामोसे घ्यायचा प्लान होता. मात्र प्लॅन थोडा चेंज करत पोटात किलबिलणार्या कावळ्यांना शांत करायला मी आधीच खादाडी करायचा निर्णय घेतला. तसेही कुठे मला डोंगरावर सूर्य नमस्कार मारायचे होते. जी काही भटकंती वा निसर्गाशी प्रणयाराधना करायची होती ती भरल्यापोटी करणे केव्हाही चांगलेच..
काल अवचितपणे पडलेल्या पावसामुळे वातावरण भन्नाटच होते. किंबहुना सकाळी उठल्यावर खिडकीतून पुर्ण मुंबईवर एक नजर फिरवून हे वातावरण बघूनच मी हा मॉर्निंग वॉल्कचा निर्णय घेतला. जेवढे उल्हासित खिडकीतून बाहेर नजर फिरवताना वाटले होते त्यापेक्षा जास्त बाहेर पडल्यावर वाटू लागले. वाटेत विचार आला की च्यायला सकाळी साडेसहा-पावणेसातला भमरसिंगकडे काय खायला मिळणार आहे. मात्र माझा अंदाज साफ चुकलाय हे मी समजून चुकलो जेव्हा तिथे जमलेली गर्दी मला लांबूनच दिसली. एवढ्या सकाळी खाण्याचे प्रकार मात्र मोजकेच होते, पण आवडीचे असेच होते. मी एक गरमागरम सिंगल समोसा आणि एक प्लेट फाफडा-जिलेबी मिक्स घेतली. याआधी कधी हे खाल्ले नव्हते असे नाही पण असे भल्या पहाटे खाण्यातील मजा काही औरच. ईसके उपर चाय तो बनती हि है म्हणून लागलीच भटाच्या टपरीकडे मोर्चा वळवला. हा खाण्यापिण्याचा प्रोग्राम उरकून मी डोंगराच्या मेनगेट पाशी येऊन मोबाईल चेक केला तर सात वाजून बारा मिनिटे झाली होती.
सव्वासात वाजले तरी वातावरण असे होते की सव्वाआठपर्यंत तरी सुर्याची कोवळी किरणे भूतलावर पोहोचणार नव्हती. मी कानातली गाणी चालू करून डोंगर चढायला घेतला. संगीताच्या तालावर श्रम फारसे जाणवत नाही हा स्वानुभव. तसेही डोंगर चढणे म्हणजे काही फार गड सर करणे नव्हते. मुळात जिथून चढायला सुरूवात करतो तो डोंगराचा पायथाच समुद्रसपाटीपासून बरेच उंचीवर असल्याने पुढे पाचेक मिनिटेच रमतगमत चालायचे असते. टेकडीच्या एका टोकावर असलेल्या देवीच्या मंदिराकडे न जाता मी जोसेफ बापटिस्टा गार्डनच्या दिशेने पावले वळवली. रस्त्यात अध्येमध्ये दिसत होती ती कुठल्या झाडाखाली, कुठल्या बेंचवर, कुठल्या कठड्यावर, तर कुठे पायरीवरच पेपर अंथरून.. अंह, प्रेमी युगुले नाही, तर शाळाकॉलेजातील मुले अभ्यास करत बसली होती. त्यांना पाहून माझे दहावी-बारावीचे दिवस आठवले. अश्या अभ्यासूंसाठी डोंगराच्या एका शांत भागात पण निसर्गाच्याच सानिध्यात सिमेंट कॉंक्रीटचे तंबू टाईप स्टडीकॅंप उभारले आहेत, मात्र त्या ठराविक जागेतच अभ्यास करण्यापेक्षा एवढ्या भल्यामोठ्या डोंगरावर वेगवेगळ्या जागा शोधत अभ्यास करण्यातच आम्हीही धन्यता मानायचो. वाटेतल्या झाडांवर कावळ्यांची कावकाव सुरू झाली होती, मात्र वर गार्डनमध्ये विविध पक्षी आजही गलका करत असतील अशी आशा होती. चला बघूया पुढे ते खरेच मला भेटले का ते..
