अगोरा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture
३_१४ विक्षिप्त अदिती in जनातलं, मनातलं
6 Apr 2011 - 11:21 pm

अनेक 'यशस्वी' चित्रपट पाहिल्यानंतर काय सापडतं? विशेषतः तो चित्रपट ऐतिहासिक काळातल्या घटनांवर बेतलेला असेल तर? आजही फार काही वेगळं दिसत नाही आणि मुळात मानवी स्वभाव बदलत नाही. भाषा, वेशभूषा, तंत्रज्ञान बदलतं पण स्वभावाला औषध नाही. जमावाला तुच्छतावाद शिकवला की सत्ता हस्तगत करता येते, असलेली सत्ता अबाधित राखता येते. दुसर्‍या जमावाला तुच्छ लेखण्यासाठी भाषा, धर्म, जात, प्रांतिक ओळख किंवा इतर काही मानवनिर्मित ओळख असेल किंवा वंश, लिंग अशी निसर्गनिर्मित असेल. 'अगोरा' हा अलेहांड्रो अमेनाबार या दिग्दर्शकाचा चित्रपट पाहून सर्वप्रथम आठवला तो वेगवेगळ्या परिस्थितीत, वेगवेगळ्या माणसांनी वेगवेगळ्या जमावाप्रती दाखवलेला तुच्छतावाद.

चित्रपट घडतो साधारण इ.स. चौथ्या शतकात इजिप्तमधल्या, अलेक्झांड्रीया शहरात. रोमन साम्राज्याचा अस्त होण्याचा, पेगन पद्धती मागे पडून ख्रिश्चॅनिटीची भरभराट होण्याचा हा काळ! हायपेशिया ही तत्त्ववेत्ती चित्रपटातली प्रमुख व्यक्तीरेखा आहे. पेगन हायपेशिया खगोलशास्त्राची शिक्षिका आहे, तिचे वडील थिऑन हे अलेक्झांड्रीयाच्या पेगन ग्रंथालयाचे प्रमुख आहेत. पेगन आणि ख्रिश्चन समाजातही बुद्धीवादी थिऑन आणि हायपेशिया यांना मान आहे. सुंदर आणि तरूण हायपेशियाला लग्न करण्यात, व्यक्तीगत आयुष्यात फारसा रस नाही. सामाजिक आणि धार्मिक बदल घडत असताना एकीकडे आकाशातल्या ज्योतींबद्दलचे पारंपारिक विचार हायपेशिया तिचे तरूण, उच्चवर्गातील विद्यार्थी, ओरेस्टेस, सायनेसियस आणि तसेच गुलाम दावूस, इत्यादींना शिकवत असते. ओरेस्टेस आणि दावूस या दोघांचंही हायपेशियावर प्रेम असतं. ती, जशी आहे तशी, स्वीकारण्याची ओरेस्टसची तयारी नसते आणि दावूस जसा आहे तसा, स्वीकारण्याची तिची तयारी नसते म्हणून ती तत्त्वज्ञान आणि खगोलशास्त्र यांच्या अभ्यासालाच सर्वस्व समजते. टॉलेमीच्या विचारधारेवर विश्वास ठेवणार्‍या हायपेशियाच्या हार्मनीबद्दल वेगळ्या कल्पना नाहीत, प्राचीन ग्रीकांप्रमाणेच वर्तुळ हाच अचूक आकार आहे, यावर तिचाही विश्वास आहे. पण त्याही बरोबरच नवीन पद्धतीचा विचार विद्यार्थ्यांनी मांडल्यास, त्याचं स्वागत करण्यात तिला कमीपणाही वाटत नाही. आपल्या कामात गर्क असणार्‍या हायपेशिया आणि इतर बुद्धीवादी पेगन लोकांचा सामान्य जनतेशी फारसा संपर्क राहिलेला नाही.

