मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दगड्या !

तर्री · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
कवडा हया पक्ष्याचा संदर्भ आज खूप वर्षांनी आला आणि भूतकाळात घेवून गेला. मी ८ वीत असताना तुकाराम ( उर्फ तुक्या दुसरे उपनाम दग्ड्या ) हा एक काळाकभीन्न व मजबूत गडी आमच्या वर्गात दाखल झाला. मिसरूड फुटलेला हा पोरगा बाप्या शोभत असे. त्याच्या गावात ७ वी पर्यन्त शाळा होती आणि म्हणून सुमारे दहा की.मी. वरून चालत तुक्या आमच्या गावातील शाळेत येत असे.घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. तो त्याची आई आणि इतर ३ भावंडे . घरात कमावणारे कोणी नाही. वडील त्याच्या लहानपणीच वारले होते.बहुतेक हे कुटुंब १ वेळच जेवायचे. शाळेत तुक्या उर्फ दगड्या पूर्ण लक्ष रात्रीच्या जेवणाकडे असे. शाळेच्या खिडकीतून आजूबाजूच्या झाडा-माडावर नजर फिरत असे. पोपट , कवडे , होले , पाच्को , बोल्डो ,पाणकोंबडी , असे पक्षी पाहात स्वारी त्यांना फस्त करण्याचे मनसुबे करीत असे. संपूर्ण निसर्गाशी एकरूप झालेला माणूस मी त्यानंतर पहिला नाही. झाडावर चढणे , पोहणे , मासे पागणे , बेचकीने अचूक नेम धरून शिकार करणे , फास लावणे , इ कला तो जणू जन्मजात शिकून आला होता. पावसाळ्यात शाळा सुरु झाली आणि तो एक दिवस दप्तरा बरोबर एक मोठी पोतडी घेवून आला. आधी तो सांगत नव्हता काय आहे ते ....पोतडीच्या आकारावरून मुलांनी त्याला भंडावून सोडले .तेंव्हा समजले तो दप्तरात ३०/४० अंडी कासविणीची अंडी घेवून आला होता. पहाटे पासून तो समुद्रावर कासविणीची अंडी शोधत फिरत होता. शेवटी त्याला ती मिळाली पण शाळेची वेळ झाली होती म्हणून तो ती घेवून शाळेत आला होता. एका निसर्ग प्रेमी मास्तराला हे समजले आणि त्याने ती सारी अंडी शिपाया करवी समुद्रावर परत नेवून ठेवली. आणि तुक्याच्या पदरी उपासाचे पुण्य घातले. हया पहिल्याच कृतीने तो शाळेत एकदम प्रसिद्ध झाला. एकदा शाळेत घोरपड शिरली होती. सगळी मुले ओरडत होती आणि थोड्या मुली जास्त किंचाळत होत्या. घोरपड खिडकी वर बसून होती, कोणाला काही समजायच्या आत दग्ड्या ने बाकावर चढून घोरपडीची शेपटी धरली .... खाली उडी मारली आणि हवेत भिरकावून जमिनीवर आदळली. घोरपड गतप्राण झाली आणि त्याच्या “शौर्याचे” शाळेत कौतुक झाले. मेलेली घोरपड टाकायला हा गेला तो बराच वेळ आलाच नाही. कुतूहलाने मी विचारले तर म्हणाला “ लावून ठेवली आहे कवळ्या कुत्र्यापासून , जातानी घेवून जाणार , २ दिवस पुरेल. घोरपड खातात हा प्रकार मला तेंव्हा समाजाला. तुक्या तथा दग्ड्या सकाळ पासून उपाशी असे. मधल्या सुट्टीत सिझन प्रमाणे आवळे , बोरे , चिंचा , जांभ , करवंद , कैऱ्या खावून तो गुजराण करीत असे. अश्या परिस्थितीत तो काय अभ्यास करणार ? पण एकदम हसतमुख असे. कबड्डी खेळण्यात तो तरबेज होता. त्यावर्षी आमच्या आठवीच्या संघाने दग्ड्याच्या जोरावर १० च्या संघाला हरवले होते. रात्रीच्या जेवणासाठी हा शिकार करायचा आणि आई मीठ मिरची करता मोलमजुरी. त्याचे दप्तर बेचकी , फासकी , गळ हया व असल्या असंख्य वस्तूंनी भरलेले असायचे. बेचकीने कवडे मारणे , पावसाळ्यात मासे पागणे , छत्रीची तार वाकवून त्याचा फास करणे , त्यात सापडलेले पक्षी जिवंत घेवून फिरणे असले त्याचे उद्योग असत. मला त्याच्या हया धंद्यांचे जाम कुतूहल असे. मी त्याच्या जवळ तासन तास गप्पा मारीत असे. त्याचे ते भुकेने व्याकुळ झालेले पण प्राणी , पक्षी आणि माशांनी भरलेले विश्व मला जाम आवडायचे. एकदा त्याच्या घरी काहीच खायला नव्हते . शिकारही काही मिळाली नाही. मग एका मोठया विहिरीत पठ्या उतरला – खेकडे पकडायला. ३/४ खेकडे पकडले आणि एका कपारीत असलेल्या विंचवाने हयाला नांगी मारली. २ दिवस झोपून होता. जाल जवळ मारायलाच टेकला होता पण वाचला. एकदा माझ्यासाठी त्याने मधाचे पोळे आणले. त्यातून ठीबकाणारा मध प्यायला जाम मजा आली होती. थोडे दिवासांनी एका मधल्या सुट्टीत ते रिकामे पोळे कसे पेटते त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. ते प्रकरण भलतेच पेटले. मुख्याध्यापकांनी त्या प्रयोगाला गेलेल्या सगळ्या मुलांना झोडून काढले होते. पुढे शाळेतील शिक्षकांनी त्याला शाळेचे पाणी भरण्याचे काम दिले. सकाळी लवकर येवून तो मुलांना पिण्यास लागणारे पाणी भारत असे . त्याचे त्याला ३० रुपये मिळत असत. एकदा त्याने मला सांगितले – की बाबांना विचार बंदूक किती रुपयाना मिळते ? त्यावेळी जी काही ८००/१००० रुपये किमंत असेत ती मी सांगितली. तर तो हिरमुसला. ३ वर्षे पाणी भरून पण त्याला बंदूक घेता येणार नव्हती. त्यावेळी मला खरेच वाईट वाटले. त्याला खर्च कुणी तरी बंदूक द्यायला हवी होती. नववीत तो नापास झाला आणि त्याने शाळा सोडली. त्याच्या बरोबर मी दोन वर्षे काढली. त्याचे ते निसर्गाशी तद्रुप जीवन मला आजही आठवते आणि वाटते त्या गरिबीतही तो किती श्रीमंत होता !

