मैसूर भजी
खरंतर मी मैसूर भजी पुर्वी कधी खाल्ली नाही आणि मला ही मैसूर भजी आहेत की नाही ते माहित नाही. पण बायको ह्याला मैसूर भजी म्हणाली, मग माझी काय मजाल त्याला ना म्हणायची. शिवाय तिने हिच पाककृती बटाटावडा म्हणून सांगितली असती तरी मी काही म्हणालो नसतो (अगदी सटलपणे निर्लज्ज व्हायची प्रॅक्टीस करतोय!).
वेल, काल ऑफिसमधून घरी परत येतो तोच खमंग वास आला आणि कळलं बायको ऑफिसमधून निघताना फोन कर का म्हणाली ते. घरात आलो आणि गरमगरम खुसखुशीत भज्यांची प्लेट पुढे आली. भजी फारच खमंग झाली होती, म्हणून इथे शेअर करतोय (अर्थात बायकोच्या परवानगीनेच).
तर हि मैसूर भजी कशी करायची म्हणे? खालचं साहित्य घरी आहे की नाही ते बघा (हे नवशिक्यांसाठी किंवा आयटीतल्या बायकांसाठी... नियमीत घरी चांगलं-चुंगलं करणार्या गृहिणींसाठी नाही).... सगळं अंदाजे किंवा आवडेल तसं घ्या.
मैदा
दही
हिरवी मिरची
आलं
लसून
कांदा
थोडंसं जीरं
मीठ
अगदी चिमूट्-अर्धी चिमूट खाण्याचा सोडा
आणि तळण्यासाठी तेल
दही आंबट असेल तर सगळं वेळेवर केलंत तरी चालेल. पण दही जास्तं आंबट नसेल तर दही आणि मैदा ३-४ तास आधी साधारण भज्यांसाठी लगतो तसा भिजवून ठेवा. भजी तळायच्या आधी ह्या भिजवलेल्या पिठामधे लांबट चिरलेला कांदा, लसून, आलं, हिरवी मिरची कुटून घाला. चवीनुसार मीठ आणि थोडसं जीरं घाला. पिठ चांगल एकत्र करुन घ्या. अगदी चिमूट्-अर्धी चुमूट खाण्याचा सोडा घालून गरम तेलात भजी तळायला घ्या. गरम गरम भजी टोमॅटो सॉस किंवा चटणी बरोबर फस्तं करा.
बायकोने ह्या भज्यांबरोबर दुधीची चटणी केली होती. ह्या भज्यांबरोबर म्हणून नव्हती केली, पण भजी ह्या चटणी बरोबर छान लागली. चटणी करण्या साठी दुधी आणि १-२ हिरव्या मिरच्या एक अगदी छोटा चमचा तेलात १-२ मिनीटे परतून वाफवून घ्या. दुधी वाफवून थंड होऊ द्या. त्यानंतर मिक्सरमधून काढून घेताना त्यात थोडं दही, दाण्याचं कुट, मीठ आणि लसून घाला. मिक्स्र मधून काढून घेतल्यावर ह्या चटणीमधे वरून मोहरी आणि कढीपत्याची फोडणी घाला. चटणी तयार!
भज्यांसाठी टिप १ - भजी थोडीशी आंबूस छान लागतात. दह्यात भिजवल्यावरही आंबटपणा नाही आला तर त्या थोडं लिंबू पिळा.
भज्यांसाठी टिप २ - खाण्याचा सोडा नाही घातला तरी चालेल. पण सोडा जास्तं झाला तर भजी तेलकट होतात.
अवांतर माहिती - बायको आयटीतली असूनही अगदी सुगरण आहे!
-(सुग्रीव) अनामिक
| From Random |
वाचने
11490
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
वेगळी पाकृ. विषेशतः दुध्याच्या चटणी (?) बरोबर खाण्याची कल्पना (पाकृसुध्दा) आवडली.
अवांतर माहिती - बायको आयटीतली असूनही अगदी सुगरण आहे!
ह्या वाक्यासाठी विषेश अभीनंदन.
[(?) टाकण्याचे कारण की त्याल भरीत म्हणले पाहीजे असे मला वाटते]
मैद्याची भजी? हम्म...कोणी केली तर मला बोलवा...एखाद - दोन चवीला खाईन म्हणते.
कमावती (आय टी- भरपूर पगार ) आणि सुगरण बायको मिळाल्याबद्दल अभिनंदन.
