मागे वळून पाहताना.. २) मु. पो. घोरावाडी
लेखनप्रकार
आधीच्या भागांचे दुवे :
मागे वळून पाहताना.. १) डोळसोबाची आळी
-------------------------------------------------------------------------
तळेगाव रेल्वे स्टेशन तसं आमच्या घरापासून बरेच लांब होते त्यामुळे रोज शाळेत जाताना गाडी पकडायला घोरावाडीला जात असू. त्यावेळी घोरावाडी स्टेशनाला प्लॅटफॉर्म तर नव्हताच आणि त्यात पुन्हा एक रुळ खाली तर एक वर! खाली जाण्यासाठी जिना नाही, उड्या मारुन, रुळ क्रॉस करुन जावे लागत असे. गाडी अगदी एखादे मिनिटच थांबत असे. पाऊस,सोसाट्याचा वारा अशामध्ये गाडीचे दार उघडून चढणे जिकिरीचे होत असे. पावसाळ्यात चिखल असेच. घरापासून घोरावाडी स्टेशनापर्यंत जायला १५,२० मिनिटे सहज लागत. कच्चा रस्ता,दोन्ही बाजूला शेती होती. तेथे तर पावसात भरपूर चिखल! सकाळी ९.३० ची गाडी गाठायची असे, ती चुकली तर शाळा बुडलीच! पावसाळ्यात गाडी हमखास लेट होत असे आणि साहजिकच मग शाळेला उशीर होत असे. पाऊस,चिखल,दगदग, उशीर असे अनेक त्रास असले तरी आम्हाला घोरावाडीहून शिवाजीनगर पर्यंतचा प्रवास आवडे. एकतर आम्ही सख्खीचुलत ४/५ भावंडे एकत्र प्रवास करत असू आणि दुसरे म्हणजे आमच्याबरोबर अप्पा दांडेकर असत. ते गोष्टीवेल्हाळ होते. तासाभराच्या त्या प्रवासात ते अनेक कथा रंगवून सांगत. एकदा आंतरशालेय नृत्यस्पर्धेसाठी त्यांनी आमच्या शाळेकरता एक शेतकरीगीत लिहिले होते भलरीगडी की असेच काहीसे त्या गाण्याचे बोल होते आणि तो नाच बसवण्यासाठी त्यांनी बराच पुढाकार घेतलेला आठवतो आहे. अर्थात त्या नाचाला पहिले बक्षिस मिळाले हे वेगळे सांगायला नकोच!
सकाळी शाळेत जाण्यापूर्वी जेवून, पोळीभाजीचा डबा घेऊन आम्ही निघत असू. घरचा गहू आणि जोंधळा येत असल्याने घरात सकाळी जेवणात भात,आमटी,पोळी भाजी आणि डब्यात पोळी आणि एखादी फळभाजी तर रात्रीच्या जेवणात भाकरी,पालेभाजी, तूरडाळीची आमटी, कोशिंबिर ,भात, दही असे. घर मोठे आणि दहा माणसे! ते तिमजली घर झाडायचे, शेणाने सारवायचे म्हणजे मोठाच व्याप असे. प्रत्येकाने एकेक खोली झाडायची असे. आमच्याकडे तेव्हा घरात नळ नव्हते. त्यामुळे पाणी भरायचे मोठेच काम असे. वापरायचे पाणी बाहेर असलेल्या नळावरुन भरावे लागत असे. प्रत्येकाने पाच कळशा पाणी भरायचा नियम केला होता. पिण्याचे पाणी आमचेच एक फडणीसांकडून घेतलेले घर होते तेथल्या नळावरुन आणत असू. त्यावेळी तेथे शेजारी सोनारांची वस्ती होती. एक कळशी भरली की दुसरी कळशी किवा घागर नळाला लावून पहिली ओतायला जात असू आणि कधी कधी परत येईपर्यंत घागर भरुन वाहू लागे, मग तेथे असणार्या कोणी तरी ती काढून ठेवत. ती घागर न आणता त्यांच्यापैकीच कोणीतरी ती आपल्यात ओतून घेई आणि पुन्हा घागर घासून नळाखाली वाहून देऊन पाणी भरुन ती आणत असू. आता आठवले तरी हसू येते पण तेव्हा ही शिवाशिव, सोवळेओवळे सगळीकडेच असे आणि त्यात कोणाला काही कमीजास्तपणा वाटत नसे. त्या तांब्याच्या कळशा,घागरी घासून लख्ख ठेवणे हे सुध्दा एक कष्टाचेच काम होते. सकाळी किवा संध्याकाळी घर झाडण्यात आणि पाणी भरण्यात वेळ जात असेच पण ती कामे न करुन चालण्यासारखेच नव्हते. जरा मोठे झाल्यावर आपापले कपडे आमचे आम्हीच पिळून टाकत असू. केर,लादी,धुण्याला बाई नव्हती आणि धुलाई मशिन माहितच नव्हते. भांडी घासायला बाई होती पण तिने घासून आणलेली भांडी परत पाणी टाकून घ्यावी लागत. आई तर कामात अखंड बुडालेलीच आठवते आहे.
