ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. ११
लेखनप्रकार
याआधी: ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. १०
आमच्या घराच्या कोपर्यावरच एक "को ऑप" नावाचं सहकारी भांडार होतं. तेथेही आम्ही जात असू.कोऑपच्या समोरच सुंदर कट्टा बांधलेला होता आणि काही बाकडीही टाकलेली होती.तिथे बसलं की वार्याच्या हलक्या झुळूका येत असत आणि समोरचे कोऑप आणि संपूर्ण रस्त्यावरच्या हालचाली दिसायच्या. पहारे करायला बसल्यासारख्या आम्ही दोघी तिथे बसत असू. आजूबाजूच्या बाकड्यांवरही कोणकोण बसलेले असायचे.ओळख देख नसताना सहज "कोन्निचिव्हा" (हॅलो,नमस्कार..)व्हायचे.आमची बिनाअस्तराची जपानी आणि त्यांची तितकीच बिनाअस्तराची इंग्रजी; दोन्हीची मोडतोड करत संवाद सुरू व्हायचा.आमचा वेळ मजेत जायचा. दुपारी साधारण प्रौढ आणि वृध्द स्रियांचाच वावर तिथे जास्त असायचा.त्या काय खरेदी करतात? त्यावरून त्यांच्या राहण्या खाण्याच्या सवयींचा अंदाज बांधायचा जणू छंदच आम्हा दोघींना लागला होता.
बर्याच जणी आपापले कुत्रे घेऊन खरेदीला येत. त्यांना बांधायला दुकानाच्या दाराशी स्वतंत्र स्टँड होता.तिथे बांधतानाही त्यांच्याशी लाडेलाडे बोलत.(बहुतेक ,"शहाणा मुग्गा ना तू? शांत बसायचं हं,मी लग्गेच येतेच.तुला चॉक्केट आणते हं. आणि काय हवं बाळाला?" असला काही संवाद जपानीतून होत असावा असा मला दाट संशय आहे.)त्यांचे लहान मुलांच्या वरताण लाड!त्यांच्या केसांना रिबिनी काय बांधतील,केस रंगवतीलच काय?त्यांना झबलेवजा फ्रॉक काय घालतील. पाऊस असला तर रेनकोट! आणि हद्द म्हणजे त्यांच्या पायात बूट!
त्याच गल्लीच्या दुसर्या टोकाला "कुत्र्यांसाठी पेश्शल हाटेल" होते. ह्या सगळ्या श्वानमाता बहुतेक वेळा आपली खरेदी करून झाल्यावर किवा आधी त्या हाटेलात आपल्या "पपीला" नेऊन खायला प्यायला घालून लाड करताना दिसत. (त्या पेश्शल हाटेलाच्या बाहेर असलेल्या बाकड्यांवर बसून आमचे तेही निरिक्षण चाले.)पण एक मात्र होतं ,ह्यांच्या कुत्र्यांचा त्रास इतरांना होत नसे .प्रत्येक कुत्राधारिकेबरोबर एक पिशवी जरूर असायची.त्या पिशवीचं कोडं एक दिवस उलगडलं.एक श्वान माता आपल्या लेकराला बाहेर ठेवून खरेदीला गेली असता इकडे बाळाने कार्यक्रम करून ठेवला.ती ललना बाहेर आल्यावर ते दृश्य पाहून" अर्रे लबाडा,तरी सांगत होते जास्त खाऊ नकोस." असे भाव चेहर्यावर! पिशवीतून टिश्यु काढून तिने ती जागा आणि कुत्र्याचा पार्श्वभाग दोन्ही साफ केले.जवळच्या प्लास्टीक पिशवीत तो ऐवज परत ठेवला. समोरच मोठ्ठी कचराकुंडी असतानाही ती पिशवी घेऊन चालायला लागली.भोचकपणा करून आम्ही तिला (बिनाअस्तराच्या जपानीत)समोरच असलेली कचराकुंडी दाखवली.तिचं उत्तर मात्र बरच काही शिकवून गेलं." ही कुंडी कॅन्स आणि बाटल्यां,जुने कागद इ.साठी आहे.ते सारे रिसायकलिंगला जाते,त्यात ही घाण टाकून कसं चालेल?
त्या समोरच्या मोठ्या कचराकुंडी मध्ये कॅन्स,बाटल्या,ओला आणि सुका कचरा,कागद,दुधाचे खोके इ. साठी वेगवेगळे कंटेनर्स होते.(परदेशात बहुतेक सगळ्याच ठिकाणी असे असते हे तेव्हा माहित नव्हते.सगळ्याचीच नवलाई होती.)लोकं तिथे येऊन वर्गीकरण करून कचर्याची विल्हेवाट लावत असत. कोणीही एकदाही आपली कचर्याची पिशवी एकाच कंटेनरमध्ये टाकून गेलेले पाहिले नाही.दुधाचे खोके तर रिसायकलिंगला सोपे जावे म्हणून धुवून,चपटे करून,महिन्याभराचे साठवून त्यांचा गठ्ठा करून मगच टाकत. एकदा असेच तिथे कट्ट्यावर बसलो असताना एक स्त्री आणि तिची १०/१२ वर्षांची मुलगी कचरा टाकायला आल्या.बाई वेगवेगळ्या कुंड्यात वर्गवारी करत कचरा टाकत होत्या. मुलगी कंटाळली आणि तिने उरलेली पिशवी एकाच कुंडीत टाकली.बाईंनी पाहिलं आणि मुलीला ओरडा तर बसलाच पण बाईंनी ती पिशवी कुंडीतून उचलली आणि मुलीला वेगवेगळ्या कुंड्यात कचरा टाकायला लावला.
सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्य नुसते सप्ताह पाळून होत नाहीत तर या आणि अशाच गोष्टीतून ते राखलं जातं ह्याचा तो एक वस्तुपाठच होता.
रस्ते तर इतके स्वच्छ की चक्क पान घेऊन पंगत मांडावी!(पंगत मांडण्याइतके स्वच्छ रस्ते मला युरोपातही क्वचितच पहायला मिळाले. )रस्त्यांमधल्या डीव्हायडर वर अनंताची,गुलाबाची झाडं,बोगनवेली लावलेल्या असतात.छत्रीच्या वाकड्या मुठीने किवा काठीने कोणीही रामभाऊ देवपूजेसाठी ती काढताना किवा कोणी रमाकाकू,ठमाकाकू वेणीत माळण्यासाठी ती खुडताना दिसत नाहीत.एकदा सूटाबूटातले हपिसर लोकं हातात मोजे घालून,लांब चिमट्यांनी वाटेतला कचरा म्हणजे फुलांच्या पाकळ्या,वार्याने गळलेली पानं,चुकून कुठे असलंच तर सिगरेटच थोटुक गोळा करून जवळ असलेल्या एका कचर्याच्या कुंडीत टाकत होते.कपड्यांवरून ते काही सफाई कामगार तर वाटत नव्हतेच. आम्ही परत एकदा भोचकपणा करून ह्याबाबत त्यांना विचारलं .उत्तर मिळालं,"आम्ही इथल्या जवळपासच्या इमारतीत कामाला येतो तर इथला रस्ता स्वच्छ ठेवणं ही आमची जबाबदारी आहे."(काशीला गेलो असताना रस्त्यात घाण की घाणीत रस्ता आहे हे समजत नव्हते.तेव्हा विचारणा केली असता मिळालेले उत्तर होते."कितने लोग यहा रोजाना आते है। कॉर्पोरेशन के सफाई करनेवाले भी रोज कौनसी तो गली साफ करतेही नही है।")
राखेतून नंदनवन उभं केलेल्या ह्या देशाचं रहस्य तेथलेच सुजाण लोकं आपल्या कृतीतून सांगत होते.
माझं जपानी रुटीन
आम्ही मैतरणी जवळ जवळ रोजच सकाळी १० ते १०.३० च्या दरम्यानं बाहेर पडत असू.दोन तीन तास आसपासच्या रस्त्यांवरून भटकंती करत तिथल्या रस्त्यांची,दुकानांची आणि माणसांचीही ओळख करून घेत येताना भाजी,दूध ,अंडी इ. गोष्टी आणत असू.इथल्या टीव्ही वरती फक्त जपानी चॅनेले दिसायची.(आता इथेही तेच! फकस्त जर्मन चॅनेले! दुसर्या महायुध्दातल्या पराभूत देशात असा रुल आहे की काय? ;) )तर इथे फक्त जपानी कार्यक्रम दिसत. घरी इंटरनेट नव्हते. बाहेर नेट कॅफे असत पण सगळे जपानीतून ! इंग्रजी व्हर्जन ज्या नेट कॅफेमध्ये होते तो आमच्या घरापासून २ किमी लांब! सॉलिटेअर तरी किती खेळणार?आम्ही ३ कुटुंबे एकत्र राहत होतो. स्वतंत्र बेडरुम आणि बाथरुम असल्या तरी आमचे स्वयंपाक घर आणि हॉल एकत्र होते. आमच्या मालकीण बाई श्रीमती लीला रेड्डी आम्हाला वेगवेगळ्या हिंदी सिनेमांच्या कॅसेटा देत असत.(हो, तेव्हा सीडी,डीव्हीडी इतक्या सहज मिळत नसत.)कधीतरी दुपारी आम्ही तिघीजणी एकत्र सिनेमा पहायचो पण जपानमधला वेळ हिंदी सिनेमात वाया घालवायला मला आणि सुप्रियाला जास्त आवडायचं नाही.लेखाला मात्र शिनूमात रस असायचा.मग आम्ही दोघी भटक्या परत बाहेर पडत असू आणि मोतोमाचीच्या शॉपिंग लेनमध्ये नाहीतर शिन कोबेच्या रस्त्यावर,बागांमध्ये भटकत असू.



वाचने
19605
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
सुंदर वर्णन!..
In reply to सुंदर वर्णन!.. by ऋषिकेश
+१
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to +१ by नंदन
सुंदर !!!
In reply to सुंदर !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:)
In reply to सुंदर वर्णन!.. by ऋषिकेश
१००%
मस्तच
मस्तच!
In reply to मस्तच! by प्रमोद देव
+१
नेहेमीप्रमाणेच हातखंडा यशस्वी लेखन स्वातीताई!
सुरेख/अवांतर...
In reply to सुरेख/अवांतर... by विसोबा खेचर
तुलना..
In reply to तुलना.. by स्वाती दिनेश
टाळ्या
In reply to तुलना.. by स्वाती दिनेश
का नाही?
In reply to का नाही? by विसोबा खेचर
.
ले गयी दिल
वा..
झ्याक
स्वाती
ह्म्म
In reply to ह्म्म by केशवसुमार
१००००० टक्के सहमत...
In reply to ह्म्म by केशवसुमार
अगदी खरे! +++१
In reply to ह्म्म by केशवसुमार
लाख मोलाचं
खरे..
स्वच्छ शहरात राहुन असे बोलणे सोपे आहे.
In reply to स्वच्छ शहरात राहुन असे बोलणे सोपे आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डॉ. साहेब,
In reply to डॉ. साहेब, by चतुरंग
प्रश्न इथल्या व्यवस्थेचा !!!
In reply to प्रश्न इथल्या व्यवस्थेचा !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपले विचार वाचले.
उशिराचा प्रतिसाद.
धन्यवाद.