वाचन 5938 वाचनखूण प्रतिक्रिया 32

पैसा Wed, 01/09/2013 - 08:59
छान व्यक्तिचित्र आहे. दगड्या बहुतेक पारधी वगैरे शिकारी जमातीतला असावा. त्याची निसर्गाशी एकरूपता भुकेतून जन्माला आलेली असावी. ही खर्‍या अर्थाने जंगलांची मुले. प्राण्यांसारखी नैसर्गिक जीवन जगणारी. तुमच्या शाळेतल्या शिक्षकांनी त्याला काम करून थोडेफार पैसे मिळवायची सवय लावली हे चांगलंच. त्या काळात गावातले बहुतेक शिक्षक अशी डाव्या उजव्या हाताने मुलांना मदत करत असत. शिक्षकांचे पगारही कमी असल्याने थेट पैसे देणे कठीणच असे. माझे आईवडील गावातल्या शाळेत शिक्षक असल्याने असे जग फार जवळून पाहिले आहे. ७/८ वर्षाच्या मुली बर्‍या परिस्थितीतल्या लोकांकडे महिना २५ रुपयांवर घरकाम करत असल्याचे पाहिले आहे. तेव्हा आताच्यासारखे बालमजुरांविरुद्ध कायदे पाळले जात नसत. आणि जरा मोठी मुले आईवडिलांच्या संसाराला खूप हातभार लावत असत. आता विचार करता हे सारे बरोबर वाटत नाही, पण त्या बिचार्‍या मुलांने काम केले नसते तर त्यांना खायला तरी मिळाले असते का कोणजाणे! मुलांना खेळ आणि अभ्यास सोडून जेवणासाठी वणवण करायला लावणार्‍या आपल्या समाजव्यवस्थेचा अशा वेळी राग येतो. पण निसर्गाबरोबर वाढलेल्या माणसांना शहरी करणे हे जास्त चुकीचे वाटते. मोठा झाल्यानंतर या दगड्याचे आयुष्य कसे होते हे तुम्हाला नंतर कधी कळलं का? एक उत्सुकता म्हणून विचारतेय.

In reply to by तर्री

पाषाणभेद Wed, 01/09/2013 - 14:16
अरेरे! फक्त तिसाव्या वर्षीच गेला बिचारा. फारच छान लेखन. माझ्याही वर्गात असलेच दोन चुलत भाऊ होते. नंतर त्यांच्याशी संपर्क आला नाही म्हणा.

प्रचेतस Wed, 01/09/2013 - 11:59
लिखाण आवडले. गोनीदांच्या जैत रे जैत कादंबरीतल्या उंदीर खाणार्‍या ठाकरांची आठवण झाली.