एकीकडे ख्रिश्चन समाजाची वाढत्या ताकदीला सीरिल नामक धर्मगुरू उन्मादाचं रूप देण्यास सुरूवात करतो. त्याच्या नेतृत्त्वाखाली अनेक ठिकाणी ख्रिश्चन समाज पेगन देवतांची विटंबना करण्यात मग्न असतो. दुसर्‍या बाजूने अधिकाधिक लोकांना ख्रिस्ताचा करूणा, प्रेम, दया हा संदेश सांगूनही ख्रिश्चॅनिटीकडे ओढण्याचं कामही सिरील करत असतो. एका बेसावध क्षणी, पेगन धर्मगुरू आणि त्याच्या जोडीला ग्रंथालय प्रमुख, थिऑन, पेगन समाजाला देवतांच्या विटंबनाचा बदला घेण्यासाठी, पेगन समाजाला ख्रिश्चन समाजाविरूद्ध हत्यार उचलण्याची अनुज्ञा देतात. हायपेशियाचा हिंसेला विरोध मान्य करून तिचे अनेक विद्यार्थी या संघर्षापासून लांब रहातात तरीही ओरेस्टस पेगनांच्या बाजूने हत्यार उचलतो. ख्रिश्चनांची वाढती संख्या पाहून पेगन, सेरापियम या त्यांच्या ग्रंथालयाचा आश्रय घेतात. काही दिवसांनी रोमन साम्राज्याकडून पेगन लोकांना माफ केल्याचा हुकूमनामा येतो पण त्यांना त्यांचं ग्रंथालय, ग्रंथांसकट ख्रिश्चनांच्या हवाली करावं लागतं. ग्रंथालय सोडून पळून जाताना, हायपेशिया, थिऑन, ओरेस्टस आणि पेगन विद्यार्थी, जमतील तेवढे ग्रंथ आणि चीजवस्तू वाचवण्याचा प्रयत्न करतात. या गदारोळात हायपेशियाकडून दावूसचा अपमान होतो आणि ती ओरेस्टसच्या मदतीने महत्त्वाचे ग्रंथ घेऊन तिथून निसटते. पेगन विद्यार्थ्यांच्या हिंसेचा बदला सेरापियम नष्ट करून ख्रिश्चन लोक घेतात.

द्रष्ट्या नेतृत्वाच्या अभावामुळे सीरिलला पुढे महत्त्व मिळतं. त्याची भडकाऊ भाषणं आणि वागण्यामुळे बराचसा पेगन समाज ख्रिश्चन होतो आणि ज्यू समाज अलेक्झांड्रीयामधून हद्दपार होतो. सीरिलचा लोकसंग्रह आणि पाठींबा वाढतच जातो. तेवढ्यावरच सीरिल समाधानी नसतो. त्याला अलेक्झांड्रीयाचा सर्वेसर्वा होण्यात, स्वत:चं संपूर्णपणे निरंकुश साम्राज्य निर्माण करण्यातच रस असतो. दावूसबद्दल आपलेपणा वाटणारी हायपेशिया, ग्रंथालयातून निघून जाताना, आतल्या आवाजाकडे दुर्लक्ष करते; ग्रंथ वाचवण्यासाठी, तिचा ओरेस्टसबरोबर जाण्याचा निर्णय संपूर्ण अलेक्झांड्रीयाचं, तिथल्या समाजाचं, कदाचित खगोलविज्ञानाच्या प्रगतीचं आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या अस्तित्त्वाचंही भवितव्य ठरवतो का?

हायपेशियाचा रस फक्त खगोलविज्ञान आणि तत्त्वज्ञानात असतो. प्रयोगांची निरीक्षणं आणि त्यातून निघणारी अनुमानं जर टॉलेमी किंवा इतर कोणा ज्ञानी पूर्वसूरींच्या निष्कर्षांच्या विपरीत असतील तरीही त्या अनुमानांवर विश्वास ठेवणार्‍या हायपेशियाबद्दल आदर वाटतो. पण सामाजिक, राजकीय परिस्थितीचा अंदाज नसणारी हायपेशिया व्यक्तिगत निर्णय घेताना, गडबडीच्या क्षणी गुलामाला त्याच्या गुलाम असण्याची जाणीव करून देताना सामान्य वाटते; कदाचित आपल्या एका निर्णयामुळे सीरिलसारखा हिंसक, अविचारी धर्मगुरू जिंकला ही पराभवाची जाणीव तिला बरीच उशीरा होते.