करून पाहीन.
(प्रयोगशील)बेसनलाडू
In reply to मस्त! by बेसनलाडू
असेच म्हणतो
(प्रयोगशील) रव्या लाडू.
पाकृ मस्त आणि पंचेसही!
... सगळं अंदाजे किंवा आवडेल तसं घ्या.माझी कोणतीही पाकृ अशीच असते.
वाह रे अनामिका हा भज्यांच्या आणि चटणीचा प्रकार नव्यानेच ऐकतोय.
अवांतर माहिती : भलताच नशिबवान हो तु ;)
मी पण लगेच केली. झकास झाली आणि चक्क दुध्याची चटणीही बेश्ट्म बेश्ट.
वाह वाह वाह !
ह्या रविवारी करुन बघतोच हो शेठ. म्हणजे फक्त भजी ;) चटणी नाही.
साला हा डॉन्या घराशेजारी राहायला आल्यापासून हे असे जाहिरपणे लिहिणे म्हणजे रिस्कच आहे म्हणा.
अनामिक त्याला दुध्याच रायत म्हणतात.
पाकृ आवडली.
In reply to अनामिक त्याला दुध्याच रायत by जागु
त्याला रायतं म्हणा, चटणी म्हणा, की अजून काही... लागतं मस्तं. मलातर हे दुधीपासून केलंय ते पण कळलं नाही.
In reply to त्याला रायतं म्हणा, चटणी by अनामिक
एखादी भाजी शिजवुन त्यात दही आणि इतर पदार्थ मिसळतात त्याला भरीत किंवा रायते म्हणतात.
माझी आवडती भजी.
या भज्यांना 'मैसुर बोंडा ' ( उच्चार अर्थात - मयसुर्र बोण्ड्डा ! ) म्हणतात. आणि हा बोंडा डाळं आणि नारळाच्या चटणीबरोबर खातात.
नेक्ष्ट टैम दुधीच्या रायत्यासोबत नक्की !!
In reply to माझी आवडती भजी. या भज्यांना by मितान
In reply to + १ by मेघवेडा
बटाटावड्याला उत्तरेत (की दक्षिणेत?) आलुबोंडा म्हणतात. आम्ही माझ्या घरी सुद्धा बटाटावड्याला आलुबोंडाच म्हणतो. हे बोंडे आकाराने लाडूसारखे गोल असतात. माझ्या बायकोने दिलेल्या माहिती नुसार तिने बघीतलेली/खाल्लेली मैसूर भजी गोल बोंड्यासारखी होती. पण घरी केलेली भजी त्यात घातलेल्या लांब कांद्यामुळे तशी झाली नाहीत. मितान म्हणते त्याप्रमाणे ह्याला मैसूर बोंडे म्हणायला हरकत नाही.
In reply to आलुबोंडा by अनामिक
मध्यप्रदेश छत्तीसगड ह्या भागात देखील आलुबोंडाच म्हणतात.
In reply to मध्यप्रदेश छत्तीसगड ह्या by परिकथेतील राजकुमार
द्राविडी लोक तर नारळाला बोंडा म्हणतात.
In reply to द्राविडी लोक तर नारळाला बोंडा by मेघवेडा
तामिळ लोक नारळाला टोंगा म्हणतात.
In reply to मध्यप्रदेश छत्तीसगड ह्या by परिकथेतील राजकुमार
ही असली संधी साधुन लोक लगेचच जगप्रवासाचे दाखले देतात.
परा तु मध्यप्रदेश छत्तीसगड काय घेउन बसलास? :(
In reply to अमेरीकेत काय म्हणतात? by चिंतामणी
हा पर्या काय छतीसगडमधे बंदुकी नाचवत आणि हमार तुमार करत हैद्राबादी भजी खात होता काय?
पर्या, ह.घे. हे. वे. सां. न. ल. ;)
- वाटी पांडे..
छान आहे,
पहिल्यांदाच ऐकली
धन्यवाद
पाकृ माझ्यासाठी नविन आहे.
दुधीची चटणी तर ग्रेटच!
आयटीतील सुगरण पत्नी मिळाल्याबद्दल आपले अभिनंदन!
आता आपण त्यांना आम्रखंड करून द्यावयास हवे.
मस्त रे!!
दुधीचा रायता आणि मैसूर्र भज्जी ....
वेगळी पाकृ.