तर, माझगाव परिसराला पाण्याचा पुरवठा करणार्या, डोंगरमाथ्यावर वसलेल्या टाकीच्या तळाशी, उजव्या हाताच्या गेटने मी गार्डनमध्ये प्रवेश केला. नेहमीची संध्याकाळची गर्दी नसल्याने पार दूरवर नजर जात होती. एक गार्डन, त्या पलीकडे दुसरे, त्या पलीकडे तिसरे ... प्रत्येकाचा आपलाच एक आकार आणि आपलेच एक वैशिष्ट्य. कमीअधिक प्रमाणात कापले जाणारे गवत तर कुठे त्या गवताच्या रंगाची भिन्नता. प्रत्येक गार्डनची सीमारेषा आखणार्या फूलझाडांचेही सतरा प्रकार. प्रत्येकात असलेली बसायची सोय देखील वेगवेगळ्या आकार उकाराची. या सर्वांना सामाऊन घेणार्या परीघावरून फिरणारा जॉगिंग ट्रॅक, ज्यावर आपण काय किती धावलो हे कडेने लिहिलेल्या मार्किंग्सवर मोजत काही फिटनेस कॉशिअस स्त्री-पुरुषांचे धावणे सुरू होते. मी मात्र त्यांच्या वेगाला डिस्टर्ब न करता त्याच परीघावरून चालतच एक राऊंड मारून पुर्ण डोंगराला एकदा नजरेखालून घालायचे ठरवले. आरामात रमतगमत चालायचे ठरवले तरी सकाळचा फ्रेश मूड, आजूबाजुला धावणार्यांमुळे तयार झालेले उत्साही वातावरण आणि पायात असलेले स्पोर्ट्स शूज यांमुळे माझीही पावले झपाझप पडत होती.
अर्धी फेरी मारून झाल्यावर एक पाणवठा लागला, तिथेच नळाला तोंड लाऊन थंडगार पाणी आत टाकले. थोडे सवयीनेच तोंडावर शिंपडले आणि तोच ओला हात केंसांतून आरपार फिरवला तसे थंडी जाणवून गारठून निघालो. मात्र गालाला सुया टोचल्यासारखे वाटू लागल्याने मूड डबल फ्रेश झाला. पुढे दोन पर्याय होते, एक पुढे त्याच जॉगिंग ट्रॅकवर जावे किंवा चार पायर्या उतरून गार्डनच्या खालच्या अंगाला यावे. डोंगराचा एक कडाच तो ज्याला पुर्णपणे सुरक्षिततेचे कुंपण घातले आहे. त्या आत बसण्यासाठी म्हणून तसाच पुर्ण या टोकापासून त्या टोकापर्यंत कठडा फिरवला आहे. अर्थात मी तिथेच गेलो हे वेगळे सांगायची गरज नाही. तिथून खाली डॉकयार्ड स्टेशन दिसते तर समोर पसरलेला अथांग समुद्र, एक बंदर, जे भाऊचा धक्का म्हणून ओळखले जाते. रेल्वेच्या पुलावर, पर्यायाने उंचावर असणारे डॉकयार्ड स्टेशन देखील तिथून खूप खाली आहे असे भासते. खाली स्टेशनला लागणारी ट्रेन भातुकलीच्या खेळातली वा एखाद्या प्रोजेक्टच्या मॉडेलमधली आहे असे वाटावे. भाऊच्या धक्क्याच्या आसपास कुठलीही गगनचुंबी इमारत नसल्याने समुद्र अगदी काठापासून क्षितिजापर्यंत एकाच नजरेत बघता येतो. बंदराला लागलेल्या बोटी अन डॉकमधील मोठाली यंत्रे आणि क्रेन्स हा समुद्र इतर समुद्रांपेक्षा वेगळा आहे हे दर्शवत होते. जवळपास पाऊण एक तास मी तिथेच गाणी ऐकत बसून होतो, हळूहळू दक्षिण मुंबई शहराला जागे होताना बघत.