असामान्य बुद्धीमत्तेचा लोकसंग्रहाशिवाय उपयोग होत नाही; समाजापासून बुद्धीवादी फटकून वागले, आपल्याच हस्तिदंती मनोर्‍यात ग्रह-तार्‍यांमधेच रममाण राहिले म्हणून सीरिलसारखा, लोकांना अज्ञानात ठेवणारा लोकसंग्रह करू शकला आणि त्या जोरावर ठोकशाही मार्गाने सत्ता हस्तगत करू शकला. चौथ्या शतकात (म्हणे) हायपेशियाला ग्रहांच्या दीर्घवर्तुळाकार कक्षांचा शोध लागला. दीर्घवर्तुळातली हार्मनीही* तिने शोधून काढली. पण गॅलिलेओपर्यंत भूकेंद्री विश्वाची संकल्पना सर्वत्र मान्य होती. १७ व्या शतकातल्या योहान्नेस केप्लरपर्यंत ग्रहांच्या कक्षा वर्तुळाकार असल्याचा समज होता. एक हजार वर्षांच्या अंधारयुगात वैज्ञानिक विचार आणि दृष्टीकोन मागे पडला, धर्मसत्तेचं समाजावर प्राबल्य राहिलं आणि उरला तो वेगवेगळ्या प्रकारचा तुच्छतावाद. आजही एकविसाव्या शतकात धर्म, भाषा, जातींच्या आधारावर हिंसा होते आणि त्याला समाजाच्या काही गटांमधून का होईना, पाठिंबा मिळतोच.

*दीर्घवर्तुळाच्या (ellipse) परीघावरील कोणत्याही बिंदूच्या दोन्ही नाभींपासूनच्या (foci) अंतराची बेरीज समान असते.

समाजचित्रपटविचार

प्रतिक्रिया

चिंतामणी's picture

6 Apr 2011 - 11:29 pm | चिंतामणी

चांगली ओळख करून दिली. आता बघीतला पाहीजे वेळ काढुन.
(पराकडे लिंक/टॉरेन्ट/डाउनलोड असणारच)

लेख इतका डोक्यावरन जातोय तर मग पिक्चर किती डोक्यावरून जाईल

चिंतामणी's picture

8 Apr 2011 - 12:38 am | चिंतामणी

Question for all brilliant people
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.Question is only for brilliant people.

You relax.

:)

आनंदयात्री's picture

6 Apr 2011 - 11:36 pm | आनंदयात्री

सुंदर. चित्रपटाचे ओघावते रसग्रहण आवडले.

>>तो वेगवेगळ्या प्रकारचा तुच्छतावाद.

खरयं, विज्ञानवाद्यांच्या तुच्छतावादाला असा इतिहास असेल हे माहित नव्हते.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Apr 2011 - 12:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

विज्ञानवाद्यांचा तुच्छतावाद म्हणजे तुला काय म्हणायचं आहे हे कळलं नाही. एका मोक्याच्या क्षणी बुद्धीवादी हायपेशिया दावोसचा अपमान करते. (रसभंग होऊ नये म्हणून संपूर्ण गोष्ट विस्ताराने लिहीलेली नाही) पण पुढे तिला या चुकीची जाणीव होतेही.
जिथे विवेक, विचार संपतात तिथे तुच्छतावाद सुरू होतो. वैज्ञानिक, तेव्हाच्या काळाप्रमाणे तत्त्ववेत्ती, हायपेशिया आवड नाही म्हणून राजकारण, समाजकारणाकडे दुर्लक्ष करते, पण तो तुच्छतावाद नसतो. खालचा, चिंतातुर जंतूंचा प्रतिसादही पुरेसा बोलका आहे.

