मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

त्याची भेट

चाणक्य · · जनातलं, मनातलं
तो मला अचानकच भेटला. साधारण वर्षभरापूर्वीची घटना असेल. खरतर तारीख मा़झ्या लक्षात रहायला हवी होती. कारण त्याची भेट हि मला बर्‍यापैकी बदलून टाकणारी घटना होती. थंडीचे दिवस होते. ऑफिस च्या कामाने वैतागलो होतो. फारच लोड आला होता. त्यातून सततच्या टूरिंगमुळे जरा होमसिक ही झालो होतो. अश्याच एका सोमवारी ऑफिसच्या कामासाठी सकाळी लवकर निघायच होत. रविवारी संध्याकाळी जाम कंटाळा...नव्हे सगळ्याचा अगदी उबग आला होता. रात्री डोळ्याला डोळा काहीलागेना. Mid-life Crisis आयुष्यात फारच लवकर व्हायला लागला होता बहुतेक. कारण आपण काय करतोय? आपल्या आयुष्याचा उद्देश काय वगैरे प्रश्न पडायला लागले होते. (अजुनही पडतात). तर रात्री डोळ्याला डोळा लागेना. त्यामुळे सहजच बाहेर पडलो. म्हणलं जरा कॉलनीत चक्कर मारु. फिरता फिरता माझी नजर त्याच्याकडे गेली. म्हणजे तेव्हा काही विषेश वाटलं नाही, सर्वसाधारण ईसमासारखा दिसत होता तो. जीन्सची पॅन्ट, शर्ट - बहुदा टी-शर्ट असावा, वर काळपट निळ्या रंगाच जॅकेट, पायात शूज असा पेहराव होता त्याचा. खान्द्यावर एक साधी सॅकही होती. जॅकेटच्या खिशात हात घालून अमिताभ बच्चन स्टाईल फिरत होता. असले सडाफटिंग लोक जनरली रात्री फिरत असतात, त्यामुळे मला काही विषेश लक्ष द्यावं असं वाटलं नाही. मी आपला माझ्या घरासमोर फिरत होतो. दोन तीनदा त्याच्या समोरून गेलो असेन. चौथ्या वेळेला मला त्याने विचारलं, "काय झोप येत नाही वाटत?" "च्यायला, हा कोण आहे? आणि ईतकी सलगी काय करतोय?" मी मनात. "कोण तुम्ही? कोणाच घर शोधताय का?" मी त्याला विचारलं "नाही. असच फिरतोय" तो उत्तरला. मी म्हणलं कुणीतरी वेडा दिसतोय. सरळ दुर्लक्ष करून पुढे निघालो. "विचित्र वाटलं ना ऐकून?" त्याचा आवाज आला मागून. बोलण्यावरून तरी चांगल्या मरठी घरातला सुशिक्षित वाटत होता. मग असा रात्री अपरात्री का भटकतोय हा. (मी पण तस म्हणल तर रात्री अपरात्रीच भटकत होतो म्हणा) मी मागे वळून बघितलं. तो माझ्याकडे यायला लागला. खरं सांगायच तर जरा टरकली माझी. रात्री अडीच वाजता एक अनोळखी माणूस आणि रस्त्यात दुसरं कोणी नाही. पण का कुणास ठाऊक, जागेवर थांबलो. "हाय. माझ नाव _________. " त्याने हात पुढे करून विचारलं "कुठल्या बिल्डींग मधे राहता?" मी काही हात बित मिळवला नाही त्याच्याशी. "मी ईथला नाही. म्हणजे या कॉलनीत नाही रहात." "मग?" "मी मुळचा ________ चा. " "अच्छा, ईथे कोणा नातेवाईका कडे आलायत का?" "नाही नाही" तो हसत म्हणाला "????" (हा नक्कीच वेडा दिसतोय) "मी फिरत असतो असाच. ईकडे तिकडे" "म्हणजे" मला काही कळेना. "म्हणजे....