मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दलिया इडली आणि दोसा

मितान · · पाककृती
यावेळी दलिया जरा जास्तच आणला गेला. दलियाची खिचडी घरात कोणाला विशेष आवडत नाही. आणि गोड तरी किती करून खाणार. म्हणुन जालावर दलियाच्या रेसिपी शोधताना दलिया इडली सापडली. दोन तीन ठिकाणच्या रेसिपी एकत्र करून तयार झालेली ही दलिया इडली ! ज्यांना तांदूळ कमी खायचा आहे किंवा चालतच नाही अशा खवैय्यांसाठी ही एक मस्त रेसिपी आहे. ट्राय करा ! सामग्री : १ कप दलिया अर्धा कप उडीद किंवा मुगाची डाळ १०-१२ मेथी दाणे अर्धा कप दही जिरे मोहरी, कढीपत्ता, हिंग, तेल वगैरे फोडणीचे साहित्य १ मोठा चमचा चणा डाळ अर्धा छोटा चमचा खाण्याचा सोडा मीठ दलिया आणि डाळ ७-८ तास वेगवेगळे भिजत घाला. दलियामध्ये भिजवताना भरपूर पाणी घाला. कारण ते जास्त शोषले जाते. मेथी दाणेही भिजत घाला. मग एकत्र वाटून घ्या. साधारण नेहमीचे इडलीचे पीठ असते तेवढे बारीक नि पातळ मिश्रण तयार करून घ्या. एका कढईत तेल तापवून जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग नि चणा डाळ घालून फोडणी तयार करा. ती वरच्या मिश्रणात मिसळा. आता त्यात दही, मीठ आणि खायचा सोडा घाला. चांगले फेटून घ्या. इडलीपात्राला तेलाचा हात लावुन त्याच्या इडल्या लावा. १५ मि इडल्या वाफवुन झाल्या की इडलीपात्र न उघडता तसेच बाजूला ठेवा. त्या इडल्या गार झाल्यावर काढायला जास्त सोप्या जातात. मग गरम गरम सांबार आणि चटणीसोबत खायला घ्या. Image removed. Image removed. इडली केली की आई दोसा पण करते याची सवय असल्याने लेकीने आजही दोशाचा हट्ट धरला. मग काय ! याच पिठाचा मस्त दोसा तयार झाला. Image removed. दलियाच्या इडल्या तांदळाच्या इडल्यांएवढ्या फुगत नाहीत आणि गरम खाणार असाल तर थोड्या चिकट पण वाटतात. फर्मेंट करण्यासाठीचा वेळ यात वाचतो. या प्रमाणात साधारण मध्यम आकाराच्या २०-२२ इडल्या होतात.

वाचन 9753 वाचनखूण प्रतिक्रिया 28

रेवती Tue, 02/01/2011 - 01:33
वेगळीच पाकृ आहे. इडली सांबाराचा फोटू भारी आलाय. सध्या आमच्याकडच्या थंडीमुळे इडलीचे पीठ नीट फर्मेंट होत नाहीये. दोश्याचा फोटूही चांगला आलाय. चव माहीत नसल्याने त्याबद्दल काय सांगणार?;)

In reply to by धनंजय

सखी Tue, 02/01/2011 - 20:45
पौष्टिक आहेच आणि जरा वेगळा प्रकारही आहे. नक्की करुन बघेन. स्वाती म्हणाली तसे खीरही बरेच दिवसांपासुन करायची आहे :)

चिंतामणी Tue, 02/01/2011 - 09:06
सकाळी सकाळी असे भन्नाट फोटो टाकुन आमची भूक वाढवल्याबद्दल निषेध. बाकी रेसिपी ट्राय करून बघीतली पाहीजे.

निवेदिता-ताई Tue, 02/01/2011 - 09:43
मस्त आहे नविन प्रकार... रेवती............. सध्या आमच्याकडच्या थंडीमुळे इडलीचे पीठ नीट फर्मेंट होत नाहीये. अग पुर्ण एक दिवस भिजवावे ईडली पिठ...म्हणजे छान फर्मेंट होते....

In reply to by निवेदिता-ताई

रेवती Tue, 02/01/2011 - 18:58
पीठ वाटून अव्हनमध्ये ठेवते आणि अव्हनचा फक्त लाईट चालू ठेवते. त्यामुळे अव्हन किंचित उबदार होतो. यावेळी काही उपयोग झाला नाही. काल -११फॅ तापमान होते. याशिवाय अर्धा कांदा कापून पिठात बुडवून ठेवायचे. त्याचाही काही उपयोग नाही झाला. शिवाय घरही उबदार असतेच. इडल्यांची 'पत्रिका' बघायला हवी.;)

In reply to by रेवती

मितान Tue, 02/01/2011 - 20:39
रेवतीतै, या दलियाच्या इडल्यांना पीठ फर्मेंट होण्याची गरज नाही. वाटून झाले की लगेच करता येतात. बाकी नेहमीच्या इडल्या करायच्या असल्या की मी पीठ वाटून झाल्यावर त्यावर एक प्लास्टिक टाकुन बाहेर थंडीत घालायचे ओव्हरकोट स्टँडऐवजी या भांड्यावर रात्रभर टाकुन ठेवते ;) मस्त फुगते पीठ !

स्वाती दिनेश Tue, 02/01/2011 - 10:38
मस्त दिसत आहेत, नवी पाकृ.. दलियाची गूळ,नारळाचे दूध घालून केलेली खीर म्हणजे विकपॉइंट..खूप म्हणजे, खूपच दिवसात केली नाहीये.. आता तू आठवण करुन दिलीच आहेस तर.. :) स्वाती

डावखुरा Tue, 02/01/2011 - 10:38
मितान एक नवीन प्रकार जिभेसाठी सादर केल्याबद्दल आभार... बाकी आत्ताच आवडीचा नाष्टा झाला नाहीतर मीही चिंतुकाकाशी सहमत ह्या कॅटेगरीत मोडलो असतो.. ;)

In reply to by सूड

मितान Wed, 02/02/2011 - 12:47
सु दे, दलिया म्हणजे गव्हाचा जाड रवा, कण्या, यालाच ' ब्रोकन व्हीट ' असेही म्हणतात. त्याची खीर, शिरा, उप्पीट, खिचडी असे बरेच प्रकार करता येतात. पौष्टीक असतो दलिया.

५० फक्त Tue, 02/01/2011 - 22:48
मितान, इडली म्ह़णजे मी आणि माझा लेक दोघेही कधीही तयार असतो अगदी पोटभर जेवुन सुद्धा, त्यामु़ळे आवडेश. आमच्या घरी इडली हा पदार्थ सकाळ ९ ते रात्री ९ असा फुल डे मेन्यु असतो, त्या दिवशी लागली भुक घाल इड्ली आणि खा. आणि जर चुकुन इडल्या उरल्याच तर दुस-या दिवशी इडली फ्राय आहेच. हर्षद.