‘मेजॉरिटी’ - बहुमतात सामील होण्याचं प्रशिक्षण
आफ्रिकन, मध्यपूर्वेतल्या किंवा दक्षिण अमेरिकेतल्या चित्रपटांमध्ये अनेकदा भारतीय संस्कृतीसारख्या संवेदना किंवा आस्थाविषय दिसतात. त्यामुळेच कधीकधी आपल्या समस्या या त्यांच्याही झालेल्या दिसतात. 'मेजॉरिटी' या तुर्की चित्रपटाच्या बाबतीत असंच झालं. मर्तकान या तरुण मुलाची ही गोष्ट आहे. आपल्या वडिलांच्या बांधकाम व्यवसायात ते त्याला हळूहळू सामील करून घेत आहेत. मित्रांबरोबर भटकणं, गाड्या उडवणं, पब/डिस्कोमध्ये जाऊन यथेच्छ 'एन्जॉय' करणं असा त्याचा दिनक्रम आहे. मर्तकान एका फास्ट-फूड रेस्टॉरंटमधल्या वेट्रेसच्या प्रेमात पडतो तेव्हा यात बदल घडतो. वडिलांना त्याचं या मुलीमध्ये अडकणं पसंत पडत नाही. एका बाजूला वडिलांचा रेटा आणि दुसर्या बाजूला प्रेम अशा द्वंद्वात सापडलेल्या मर्तकानचं काय होतं हे चित्रपटात दाखवलेलं आहे. तसं म्हटलं तर हे अगदी 'दो प्रेमी और बेदर्द जमाना' छाप तद्दन 'हिंदी पिच्चर'चं कथानक वाटतं. पण दिग्दर्शक त्यात समकालीन अस्तित्वाचे असे काही रंग भरतो की चित्रपट 'तद्दन' रहात नाही.
असं आयुष्य घडवत असताना वडील गप्पा मात्र मोठ्यामोठ्या करत असतात. आपण कसे देशभक्त मुसलमान आहोत; सैनिक देशाची सेवा करतात; तूही तुझी सक्तीची सैनिकी सेवा लवकरात लवकर स्वीकार, असे उपदेशाचे डोस ते एकीकडे मुलाला पाजत असतात आणि त्याच वेळी स्वतःच्या भ्रष्ट वर्तनातून ते मुलाला आपल्याच बेपर्वा, बेमुर्वतखोर मुशीत घडवत असतात. सोशिक आई मात्र या सर्वात भकास होताना दिसते. एकदा रात्री उशिरा मर्तकानला आई स्वयंपाकघरात एकटीच रडताना दिसते. 'काय झालं' म्हणून तो तिला विचारतो, तेव्हा ती म्हणते की माझा पोटचा मुलगा असा (असंवेदनशील, बेपर्वा) कसा झाला? माझ्या आयुष्यातले पुरुष असे का आहेत? म्हणून मी रडतेय. तर यावर मर्तकान ‘एवढ्या रात्री तुला दुसरं काही सुचत नाही का; बोअर करू नकोस’ अशा पध्दतीचं काहीतरी क्रूर वक्तव्य करून बापाच्या पावलावर पाऊल टाकण्याची त्याची सज्जता दाखवून देतो.
पण आतून आपलं काहीतरी चुकतं आहे हे मर्तकानलाही कळत असतं. अनेकदा आपल्या खोलीत एकटाच अंधारात बसून तो हमसाहमशी रडताना दिसतो.