कोलाहल वाढू लागला, पक्ष्यांच्या किलबिलीची जागा फलाटावरच्या वाढत्या गर्दीचा गोंधळ घेऊ लागला, तसे मी उठायचे ठरवले. दुतर्फा वाढलेल्या झाडांमुळे अजूनही सुर्याची किरणे माझ्यापर्यंत पोहोचली नव्हती. पण जसे पुन्हा मोकळ्या बगीच्यांमध्ये आलो तसे कोवळे उन जाणवू लागले. तो उबदारपणा हवाहवासा वाटू लागला. म्हणून आता तो उपभोगायसाठी डोंगरावरचा मुक्काम आणखी थोडा वाढवायचे ठरवले. एक बाकडा पकडून, अंह, त्यावर बसलो नाही तर त्याच्या कडेला माझे शूज काढून ठेवले आणि माझ्या आवडत्या प्रकारासाठी सज्ज झालो. दव पडलेल्या गवतावरून अनवाणी पायांनी चालणे. खाली तळपावलांना जाणवणारा थंडगार ओलावा, सोबत गुदगुल्या करत टोचणारी गवताची पाती आणि वर अंगाखांद्यावर खेळणारी सोनेरी किरणे. अंगावरची सारी वस्त्रे भिरकाऊन तिथेच लोळत पडावे असा मोह पाडणारा अनुभव घेत मी पुढची पंधरा-वीस मिनिटे फेर्या घालत होतो. या प्रकाराची संध्याकाळीही आपलीच एक मजा असते, खास करून डोंगराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या कारंज्याच्या जवळचे एखादे गार्डन पकडावे, ते ही वार्याची दिशा अशी बघावी की कारंज्याचे तुषार त्या सुसाट वार्याबरोबर उडत येऊन आपल्याला पार न्हाऊन टाकतील. आयुष्यातल्या सार्या चिंता या प्रकारात विसरायला होतात. माझे अभ्यासाचे टेंशन तरी वेळोवेळी विसरायला मी हाच फंडा वापरायचो.
असो, तर त्याचवेळी घड्याळात वेळ चेक करून आता माहेरी गेलेली बायको उठली असेल या हिशोबाने तिला फोन लाऊन त्या गवतावर चालता चालताच तिच्याशीही दहा-पंधरा मिनिटे बोलून घेतले. आज आपला नवरा चक्क स्वताहून फोन करून चक्क दहा ते पंधरा मिनिटे बोलतोय आणि ते ही चक्क हळूवार आणि रोमॅंटीक.. एकंदरीत चक्क्राऊनच गेली ती बिच्चारी.
बस मग पुढे काय परतीचा रस्ता. उतरणीचा असल्याने तरंगतच उतरलो. तसेही दमण्यासारखे श्रमदान झाले नव्हतेच, किंबहुना दिवसभर, अंह आठवडाभर पुरणारा उत्साह घेऊन परतत होतो. वाटेत घरच्यांसाठी सामोसे पार्सल घ्यायला विसरलो नाही, आणि एकदाची स्वारी नऊच्या सुमारास घरी परतली !
------------------------------
सदर अनुभव आमच्या माझगावच्या डोंगराची जाहीरात करण्यासाठी लिहिला आहे. तर कधी आलात त्या भागात जरूर भेट द्याल. अन मलाही आवाज द्यायला विसरू नका. मी तिथून हाकेच्या अंतरावर राहत असलो तरी हाक न मारता फोन वा मेसेज करू शकता :)
- तुमचा अभिषेक
वाचने
4774
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
मस्त...
अर्ध्या तासात बेत बदलून सारा जामानिमा करून बाहेर पडलात, हे अंमळ जास्तच कौतुकास्पद वाटले. ;)
फटू कुठेत?
In reply to अर्ध्या तासात बेत बदलून सारा by इनिगोय
१) आंघोळ नाही केली
२) ब्रश आधीच केलेला
३) सकाळी प्रेशर मला येत नाही
४) चहा तयारच नसल्याने प्यायचा प्रश्नच येत नव्हता
५) जीन्स टीशर्ट आणि शूज घालायला तेवढाच वेळ लागतो जेवढे बायकांना आज कोणती साडी घालावी हे ठरवायला लागतो :)
In reply to सोप्पय by तुमचा अभिषेक
जीन्स टीशर्ट आणि शूज घालायला तेवढाच वेळ लागतो जेवढे बायकांना आज कोणती साडी घालावी हे ठरवायला लागतोघोर अज्ञान....अभ्यास वाढवा ;)
In reply to जीन्स टीशर्ट आणि शूज घालायला by टवाळ कार्टा
यातले नक्की काय चुकले?
जीन्स टीशर्टचाशूज चा वेळ कि साडी कुठची घालायची हे ठरवायचा वेळ.
अवांतर - हॉस्टेलला असताना सकाळी बिछान्यावर माझा डोळा उघडल्यावर मी एकतीसाव्या मिनिटाला क्लासरूममध्ये पाऊल टाकायचो.
