नस्त्या उचापती
आज घरातील सर्व मंडळी काही कारणास्तव चार दिवसांसाठी बाहेरगावी गेलेली असल्याने मी घरात एकटाच पडलो होतो आणि त्यामुळेच घरातील 'स्व' जेवणाची जबाबदारीसुद्धा सर्वस्वी माझ्यावर पडली होती. तसा मी भात अगदी मस्त करतो (एकट्यापुरताच) परंतु रोज रोज भात खाण्यापेक्षा आज जरा वेगळं करुया असे वाटले. पण वेगळ म्हणजे नेमक काय करायच? कारण ऑम्लेट- भाताच्या पुढे माझी कधीच उडी गेली नव्हती; नव्हे तसं धाडसच मी कधी केलं नव्हत. (त्यात आळस हा घटकही किंचितसा कारणीभूत होताच!) पण आज मात्र काहीतरी असं धाडसी कृत्य करावच अस मनापासून वाटू लागल होतं. त्यात मिपाच्या पाकृ लेखांनी मला चांगलच पछाडून सोडल्यानं शेवटी नाही नाही म्हणता भाताच्या ऐवजी चपात्या हा साधा पदार्थ आणि ऑम्लेटच्या ऐवजी अंड्याचे कालवण करावे असे ठरले.
मग ठरल्या प्रमाणे मी किचनकडे वळलो. पण अचानक किचनच्या दारातच मी चूळबूळत थबकलो, मनात एकप्रकारची बैचेनी वाढून, माझी छाती जोरजोरात धडधडू लागली. का कुणास ठाऊक पण मध्येच लग्न होऊन प्रथमच सासरच्या घरात प्रवेश करणार्या नववधू सारखे मला उगीच भासू लागले. त्यामुळे मनावर एकप्रकारचे दडपण आले. पण मग मी आपल्याच धडधडत्या छातीवर हात ठेवत, रडणार्या मुलीला उगी उगी म्हणणार्या वधूच्या पित्यासारखे सगळं ठिक होईल असे स्वतःला समजावत मनातील भिती आणि नर्व्हसपणा कमी करत हळूच नकळत पायाखाली नजर टाकली आणि तांदळाचा तांब्या पायाखाली नाही याची खात्री करत मग मी किचनमध्ये इंट्री केली. प्रथम टाईम मॅनेजमेंटसाठी मोबाईल पाहीला. सकाळचे बरोब्बर साढे आठ वाजले होते, चला म्हणजे स्वयंपाकाला आपणाकडे भरपूर वेळ आहे असे म्हणत मी गव्हाच्या पिठाचा डबा बाहेर काढला. तसा मला अजूनही गव्हाच्या आणि ज्वारीच्या पिठातला फरक कळत नाही, पण रोज स्वयंपाक करताना दिदिच्या जवळ हाच डबा असतो हे माझ्या चाणाक्ष नेत्रांनी मी पाहीले होते त्यामुळे हा डबा गव्हाच्या पिठाचाच आहे हे मला माहीत होते.
डब्यातले पिठ चाळणीने चाळून मग त्यात थोडे पाणी टाकून ते मी मळू लागलो. काही वेळ माझ काम अगदी सराईतपणे चालू झालं, पण पिठाच्या मनात मात्र माझ्या विरुध्द वेगळच कटकारस्थान शिजत असावं. कारण पिठ व्यवस्थितपणे मळून झालं तरीसुद्धा ते काहीस टणक वाटत होतं. त्यामुळे पुन्हा पाणी टाकून ते मी मळू लागलो पण काही उपयोग झाला नाही, शेवटी मग मळून झालेल्या पिठाला नरमपणा आणण्यासाठी आणि त्यावर मळणीचा शेवटचा हात मारण्यासाठी मी त्यावर थोडे तेल चोपडले आणि तेथेच पिठाने उग्र रुप धारण करण्यास सुरवात केली!