वडिलोपार्जित आखून दिलेल्या रेषेत जगणं खूप सोपं असतं, पण स्वतंत्र वृत्तीनं, स्वतःचे निर्णय स्वतः घेत गुलसारखं आयुष्य घडवणं कठीण असतं. यापैकी कशाची निवड मर्तकान करतो हे सांगून चित्रपट पाहण्याची मजा घालवत नाही. एवढं मात्र वाटतं की अशा तिढ्यात सापडलेले तरुण-तरुणी भारतातही नक्की आढळतात. त्याशिवाय चित्रपटात जाणीवपूर्वक केलेली एक गोष्ट म्हणजे व्यक्तिगत आणि राजकीय (पर्सनल आणि पॉलिटिकल) यांची घातलेली सांगड. अनेकदा टीव्हीवर चाललेल्या बातम्यांत राजकीय संदर्भ पखरलेले आहेत. आणि ते प्रसंगानुरूपही आहेत. एका प्रसंगात आई म्हणते की मला तुम्ही घरकामात मदत करा असं मी सांगत नाही, पण घरी आल्यावर किमान माझी विचारपूस करायला तुम्हाला कष्ट का पडतात? मागे टीव्हीवर कुणीतरी म्हणत असतं की अमुकतमुक पक्षाची राजकीय मतं तुम्हाला कदाचित पटत नसतील, पण त्यांच्या मागण्या लोकशाहीला अनुसरून आहेत यात संशय नाही. देशप्रेमाच्या उपदेशाच्या पार्श्वभूमीवर ऐकू येणारी एक बातमी ही तुर्कांनी आर्मेनिअन वंशसंहार केला त्याच्या ७५व्या स्मृतिदिनानिमित्त अमेरिकेत जो ठराव केला जाणार होता त्याविरोधातल्या फिलिबस्टरविषयीची असते.
या पध्दतीनं देव-देश-धर्मनिष्ठा, कुटुंबव्यवस्था, व्यक्तिगत जिव्हाळा यातला बेगडीपणा विविध पातळ्यांवर उघडा करत एका समाजव्यवस्थेचं प्रतिबिंब आपल्याला दाखवलं जातं. यात चारचौघांसारखं जगून 'बहुमतात' राहणं हाच एक निसरडा प्रवास असतो आणि त्याचं प्रशिक्षण द्यायला पितृसत्ताक व्यवस्था सदैव तत्पर असते.
वाचने
5709
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
आणि चित्रपटातील स्थिरचित्रे बघता वातावरणनिर्मितीसाठी निळ्या रंगाचा प्रभावी वापर केलेले दिसत आहे.
चांगली ओळख. धन्यवाद.
खाली कोणीतरी चित्रपटाच्या नावाबद्दल विचारलेलं आहे. मर्तकान बहूसंख्य असलेल्या तर्की मुस्लिम समाजाचा आहे तर गुल अल्पसंख्यांक कुर्द. चित्रपटाच्या नावामुळे बहूसंख्येमुळे येणारी सुलभ प्रवाहपतितता (पारखे झालेले व्यक्तिस्वातंत्र्य) आणि अल्पसंख्य असल्याने स्विकारलेली खडतर स्वतंत्रता हा विरोधाभासही अधोरेखित करायचा असावा असे वाटते.
थोडा फार रणबीर कपुरच्या 'वेक अप सिड' सारखा असावा अस वाटतय.
In reply to छान चित्रपटप ओळख. by गणपा
हे चीत्रपट तरळत होते
या चीत्रपटाचे नाव मेजॉरिटी असे असण्याचे काही वीशेश कारण/संदर्भ ?
अजून एक उत्तम चित्रपटओळख. जाणकाराच्या नजरेतून चित्रपट समजून घेण्याचा आनंद व्यक्त करायचा का ही कलाकृती बघितलेली नाही याचं दु:ख?
आवडली. कथानक वाचताना ओरहान पामुकच्या लेखनाची आठवण येत होती. युरोप-आशियाच्या संस्कृती-देवाणघेवाणीत मध्यभागी सापडलेला देश; अर्मेनियन वंशसंहाराला नाकारणारा, 'फॉल ऑफ कॉन्स्टँटिनोपल' या संज्ञेला आक्षेप घेणारा आक्रमक, राष्ट्रवादी वर्ग या पार्श्वभूमीवर मर्तकानचं कुटुंब आणि गुलमधला फरक नजरेत भरतो.
अवांतर - बादरायण होईल कदाचित - पण शेवटी बहुमतापुढे मान तुकवणं (तसा शेवट असल्यास), एकंदरीत परात्मभाव (एलियनेशन) हे कोसलाची आठवण करून देणारं. ("मग आपणच खुंटीवर उभं येऊन राहिलेलं काय वाईट?")
पाहीला पाहीजे.
मस्त आणि विस्तृत परिक्षण.
चित्रपट पाहण्याचा नक्की प्रयत्न करेन.
आफ्रिकन, मध्यपूर्वेतल्या किंवा दक्षिण अमेरिकेतल्या चित्रपटांमध्ये अनेकदा भारतीय संस्कृतीसारख्या संवेदना किंवा आस्थाविषय दिसतात. हे वाक्य पश्चिम युरोप आणि काही अमेरिकेचा भाग सोडला तर सर्वत्रच लागू आहे असे वाटते.