पाण्याच्या साठवणीची भांडी तांब्याची तर घरातली स्वयंपाकाची भांडी,पातेली,डबेडुबे आणि ताटं वाट्या पितळेच्या असत.स्टेनलेसस्टील त्यावेळी बाजारात अगदी नवे आले होते. त्या ताटवाट्या चकचकीत आणि शिवाय घासायला सोप्या म्हणून मग दरमहा प्रत्येकासाठी एकेक ताट खरेदी करुन वर्षात सगळ्यांसाठी स्टीलची ताटे आली. निर्मल, शशी आणि गोपाळ अगदी लहान होते.निर्मल सहा वर्षांची,शशी साडेचार तर गोपाळ तीन वर्षांचा असेल.त्या तिघांसाठी सारख्या ताटल्या घेतल्या होत्या आणि त्यावर नावे टाकली होती. गोपाळचे पूर्ण नाव तर बाकी ताटांवर आद्याक्षरे टाकली होती. गोपाळ त्यातून आपले 'मोठ्ठे' नाव असलेली ताटली बरोब्बर ओळखून काढे त्याची गंमत वाटत असे.
आमच्याकडे एक म्हैस आणि तीन गाई होत्या. त्यांची बरीच उस्तवारी करावी लागत असे. आम्हाला त्यांचे आंबोण म्हणजे सरकी,चुणी,पेंड याचे मिश्रण प्रत्येकीच्या घमेल्यात काढून ठेवणे,गवत,कडबा काढून ठेवणे अशी कामे करावी लागत. माडीच्या मागच्या खोलीत गुरांचा कडबा,गवत ,सरकी,चुणी इ.साठवलेले असे आणि सकाळच्या घाईत एखादे वेळी विसरलेच तर रात्री कंदिल घेऊन त्या काळोखातून गवत आणायला फार भीती वाटत असे कारण घरात वीज नव्हती. कंदिलाच्या प्रकाशात रात्रीच अभ्यास करुन ठेवावा लागे. सकाळच्या घाईत वेळ मिळत नसे. कंदिलावर वाकून लिहिताना माझ्या केसांच्या बटा भुरुभुरु जळत तिकडे लक्ष ठेवावे लागत असे. घरचा भुईमूग पोतीपोती भरलेला असे पण त्या शेंगा सोलून दाणे काढण्याचे काम सुटीत करावे लागतच असे. घरचे भात आले की गिरणीवरुन सडून तांदूळ करुन आणावा लागे. त्यात कोंडाही येत असे, तो चाळून त्यातील कणी काढली जाई आणि कोंडा गुरांसाठी ठेवला जाई. हरबर्याची चणाडाळही घरीच केली जाई. टरफले अर्थातच गुरांसाठी उपयुक्त असत. शारिरिक कष्ट भरपूर होते पण तळेगावची हवा इतकी उत्तम होती आणि जोडीला घरचे धान्य आणि दूध,तूप ! भूक भरपूर लागे पण आजच्यासारखे दहा प्रकार बाजारातून आणणे माहितच नव्हते. भुकेला शेंगदाणे, गुडदाणी,खजूर, फुफाट्यात भाजलेले कांदे,बटाटे, केळी, परसातल्या अंगणातल्या पपया असे खात असू. डोळसोबाच्या उत्सवाच्या आधी आमच्या आळीत एका रविवारी बाजार भरत असे. आजूबाजूच्या खेड्यातले शेतकरी भाजी,फळे,धान्य असे घेऊन येत असत. ह्या बाजारात खरेदी करण्यात मोठी गंमत असे. अशा वेळी नानासाहेब करवंदाची अख्खी पाटीच खरेदी करत. तेव्हा घरातली सगळी मुले आणि आळीतलीही मुले ओट्यावर किवा अंगणात बसून कोंबडाकोंबडी खेळत त्या पाटीचा फडशा पाडत असू.