आगीत पेट्रोल टाकावे आणि त्याचवेळी आगीने चवताळून एकच भडका घ्यावा अशी त्यावेळी त्या पिठाची अवस्था झाली. काही क्षणांत त्या पिठाने माझ्या हाताला च्विंगम पेक्षाही भयानक असे चिटकायला सुरवात केली, त्यातून बचावासाठी मी त्यावर काही पाण्याचा शिडकावही केला पण त्याने स्थिती आणखीनच बिघडली. शेवटी कधी पाणी, कधी सुके पिठ, पुन्हा पाणी आणि पुन्हा सुके पिठ अशी क्रमाक्रमाने त्यात भर टाकत गेलो. अर्ध्या तासानंतर छोट्या दोन चपातीच्या पिठाने दुप्पट आकार घेतल्यानंतर पिठाची आग काही अंशी तरी शमली आणि तेथेच मनगट पकडून विव्हळत मी दहा मिनिटांची रेस्ट घेतली! सलग अर्धा तास नॉन स्टॉप पिठ मळत असल्याने हाताची बोटे आणि मनगट ठण्णss ठण्णss ठणकून निघत होते आणि त्यात मी अधिक वेळ रेस्टही घेऊ शकत नव्हतो; कारण ते पिठ अजुनही काहीसे टणकच राहीले होते आणि आणखी अर्धा एक तास जर मी थांबलो तर त्याच्या मला वरवंट्यानेच चपात्या लाटाव्या लागल्या असत्या!
त्यामुळे पुन्हा मी माझ्या कामाला लागलो. काही वेळ पुन्हा तेल चोपडून मी त्या पिठाला चांगले मळून-मळून काही अंशी तरी नरम करण्यात यशस्वी झालोच! पिठ मळणीच्या यशस्वी मोहीमेनंतर ते पुढीलप्रमाणे दिसू लागले. (यापुर्वीचे म्हणजेच, पिठ मळणीचे फोटो अतिशय भयानक असल्याने त्या कार्याचे फोटो काढण्याचे कटाक्षाने टाळलेले आहेत)
मळलेल्या पिठाचे चपात्यांसाठी सम-चार गोळे करण्यात आले. आहाहाss! काय ते पिठाचे गोळे चिकने दिसत होते म्हणून सांगू. ते पिठाचे आकर्षक गोळे पाहून मला तर सातारच्या गोग्गोड कंदी पेढ्यांचीच आठवण आली आणि तोंडाला भरभरुन पाणी सुटले,
पण दुसर्याच क्षणी याच पिठाच्या मळणीचे आत्ताच आलेले भयानक, ताजे अनुभव आणि ते प्रसंग आठवून तोंडचे पाणी आल्या पावली तोंडाला आणि घशाला कोरड पाडून तसेच परत पळाले!
आता माझ्या कामाला खरी सुरवात झाली. तवा गॅसवर ठेऊन मी चपाती लाटायला घेतली. पण आता त्या गोळ्याने पोळपाटालाच चिकटण्याचा पावित्रा घेतला. "पिठ पोळपाटाला चिकटायला नको म्हणून त्याला सुके पिठ लावायचे असते." हे बहीणीचे कोणे एके काळी कोणालातरी सांगतानाचे अमृत बोल माझ्या कानांना आठवले आणि मग मी त्याला लग्गेच हाताने पावडर लावतात तसे पिठ लावले. पण तरी सुद्धा ते पिठ पोळपाटाला काहीसे चिकटतच होते. चपाती लाटताना स्त्रियांच्या हातात चपात्या कशा पोळपाटावर गरगर फिरतात, पण माझी चपाती गोल फिरायचे सोडाच पण तिथल्या तिथे सुद्धा हलत नव्हती. शेवटी मग ती चपाती तशीच पोळपाटावर ठेऊन चपातीऐवजी पोळपाट फिरवून मी तिला गोल आकार देऊ लागलो. काही प्रमाणात मी यशस्वी झालोही होतो पण ते पाहून मध्येच नशीबाच्या पोटात खुपलच! त्यामुळे नंतर चपाती लाटल्यानंतर चपातीने गोल आकार तर घेतला पण तो भलताच विचित्र दिसत होता. बरं असू दे असं म्हणून मी ती माझ्या आयुष्यात प्रथमच बनविलेली एकुलती एक चपाती तव्यात अंथरली!
