अ‍ॅडिरोन्डॅक उद्यानातील रंगीबेरंगी हेमंत

धनंजय's picture
धनंजय in कलादालन
21 Oct 2011 - 3:56 am

ही चित्रे अ‍ॅडिरोन्डॅक उद्यानातल्या रंगीबेरंगी हेमंताची आहेत.

एका वेगळ्या तंत्राने चित्रे काढायचा हा प्रयत्न आहे. चित्रे चालत्या गाडीतून काढली आहेत, पण अनावरणकाल मुद्दामून लांब ठेवलेला आहे (१/१५ ते १/३० सेकंद). असे केल्यामुळे ज्या वस्तूकडे डोळे बघत राहात होते (आणि त्यामुळे कॅमेरा त्या वस्तूचा मागोवा घेत होता), ती वस्तू त्यातल्या त्यात स्पष्ट दिसते, बाकीच्या वस्तू मात्र खरवडलेल्या दिसतात. यामुळे चित्राला गती येते. हा तंत्राला "पॅनिंग" म्हणतात. कॅमेरा : ऑलिंपस ई-५००. केंद्रमान, अनावरणकाल, छिद्रमान वगैरे वेगवेगळे. चित्रे एकमेकांवर रचण्यासाठी GIMP 2.0 वापरले. पार्श्वभूमीच्या चित्राचे रंग थोडे गडद केलेले आहेत.

छायाचित्रण

प्रतिक्रिया

मर्द मराठा's picture

21 Oct 2011 - 5:07 am | मर्द मराठा

चांगला प्रयत्न... पण मला वाटते पॅनिंग करताना तुम्हाला म्हणजे छायाचित्रकाराला स्थिर राहावे लागते.. आणि गतिमान विषयाचा मागोवा घेतात...

वानगीदाखल...

   अशी मी जिंकले....

गाडीतून अशा प्रकारच्या छायाचित्रणाला पॅनिंग म्हणणे मला थोडे अनुचित वाटतेय ..

शिवाय तुमच्या छायाचित्रांमधे मला विषय दिसला नाही ज्याचा तुम्ही मागोवा घेताय... कदाचित लाल, हिरव्या , पिवळ्या रंगाचे फराटे घेता आले असते अशा तंत्राने तर अधिक सुंदर दिसले असते...

बरोबर. कॅमेरा हलत असला, तर त्याला "ट्रॅकिंग शॉट" म्हणतात. चित्राचा विषय हलत असला, तर "पॅनिंग"

विषय आणि कॅमेरा यांच्यात सापेक्ष गती असली तर कॅमेरावानाला जे काय करावे लागते ते तेच... त्यामुळे या बाबतीत पॅनिंग शॉट आणि ट्रॅकिंग शॉट यांच्यात मला फारसा फरक वाटत नाही.

मागे एकदा हलत्या बोटीतून उडणार्‍या "गल" पक्षाचा फोटो घेतला होता - त्याला पॅनिंग म्हणावे की ट्रॅकिंग? तांत्रिक दृष्ट्या काहीही फरक पडत नाही, असे मला वाटते.

माझ्या प्रत्येक चित्रामध्ये केंद्रस्थानी असलेली झाडे/झुडपे कोणती, ते स्पष्ट आहे, असे मलातरी वाटते :-) काहींचे तर पानन् पान स्पष्ट दिसते आहे.

- - -

गोडुल्या सायकलस्वारिणीची चित्रे मस्तच!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Oct 2011 - 8:38 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> माझ्या प्रत्येक चित्रामध्ये केंद्रस्थानी असलेली झाडे/झुडपे कोणती, ते स्पष्ट आहे, असे मलातरी वाटते

मला तर खरवडलेलंच जास्त दिसतंय. स्थीर चित्र फार कमी आहे राव.

बाकी अशा चित्रांना ट्रॅकिंग आणि पॅनिंग म्हणतात हे मात्र मला माहितीपूर्ण आहे.
धन्यु.

-दिलीप बिरुटे

चित्रा's picture

21 Oct 2011 - 7:26 am | चित्रा

माझी गाडीतून काढलेली सगळीच चित्रे ही अशी दिसतात :)

थोडासा खवटपणा: खरवडलेली हा शब्द योग्य वाटत नाही, फराटलेली (असा शब्द असला तर) किंवा खोडलेली असे वापरावे का?

चित्रे थोडी मोठी असती तर आवडले असते. मधले चित्र रंगांच्या पखरणीमुळे विशेष आवडले. मोठ्या आकारात सुंदर दिसेल असे वाटते.

पैसा's picture

21 Oct 2011 - 7:57 pm | पैसा

एक नवीन प्रकार म्हणून चांगलं आहे. सोबत सगळी चित्रं वेगवेगळी दिली असती तर आणखी छान झालं असतं. आता रंगाचा खेळ छान वाटतोय खरा पण त्यातले बारकावे तितकेसे लक्षात येत नाहीयेत.

मदनबाण's picture

22 Oct 2011 - 1:24 pm | मदनबाण

हेच म्हणतो म्या.

विकास's picture

21 Oct 2011 - 8:28 pm | विकास

सगळीच छायाचित्रे आवडली आणि प्रयोग देखील...आता करून पाहेन.

प्रयोगासंदर्भात नाही, पण त्यातील विषयासंदर्भातले माझे या वर्षीच काढलेले स्थिरचित्रांचे कोलाज येथे देत आहे.

श्रावण मोडक's picture

21 Oct 2011 - 8:38 pm | श्रावण मोडक

पहात रहावी अशी आहेत प्रकाशचित्रे, पण मी त्यात फार अर्थ शोधत बसलो नाही. रंगसंगती देखणी आहे. तिचा आनंद घेतला. पुन्हा घेईन.