इनो घेतो आहे!!!
_/\_
छान ओळख.
गणपानी म्हणल्याप्रमाणे 'वेक अप सिड'ची आठवण झालीच.
फार फार सुरेख ओळख.
तिन्ही सिनेमे नोंदवून ठेवले आहेत. संधी मिळाली की लगेच पाहणार.
नेहमीसारखे खास चिंजं परीक्षण आणि तेही असे की वाचणार्याला वाटावे की कोणत्याही परिस्थितीत या चित्रपटाचा आनंद घ्यावा. अगदी खास भारतीय मुशीतील "खानदानकी इज्जत" टाईपचे कथानक दिसते, शिवाय त्यात 'जातपातीच्या दृष्टीने आपण मोठे ते कनिष्ठ...' हा सूरही नायकाच्या बापाच्या शेर्यात डोकावतोच.
जगभरातील मध्यमवर्गीयांच्या ललाटी अटळ जे लिहिले आहे ते घडतेच, म्हणजे मागील पानावरून पुढे चालू...."काहीतरी क्रूर वक्तव्य करून बापाच्या पावलावर पाऊल टाकण्याची त्याची सज्जता दाखवून देतो...." लेखातील हे वाक्यदेखील चित्रपटाचे 'मेजॉरिटी' या शिर्षकाची यथार्थता पटविते.
इन्द्रा
भारतासरख्या देशात हा चित्रपट कुठे मिळेल.
चित्रपटाच्या लेखकाने/दिग्दर्शकाने अतिशय नाजूक विषय हाताळला आहे.
विषय मनाला भिडला - एकेक सुटी सुटी संवेदनशील व्यक्ती समूहात वावरताना निर्ढावलेली होत जाते आणि एक बेमुर्वतखोर 'बहुसंख्य समाज' निर्माण होतो. (त्याचे पितृसत्ताक असणे हा एक योगायोग आहे की मातृसत्ताक समाज खरोखरीच मातृहृदयाचा झाला असता?)
या पध्दतीनं देव-देश-धर्मनिष्ठा, कुटुंबव्यवस्था, व्यक्तिगत जिव्हाळा यातला बेगडीपणा विविध पातळ्यांवर उघडा करत एका समाजव्यवस्थेचं प्रतिबिंब आपल्याला दाखवलं जातं. यात चारचौघांसारखं जगून 'बहुमतात' राहणं हाच एक निसरडा प्रवास असतो आणि त्याचं प्रशिक्षण द्यायला पितृसत्ताक व्यवस्था सदैव तत्पर असते.- वा,वा ! खूपच दर्जेदार चित्रपट परीक्षण. चित्रपट कुठे पहायला मिळेल?
In reply to वा वा by विसुनाना
चिंतातूर जंतू यांचे पुणे चित्रपट महोत्सवातील चित्रपटांच्या परीक्षणाखातर हार्दिक धन्यवाद.
परीक्षण आवडले. नोंद करुन ठेवली आहे. धन्यवाद.
सर्वप्रथम , या सर्व चित्रपटांच्या करून दिलेल्या सुरेख ओळखीबद्दल आभार. ( म्हणजे हा प्रतिसाद जंतुंच्या सर्व चित्रपटविषयक धाग्याना लागू !)
मेजॉरिटी, पीअर प्रेशर , ट्रेंड्स , प्रवाहपतित्व , वेगवेगळ्या स्वरूपाचे साचे, त्या साच्यात स्वतःला बसवण्याची खटपट ही सगळी आधुनिक जगातली कंपल्शन्स आहेत. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरच काय, जवळजवळ प्रत्येक दिवशी "आपल्याला काय वाटते ते करावे की जनरीत पाळावी" , "नैतिकदृष्ट्या योग्य ते करावे की जनरीत पाळावी" , "आपल्या किंवा आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींच्या आयुष्यातल्या सर्व टप्प्यांवर त्या त्या व्यक्तीला हवी ती दिशा घेऊ द्यावी की जनरीत पाळावी" याचे छोट्यामोठ्या पातळीवरचे निर्णय - कधीकधी आपल्याही नकळत - आपण घेत असतो. ही कंपल्शन्स हाच चित्रपटाचा विषय होऊ शकतो याबद्दल कौतुक वाटते. या थीमची चित्रपटमाध्यमाद्वारे करायची हाताळणी कशी असेल याबद्दल कुतुहल वाटते आहे.
