सरप्राईज टेस्ट आणि गोंधळलेला परिक्षक.
मधली सुट्टी संपली आणि नव्या तासाचा टोला पडला. विज्ञानाच्या बाई वर्गात शिरल्या तसा पोरांचा कलकलाट थांबला. बाईंनी पुस्तक उघडुन नवा धडा शिकवायला घेतला. आजचा धडा होता 'मुळं'. बाईंनी फळ्यावर जमतील तशी चित्रं काढत वेगवेगळ्या मुळांचे प्रकार सांगीतले. उदाहरणं ही दिली.
लेकीच्या मनात बाईंची परिक्षा घेण्याची लहर आली. उत्तर माहित असतानाही कार्टीन बाईंना प्रश्न टाकला.
"टिचर स्वीट पोटॅटो इज अ स्टेम ऑर रुट?"
कुणी रताळं 'मुळ' की 'खोड' असं विचरल्यावर पटकन बेधडक 'मुळ' उत्तर आलं असतं. पण 'स्वीट पोटॅटो' म्हटल्यावर चटकन गोंधळ उडणे स्वाभाविक आहे. झालं बाईंची विकेट उडाली.
आता बरोबर उत्तर माहित असुनही सांगता येत नसल्याने लेकी समोर धर्मसंकट उभं राहिलं. सांगीतल तर आपण बाईंची परिक्षा घेत होतो हे सत्य उघडं झालं असतं. प्रसंगावधान राखुन लेक निमुट खाली बसली. आणि अश्या प्रकारे एकाच बॉल वर दोन विकेट डाऊन झाल्या. ;)
अशी चुकीची माहिती आपल्या मित्रं मैत्रींना मिळु नये असं तिला मना पासुन वाटत होत. मनाला चुटपुट लागुन राहिली. घरी आल्यावर आईला अडचण सांगीतली. बायकोला पण झाल्या प्रकाराची गंमत वाटली. ती म्हणाली की उद्या शाळेत गेल्यावर बाईंना सांग की आईने दुसर्या पुस्तकात पाहुन सांगितलं की 'स्वीट पोटॅटो इज अ रुट. वील यु प्लीज कन्फर्म?' आपल्या प्रत्येक अडचणीवर आईकडे उत्तर असतं म्हणुन लेक खुश झाली. आईने धर्म संकाटुन वाचवल्या बद्दल लेकीने एक गालगुच्चा बक्षिस दिला आणि स्वारी 'आज मधहोश हुआ जाये रे..मेरा मन...' गुण गुणत खेळायला पळाली. :)
वाचन
17512
प्रतिक्रिया
42