सुंदर प्रकाशचित्रे आणि कॅमेर्‍याविषयी नविन माहीती.

सर्वसाक्षी's picture

23 Oct 2011 - 1:46 pm | सर्वसाक्षी

अनेकदा चालत्या वाहनातुन काढलेली चित्रे गतीची जाणीव चांगली करुन देतात. बोगद्यात शिरताना धनंजय यांच्याप्रमाणेच अनावरण काल १/८ सारखा दिर्घ ठेवुन कळ दाबावी, प्रकाशरेषांचा मजेशीर खेळ पाहावयास मिळतो.

वरील चित्रांपैकी खालचे डाव्या बाजुचे चित्र नीट पाहिले असता त्यात काही झाडे स्थीर आली असून इतर झाडे फराटली आहेत. स्पष्ट झाड हे आत तर फराटलेली झाडे बाहेर म्हणजे वाहनाच्या तुल्नात्मक जवळ आहेत हे जाणवते व गतीची जाणीव अचूक होते.

माझी खात्री आहे की धनंजय अधिक सरावा/ प्रयोगा नंतर उत्तम गतीचित्रे सादर करतील.

धनंजय's picture

24 Oct 2011 - 8:23 am | धनंजय

सर्व प्रतिसादकांचे आभार मानतो. विशेषतः मराठमोळा आणि सर्वसाक्षी यांची बिंदुगामी तज्ज्ञ मते तर फारच उपयोगी आहेत.

@चित्रा : "फराटलेला" शब्द चपखल!

- - -
साधारणपणे पॅनिंग/ट्रॅकिंग हे लक्षणीय चित्रविषयासाठी वापरतात (उदाहरणार्थ मराठमोळा यांची गोडुली सायकलस्वार). मात्र या चित्रात जो आशय सांगायचा होता तो चक्रावणार्‍या रेलचेलीचा होता. (चित्रे रेल्वेप्रवासात काढलेली होती.) म्हणजे दृष्टी कशावरतरी ठरते पण लक्ष देण्याइतकी ठरत नाही. फोटोसुद्धा अस्तव्यस्त वेडेवाकडे सांडलेले आहेत. त्यातील मध्यवर्ती चित्र तर असे आहे की त्याच सगळेच फराटे आहेत - पण हे फराटे वेगवेगळ्या दिशेला आहेत, ही बाब लक्षणीय आहे. त्यामुळे हा पेतीत-ताश/इम्प्रेशनिझम प्रकाराचे थेट उद्धरण सांगते. त्या उद्धरणावरून कोलाजचा आशय एक "इम्प्रेशन" असणार आहे, कुठलाही रेखीव विषय नव्हे, ही प्रस्तावना दिली जाते. वगैरे.

इतकेच काय, दूरच्या झाडांचे स्थिरचित्र पार्श्वभूमीसाठी घेतलेले आहे, त्यावर कधीच लक्ष केंद्रित करता येऊ नये अशा प्रकारे कोलाज बनवले आहे.

त्यामुळे पैसा, मदनबाण, बिरुटे म्हणतात तसे तपशीलवार लक्ष देता येण्यासारखी चित्रे दिली तर "चक्रावणारी, लक्ष देता-देता वस्तू नाहिशी होणारी रेलचेल" हा भावनिक आशयच हरवतो. "मन शांत-प्रसन्न करणारे सृष्टीचे नजारे" असा भावनिक आशय हवा, तर चित्रीकरण आणि कोलाजही अगदीच वेगळे हवे. विकास यांनी असे एक सुंदर कोलाज वर दिलेले आहे.

किंवा चालत्या गाडीतूनच कॅमेर्‍याचे सेटिंग बदलून चित्र काढता येते : शटर-स्पीड खूप वाढवला, तर चालत्या रेल्वेगाडीत नसून त्या ठिकाणी स्थिर बसलेल्या व्यक्तीच्या नजरेतून चित्र तयार होते. उदाहरणार्थ त्याच प्रवासात काढलेले हे वेगळे चित्र :

या चित्रातही कथानक आहे. (स्वर्णिम-तरुवरो विलसति पुरतः ।) पण ते कथानक वर दिलेल्या कोलाजपेक्षा खूपच वेगळे आहे.

कॅमेर्‍याची सेटिंग आणखीही बदलून डच गोल्डन एज चित्रकारांच्या शैलीची नक्कल करणारे (त्याच प्रवासात काढलेले) हे चित्र बघा :

येथे कथानक नाट्यमय ढगांचे आणि गडद काळवंडलेल्या "टोनल रंगसंगती"चे आहे. येथेसुद्धा "आयएसओ" सेटिंग बदलून रंगसंगती वेगळीच - खेळकर आणि स्पष्ट रंगांची - बनवता आली असती. तसे चित्रही सुंदरच असते. पण त्या चित्राचा भावनिक आशय वेगळा असता.

पैसा's picture

24 Oct 2011 - 9:21 am | पैसा

मला हीच चित्रनिर्मितीची प्रक्रिया अशीच विस्ताराने पाहिजे होती! म्हणूनच वेगवेगळी चित्रं आणि त्यांचं कोलाज यातून किती वेगवेगळ्या कृती निर्माण होऊ शकतात हा त्याचा फक्त एक भाग झाला. बाकी तुम्ही विस्ताराने लिहिलंच आहे आता. ही दोन्ही चित्रंही सुंदर आहेत, त्यांचा बाज वेगळा आहे.