बेल्जियन वाडीवर एक दुपार
हसतमुख आणि प्रसन्न दिसणार्या या कुटुंबाकडे बघून परकं वाटलं नाही. दोघांनीही पायात रबरी बूट घातलेले होते. विटक्या पँट आणि मळक्या स्वेटरवर गवताच्या काड्या चिटकलेल्या होत्या. दोघंही लाजरेबुजरेच दिसत होते. कोणीतरी परदेशी पाहुणे शेतावर येण्याची पहिलीच वेळ असल्याचे जाणवत होते. लुकने ओळख झाल्याच्या दुसर्या मिनिटाला गाईडच्या भूमिकेत प्रवेश केला. हवापाण्याच्या गप्पा नाहीत, की हापाप कपाचा आग्रह नाही, की डेर्यातले पाणी नाही!
रोसिता आणि इंगं बर्याच दिवसांनी भेटल्याने गप्पा मारू लागल्या. 'रीतीप्रमाणे' लुक पुरुषांबरोबर पुढे गेला आणि मागे आम्ही तीन बायका रमतगमत चालू लागलो.
समोर एक गोडाऊन सारखे बांधकाम दिसत होते. तो होता गोठा. गाय स्पेशल. त्याला लागून दोन छोट्या खोल्या. तिथे दूध काढण्याची जागा. मग एक मोठे पार्किंग. त्यात अवाढव्य आकाराचे दोन ट्रॅक्टर, खत फवारणी यंत्र, पेरणी यंत्र, गवत कापायचे यंत्र, नि काय अन् काय. त्याला लागून या कुटुंबाची रहाण्याची जागा. त्याच्या डावीकडे अजून दोन प्रचंड गोठे. एक वासरू स्पेशल आणि एक गाभण गाय स्पेशल. यात एका बाजूला घोडे. मागच्या बाजूला चौथा गोठा - बैल स्पेशल! एकूणच आम्ही शेतकरी + गवळी मित्राकडे आलो होतो तर!
पहिल्या गोठ्यात गेलो. लुक माहिती सांगू लागला. त्याच्याकडे एकूण ८० गायी, १०० वासरं, आणि २० बैल आहेत. सर्वांच्या कानाला त्यांचा बिल्लानंबर टोचलेला. आपल्यासारखी हरणी, ढवळी, चांदी, बुधी, मंगळी, कपिला, लाल्या, पवळ्या असली नावांची भानगडच नाही. एका रांगेत नीट बांधलेल्या त्या ८० गायी - सगळ्या सारख्याच दिसत होत्या मला! पुढ्यात टाकलेले गवत चघळत निवांतपणे मनुष्यप्राण्याचे निरीक्षण चालू होते. हा गोठा हिवाळ्यात गरम करतात. गायींच्या डोक्यावर आढ्याला कसल्याच्या झाडाच्या फांद्या टांगल्या होत्या. सध्या कुठल्यातरी त्वचारोगाची साथ चालू आहे म्हणे. त्या पाल्याने ते इन्फेक्शन वाढत नाही.
अजून एक माहिती मिळाली ती अशी - एक गाय दिवसाला ३० ते ४० लीटर दूध देते. ते एका कंटेनरमध्ये साठवतात.
दर तीन दिवसांनी ते विक्रीला पाठवतात. ३० युरो सेंट प्रतिलीटर असा सध्या भाव मिळतो. (आम्ही दूध घेताना ते ६८ ते ७० युरो सेंट प्रतिलीटर मिळते). या गायी वर्षाचे ५ महिने शेतात जाऊन चरतात. इतर महिने गोठ्यातच बांधलेल्या असतात. जनावरांसाठी लागणारा चारा शेतातच पिकवितात. साधारण २ फूट वाढणारं गवत असतं. ते कापून, बारीक करून, प्रेस करून त्याच्या पेंड्या करून ठेवतात. वर्षातून ४ वेळा ही गवतकापणी होते. वर्षातून एक पिक मक्याचं. मका तोडून उरलेली धांडं ट्रॅक्टरखाली दाबून, चुरून गवतात मिसळायचे. त्याचे पाऊस व बर्फात रक्षण करायचे. हे गुरांचं हिवाळ्याचं खाद्य.
खूप साध्या लाजाळू लुकच्या मालकीची सव्वादोनशे एकर शेती आहे हे कळाल्यावर आ वासून बघतच राहिलो आम्ही. अगदी ५०-६० एकर शेती असणार्या शेतकर्यांचा ५-६ गडी, २०-२५ बाया, ४ बैलजोड्या, १०-१२ गायी यांच्या जोरावर चालणारी 'जमीनदारी' आपल्याकडे खूप अनुभवलेली आहे. इथे एवढं शेत आणि गुरं केवळ ही दोघं पती-पत्नी आणि लुकचे ७२ वर्षांचे वडिल सांभाळतात हे ऐकून थक्क झाले.