गावात दर रविवारी आठवडी बाजार भरत असे. भाजीपाला,फळे इ. आणण्यासाठी आम्ही नानासाहेबांबरोबर जात असू. अनेक प्रकारच्या पालेभाज्या,फळभाज्या,भरीत कोशिंबिरीसाठी गाजरे,मुळा,वांगी अशी पोतभर भाजी खरेदी होत असे. घरी आल्यावर त्या भाज्या वेगळ्या करुन निवडणे हे सुध्दा मोठेच काम असे. पोतं उचलण्यासाठी सखा महार तयारच असे. महार,चांभार, वाणी इ. दुकानदार ठरलेले असत.आमच्या घरासमोर एक तेली होता,त्याच्याकडून घाण्यावरचे गोडेतेल आणत असू. कापडचोपडासाठीचीही दुकाने ठरलेली होती. वर्षातून एकदा अमृतलाल पारेख कडून आईसाठी नऊवार साड्या घेऊन माणूस घरी यायचा.त्यातल्या मुगी चौकटीची जोडी आई घ्यायची. ती गोरीपान, घारी असल्याने तिला कोणताही रंग शोभून दिसे पण तिचे साडीचे रंग लाल,डाळिंबी,हिरवा किवा हळदीचा पिवळा असे ठराविक असत. शाळेत गणवेश नव्हता पण आमच्या घरात होता ना! एका पांढर्या कापडाच्या ताग्यात मुलांचे शर्ट, नानासाहेबांचे नेहरुशर्ट शिवले जायचे ,त्यांची धोतरजोडी असायची तर मुलांच्या विजारीसाठी मळखाऊ रंगाचा एक तागा असायचा. चिटाचे फुलाफुलांचे कापड असलेल्या ताग्यात परकरपोलक्यापासून पाऽर झबल्याटोपर्यापर्यंतचे कपडे शिवले जायचे. आमच्याच एका घरात रामभाऊ शिंप्याचे बिर्हाड होते त्यामुळे कपडे कोणाकडे शिवायचे,फॅशन काय असावी असले किरकोळ प्रश्न आधीच निकालातच निघालेले असायचे. किंबहुना असे काही असते हेच मुळात माहित नव्हते.
एवढ्या मोठ्या कुटुंबात घरातली कामे मोठ्या मुलांना वाटून दिलेली असत ती करावीच लागत. पुढे आम्ही जरा कळत्या झाल्यावर पोळ्या,भाकरी करायला लागत असू. मागचे आवरणे तर मी आणि कलाच करत असू पण अभ्यासात हयगय मुलगा असो वा मुलगी कोणाचीच चालत नसे. नानासाहेब स्वतः आमचा अभ्यास कधीच घेत नसत, पण तरीही सगळ्यांच्या प्रगतीची खबर त्यांना बरोबर असे. शाळेकरता रोजचे घोरावाडी- शिवाजीनगर अपडाउन चालू होतेच. चकमकाटाच्या दुनियेपासून खूप लांब अगदी साधेसुधे असे आमचे रुटिन होते.
वाचने
5191
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
:)
In reply to :) by ब्रिटिश टिंग्या
असेच म्हणतो.
छान. येऊद्या पटापट पुढचे
छान
मस्त आहे ...
आमचेही एकत्र कुटुंब होते..
In reply to आमचेही एकत्र कुटुंब होते.. by विलासराव
हो
आवडलं.
पुढच्या भागाची वाट पाहत
In reply to पुढच्या भागाची वाट पाहत by मदनबाण
असेच म्हणतो
आवडले.
मस्त लेखन! पुढच्या भागाची वाट
खुप छान लिहिले आहे. पुढच्या
खुप छान
छान!
१) चुणी २) फुफाट्यात भाजणे ३)
लय भारी! मिपावर आजकाल जे
धन्यवाद
In reply to धन्यवाद by लीलावती
फुफाट्यात भाजणे - चुलीवरचा
In reply to फुफाट्यात भाजणे - चुलीवरचा by llपुण्याचे पेशवेll
नाही, बार्बेक्यूपेक्षाही हे भन्नाट लागते!
जुन्या काळात छान फिरवून आणता
मस्त! फार सुंदर लिहिले