सस्नेह Wed, 01/09/2013 - 12:11
पूर्वी जंगले भरपूर असल्याने शिकारी इ. जंगलाशी संबंधित उपजीविकेची साधने तरी गरिबांसाठी होती. आताच्या काळात या दगड्याने काय केले असते, असा प्रश्न पडला आहे.

आदूबाळ Wed, 01/09/2013 - 13:03
व्यंकटेश माडगूळकरांची आठवण झाली. "झेल्या"चा शेवट काहीसा असाच आहे. कदाचित त्याचाही दगड्यासारखा परिस्थितीने बळी घेतला असेल, त्यामुळे माडगूळकरांनी त्याबद्दल लिहायचं टाळलं असेल...

बहुगुणी गुरुवार, 01/10/2013 - 00:17
नेमकं व्यक्तिचित्रण. तुम्हाला किंचितकाळ का होईना, पण role model वाटलेला हा दगड्या अवघ्या तिसाव्या वर्षी दारू पिऊन गेला हे वाचल्यावर काही माणसं 'good, but good for nothing' असं आयुष्य जगतात हे पुन्हा एकदा जाणवलं.

३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 01/10/2013 - 02:35
व्यक्तिचित्रण आवडलं. तुक्या थोडा उशीरा जन्माला आला असता तर शाळेत निदान एक वेळची खिचडीतरी मिळाली असती. पण त्याही परिस्थितीत पोराला शाळेत पाठवणारी त्याची आई आणि दिवसभर शिकारी करून दोन्ही वेळ पोट भरण्यापेक्षा एकवेळ उपाशी राहून शाळेत शिकणार्‍या त्याचंही कौतुक वाटलं. शिक्षणाचं महत्त्व अगदी सुस्थितीतल्याही किती लोकांना असेल?

अभ्या.. Sun, 01/13/2013 - 23:05
यमगरवाडी, ता. तुळजापूर येथे पारध्यांच्या मुलांसाठी चालवलेल्या शाळेतले वर्णन आठवले. मोराची सौंदर्याची कविता शिकवताना विद्यार्थ्याकडून "खायला लै झ्याक अस्तो" हे उत्तर येते.

तर्री Fri, 01/18/2013 - 21:21
सर्व प्रतीसाद्कांचे मनासून धन्यवाद. लेखन त्रोटक वाटले ही गोष्ट खरी आहे. पॉवरपॉईंट अंगात भिनला की मोकळ मनापासून लिहिणे खुंटते ......त्याचा हा परिणाम असावा.थुक्का लावणे बंद करायला हवे. पुढच्यावेळी पॉवरपॉईंट चे "कुंकू" पुसून , बार लावून लिखाणाला सुरवात करायला हवी.

In reply to by मांत्रिक

बाबा योगिराज गुरुवार, 10/22/2015 - 00:08
हा धागा वर आनलात चांगल केल. मस्तच लिव्लै. अजून भपुरसे जुने लेख वाचायचे आहेत. जसे जसे वर येतील वाचत राहु. खरच या id ने लिहिन बंद केलै का? कुणीतरी लिवायला सांगा वो त्यायला.

प्रभाकर पेठकर Wed, 10/21/2015 - 20:46
त्याकाळी माझ्या वाचनातून सुटलेली ही कथा छानच आहे. व्यक्तिचित्रणातून दगड्या अगदी नजरेसमोर येतो. गरीबीचं आणि दारूचं काय अतूट नातं आहे हे कळत नाही.

ज्योति अळवणी Wed, 10/21/2015 - 23:04
आठवी मध्ये असताना एक म्हस्कू नावाचा मुलगा आला होता वर्गात. खूप मस्तीखोर आणि अशक्य होता. वडील नव्हते. आई भाजी विकायची. नववी मध्ये त्याला आमच्या शाळेतून काढून भोस्ला मिलिट्री मध्ये घातला. अचानक काही महिन्यांपूर्वी त्याने मला फोन केला होता. जवळ जवळ २६-२७ वर्षानंतर. म्हणाला तुझा नंबर मिळाल्यापासून ४ दिवस विचार करत होतो फोन करू का? तू बोलशील का? बायको तर नकोच म्हणत होती. म्हणून ती आता बाहेर गेल्यावर करतो आहे. आम्ही जवळ जवळ दिड तास बोललो. पुढची काम बाजूला ठेवून मी बोलले. त्या दोन वर्षातल्या आठवणी तो सांगत होता. बोलताना आवाज भरून आला त्याचा. तू बोलशील अस नव्हत वाटल अस म्हणाला. मला मात्र जुना मित्र भेटल्याचा खूप आनंद झाला होता. त्याने अजूनही त्याच वेगळ असण मनात जपलं आहे... कदाचित एक दुखरी नस म्हणून.... हे लक्षात येऊन मात्र वाईट वाटल.