चित्रपटाची ओळख आवडली.

असामान्य बुद्धीमत्तेचा लोकसंग्रहाशिवाय उपयोग होत नाही; समाजापासून बुद्धीवादी फटकून वागले, आपल्याच हस्तिदंती मनोर्‍यात ग्रह-तार्‍यांमधेच रममाण राहिले म्हणून सीरिलसारखा, लोकांना अज्ञानात ठेवणारा लोकसंग्रह करू शकला आणि त्या जोरावर ठोकशाही मार्गाने सत्ता हस्तगत करू शकला.

आजही हेच सत्य आहे.

गोगोल's picture

7 Apr 2011 - 1:30 am | गोगोल

धमाल लेख लिहिला आहे. यानिमित्तने

"भास्कराचार्यांचे भास्कराचार्यत्व फक्त गणितातच" आठवले.

प्राजु's picture

6 Apr 2011 - 11:41 pm | प्राजु

आवडले परिक्षण आणि नंतरचे अनुमानही. :)

प्राजक्ता पवार's picture

6 Apr 2011 - 11:51 pm | प्राजक्ता पवार

चित्रपटाची ओळख आवडली.

छोटा डॉन's picture

7 Apr 2011 - 11:18 am | छोटा डॉन

हेच्च म्हणतो आक्शी !
चित्रपट जरुर बघेन असे सांगतो.

- छोटा डॉन

रमताराम's picture

7 Apr 2011 - 12:06 am | रमताराम

काय हे. आम्ही दोन दिवस लिहित होतो नि तुम्ही आधीच नंबर लावला, बरा नाय हां हे. ता जाव. लिवला चांगला हे म्हत्वाचा. झकास परिचय.

विनायक बेलापुरे's picture

7 Apr 2011 - 2:02 am | विनायक बेलापुरे

झक्क ओळ्ख करुन दिलीत , धन्यवाद.
रॅचेल वाइसला ना सगळे चित्रपट असेच काय काय मिळतात.

अजुन एका आयडीचा उपवास सुटला. :)
मज्जाय बुवा मिपाकरांची सध्या.
सध्या कुठला बरा चित्रपट उतरवायचा या विचारात होतो.
तुझ्या परिक्षणावरुन चांग्ला असाव अस मत झालय. बघतो आणि कळवतो मग.

परिक्षण आवडलं. बादवे, अगोरा म्हणजे बाजार असाच संदर्भ आहे का यात?

नमकिन's picture

19 Aug 2015 - 9:38 pm | नमकिन

अगोरा म्हणजे जिथे भरपूर लोक जमतात (जसे बाजार) बहुधा गोलाकार अस्टरच्या फुलाप्रमाणे

नमकिन's picture

19 Aug 2015 - 10:28 pm | नमकिन

अगोरा म्हणजे जिथे भरपूर लोक जमतात (जसे बाजार) बहुधा गोलाकार अस्टरच्या फुलाप्रमाणे

सहज's picture

7 Apr 2011 - 7:51 am | सहज

सर्वप्रथम ज्यानी कोणी हा सिनेमा पहायला सुचवले त्या व्यक्तिला धन्यवाद.

परिक्षण लिहता लिहता सगळी कथाच लिहली का?

बाकी सिनेमाचे उत्तम कथासार मांडल्याबद्दल धन्यवाद!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Apr 2011 - 10:33 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

सर्वप्रथम ज्यानी कोणी हा सिनेमा पहायला सुचवले त्या व्यक्तिला धन्यवाद.

फक्त सुचवलंच असं नाही तर समजून घेण्यासाठी आणि लिखाणासाठीही मदत केली. :-)

परिक्षण लिहता लिहता सगळी कथाच लिहली का?