मी अधून मधून पाय नेतील तिथे जात असतो. तुमचं काय नाव?" "अजय" मी सांगितले "अजय काय?" "अजय मित्रगोत्री" "अजयराव, तुम्ही जरा टेन्शन मधे दिसताय" "नाही, काही विशेष नाही" मला काही या अनोळखी इसमाजवळ मन मोकळं करायचं नव्हतं. त्यामुळे संभाषण आटोपतं घेण्याकडेच माझा कल होता. "मी बेट लावून सांगतो, की तुम्ही गेल्या अनेक दिवसात तुमच्या कामातून स्वतःसाठी वेळ काढलेला नाहीये." खरं होतं म्हणा ते. चार वर्षापूर्वी लग्नासाठी सुट्टी घेतली होती, त्यानंतर नाही. "तुम्हाला कस कळलं?" मी चेहर्यावर आश्चर्य न दाखवता त्याला विचारलं "तुमच्या चेहर्यावरून दिसून येतय." "हा हा" तो हसला, "सॉरी, खर सांगायचं तर तुम्ही संध्याकाळी कुणाशी तरी फोन वर बोलत होता, तेव्हा कानावर आलं" च्यामारी...... हा काय मला ट्रॅक वगैरे करतोय की काय? (काळजी) पण मला ट्रॅक कोणाला काय मिळणार आहे. (हायसं) "सॉरी, मी तुमच बोलणं ऐकलं", तो पुढे म्हणाला, "पण मी मुद्दामून नाही ऐकलं, तुम्ही रस्त्यावर जोरात बोलत होता, त्यामुळे कानावर आलं" 'आयला फोनवर बोलताना जरा हळू बोललं पाहिजे. "पण तुम्ही संध्याकाळ पासून ईथे काय करताय?" "अॅलक्च्युअली माझी ट्रेन होती सकाळी ती चुकली, मग ईथेच गावात फिरत राहिलो." "कुठे निघाला होतात?" "जम्मीकुंटा" "जम्मीकुंटा????? कुठे आलं हे" "आन्ध्रात आहे, एकदा कामासाठी गेलो होतो. सुदर गाव आहे. तिथे नदीकाठी शंकराचं मंदीर आहे. तिथे जाऊन रहणार होतो २ दिवस. " "तिथे का?" "सहज, मी म्हणालो ना, पाय नेतील तिथे जातो" "म्हणजे?" "म्हणजे आपल्या मर्जीचा आपण मालक. मनात येईल तिथे जायच" "काय करता तुम्ही?" हा माणूस आयुष्यात काही प्रॉडक्टीव्ह करत असेल, यावर माझा (तेव्हा तरी) अजिबात विश्वास नव्हता "मी ____________ या कन्सल्टन्सी मध्ये ___________ या पोस्ट वर काम करतो" "कन्सल्टन्सी???" मी स्वतः एका कन्सल्टन्सी मध्ये काम करत असल्याने मला जरा कुतुहल निर्माण झालं, "कशाची आहे कन्सल्टन्सी" मी विचारल "सप्लाय चेन, लॉजिस्टीक" "मग हे अस वेळीअवेळी भटकणं?" "तो माझा स्वतःसाठी काढलेला वेळ आहे... सिगरेट?" त्याने बोलता बोलता सिगरेट शिवगावली. मला कळालं नाही", मी म्हणलो "माहितिये, पहिल्या भेटीत कुणालाच झेपत नाही." त्याने एक कश मारला आणि आकाशाकडे बघत धूर सोडला. आपलं वागणं या माणसाला झेपत नाहीये, याचा त्याला जरा आनंद झाल्यासारखा वाटत होता "मी पण काही वर्षांपूर्वी तुमच्यासारखाच टेन्स्ड असायचो. काम, काम आणि काम. वैताग यायचा, वाटायच पळून जावं कुठेतरी. एकदा म्हणलं, खरच पळून जाउयात. ऑफिस मध्ये सांगितल गावी काका वारलाय, घरी सांगितल की ऑफिसच काम आहे. घेतली बॅग अन निघालो आणि माझं बोलण तुम्हाला ईतक बोअर होतय की तुम्हाला झोप आली आहे" "अं... नाही नाही" मी त्याच बोलण ऐकता ऐकता जांभई दिली होती. "तस काही नाही, रात्र बरीच झालीये ना म्हणून." "जा तुम्ही, झोपा. तुम्हाला उद्या सकाळी लवकर जायचय मुम्बईला" "फोन वर ऐकल ना मघाशी?" मी "सॉरी म्हणलं ना" आम्ही दोघही हसलो. "ओ.के. गुड नाईट" मलाही काही विशेष ईंटरेस्ट होता त्याची स्टोरी ऐकायला अशातला भाग नव्हता. "गुड नाईट" तो चालू लागला. ----------------------------------क्रमश:-------------------------------------------- (मला खरतर क्रमशः टाकायच नव्हत, पण सगळ टंकायला वेळ नाही मिळाला, म्हणून टाकत आहे)

वाचने 1730 वाचनखूण प्रतिक्रिया 3

छान. कथा इथेच संपली असती तरी चालले असते असे वाटले. आता ’त्याची’ कथा पुढे कोणते वळण घेईल त्याची उत्सुकता आहेच. पुढील भागाच्या प्रतिक्षेत. -दिलीप बिरुटे