नकार
लेखनविषय:
नकार
तू,
तू मला जन्म दे
तुझ्या शिवाय कोण झेलेल हा प्रसव कल्लोळ?
अन
तुझ्याशिवाय कोण करेल हा अट्टाहास?
म्हणूनच तू मला जन्म दे
अग त्या मूळेच तर तू महान ठरतेस
पण
कृपा करून
तू माझ्या पोटी नको येऊ.
तू
तू माझी भगिनी हो
माझ्या दिवाळ्या, रक्षाबन्धन हीं सारी
तुझ्या शिवाय कशी सजतील?
नाही तू माझी भगिनी हो
तुझ्याशिवाय पहाटेची ती सुगंधी तेल माझ्या अंगाला कशी लागतील?
अन रक्षाबन्धनाचा रंगीत धागा कपाळावरच्या नामासह
मी कसा मिरवेन?
नाही तुला झालच पाहिजे माझी भगिनी
पण
कृपा करून
तू माझ्या पोटी नको येऊ.
तू
तू माझी साथीदारीण हो
अग , निसर्गाचा नियमच आहे हा
माझ्या पालवी फुटलेल्या मनाला विहारायला
तुझी तनुलताच तर हवी मला
तुझ्या शरीराच्या गंधान वेडावतो मी
माझा आत्मा समाजाची सारी बन्धन झुगारून
तुझ्याशी एकरूप होऊ पाहतोय
दे
दे मला , तुझी साथ दे
या अडखळणाऱ्या श्वासांना एक लय दे
हो, स्वाधीन हो माझ्या
अन शांतव माझ्या तनामनाची आग
पण
कृपा करून
तू माझ्या पोटी नको येऊ
तू
तू देव्हारी रहा
तुझ रणरागिणी रूप माझ संकट हरू दे
तुझ लक्ष्मिच पाउल माझ घरदार उजळू दे
तुझ्या वीणेच्या झन्कारे माझा ज्ञानदीप तेवू दे
तुझ्या प्रसन्न रूपाने माझ मस्तक लवू दे
पण तू देव्हारीच रहा
कृपा करून
माझ्या पोटी नको येऊ
काय? काय म्हणतेस?
आधुनिक समाजाचा वारस मी?
हो मी आधुनिक समाजाचा वारसच तुला ठणकावून सांगतोय
कृपा करून माझ्या पोटी नको येऊ
नाहीतर
पूर्वापार 'दुधपिलाई' सोडून
मी हीं आधुनिक शस्त्रे वापरीन
पण तुला नष्ट करेन.
म्हणून,
म्हणूनच सांगतोय
कृपा करून
माझ्या पोटी नको येऊ.
__/\__
अपर्णा
वाचने
3903
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
कवितेचा मध्य गाभा आणि त्याच्या मेंदवाला झिणझिण्या आणणार्या संवेदना आवडल्या,
विचार करायला लावणारी कविता आहे. :)
आशयघन कविता छान जमली आहे.
सध्याच्या कुत्र्याचे पाय मांजराला आणि मांजराचे कुत्र्याला जोडून मिपावरती आदळणार्या कवितांच्या अंधारात ही तारक मस्त सुखावून गेली.
In reply to आवडली by परिकथेतील राजकुमार
अगदी असेच म्हणतो..
सुंदर आशयघन कविता
:(
आवडली.
मस्त कविता अपर्णातै :)
उत्कृष्ट रचना!
कविता आवडलीच. पण अजूनही हे चालू आहे हा विचार फार अस्वस्थ करतो....
खरं तर..
असो...
सध्या फक्त हे घ्या _/\_०_
वीकांताला नक्कीच भेटु :)
वाचून सुन्न्न झालो
आई हवी, बहिण हवी, पत्नी हवी मग मुलगी का नको ? असा जगावेगळा हट्ट काय कामाचा ? ही एक सरकारी जाहिरात आहे. आमच्या
गावात ती भिंतीवर रंगविली आहे. पण कवितेचा बाजच काही वेगळा , धारदार असतो. कविता जमली आहेच पण कशाला हो अस्वथ करता आम्हाला ?.दोन मुलींचा बाप असूनही मी त्यांच्या सहवासाचा आनंद मिळवितो आहे.
अतिशय मार्मीक आणि सटीक.
अमृत
सुंदर कविता...पण सुन्नता आणणारी!!
कविता आवडली. प्रभावी आहे.
एकदम आर्त !!!!!!
मनाला हेलावुन टाकणारी
एकदम आर्त !!!!!!
मनाला हेलावुन टाकणारी
जबरी. भेदक.
तू माझ्या पोटी नको येऊ..
अतिशय विदारक चित्रण....
आवडलि कविता.
अप्रतिम