मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वैराग्यभावनेचा अभाव.. भारताच्या लोकसंख्या प्रश्नाचे मूळ?

धनंजय · · काथ्याकूट
(मागे मुमुक्षू यांनी राष्ट्रभावनेचा अभाव.. भारतासमोरच्या अडचणींचे मूळ? हा विचार चर्चेत आणला. त्यांच्या कळकळीला दाद देत मी वेगळी विचारसरणी सांगितली की राष्ट्रभावनेच्या भाव-अभावाबद्दल कोणाला दोष न देताही अडचणींबद्दल कारवाई केली जाऊ शकते. माझा व्यक्तिगत अपवाद मानून [सर्व प्रतिसादकारांस त्याबद्दल धन्यवाद] अनेक प्रतिसादकारांनी या विचारसरणीला भ्रष्टाचाराची भलावणी मानली, आणि रसातळाकडे जाणार्‍या समाजाची नांदी मानली. म्हणून त्या लेखात आणि प्रतिसादातल्या युक्तिवादासारखा दुसरा एक युक्तिवाद मी येथे देत आहे. हे कोणीही व्यक्तिगत घेऊ नये. ) युक्तिवादाचा सारांश : लोक वैराग्यपूर्ण नाहीत त्यामुळे मुले उदंड असतानाही लैंगिक संबंध ठेवतच राहातात. वैराग्यभाव नसणे हे अपेक्षेपेक्षा अधिक मुले असण्याचे मूळ आहे. मुळातून वैराग्यभाव वाढवला तर ही अडचण उद्भवणारच नाही. "लोक लैंगिक संबंध ठेवतच राहातील" असे हात टेकून संततिनियमनाचे उपाय उपलब्ध देणे म्हणजे वैराग्यभावाच्या बाबतीत रसातळाकडे जाणार्‍या समाजाची विचारसरणी आहे. त्यापेक्षा आपण सर्वच प्रयत्न करून वैराग्यभाव वाढवूया. अशा प्रकारे विचार बदलत गेलेत तर पुढे लोकसंख्यावाढीच्या मुद्द्यासकट लैंगिक अत्याचारासारख्या अनेक अडचणींचा नायनाट होईल. समाजाची उन्नती होईल. कोणत्याही समाजातील लोकांची लैंगिकता, त्या देशाची संतती आणि लोकसंख्या ठरवत असते. ही संतती जेथे उगम पावते त्याबद्दल विचार केल्यास लोकसंख्येच्या अडचणींवर मात करण्याची शक्ती उत्पन्न होत असते. वैराग्यभावनेच्या अभावामुळेच आज लोकसंख्येबाबत एकापेक्षा एक अडचणी उद्भवल्या आहेत. त्या संपवायचे प्रयत्न अपुरे पडतात त्यामागचे कारणही हेच आहे. वैराग्यभावना म्हणजे काय हे अगोदर बघावे लागेल - लैंगिकतेवर दमन असण्याबद्दल अभिमान, वैराग्याबद्दल प्रेम, लैंगिकतेतून उत्पन्न होणार्‍या संततीची जबाबदारी घेण्याची तयारी, आत्मनिग्रहाच्या ताकदीवरील विश्वास या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे वैराग्यभावना. याचा अर्थ सारखे मुंडन करत संन्यासी होत फिरावे असे नाही. फक्त साधे जीवन जगताना सुद्धा हा विचार मुळाशी असला तरी कितीतरी गोष्टी आपोआप घडून येतील. महात्मा गांधी या माणसाने आपल्या देशाला एका बाबतीत नैतिक अधिष्ठान द्यायचे स्वप्न पाहिले. आज जवळपास ६० वर्षानंतर आपण त्याची फळे बघतो आहोत. त्यांची या स्वप्नामागची प्रेरणा वैराग्यभावना नसेल तर आणखी काय असेल? आपल्यामुळे किंवा आपणास दिसणार्‍या इतर लोकांमुळे आपल्या वैराग्याच्या भूमिकेस धक्का लागेल, त्याचे नुकसान होईल असे वर्तन घडू न देण्याची जबाबदारी याचमुळे प्रत्येक नागरिकावर पडते. जर ती जबाबदारी पार पडली तर लोकसंख्येचे भविष्य बदलण्यास जास्त काळ लागणार नाही. उदाहरणार्थ, एक साधी सूचना - २६ जानेवारी, १५ ऑगस्ट या सारखे महत्त्वाचे दिन लैंगिक आचार मुक्त दिन म्हणून पाळले जावेत. "मी स्वतः लैंगिक व्यवहार करणार नाही अन् लैंगिक व्यवहारास प्रोत्साहन देणार नाही"असा विचार केल्याने काय एकदम वैराग्यभावना जागृत होऊ शकेल? नाही. तसे नाही. पण मानसिकता बदलण्यास ही सुरुवात ठरू शकते. १०० कोटी लोकसंख्येत एक जण जरी असा निघाला जो विचार करतोय, "मी लैंगिक व्यवहार नाही करणार, हे माझ्या समाजासाठी हानिकारक आहे. मी असे करता कामा नये!" तर काय कमी झाले? किती