व्यापार
लेखनविषय:
केला सुखाचा व्यापार
दु:ख झाले, तोटा झाला
झोळीभर पश्चाताप,
खरा दाम खोटा झाला !
देवा, जगणं रुचंना
काय करावं सुचंना
भल्या सुपीक डोक्याचा
नर्मदेचा गोटा झाला !
तोंडावर लाडीगोडी
पाठ फिरताच खोडी
असे ग्राहक भेटले,
ठकसेन छोटा झाला !
जमा अक्कलखात्यात,
तुझी सावकारी त्यात
हात बुद्धीचे गहाण,
उभा जन्म थोटा झाला !
कधी केली ना लाचारी,
आज देणेकरी दारी
ऐकती ना विनवण्या
गोंधळ वांझोटा झाला !
खुळ्या मनाचं ऐकून
दिलं आयुष्य झोकून
झाले भणंग, भिकारी
मुद्दलात तोटा झाला !
वाचने
2601
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
वा! मस्त कविता!
कविता आवडली. तुकोबांना एखाद्या बेसावध क्षणी असं कधी वाटून गेलं असेल का, असा प्रश्न मनात डोकावला.
हात बुद्धीचे गहाण, उभा जन्म थोटा झाला !हे खासच.
मस्त कविता...
खुळ्या मनाचं ऐकून
दिलं आयुष्य झोकून
झाले भणंग, भिकारी
मुद्दलात तोटा झाला !
हे वाचताना, "स्वतः भोवती गिरक्या घेता, अंधपणा की आला, तालाचा मग तोल कळेना, सादही गोठून गेला" ह्या ओळी आठवल्या...
फारच सुरेख... :)
कविता छान झालीय, पण फार एकसुरी वाटते आहे ग.
खुळ्या मनाचं ऐकून
दिलं आयुष्य झोकून
झाले भणंग, भिकारी
मुद्दलात तोटा झाला !
खुळ्या मनाचं ऐकुन, जरी आयुष्य झोकुन दिलेलं असलं तरी, मुद्दलात तोटा झाला हे समजावणारा मेंदुच होता ना, मुद्दलाचे आणि तोट्याचे हिशोब त्या मनाला कधीच क़ळ्त नसतात, किंवा ते कळुन घेत नसतं.
चांगली कविता. बऱ्याच दिवसांनी?
झकास ग तै :)
आणि हो भेलकम बॅक. आता गायबु नको परत.
>भल्या सुपीक डोक्याचा
नर्मदेचा गोटा झाला !
:) आवडले .
खुळ्या मनाचं ऐकून
दिलं आयुष्य झोकून
झाले भणंग, भिकारी
मुद्दलात तोटा झाला !
क्लास!! सुरेख!
परत क्रांतिताई लिहीत्या झाल्या हे बघून आनंद झाला.
हात बुद्धीचे गहाण,
उभा जन्म थोटा झाला !
हे छान. मात्र एरवी तुमची कविता वाचली की दाद देण्यासाठी काव्यपंक्ती स्फुरतात, तसं आज झालं नाही.
कविता वाचून इब्ने इन्शाची एक कविता आठवली. तीतदेखील सावकारी, कर्ज, व्याज ही रूपकं वापरली होती. अर्थात साम्य इथेच संपतं, कारण आशय वेगळा होता.
वा! मस्त कविता!