मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ओले अंजीर आणि बेळगावी कुंदा...

विसोबा खेचर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
एकदा सहजच अण्णांना भेटायला कलाश्रीमध्ये गेलो होतो. बाहेरच्या खोलीत अण्णा निवांतपणे बसले होते. पुढ्यात नेहमीप्रमाणे पानाचा डबा होता.. इब्राहमी तंबाखूवाला.. "काय कसं काय, मुंबई काय म्हणते, केव्हा आला ठाण्याहून.." असे जुजबी प्रश्न अण्णा विचारत होते. जरा वेळाने तेथे वत्सलाताई आल्या. वत्सलाताई जोशी. माहेरच्या वत्सला मुधोळकर. भाग्यश्री या कानडी नाटकांच्या तालमीदरम्यान त्यांचं आणि अण्णांचं जमलं. स्वतः वत्सलाताई चांगल्या गात असत. 'अत धूम' ही मियामल्हारातली, 'जाऊ मै तोपे बलिहारी ही वृंदावनी सारंगातली, किंवा मारव्यातली एक अशा काही बंदिशी त्यांनीच अण्णांना दिल्या होत्या असं अण्णा सांगत असत.. 'काय केव्हा आलात..' असं म्हणून वत्सलाताईंनी हसून स्वागत केलं आणि माझ्या हातावर काही ओले अंजीर ठेवले. अंजीर अतिशय गोड आणि सुरेख होते.. मी ते पटापट मटकावले परंतु मला प्रश्न असा पडला की त्याची देठं टाकायची कुठे? मग बाहेर जाताना ती सोबत न्यायची आणि टाकून द्यायची असं मी ठरवलं आणि तसाच बसून राहिलो.. माझी चुळबुळ वत्सलाताईंच्या लक्षात आली.. 'माझ्याजवळ द्या ती देठं इकडे.. मी टाकते.." त्या इतक्या सहजतेने म्हणाल्या की मलाच ती देठं त्यांच्या हातात देतांना अवघडल्यासारखं वाटलं.. "यांना तो बेळगावी कुंदापण दे.." अण्णा म्हणाले.. "खास शहापुरी कुंदा आहे बर्र का.. " - अण्णांचा धीरगंभीर खर्ज.! ताईंनी लगेच तत्परतेने आत जाऊन माझ्याकरता तो कुंदा आणला..अगदी सुरेख, साजूक कुंदा होता.. मग निरोप घेतला.. अण्णांनी विचारलं, "कसे जाणार?" अण्णांना एकूणच रस्ते, गाड्या यात विलक्षण इंटरेस्ट.. :) "साडेचारची कोयना आहे.. ती पकडणार.." हां हां बरोबर.. कोयना आठ-साडेआठापर्यंत जाईल ठाण्याला.." जगभर प्रवास केलेल्या अण्णांनी 'मी कोयना एक्सप्रेस पकडून ठाण्याला जाणार..' या प्रवासातदेखील इतकी उत्सुकता दाखवली की मला गंमतच वाटली..! :) असो.. कुणी म्हणेल या लेखाचं प्रयोजन काय? काय तर म्हणे अंजीर खाल्ले..! खरं आहे.. आठवण तशी छोटीशी आणि साधीच आहे.. परंतु अशा अनेक लहानसहान आठवणीच कुठेतरी मर्मबंधातली ठेव होतात आणि तीनसांजा झाल्या की या खिडकीतनं, त्या खिडकीतनं घिरट्या घालायला लागतात, अस्वस्थ करतात..! आणि आता फक्त आठवणीच तर आहेत..पटकन एखादा फोन करून किंवा कलाश्रीत जाऊन पायावर डोकं ठेवायला अण्णा कुठे आहेत..?! -- तात्या.

वाचने 12824 वाचनखूण प्रतिक्रिया 26

बंडा मामा Sun, 04/28/2013 - 20:21
तात्या तुम्ही बर्‍याच दिवसांनी सक्रिय झालात हे पाहुन आनंदच आहे. पण असे फुटकळ लेख लिहिण्यापेक्षा रोशनी सारखे सकस लेख लिहा पाहू. तुमच्याकडुन आमच्या मोठ्या अपेक्षा आहेत. (काही द्वाड मिपाकर तुम्हाला डायरी घ्यायचा सल्ला द्यायच्या आत आम्हाला रोशनी सारखी मेजवानी द्या)

In reply to by विसोबा खेचर

बंडा मामा Sun, 04/28/2013 - 21:02
तात्या कृपया राग मानून घेऊ नका. तुमचे इथले लेखन वाचले आहे आणि त्यातुनच वरील अपेक्षा लिहिली आहे. इथे दिलेली आठवण सुरेखच आहे पण एक स्वतंत्र लेख म्हणून तुम्ही सातत्याने असे किरकोळ स्फुट लिहिणे आवडले नाही. एका चाहत्याला तुम्ही नाराज करणार नाही ह्या अपेक्षेने लहान तोंडी मोठा घास घेते आहे. कळावे लोभ असावा.