आता चपातीचा आकार चुकला म्हणून काय एवढं पण दात काढायची गरज नाही! ही मी बनवलेली पहीलीच आणि मुख्य म्हणजे तुटून रिमेक न होता यशस्वीपणे तव्यात पडलेली चपाती आहे! ही चपाती भाजून झाल्यावर मात्र तिने अचानक आपले अंग ताठरून का घेतले(?) तेच कळाले नाही. त्यामुळेच की काय; पण म्हणून मला तिच्याकडे बघून उगीच दिवाळीच्या कडाकण्याची आठवण आली! आता बारी होती ती दुसर्या चपातीची. पहीलीचा अनुभव लक्षात घेता मी दुसरी चपाती जास्त पातळ लाटली नाही आणि त्यामुळेच ती पहीली पेक्षा थोडीशी नरम झाली.
पण येथे दोन्ही चपात्या भाजताना त्या पुर्णपणे नरमही झाल्या नव्हत्या की त्यांना पापडचा कुठे लवलेशही आला नव्हता. नाही म्हणायला पहीली चपातीच पुर्णपणे पापड झाली होती ती गोष्ट वेगळी! शेवटी तिसर्या चपातीच्या घडीला मी थोडे तेल लावले व ती लाटून तव्यात टाकली. त्यामुळे ती चपाती पहील्या दोन्हीं चपात्यांपेक्षा अधिक नरम झाली आणि म्हणून खुश होत मीच माझ्या पाठीवर थाप मारुन स्वतःला शाबाशकी दिली. एव्हाना चपातीने चपाती नामक खाद्यपदार्थाच्या गुणधर्मात दिसण्यास सुरवात केली होती.
(हा श्रीलंका नव्हे! तसा प्रश्न कोणीतरी नक्कीच काढेल, म्हणून मी ही चपाती उलटी फिरवलेली आहे)
शेवटची चपाती तव्यात टाकल्यावर मात्र मी आनंदाने टुन्नकन उडीच मारली. चौथी चपाती अक्षरशः फुगली होती! एखादी मुलगी पटल्यावर झाला नसेल एवढा आनंद मला त्यावेळी झाला.
अशा प्रकारे चार चपात्या यशस्वीपणे तयार झाल्या होत्या. म्हणजेच मिशन चपाती कंप्लिट.
सहजपणे म्हणून मी घड्याळात नजर टाकली तर बारा-वीस झाले होते. म्हणजे चार चपात्यांसाठी मला जवळजवळ तिन तास लागले होते! घड्याळाकडे दुर्लक्ष करित मी माझ्या पुढच्या मोहीमेकडे वळलो. मनात म्हटल अजुन दहाच वाजलेत अजुन खुप वेळ आहे!
अंड्याच्या कालवणासाठी प्रथम कांदा आणि टोमॅटो बारीक कापून घेतले. येथेसुद्धा नवीन सुरी तिला काहीच धार नसल्यासारखी करत मला खिजवत होती. पण मी सुद्धा एकाच जाग्यावर पुन्हापुन्हा सुरी फिरवत टोमॅटो कापत होतो, त्यात कांदाही ओला असल्याने पाण्यातील माशासारखा सुरीच्या कचाट्यातून निसटून पळत होता व मिही त्याला वारंवार पकडून बळी घेणार्या कसायासारखा त्याला कापत होतो. कितीही झाले तरी आता मी कोणाकडूनही हार मानून घेणार नव्हतो. त्यामुळेच जिद्धिने आणि चिकाटीने मी माझे काम करत होतो. पंधरा मिनिटांनी कांदा आणि टोमॅटोची धरपकड आणि कापाकापी झाली!
जेवताना कालवणात कोणकोणत्या पदार्थांची चव लागते ते आठवत हळूहळू त्या-त्या पदार्थांची किचनकट्यावर हजेरी लावण्यात आली.