पहिला अर्धा भाग बर्‍यापैकी विस्ताराने लिहीला आहे; पुढचा अर्धा भाग, विचार मांडण्यापुरता आवश्यक एवढाच आला आहे. याला परिक्षण म्हणावं का परिचय याचा उहापोह जाणकारांनी करावा.

प्रीत-मोहर's picture

7 Apr 2011 - 7:44 am | प्रीत-मोहर

मस्त परिक्षणं ...

शिल्पा ब's picture

7 Apr 2011 - 8:02 am | शिल्पा ब

परीक्षण आवडले.

विनीत संखे's picture

7 Apr 2011 - 8:25 am | विनीत संखे

असामान्य बुद्धीमत्तेचा लोकसंग्रहाशिवाय उपयोग होत नाही; समाजापासून बुद्धीवादी फटकून वागले, आपल्याच हस्तिदंती मनोर्‍यात ग्रह-तार्‍यांमधेच रममाण राहिले म्हणून सीरिलसारखा, लोकांना अज्ञानात ठेवणारा लोकसंग्रह करू शकला आणि त्या जोरावर ठोकशाही मार्गाने सत्ता हस्तगत करू शकला.

मान्य! अगदी.

शिल्पा ब's picture

7 Apr 2011 - 8:34 am | शिल्पा ब

अगदी अगदी....म्हणुनच मी मिपा सदस्य झालेयं ;)

आळश्यांचा राजा's picture

7 Apr 2011 - 8:34 am | आळश्यांचा राजा

हायपेशिया आणि सीरिल ह्या सार्वकालिक व्यक्तिरेखा आहेत. आजही आपण पाहतो आहोच. हायपेशियाला फार दोष देण्यात अर्थ नाही. तिच्यात नेतृत्त्वगुण असायलाच हवेत का? ती तिचं काम उत्तम करतेय. त्या काळात (म्हणजे या कथेच्या काळात) उत्तम नेता समाजाला मिळाला नाही हे त्या समाजाचे दुर्दैव. (या दुर्दैवाची जबाबदारीही समाजाचीच म्हणा.)

हीच कथा सेम टू सेम आजच्या काळालाही लागू शकते असे वाटते.

विनीत संखे's picture

7 Apr 2011 - 8:58 am | विनीत संखे

इतिहासाची पुनरावृत्ती होते म्हणतात... ते काही खोटे नाही.

प्रकाश घाटपांडे's picture

7 Apr 2011 - 4:18 pm | प्रकाश घाटपांडे

सहमत आहे.

चित्रा's picture

7 Apr 2011 - 9:03 am | चित्रा

छान परीक्षण. चित्रपट पहावासा वाटतो आहे.

ऋषिकेश's picture

7 Apr 2011 - 9:39 am | ऋषिकेश

सगळी गोष्ट कळेल या भितीने अख्खा लेख वाचला नाही.. मात्र चित्रपट जरूर बघेन!

मृत्युन्जय's picture

7 Apr 2011 - 10:16 am | मृत्युन्जय

झक्कास परीक्षण आहे. चित्रपट तुला फक्त आवडलेला नाही तर समजलेला पण दिसतो आहे. संपुर्ण रसग्रहण आणि समीक्षा.

नंदन's picture

7 Apr 2011 - 10:20 am | नंदन

आवडलं. चक्रनेमिक्रमेणाचाच हा वेगळा पैलू म्हणावा लागेल.

स्नेहश्री's picture

7 Apr 2011 - 11:51 am | स्नेहश्री

आवडल परिक्षण.. नक्की बघेन..

स्नेहश्री

कवितानागेश's picture

7 Apr 2011 - 1:22 pm | कवितानागेश

बघायला हवा.

चित्रपट परीक्षण आवडले..