मोठा विचार आहे हा! [ अशी सूचना देण्यामागचा एक हेतू हा की, एक दिवसभर असा विचार करून तो अमलांत आणला तर आपण किती क्षुल्लक कामवासनेसाठी लैंगिक व्यवहार छेडतो, वागतो ते स्वतःचे स्वतःलाच दिसून येईल. कारण कितीही केले तरी कुणी स्वमनाला कधीही फसवू शकत नाही. आपण केलेल्या चुकीबद्दल आपल्याला जाणीव होवून पश्चात्ताप होणे ही चूक सुधारण्याची पहिली पायरी असते. दुसऱ्याने ती चूक लक्षात आणून दिली तर ती मान्य केल्याच जाईल असे नाही, पण स्वतःला लक्षात आलेली चूक मान्य होण्याचे प्रमाण निश्चितच जास्त असणार. या साध्या सूचनेच्या पालनामुळे आपण स्वतःच्या वागणुकीकडे बघू शकू असे वाटते. आणि हेच दिन निवडण्याचे कारण हे की लैंगिक व्यवहाराचा प्रश्न सरळ देशाच्या लोकसंख्येशी आणि प्रगतीशी निगडित असल्याचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचे दुसरे उत्तम साधन कोणते? दुसरा हेतू असा की, जेव्हा लोकांना स्वतःच्या कामवासनेबद्दल जाणीव अन् पश्चात्ताप होईल, तेव्हा वैराग्यभावनेबद्दल विचार करण्याची वृत्तीही उगम पावू शकेल. काही नाही तर निदान थोडे लोक तरी यादृष्टीने विचार करू लागतील. त्यामुळे आज नाही तर उद्या खचितच आशादायक चित्र बनू शकेल. (याचा अर्थ असा नाही की आज असा विचार कुणी करतच नाहीत. पण जास्त्तीत जास्त लोक असा विचार करण्यास लागावेत हे नक्कीच चांगले.) ] आज इतर देशांमधली मर्यादित लोकसंख्या आणि समृद्धी आपण बघतो तर आपल्याला आपल्या देशाची लाज वाटते. पण त्यांची प्रगती अशाच वैराग्यभावनेतून झालेली आहे हे आपण कसे विसरतो? लैंगिक बाबतीत आपली दंडसंहिता इंग्लंडच्या प्यूरिटन/प्रोटेस्टंट दंडसंहितेवर आधारलेली आहे. लैंगिक प्रकरण (सेक्सकांड) बाहेर पडले तर निवडून आले असले तरीही तिथल्या राजकरणी खासदारांनाना खुर्च्या सोडाव्या लागल्या. आपणास बहुमत आहे म्हणजे आपली लैंगिक वर्तणूक संपूर्ण राष्ट्राला मान्य होईलच असे नाही अन् लैंगिक वागणुकीच्या प्रश्नावर जनतेचे मत विचारात घेतलेच पाहिजे असे मानणारे लोक तिथे होते (आजची परिस्थिती माहीत नाही!). आज दुर्दैवाने आपल्या देशात तरी अशी परिस्थिती दिसत नाही (उदाहरण - जळगाव सेक्स कांड). कोणी म्हणेल की लैंगिक आकर्षण सर्वांना होते आणि त्यायोगे लैंगिक वागणूक सर्वच करतात. बहुतेक लोक म्हणतील की नको असलेली मुले उत्पन्न करायचीच नसतात. वैराग्यभावनेचा मुद्दा नाही. तर ते ठीक नाही. सर्वांना माहीत असते की लैंगिक व्यवहारातून मुले उत्पन्न होतात. त्यांना पूर्ण माहीत असते की आपल्या कृतीतून मुले उत्पन्न होत आहेत. आता हे लक्षात ठेवले पाहिजे उदंड मुले उत्पन्न करणे ही कुठली व्यक्तिगत बाब नाही. अमर्याद लैंगिक व्यवहाराचे समर्थन असे केले जाऊ शकते, तसे समर्थन करू नये. मग याच प्रकारे कोणी बलात्काराचे समर्थन करेल. वैराग्यापासून दूर जातात त्यांना आपली चूक समजलीच पाहिजे, मगच लोकसंख्येबाबत प्रगती होईल. काही लोक म्हणतात, की वैराग्याचे सोडा. लोक लैंगिक व्यवहार करतीलच असे जाणून त्यांना संततिनियमनाची साधने द्या. जर लैंगिक व्यवहार करणार्‍याचे स्वत:चे विचारच असे असले की, "उदंड मुले असताना लईंगिक व्यवहार करणे अयोग्य आहे अन् तसे करून व्यक्तिगत कामवासनेसाठी कुठेतरी मी माझ्या त्या समाजाशी प्रतारणा करेन, ज्यांनी समाजासाठी स्वत:च्या सर्व कामवासनेवर पाणी सोडले"तर संततिनियमन यंत्रणेची गरज कितीतरी कमी होईल. होय ना? वैचारीक पातळीवर योग्य बदल घडवून आणण्यासाठी वैराग्यभावना असणे गरजेचे आहेच.

वाचन 20577 प्रतिक्रिया 35