आता येथे श्रीखंडाचे लेबल असलेल्या डब्यात मिठ आहे. त्यामुळे अंड्याच्या कालवणात श्रीखंडही टाकतात का असा उगीच पाणचट प्रश्न कोणीही विचारु नये! (नवशिकाऊ स्वयंपाक कर्ते असा त्यांचा अपमान कदापी सहन करणार नाहीत! जो कोणी असे विनोद करेल त्याला आमच्या याच पाकृचे पोटभर जेवण भरवले जाईल याची गंभीरपणे नोंद घ्यावी!)
तर आता आपल्या मुख्य मुद्द्याकडे वळू (सिनेमातला नव्हे!) टोप गॅसवर ठेऊन मी त्यात अनुक्रमे, तेल, जिरे, हळद आणि चटणी टाकली व चांगले परतून घेतले. त्यानंतर कांदा आणि टोमॅटो टाकले.
आता पाणी टाकायची वेळ आली. पण अरेरे! पाणी कुठे आहे? मसाल्याच्या गडबडीत कालवणासाठी लागणारा मुख्य पाणी हा घटक घ्यायचा विसरुनच गेला होता. त्यामुळे ऐन वेळी पाण्याने माझी चांगलीच तारांबळ उडाली आणि पाणी घेण्याच्या गडबडीत कांदा हलवण्याचे मला विस्मरण झाले. त्यामुळे मध्येच माझे दुर्लक्ष झाल्याने टोपातील मसाला माझ्यावर कोपला आणि त्याने हळूहळू कोळशाचा रंग धारण केला. परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेऊन मी तातडीने त्यात पाणी टाकले आणि पुढचा अनर्थ टळला. तरीही काही बरेच काळे ठिपके वर तरंगू लागले. त्याकडे कानाडोळा करत मी त्यात मिठाची चिमट टाकली. छे! मिठ सुद्धा थोडेच राहीले आहे. नवीन पाकीट फोडून टाकावे लागेल. विचार करत करत मी ते मिश्रण चांगले ढवळून उकळण्यासाठी फास्ट गॅसवर ठेवले.
कालवणाला उकळी फुटल्यानंतर त्यात अख्खे दोन अंडे न ढवळता फोडण्यात आले आणि ते मिश्रण पाच मिनिटांसाठी झाकून ठेवले. पाच मिनिटांनी कालवण खदखदू लागले. सर्व घरभर मॅगीसारखा मंद मोहक सुवास सुटला. आणि पुन्हा पोटात कावळे ओरडू लागले.
घड्याळात आता दुपारचा एक वाजला होता. वेळ न दवडता मी माझी अशी स्पेशल डिश सजवून तयार केली.
कोणाच्याही मदतीशिवाय आपण जेवण बनवले या आनंदात मी जेवायला घेतले आणि चपातीचा एकच घास तोडून तो तोंडात टाकला तोच!......
काहीतरी पाणचाट तोंडात गेल्यासारख वाटल. हे असं का वाटाव हे प्रथम मलाच काही कळाल नाही. मी जास्त लक्ष न देता सरळ टीव्ही ऑन केला आणि टीव्ही बघत पुन्हा जेवणास आरंभ केला. पहीली चपाती तर कडाकण्यासमानच असल्याने तिचा वापर लिज्जत पापड सारखा करावा असे मी ठरवले व त्यानुसार जेवणाचा एक घास घेतल्यानंतर मी ती चपाती तोंडी लावत कडाडूम कुडूडूम अशी करत खाऊ लागलो (चपाती पापडासारखी इतकीही पातळ आणि कुरकुरीत झालेली नव्हती. तर ती जाडसर आणि कडकडीत झालेली होती. त्यामुळे कुर्रम कर्रम असा आवाज न करता ती कडाडूम कुडूडुम असाच आवाज करत होती.)