चिंतातुर जंतू's picture

7 Apr 2011 - 5:45 pm | चिंतातुर जंतू

रोचक चित्रपटाचा रोचक परिचय. कथासूत्र पाहिलं तर त्यात वरवर पाहता परस्परविरोधी वाटणारे अनेक प्रवाह दिसतात. ख्रिस्ती धर्म आणि त्याचे प्रचारक यांचा एक महत्त्वाचा प्रवाह दिसतो. जुना पेगन धर्म आणि त्यातली वर्णव्यवस्था या काळापर्यंत रुढीबद्ध आणि जाचक झालेली असावी असं वाटतं. त्यामुळे करुणा, क्षमा, शांती अशा मूल्यांना आवाहन करणाऱ्या ख्रिस्ती धर्माचं दावोससारख्या तळागाळातल्या लोकांना आकर्षण वाटत असावं. पण सत्तासंस्था, त्यांतला मूल्यहीन संघर्ष आणि त्याचं विधिनिषेधशून्य राजकारण अखेर त्या धर्मातदेखील शिरकाव करतातच. म्हणजे ही एक मूलभूत प्रवृत्ती म्हणून चित्रपटात दिसते. (अगदी आंबेडकरांना बौद्ध धर्माचं वाटलेलं आकर्षण आणि आताचं दलित राजकारण यांच्यापर्यंतसुद्धा हे नेता येईल.)

याशिवाय हायपेशिआचं स्त्री असणं आणि म्हणून दुय्यम ठरवलं जाणं, तिनं एका कसोटीच्या क्षणी आपल्याहून कमी सामाजिक दर्जाच्या गुलामाला तुच्छ लेखणं, ख्रिस्ती अपप्रचारामुळे ज्यूंना शहराबाहेर ढकललं जाणं, त्यावेळी गप्प बसणाऱ्या प्रतिष्ठितांना नंतर धक्के बसणं अशा अनेक घटनांतून अल्पसंख्य समाजाला तुच्छ लेखण्याचे परिणाम दिसतात. (इथे अल्पसंख्य म्हणजे निव्वळ संख्याबळानं अल्प एवढ्या संकुचित अर्थानं नव्हे, तर कोणत्याही सत्ताव्यवस्थेत हक्क आणि प्रतिष्ठा देऊ करताना ज्यांना गणलंसुद्धा जात नाही आणि म्हणून जे अल्पसंख्य ठरतात असेही त्यात येतात/यावेत.)

विशुद्ध ज्ञानोपासना करू इच्छिणारी हायपेशिआ हा कथेतला प्रमुख प्रवाह दिसतो. धर्म, सत्ता, राजकारण, समाजकारण अशा कोणत्याही गोष्टींत रस नसणारी ही स्त्री त्या सर्व गोष्टी टाळून शांतपणे आपलं काम करू पाहते. गुलाम, उच्चवर्णीय, सत्ताधारी अशा सर्वांना निरपेक्ष ज्ञान देण्याची तिची वृत्ती म्हटलं तर आधुनिक आणि म्हटलं तर कालातीत आहे. पण त्या विशुद्ध ज्ञानदानाच्या आड येणारे अडथळे हे तिला ज्या गोष्टींना टाळायचं असतं त्यांमुळेच येतात, हे चित्रपटाच्या आशयाच्या दृष्टीनं महत्त्वाचं वाटतं. म्हणजे चित्रपटात पूर्णपणे निर्दोष कुणीच नाही.

हायपेशिआचा दोष मान्य केला तरीही पाश्चिमात्य समाजानं या काळात आपल्यातल्या शक्यतांकडे पाठ फिरवली आणि त्यामुळे तो अंधाऱ्या मध्ययुगात ढकलला गेला, हेही खरंच. बुद्धिवंतांना त्रास देणाऱ्या समाजाचा ऱ्हास अटळ असतो. तसंच तळागाळातल्या लोकांचा छळ करणारेदेखील समाजाची दीर्घगामी हानीच करतात. मग समाजाचं एकमेव आशास्थान हे अशी बेमुर्वतखोर सत्तास्थानं निर्माण होऊ न देण्यात असतं. ज्यात बुद्धिवंत आपली ज्ञानोपासना अविरत करू शकतील, ज्यात तळागाळातल्या लोकांनाही प्रतिष्ठा मिळेल आणि आपल्या उद्धाराची शक्यता दिसू शकेल, आणि हे नाकारणाऱ्या स्वार्थी सत्ताकारण्यांना जी शासन करू शकेल अशा समाज/राज्यव्यवस्थेला पर्याय नाही असंच दिग्दर्शक सुचवू पहात असावा. (अण्णा हजार्‍यांनासुद्धा हेच अपेक्षित आहे असं आपल्याला वाटतं का, यावर कदाचित आज काही गोष्टी अवलंबून आहेत.)