In reply to by बंडा मामा

बंडा मामा Sun, 04/28/2013 - 21:04
घेतो* आहे असे वाचावे--- प्रतिसाद संपादित करण्याची सोय नसल्याने टंकन दोष निवारण करणे जमले नाही -- उगाच गैरसमज नकोत म्हणून हा खुलासा

स्पा Mon, 04/29/2013 - 15:28
सारखं आपलं अण्णा, मधुबाला, रफी, पंचम दा उगा त्यातून लिहिलेली भावनिक मुक्तकं... बॉर झालो राव.

In reply to by स्पा

विसोबा खेचर Mon, 04/29/2013 - 15:33
>>बॉर झालो राव. आपल्या भावनेचा आदर करतो...परंतु माझ्याकडून या पुढेही असंच काहीसं लेखन होईल असंही नमूद करतो.. आणि यापुढे माझ्या लेखांकडे पूर्णत: दुर्लक्ष करण्याची आपल्याला सूचनावजा विनंती करतो.. :) धन्यवाद..

In reply to by विसोबा खेचर

स्पा Mon, 04/29/2013 - 16:05
परंतु माझ्याकडून या पुढेही असंच काहीसं लेखन होईल असंही नमूद करतो
आपल्याही भावनांचा आदर आहेच या पुढे प्रतिसाद टाकण्याचे कष्ट घेणार नाही -- धन्यवाद

In reply to by स्पा

सामान्य वाचक Mon, 04/29/2013 - 16:10
All animals are equal, but some animals are more equal than others, हे वाचले आहे का? त्यामुळे प्रत्येकाला मिळ्णारी दाद वेगळी असते. असे धागे तुम्ही काढून तर बघा, आम्ही सगळे तुम्हाला कसे बडवू ते...

In reply to by सामान्य वाचक

सूड Mon, 04/29/2013 - 18:04
>>असे धागे तुम्ही काढून तर बघा, आम्ही सगळे तुम्हाला कसे बडवू ते... अशा धाग्यांसाठी लोक डायर्‍या आणि जिलब्यांची ताटं घेऊन उभे असतात, ते आताशा कुठे दिसत नाहियेत.

In reply to by सूड

अशा धाग्यांसाठी लोक डायर्‍या आणि जिलब्यांची ताटं घेऊन उभे असतात, ते आताशा कुठे दिसत नाहियेत.
सूड तुला आजकाल नको ते प्रश्न फार पडतात बरे. तू उपाशीपोटी अंजीर आणि भरल्या पोटी केळे खात जा.

अनुप ढेरे Mon, 04/29/2013 - 17:53
काही लोक म्हणतात की मोठ्या/प्रसिद्ध/कलाकार व्यक्तिंच्या खासगी आयुष्यात आपण फार उत्सुकता दाखवू नये. पण अशा काही आठवणी वाचल्या की तो कलाकार माणूस म्हणून कसा होता हे पण कळतं. म्हणून हा लेख आवडला.

आजानुकर्ण Mon, 04/29/2013 - 22:10
ओल्या आणि गोड, सुरेख वगैरे अंजिरांची देठंही कोवळी असतात. खाऊन टाकली तरी त्रास होत नाही. कधीकधी मलाही अंजीर खाताना राहिलेली देठं कचऱ्याच्या बादलीपर्यंत जाऊन टाकण्याचा कंटाळा येतो. तेव्हा मी ती गिळून टाकतो. :)

अत्रन्गि पाउस Mon, 04/29/2013 - 23:18
तानपुर्याच्या ४ तारा काय वाजवता.सतत..त्यात अजून काही वाजवता येत तर नाही..असे विचारणारे लोक असतात.... अरे अण्णांचे गाणे सोड..नुसता हम्म म्हणत त्या खर्जाची पण आठवण येते ... तू लिही बाबा!!

विसोबा खेचर Tue, 04/30/2013 - 10:47
कौतुक करणा-या, टीका करणा-या, प्रोत्साहनपर, सकारात्मक, नकारात्मक, समिक्षणात्मक, अवांतर/विषयाला सोडून लिहिणा-या अशा सर्व प्रतिसादकर्त्यांचा मी आभारी आहे.. :)