दोन-तिन घास पोटात गेल्यानंतर मात्र कावळ्याची चलबिचल कायमचीच थांबली. बहुदा असल्या जेवणाने पोटातील कावळे पोटातल्या पोटातच मेले असावेत! पण त्यामुळे परिणाम मात्र वेगळा झाला. पोटातील प्रत्येक आतडे जिवाच्या आकांताने त्या घासाला परतुन लावू लागले. भुकेसाठी पोटाचं तिळ-तिळ तुटणं मी ऐकून आहे पण येथे तर जेवणाच्या घासानेच पोट तिळ-तिळ तुटताना मी पहील्यांदाच पाहत होतो! हिंदी पिक्चरमध्ये एखादी स्त्री कलाकार काही प्रसंगाला जशी भावनाविवश होऊन जिवाच्या आकांताने "नहीsssss.." म्हणून ओरडते तसेच माझे प्रत्येक आतडेसुद्धा अक्षरशः बोंबलत होते. उशीरपर्यंत उपाशी राहील्याने कदाचित असे झाले असेल म्हणून मी शेवटी प्रत्येक घासाला पाण्याचा घोट घेऊ लागलो निदान त्यामुळे तरी असे होणार नाही. पण कशाचे काय! चार-पाच घास घेतल्यानंतरसुद्धा तिच स्थिती. काही वेळानंतर मात्र माझ्या मनानेच त्या जेवणाची धास्ती घेतली. चपातीमुळे कदाचित असे झाले असावे मी दुसरा निष्कर्ष काढला आणि फ्रिजमधील ब्रेडचं पाकिट काढल. आता त्या चपातीला कायमचा रामराम करुन मी ब्रेड आणि कालवणावरच आपला लंच भागवण्याचे ठरवले. पण हे काय! त्या ब्रेडच्या घासालाही तसाच अनुभव येऊ लागला. आता मात्र मला काहीच समजेना, कालवण तरी बरोबर झालं होतं मग हे असं काय होतय?
विचार करण्यात आणि जेवणात माझा उरलेला निम्मा दिवस संपला. यानंतर सलग दोन दिवसांपर्यंत माझ्या अंगात कणकणी भरुन आली व काही प्रमाणात ते तापलेही होते. या घडल्या प्रकारानंतर मात्र मी कानाला खडाच लावला. स्वयंपाकाची आणि स्पेशली माझ्याच हातच्या जेवणाची मी चांगलीच धास्ती घेतली. पुढे घरातील मंडळी येईपर्यंत मग मी ऑम्लेट आणि ब्रेड यावरच भागवले.
पाच दिवसानंतर ज्यावेळी घरातील सर्व मंडळी आली त्यावेळी त्यांना हा माझा सगळा पराक्रम कळाला आणि सगळ्यांनी कपाळावरच हात मारुन घेतला. कशाला अशा उचापती करायच्या म्हणून सर्वांनी जाहीरपणे माझी चांगलीच टर उडवली.
नंतर हळूहळू त्यांच्या बोलण्यातून सहजच माहीती पडले की डब्यातील चटणी तिखट कमी असल्याने अधिक टाकावी लागते, तसेच चपाती या प्रकारात मिठ हा घटकसुद्धा सामाविष्ठ असतो. जो मी टाकलाच नव्हता, नव्हे त्याचा विचारच मी केला नव्हता. सगळ्यात शेवटीची आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या डब्यात मिठ असायचे तो डबा ऐन वेळी बदलून खायच्या सोड्याचा करण्यात आलेला होता! आणि याची सुचना ते सर्वजण बाहेर जाताना मला वारंवार देण्यात आलेली होती, परंतु त्याचवेळी मी झोपेत असल्याने ते बोलणे एका कानाने ऐकून तिथेच दुसर्या कानाने मी सोडून दिले होते. आता घ्या!!!! या सर्व स्पष्टीकरणाने मला मी बनवलेल्या जेवणाच्या भयानकतेचे रहस्य पुर्णपणे उलगडले. सत्य स्थिती कळ्ल्यावर आता यावेळी कपाळावर हात मारुन घेण्याची पाळी माझीच होती.
