पावसाला बोलवायला हवे आता

मिसळलेला काव्यप्रेमी जे न देखे रवी...
पावसाला बोलवायला हवे आता ------- तुझ्यासोबत पहिल्या पावसात भिजतांना तुझ्या पैंजणांची नादनक्षी मनावर कोरली होतीस त्या नक्षीतल्या कुयऱ्यांच्या चक्रव्युहात अभिमन्यु झाला होता माझा... ------- अंगणातला पारिजातकही आता फारच काकुळतीला आला आहे तुला आठवतं? पावसाची रिपरिप चालू झाल्यानंतर इवलेसे थेंब निथळणाऱ्या पारिजातकाजवळ तुझ्या ओढणीखाली ते तुझ्या सुगंधी श्वासात भिजणे . . खरचं पावसाला बोलवायला हवे आता ------- कोसळणाऱ्या धारांमध्ये खिडकीतुन हात बाहेर काढून ओंजळीतले छोटेसे तळे तुझ्या मेहंदीभरल्या हातात ओतल्यावर फक्त निखळ आनंद उरायचा माझ्या हातात --------- कुठे दडलाय तो कुणास ठाऊक? --------- नखशिखांत भिजल्यावर ओठांवर अडकलेली तुझ्या केसांची एक चुकार बट उचलून मी कानामागे सरकवतांना तुझ्या डोळ्यात फुललेला गुलाब . आणि मग त्या गुलाबाचा तो काटा असा खोलवर गेला होता कि काय सांगू . . स्स... अजुनही बोचतोय.. --------- जातांना तो पाऊस घेऊन गेलीस निदान त्या पारिजातकाची समजूत काढून तरी जायचे होतेस... फारच काकुळतीला आला आहे तो --------- बस्स पावसाला बोलवायलाचं हवे आता |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (२३/०२/२०१३)
वर्गीकरण
काव्यरस

39 टिप्पण्या 7,371 दृश्ये

Comments

लौंगी मिरची नवीन

अतिसुंदर . तुमच्या शक्यतो सगळ्या कविता वाचते . ओठांवर हसु फुलवण्यापासुन ते डोळ्यात पाणि उभं करण्याची ताकद तुमच्या शब्दरचनेत असते . शुभेच्छा आणि अनेक धन्यवाद .

अभ्या.. नवीन

मिका रे. ___/\___ कसं लिहितोस रे असं? कसं जमतं? आम्हाला प्रतिसाद द्यायला पण शब्द सापडत नाहीत,

फिझा नवीन

खूप दिवसांनी नेहमीसारखी छान कविता वाचायला मिळाली ....मस्त !!!

स्पा नवीन

साला या मिका मुळे कविता कळायला लागल्या असे म्हणावे लागेल क्या बात लिहितोस रे उगाच जड जड शब्द नाहीत , उपमा नाही, जबरदस्ती यमक जुळवण्याचा प्रयत्न नाही सहज सुंदर सोप्प पण तितकच प्रभावी अवांतर : पावसाला बोलवायला हवे आता शीर्षक वाचून वाटलेलं चक्क मिकाने विदर्भ , मराठवाड्यात पडलेल्या भीषण दुष्काळावर काही लिहिलेय काय थोडा अपेक्षाभंग झालाय

परिकथेतील राजकुमार नवीन

जातांना तो पाऊस घेऊन गेलीस निदान त्या पारिजातकाची समजूत काढून तरी जायचे होतेस... फारच काकुळतीला आला आहे तो
___/\___

स्पंदना नवीन

नादनक्षी? व्वा! क्या बात है ! नादनक्षी. सुरेख! सगळी कविता वाचुन झाली तरी मी याच शब्दात अडकुन राहिलेय. नादनक्षी.

अत्रुप्त आत्मा नवीन

खल्ला..............स!!! पावसाची रिपरिप चालू झाल्यानंतर इवलेसे थेंब निथळणाऱ्या पारिजातकाजवळ तुझ्या ओढणीखाली ते तुझ्या सुगंधी श्वासात भिजणे>>> http://www.sherv.net/cm/emoticons/hearts/happy-love-heart-smiley-emoticon.gif आह्हह्ह्ह्ह्हाहाहाहा.... पावसापेक्षा हजारपट श्रेष्ठ आहे हे...!!!