तुमच्या बहुतेक समीक्षणांतून चित्रपटाचं सार गवसल्याचं जाणवतं. निदान काय प्रश्न मांडले आहेत ते तरी. मात्र या ओळखीतून मला तरी चित्रपटाचं नाव मेजॉरिटी का असावं याचा अंदाज आला नाही. सर्वसाधारण यशस्वी माणसाचं (बापाचं) आयुष्य कसं काहीसं दुटप्पी असतं व त्याच्या मुलाचं कसं गोंधळलेलं असतं असा काहीसा संदेश आहे का? म्हणजे आदल्या पीढीने तत्वांना औष्ठ्यसेवा देऊन प्रत्यक्षात स्वार्थी कठोरपणाने तत्वांना मुरड घालून यश मिळवल्यामुळे पुढच्या पीढीत दिशाहीनता, चंगळवादी प्रवृत्ती येते का?
In reply to प्रश्न by राजेश घासकडवी
या ओळखीतून मला तरी चित्रपटाचं नाव मेजॉरिटी का असावं याचा अंदाज आला नाही. सर्वसाधारण यशस्वी माणसाचं (बापाचं) आयुष्य कसं काहीसं दुटप्पी असतं व त्याच्या मुलाचं कसं गोंधळलेलं असतं असा काहीसा संदेश आहे का? म्हणजे आदल्या पीढीने तत्वांना औष्ठ्यसेवा देऊन प्रत्यक्षात स्वार्थी कठोरपणाने तत्वांना मुरड घालून यश मिळवल्यामुळे पुढच्या पीढीत दिशाहीनता, चंगळवादी प्रवृत्ती येते का?सर्वांसारखं होणं हा 'पाथ ऑफ लीस्ट रेझिस्टन्स' असतो. काही केलं नाही तर ते आपोआप होतं आणि मग बहुमतात असल्याचे फायदे आयुष्यभर चापता येतात. चित्रपटात हे विविध पध्दतीनं दिसतं. मित्रांबरोबर तासनतास काही न करता बसणं, डिस्कोमध्ये नाचणं या सर्वांत एक भकास रितेपण आहे आणि कळपातलं व्यक्तीचं हरवून जाणं आहे. तसंच वडिलांनी आखून दिलेल्या 'करिअर'चं आहे. एका प्रसंगात मर्तकान बांधकामाची देखरेख करताना कामगारांवर खेकसतो कारण त्याच्या लक्षात येतं की कामाचा दर्जा सुमार आहे. पण हा इतका का चिडला आहे ते कामगारांना कळतच नाही. निम्न दर्जाची सामग्री वापरून स्वस्तात उभी केलेली इमारत काय दर्जाची असणार? ती त्याच्या वडिलांची बांधकामाची चाकोरी आहे. तशीच त्याच्या वडिलांची संगोपन पध्दतीही आहे. अशा संगोपनानं मुलगा व्यक्तिमत्वहीन आणि चारचौघांसारखाच होणार. गुल येण्यानं याला छेद जातो आणि काही वेगळ्या शक्यता मर्तकानला दिसू लागतात. पण त्यासाठी चालत आलेलं सर्व काही 'जैसे थे' ठेवू पहाणार्या पितृसत्ताक पध्दतीला आव्हान द्यावं लागतं, सामोरं जावं लागतं आणि होणारे परिणाम झेलावे लागतात.
In reply to सार, शीर्षक वगैरे by चिंतातुर जंतू
आता चित्र जास्त सुस्पष्ट झालं. या आपल्या विवेचनाच्या पार्श्वभूमीवर परत एकदा परीक्षण वाचलं आणि जिस्ट कळलं. आपले समर्पक, सुस्पष्ट उत्तराबद्दल आणि घासकडवी यांचे प्रश्नाबद्दल आभार.
मस्त ओळख करून दिलीत.
बाकी ‘मेजॉरिटी’ - बहुमतात सामील होण्याचं प्रशिक्षण यावरून असं वाट्तंय की याचा शेवट कदाचित मर्तकानने वडीलांचाच मार्ग सरधोपटपणे स्वीकारण्यात झालेला असावा..
वा