दिग्दर्शकाची फ्रेंच भाषेतली एक मुलाखत इथे वाचायला मिळाली. त्यात कार्ल सेगनच्या ‘कॉस्मॉस’ पुस्तकातल्या अलेक्झांड्रियाच्या ग्रंथालयाविषयीच्या उल्लेखातून चित्रपटाची प्रेरणा मिळाली असा उल्लेख आहे. हा उल्लेख इथे वाचता येईल. ज्ञानी आणि सर्वसामान्य यांच्यातली दरी याविषयी सेगन त्यात बोलला आहे. हायपेशिआ आणि सिरील यांचेही त्यात उल्लेख आहेत.

अजूनही सर्वसामान्यांना तुच्छ लेखणारे ज्ञानी पुष्कळ आहेत आणि सर्वसामान्यांना फसवणारे सत्ताकारणीही पुष्कळ आहेत. धर्म, वर्ण, देश, लिंग, बुद्धी यांसारख्या कोणत्यातरी बाबतीत आपल्याहून वेगळ्या व्यक्तींविषयीचा तुच्छतावाद तर बोकाळलेलाच दिसतो. अगदी इथल्या (आणि एकंदर मराठी आंतरजालावरच्या) वाचक-लेखकांतसुद्धा या प्रवृत्तींचा प्रादुर्भाव दिसतो. म्हणून हा लेख विशेष महत्त्वाचा वाटतो.

मराठे's picture

8 Apr 2011 - 9:24 pm | मराठे

छान परिक्षण ! उत्कृष्ठ प्रतिसाद !

श्रावण मोडक's picture

7 Apr 2011 - 8:03 pm | श्रावण मोडक

अजूनही सर्वसामान्यांना तुच्छ लेखणारे ज्ञानी पुष्कळ आहेत आणि सर्वसामान्यांना फसवणारे सत्ताकारणीही पुष्कळ आहेत. धर्म, वर्ण, देश, लिंग, बुद्धी यांसारख्या कोणत्यातरी बाबतीत आपल्याहून वेगळ्या व्यक्तींविषयीचा तुच्छतावाद तर बोकाळलेलाच दिसतो. अगदी इथल्या (आणि एकंदर मराठी आंतरजालावरच्या) वाचक-लेखकांतसुद्धा या प्रवृत्तींचा प्रादुर्भाव दिसतो. म्हणून हा लेख विशेष महत्त्वाचा वाटतो.

सहमत.
चांगला परिचय.

मन१'s picture

7 Apr 2011 - 9:49 pm | मन१

झकास परिचय.
त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे तो ख्रिश्चन धर्मांतरणाबद्दलचा विश्वास कल्याणकरांचा धागा आणि तुझा हा पेगन्-ख्रिस्ती भांडणाच्या पिक्चरचं परिक्षण दोन्ही एकदमच आलेलं दिसतयं. मिपावर काय हल्ली विषय "पॅके़ज" करुन मिळतात काय?

--मनोबा.

धनंजय's picture

7 Apr 2011 - 11:34 pm | धनंजय

परिचय, चिंज यांचा प्रतिसाद दोन्ही वाचनीय. चित्रपट बघावासा वाटतो.

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Apr 2011 - 12:13 pm | बिपिन कार्यकर्ते

चित्रपटाची ओळख आवडली.