रोसिता आणि इंगंच्या गप्पांमध्ये मीही हळूच सामील झाले. रोसिताला इंग्रजी येत नाही. मला इंगंच्या वेगळ्या उच्चारांमुळे एक एक शब्द हळू हळू समजवून घेत बोलावे लागत होते. मला तिने विचारले की, तुझ्याकडे आहेत का गायी? मी आपल्याकडच्या सिस्टीमची माहिती दिली. बैल शेतात काम करतात हे ऐकून ती म्हणाली, क? तुम्ही खात नाही? मग शाकाहारावर एक भाषण दिलं!
बोलता बोलता वासरांच्या गोठ्यात आलो. २ दिवसांची २ वासरं होती.
एकूण एक महिना ते एक वर्ष वयाची ६० वसरं होती. पण कालवडी एकीकडे नि गोर्हे एकीकडे. इंगं म्हणाली - मला गोर्हे झालेले आवडत नाहीत. का ते ५ मिनिटांत कळणार होते.
६ गाभण गायी ज्या अठवडाभरात एक्स्पेक्टेड होत्या, त्या वेगळ्या बांधलेल्या होत्या. शेजारीच उत्तम जातीचे ४ घोडे तबेल्यात होते. शेतावर रपेट मारण्यासाठी हे घोडे.
फॉन्सचा - लुकच्या वडिलांचा - या घोड्यांवर भारी जीव. स्वतः जातीने या घोड्यांची निगा राखतात. आम्ही ते बघत असताना ठेंगणीशी, गोड मार्गारेटआजी आली. मला डच येतं समजल्यावर तिचा बोलण्याचा धबधबा कोसळू लागला. त्यातले केवळ काही शब्दच मला कळत होते. पण एवढे कळाले की ती आपल्या नवर्याचे नि मुलाचे खूप कौतुक करत होती.
सूनबाई मात्र सासूबाईंसमोर गप्प झाली. होती. "जाण्यापूर्वी माझ्याघरी नक्की या हं" असे आजीने म्हटल्यावर प्रकाश पडला. इथेही मातीच्या चुली!
आता आम्ही बैलांच्या गोठ्याकडे निघालो. तिथे जे दृष्य दिसले ते फारच अस्वस्थ करणारे होते. २०-२५ बैल लोखंडी जाडजूड कुंपणाच्या आत बांधलेले होते. अस्ताव्यस्त गवत पसरलेले. घोंगावणार्या माश्या आणि बैलांसाठी ठेवलेल्या कुठल्यातरी 'पौष्टिक' खाद्याचा नकोनकोसा वास. सव्वा ते दीड वर्षाचे गोर्हे इथे आणून बांधतात ते बाहेर काढतच नाहीत. त्याला वावरायला १० बाय १५ ची जागा असते. तेवढीच काय ती हालचाल. दोन वर्षांचा होईपर्यंत त्याला चरबी वाढवणारे खाद्य खाऊ घालतात. ८०० ते १००० किलोचा बैल कापण्यासाठी विकायला पाठवतात. हे बैल रग न जिरल्याने प्रचंड आक्रमक असतात. त्यामुळे गवत टाकण्यापासून गोठा साफ करण्यापर्यंतची सगळी कामं यंत्राने १० फूट अंतरावरून केली जातात. 'मला गोर्हे झालेले आवडत नाही' या वाक्याचा अर्थ आता लागला.
आम्ही अधूनमधून त्यांच्या भाषेत आपल्याकडील शेतीची माहिती देत होतो. अडेल तिथे पॅट्रिक दुभाषा म्हणून होताच.
खाणं संपवून निघालो. आजीबाईंनी हातात एकेक चॉकलेट ठेवले. बाहेर आलो तेव्हा लुक आणि इंगं आपल्या कामाला लागले होते. दूध काढण्याचे काम चालू होते.
In reply to अतिशय महितीपुर्ण आणी चांगला by इंटरनेटस्नेही
In reply to असेच म्हणतो by बेसनलाडू
In reply to +१ by मुक्तसुनीत
In reply to मितानकडून अजून एक सुंदर लेख! by अनामिक
In reply to दुध साठवायचे कंटेनर अल्फा by पाषाणभेद
In reply to >>दुध साठवायचे कंटेनर अल्फा by नितिन थत्ते
In reply to दुध साठवायचे कंटेनर अल्फा by पाषाणभेद
In reply to दुध साठवायचे कंटेनर अल्फा by पाषाणभेद
In reply to छान by सुनील
In reply to छान by नंदन
In reply to नंदोबाशी सहमत आहे.. by प्रभो
In reply to वरच्या दोघांशीही सहमत by निखिल देशपांडे
In reply to वरच्या तिघांशीही by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to बेष्टंच ब्वॉ!!! मितान यांनी by बिपिन कार्यकर्ते
In reply to +१ by ब्रिटिश टिंग्या
In reply to बेष्टंच ब्वॉ!!! मितान यांनी by बिपिन कार्यकर्ते
In reply to सर्व वाचक प्रतिसादकांचे by मितान
In reply to नुसते म्हणू नकोस, लिही. by यशोधरा
In reply to वा! मस्त सफर.. फारच छान by रुपी
अतिशय महितीपुर्ण आणी चांगला