-सत्यघटित
७ एप्रिल २०१२
आता माझ्या कामाला खरी सुरवात झाली. तवा गॅसवर ठेऊन मी चपाती लाटायला घेतली. पण आता त्या गोळ्याने पोळपाटालाच चिकटण्याचा पावित्रा घेतला. "पिठ पोळपाटाला चिकटायला नको म्हणून त्याला सुके पिठ लावायचे असते." हे बहीणीचे कोणे एके काळी कोणालातरी सांगतानाचे अमृत बोल माझ्या कानांना आठवले आणि मग मी त्याला लग्गेच हाताने पावडर लावतात तसे पिठ लावले. पण तरी सुद्धा ते पिठ पोळपाटाला काहीसे चिकटतच होते. चपाती लाटताना स्त्रियांच्या हातात चपात्या कशा पोळपाटावर गरगर फिरतात, पण माझी चपाती गोल फिरायचे सोडाच पण तिथल्या तिथे सुद्धा हलत नव्हती. शेवटी मग ती चपाती तशीच पोळपाटावर ठेऊन चपातीऐवजी पोळपाट फिरवून मी तिला गोल आकार देऊ लागलो. काही प्रमाणात मी यशस्वी झालोही होतो पण ते पाहून मध्येच नशीबाच्या पोटात खुपलच! त्यामुळे नंतर चपाती लाटल्यानंतर चपातीने गोल आकार तर घेतला पण तो भलताच विचित्र दिसत होता. बरं असू दे असं म्हणून मी ती माझ्या आयुष्यात प्रथमच बनविलेली एकुलती एक चपाती तव्यात अंथरली!
वाचन
10290
वाचनखूण
प्रतिक्रिया
46
बापरे! बराच सोडा पोटात गेला
असु दे हो. फार नका वाईट वाटुन
पहिला प्रयत्न असला तरी
छान
In reply to छान by इरसाल
हे हे हे ,मलाहि असच वाटलं ते
In reply to हे हे हे ,मलाहि असच वाटलं ते by जेनी...
पापडांपेक्षा
हम्म्...कळल ना तुला स्वयंपा़क
हा हा...
होतं असं...
@ पेठकर काका पियुशाला
In reply to @ पेठकर काका पियुशाला by पियुशा
गंमत..
हीहीही. मस्त लिहिले आहे एकदम.
अभिनन्दन तुमच्या पाक कौश्यल्याबद्दल
नाराज होवु नका....
देवा.. जबरदस्त हसू आलेलं
In reply to देवा.. जबरदस्त हसू आलेलं by गवि
बादवे पुढील वेळी एक डाबर
स्वयंपाकाची क्रुती फसली तरि
सत्यघटना आवडली.... डोन्ट
In reply to सत्यघटना आवडली.... डोन्ट by प्रेरणा पित्रे
अनुस्वारासाठी शिफ्ट + m
फार वाईट वाटून घेउ नका. असे
(चपात्यांप्रमाणेच) कडक
अनुस्वारा करिता धन्यवाद..लीमाउजेट..:)
मस्त आणि कड्क लेखन आवडले.
In reply to मस्त आणि कड्क लेखन आवडले. by स्वातीविशु
कुकर मधला गाजर हलवा हा
In reply to कुकर मधला गाजर हलवा हा by किचेन
अरे वा!
In reply to अरे वा! by अन्नू
☺
In reply to ☺ by किचेन
?
In reply to ? by अन्नू
हसणारी.खळखळून हसणारी
:)
उचापती केल्याशिवाय कुठलेच
हम्म्..आता इंडिया स्टोअर्स
आमचाहि पहिला प्रयोग !
हाहाहा!
मस्त लेख ..
हा हा हा!
उत्तम, कणकेच्या गोळ्याला उपमा
खुसखुशीत लेखन!
In reply to खुसखुशीत लेखन! by ऋषिकेश
ऋ धन्यु रे.
In reply to ऋ धन्यु रे. by परिकथेतील राजकुमार
कॉपीराईट भंग!!!!!
In reply to कॉपीराईट भंग!!!!! by प्रीत-मोहर
चले चल...
हा हा हा
थांकू-थांकू
चपाती मध्ये मीठ टाकायचा विचार
तिच्यायला त्या सोड्याच्या
In reply to तिच्यायला त्या सोड्याच्या by कैलासवासी सोन्याबापु
=)) =))
same pinch