माझी मार्गाथा...
शिर्षक वाचून भलतं-सलतं काही मनात आणायचा आधीच सांगतो की हे खरं तर "माझी मार-गाथा" असं हवं होतं, पण गर्दी खेचण्याचा उगाच आमचा दुबळा प्रयत्न...
***********************************************************
तर सांगायचा मुद्दा हा, की आयुष्यात मी भरपुर मार खाल्लाय. :-) आमच्या मास्तरांनी म्हणजेच शिक्षकांनी आम्हाला कुबल कुबल (अलका नव्हे!) कुबललाय. आणि "आई हीच मुलाची पहिली शिक्षक" हे आमच्या मातेने भलतंच मनावर घेतल्याने तिने आम्हाला बदडण्याच्या कर्तव्यात अजिबात कसूर केली नाही.. :tongue:
आमचं घर आधीपासून बर्यापैकी दुध-दुभतं असलेले आहे. त्यामुळे घरात मांजरींचाही बराच राबता असतो. दुध पिणे, सायीच्या भांड्यात तोंड घालणे हे सगळं करतांना ह्या मांजरी कधीकधी घाण पण करायच्या. ते बघून आमच्या आईचा रागाचा पारा भडकायचा आणि मग आमच्या मनात मातृप्रेमाचा वणवा पेटायचा आणि आम्ही मांजरींवर बदला घ्यायचे ठरवायचो.
मग आम्ही (म्हणजे मी आणि माझा भाऊ, भैय्या) दोघे मिळून प्लान करुन मांजरीला घराच्या हॉलमधे घेरायचो. दारं खिडक्या बंद करुन आम्ही मांजरीला काठी आणि झाडणीने बदडायला ट्राय करायचो. सुरुवातीला मांजर दबून, लपून रहायला पाहायची, पण दोन-चार रट्टे बसल्यावर मात्र "वाघाची मावशी" असल्याचे सिद्ध करत आम्हाला बोचकारायची. (त्यावेळच्या युद्ध-खुणा आम्ही अजुनही हातांवर मिरवतोय.) मांजर वाचण्यासाठी जी धडपड करायची त्यात भांडी, फुलदाण्या वगैरे पडून आम्ही आईला "मांजर चालेल, पण मातृप्रेम आवरा" असं करुन सोडायचो. पण आम्ही निष्ठेचे पक्के... म्हणून मग मांजरीला पोत्यात भरुन आम्ही तिला खुप खुप दुर असलेल्या ३-४ किमी अंतरावरच्या गावात ओसाड माळावर सोडून यायचो. मग विजयोन्मादात आम्ही घरी परत आलो, की आई आमची वाट बघत उभी असायची ! मग असला ब्येक्कार मार पडायचा राव की ज्याचं नाव तेचं... आणि आई मस्त कोपर्यात कोंडी करुन हाणायची. आम्ही कर्तव्यपुर्तीच्या आनंदात तो मार गपगार सहन करायचो. (येकदम भगतसिंग फिलींग यायचं भौ !) एवढा मार (आम्ही) खाल्यावर पुन्हा संध्याकाळी ती मा़ंजर आमच्यावर तिखट-मीठ चोळायला घरात हजर असायची.. तेव्हा तोच जिंकल्याचा माज तिच्या चेहर्यावर (?) दिसायचा...
*************************************************************
आमचं घर जुन्या बांधणीचं आहे. त्यात दुसर्या मजल्यावर एक छोटा माळा आहे, तिथे (तेव्हा मोठं कूटुंब असल्याने) कांदे वगैरे एकदमच भरपूर आणून त्या माळावर टाकून ठेवायचे. तिथून लागेल तसे ते खाली आमच्या घरी आणायचो...
एकदा मी वरुन कांदे घेऊन खाली येत असतांना, वरच्या पायरीवरुन पाय सटकला आणि मग दाण-दाण करत प्रत्येक पायरीवर बुड ठेचून घेत (अहो, एक एक फूट उंचीच्या जून्या पद्धतीच्या पायर्या त्या..) मी दोन दारांच्या मधल्या चौकात येऊन आदळलो. कांदे चौखूर उधळत अर्धे पुढच्या आंगणात तर अर्धे मागच्या मोरीपर्यंत पसरले. आई बाहेर आली आणि, "एक काम कमी करायचं म्हटलं, तर एक कम फुकटचं वाढवून ठेवते हे पोट्टं" असं म्हणत तिथंच दोन ठेऊन दिल्या. मी लागल्याचं बोंबलायला लागलो तर " जा, आधी कांदे उचलून आण" म्हणत आणखी दोन रट्टे देण्यात आले...
*************************************************************
ह्याच्या पुढचा किस्सा माझ्या मेंदूत पक्का कोरलेला आहे..
एकदा घराजवळ खेळतांना कोणाला तरी मी शिवी दिली. आईने ती ऐकली. घरी पोचल्यावर आईनी मला बोलावलं. चुलीजवळ नेलं आणि तिच्यातला निखारा चिमट्यात उचलला. माझ्या तोंडाजवळ आणून म्हणाली, " तोंड उघड." मी तोंड उघडल्यावर आईने तो धगधगता निखारा माझ्या दातांच्या मध्ये तोंडात धरला, आणि म्हणे, "आता तीच शिवी पुन्हा दे". मी कसला शिवी देतोय? दात, हिरड्या नी अख्ख्याच तोंडाला धग लागत होती.. आईनी पुन्हा शिव्या दिल्यास निखारा तोंडात सोडण्याची धमकी दिली आणि ती ते खरं करु शकते ह्याची खात्री आम्हालाही होती. पुढे कॉलेजात भरपुर शिव्या द्यायला लागलो, पण तेव्हाही सुरवातीला जीभ अडखळायचीच...
पण आईनी दिलेल्या ह्या मारानेच आयुष्याला वळण लागण्यास मदत झाली हे ही तितकंच खरं..
**************************************************************
पाचवीनंतर मी जवाहर नवोदय विद्यालयात शिकायला, हॉस्टेलला गेलो.. त्यानंतर मात्र आईने मार दिला नाही. मात्र नवोदयात आमच्या काड्या नी खोड्या करण्याला नवे धुमारे फुटले, आणि तिथे मास्तरांनी आम्हाला मस्तपैकी फोडले.. ;-)
..... वो दास्तान फिर कभी !!
वाचन
6671
प्रतिक्रिया
0