In reply to यातले नक्की काय चुकले? by तुमचा अभिषेक
मुली/स्त्रीया/बाया/बायका/म्हैला..."आज" काय घालायचे याचा विचार "किमान कालपासुन" करतात
नक्की लग्न झाले आहे ना?? का अजुन नविन लग्न आहे ;)
=))
अले वा
चान चान निबंध
In reply to अले वा चान चान निबंध by स्पा
सर्व प्रतिसाद आणि वाचकांचे !
In reply to धन्यवाद by तुमचा अभिषेक
>>अभ्या दारू पितो, अभ्या किडे करतो, अभ्या लफडे करतो.. अभ्या कसाही असेल.. पण अभ्या नीच नाही रे
ते ठीकै, पण अभ्या बद्दल तुम्ही का लिहीताय? तुमच्या नावाचा एखादा ब्यानर पाडेल हां तो!!
In reply to >>अभ्या दारू पितो, अभ्या किडे by सूड
ओह सॉरी, इतर सर्व अभी अभय अभ्या अभिजीत अभिषेक अभिमन्यू वगैरे अ लगोलग भ घेऊन येणार्या टोपणनाव बंधूंनो, क्षमस्व !
In reply to ओह सॉरी, इतर सर्व अभी अभय by तुमचा अभिषेक
असू दे रे सुडक्या. एकदा आपले आपणच नीच नाही हे ठरवल्यावर सगळे करायचे असते हे कळाले, ते काय कमी आहे. ;-)
In reply to असू दे रे सुडक्या. एकदा आपले by अभ्या..
*good*
In reply to असू दे रे सुडक्या. एकदा आपले by अभ्या..
=))
अभ्या डॉट डॉट कडू भा*
In reply to असू दे रे सुडक्या. एकदा आपले by अभ्या..
प्लीज रागाऊ नका, हवे तर मी आपल्याला पर्सनली सॉरी बोलतो.
कुठून मला बुद्धी झाली आणि हे वाक्य सुचले असे झालेय.
सकाळीच ईनसपेक्टर जय दिक्षितचा पण फोन येऊन गेलाय याच कारणास्तव, अटक वॉरंटच काढतो म्हणलाय :(
In reply to प्लीज रागाऊ नका, हवे तर मी by तुमचा अभिषेक
हा जय दिक्षित शिला दिक्षितचा कोण?
In reply to हा जय दिक्षित शिला दिक्षितचा कोण? by राघवेंद्र
शिला दिक्षितचा कोणी नाही तर धूम चित्रपटमालिकेतील अभिषेक बच्चन म्हणजेच जय दिक्षित होय. (जर माझी याद्दाश मला धोका देत नसेल तर, कारण तिसरा धूम मी पाहिला नाही आणि दुसर्याला बघून जमाना लोटलाय.)
बाकी दिक्षित म्हटल्यावर माधुरी दिक्षित आठवयचे सोडून शिला दिक्षित नि काय आठवताहेत ;)
लेख आवडला.
तुमच्या माझगावात अद्याप फिरणेबल डोंगर टिकलाय हे वाचून अं ह झालो.
मलबार हिल म्हातारीच्या बूटामुळे अन् अंधेरीचा गिल्बर्ट हिल अशाच कुठलाशा कारणामुळे टिकून आहेत. बाकी पवईला तलावासमोरील टेकड्यांच्या जागी काँक्रीटचे सुळके आमच्या डोळ्यादेखत उभे राहिले!
In reply to छान by सुनील
आनी चवान सायेब आनी त्येंच्या राजकार्नी सगेसंबंदिंचा "आदर्श"बी असाच लै झोकात हुबा र्हाय्ला बर्का :)
In reply to छान by सुनील
फिरणेबल?? अहो मध्यंतरी छानपैकी रिनोवेशनही झालेय, कारंजे आधीच होते, पण हल्ली कृत्रिम धबधबा विथ लायटींग सुद्धा सुरू केलेय, पण गर्दी वाढली की बंद करतात तो ती गोष्ट वेगळी..
मुळात हे गार्डन डोंगरावर असणे हा याचा यूएसपी..
लेख वाचून अगदी ताजंतवानं वाटलं :) नेहमीप्रमाणे मस्त लेख :)
छान लिहीले आहे.....