शेवटचा परिच्छेदही आवडला आणि पटलाही. प्रज्ञावंतांच्या चुका किंवा प्रज्ञावंतांचा दहशतवाद वगैरे सामान्य लोकांच्या तत्सम कृतींपेक्षा कैक पटीने समाजाला मारक ठरते. आपण आजही अशी खूपशी उदाहरणे आपल्या आजूबाजूला बघत असतोच / आहोत. प्रत्यक्ष आणि जालिय आयुष्यात, सगळीकडेच.

लेखात मांडलेल्या एका विचारप्रवाहामुळे खालील ओळींची प्रकर्षाने आठवण झाली.

First They came...

First they came for the communists,
and I didn't speak out because I wasn't a communist.

Then they came for the trade unionists,
and I didn't speak out because I wasn't a trade unionist.

Then they came for the Jews,
and I didn't speak out because I wasn't a Jew.

Then they came for me
and there was no one left to speak out for me.

- Pastor Martin Niemoller

राजेश घासकडवी's picture

8 Apr 2011 - 9:43 pm | राजेश घासकडवी

चित्रपटाची ओळख आवडली. मी चित्रपट पाहिलेला नाही, तरी केवळ कथावस्तूवरून काही संगती लावण्याचा प्रयत्न.

हायपेशिया ही बुद्धीवादी वर्गाची प्रतीक आहे. श्रीमंत, सत्ताधारी वर्ग (ओरेस्टेस) व गरीब कामकरी वर्ग (दावूस) या दोघांशी बुद्धीवादींचा संपर्क येतो. दोघांनाही तिचं आकर्षण वाटतं, ते दोघेही तिला वश करून घेण्याचा प्रयत्न करतात. सत्ताधारी ओरेस्टेसला तिने आपल्यासाठी बदलावं - आपल्या अंकित व्हावं असं वाटतं तर कामकरी दावूसकडे जायला ती नाखूष दिसते. सिरील हा धार्मिक, ज्ञानाच्या बाबतीत प्रतिगामी दृष्टीकोनाचा प्रतिनिधी.

पेगन समाजातलं ज्ञानाचं भांडार - सेरापियम - रोमनांनी काबीज केलं. विज्ञानवादी दृष्टीकोनाचं हे संचित धार्मिक, प्रतिगामी शक्तींच्या हातात पडलं. 'ते दिलंत तर तुम्हाला जिवंत सोडू' असं सांगणं म्हणजे सामाजिक खच्चीकरणाची पद्धत आहे. ज्ञान हातातनं निसटलेला समाज जिवंत राहिला तरी नखं व दात काढलेल्या सिंहासारखाच.

सिरीलचं जिंकणं हे बुद्धीवादींनी प्रोलेटरीटांना नकार देण्याशी संबंधित आहे असं सांगण्याचा चित्रपटाचा प्रयत्न वाटतो. मध्ययुगातला अंधार पसरण्याचं ते कारण म्हणून दिलेलं आहेसं दिसतं. त्यामुळे मला ही व्यक्तींची कथा नसून विचारप्रवाहांच्या लढ्यांची कथा वाटते.

एस's picture

19 Aug 2015 - 8:33 pm | एस

आज इस्लामिक स्टेट ह्या दहशतवादी संघटनेने खालिद-अल्-असाद ह्या सीरियामधील पाल्मिरा ह्या पुरातन अवशेष असणार्‍या शहरातल्या ८२ वर्षीय वृद्ध पुरातत्त्वशास्त्रज्ञाचा शिरच्छेद केल्याची बातमी वाचली आणि ह्या लेखाची आठवण आली. समाजातील विवेकवाद झुंडशाही, दडपशाहीच्या दहशतवादाखाली आजही कसा चिरडला जातोय ह्याचे अत्यंत वेदनादायक उदाहरण.

मारवा's picture

21 Aug 2015 - 11:05 am | मारवा

हा चित्रपट नक्की बघेन
तुछत्तावादा ची चेन रीअ‍ॅक्श्न च वाटते जणु.
परीचयासाठी धन्यवाद