बॅटमॅन नवीन

ते नादनक्षी अन कुयर्‍यातला चक्रव्यूह अन डोळ्यातला गुलाब हे लैच लैच भारी आहे. नादनक्षी तर फारच खास!!!! कविता कशी असावी याचा उत्तम वस्तुपाठ आहे ही कविता म्हंजे. "ना वृत्त ना शब्दजंजाळ काही | आस्वादितां पैं न उणेंचि काही | वाचेसवे तो जणु अर्थ धावे | प्रणाम त्वां आमुचे स्वीकरावे ||"

स्पंदना नवीन

In reply to by बॅटमॅन

"ना वृत्त ना शब्दजंजाळ काही | आस्वादितां पैं न उणेंचि काही | वाचेसवे तो जणु अर्थ धावे | प्रणाम त्वां आमुचे स्वीकरावे ||"
पहिला या साठी दंडवत स्विकार बाबा!

अत्रुप्त आत्मा नवीन

In reply to by बॅटमॅन

"ना वृत्त ना शब्दजंजाळ काही | आस्वादितां पैं न उणेंचि काही | वाचेसवे तो जणु अर्थ धावे | प्रणाम त्वां आमुचे स्वीकरावे ||" >>> वा...! वा...! वा...!वा...! वा...! वा...!.........http://www.sherv.net/cm/emo/happy/big-grin-smiley-emoticon.gif वृत्तराजा .... सानंद दंडवत रे तुला...!!!

सस्नेह नवीन

याला कल्पनेचे ऐश्वर्य म्ह्णावे की काव्याची श्रीमंती ?

इनिगोय नवीन

लाजवाब.. मिका, ही खरी व्हॅलण्टाईन डेची कविता. जशा बाकीबाब बोरकरांच्या कविता जीव लावतात, अगदी तसा तुझ्या कवितांनी जीव लावला आहे..!

ई-पूर्वाई नवीन

फेसबुक प्रमाणे इथे लाईक हवे होते...

मृत्युन्जय नवीन

सुरेख. अतिशय सुंदर कविता. कविता प्रकाराकडे फार दुर्मिळपणे लक्ष जाते. पण जेव्हा जाते तेव्हा त्यात बर्‍याचदा मिकांची कविता असते. खुपच सुंदर.

किसन शिंदे नवीन

खरंतर वेगळं काही लिहण्याची गरज नाही, जे लिहायचं होतं त्याच्यापेक्षा अनेक पटींनी चांगलं वरच्या प्रतिसादातून वाचायला मिळालं. मिका, अशाच अनेक उत्तमोत्तम कवितांची मेजवानी तुझ्याकडून आम्हाला कायमच मिळत राहो.

आबा नवीन

कविता, मुक्तक जे काही आहे ते प्रचंड आवडलं अवांतरः तुम्ही गुलजार यांचे चाहते दिसताय !?

संजय क्षीरसागर नवीन

आणि मग त्या गुलाबाचा तो काटा असा खोलवर गेला होता कि काय सांगू . . स्स... अजुनही बोचतोय..
तो काटा अजून काही निघण्याच नांव घेत नाही...म्हणून प्रतिसादाला वेळ लागला!

चाणक्य नवीन

पाणी झिरपावं तश्या तुझ्या कविता वाचता वाचता सबंध शरीरात झिरपत राहतात.

जेनी... नवीन

In reply to by चाणक्य

सह्ही .... सेम चनुकाकांसारखच बोलते .. दाद्या मस्त कविता आणि भौरायाचा प्रतिसादहि एकदम चिकना ...:)

पाषाणभेद नवीन

--^-- खरंच कविता एकदम मनाला टोचली !

चिगो नवीन

अत्यंत सुंदर..
ओंजळीतले छोटेसे तळे तुझ्या मेहंदीभरल्या हातात ओतल्यावर फक्त निखळ आनंद उरायचा माझ्या हातात
स ला म..