होम्सानंद
वर्ष होते १९८४. पुण्यात पदव्युत्तर शिक्षण घ्यायची संधी आणि महानगराची भीती अशा दोन कुबड्यांवर लंगडत मी पुण्यात आलो. संपूर्ण गोंधळलेल्या अवस्थेत पहिले काही दिवस गेले. जन्माने पुणेकर नसलेल्यांबद्दलची पुणेकरांची तुच्छता समजून घेण्यात नंतरचे काही दिवस गेले. त्यानंतर वर्गातल्या सहकार्यांनी त्यांच्या गप्पांमधे सहभागी व्हायची परवानगी दिली. त्यांच्या गप्पांमध्ये 'अरे, आज स्कॅन्डल इन बोहेमिया वाचली...',' नेव्हल ट्रेटीला तोड नाही...', 'क्रीपिंग मॅन काहीतरीच आहे हं...', 'माझी आवडती म्हणशील तर यलो फेस...' असं काहीतरी त्यांचं बोलणं सुरु असे. एकदा धाडस करुन हे काय आहे असं विचारल्यावर हे सर आर्थर कॉनन डॉईल यांच्या शेरलॉक होम्सच्या कथांबद्दल आहे हे कळालं. 'कम्प्लीट शेरलॉक होम्स' हे त्या वेळी शंभर रुपयांना मिळणारं पुस्तक त्या वेळी आमच्या वर्गातल्या एका मुलाकडं होतं, आणि ते असं आळीपाळीनं फिरत असे. होम्सकथांची मी आजवर भाषांतरं वाचली होती. मुळातून होम्सकथा वाचणं हे आपल्याला पेलणारच नाही अशी जवळजवळ खात्रीच होती. मग एकदा कधीतरी ते खूप लोकांच्या हातांखालून गेलेलें पुस्तक माझ्या हाती आलं. 'डॉग इयर्ड' म्हणतात तसं झालेलं. ते वाचायला घेतलं आणि त्यात पार हरवून गेलो. इंग्रजीशी परिचय होता, पण ही इंग्रजी म्हणजे भलतीच होती. होम्सही माहितीचा होता, पण या पुस्तकातला होम्स वेगळाच होता. मग झपाटल्यासारखा ते उसनं घेतलेलं पुस्तक वाचत राहिलो. कधीतरी हातात पैसे आले, तेंव्हा स्वतःची प्रत विकत घेतली. मग जेंव्हा जेंव्हा शक्य झालं , तेंव्हा लोकांना या पुस्तकाच्या प्रती भेट म्हणून दिल्या. होम्सकथा पुन्हापुन्हा वाचल्या, त्यांच्यावर चर्चा झाल्या, एकूण आनंदीआनंद झाला.
नंतर कधीतरी दूरदर्शनवर रविवारी सकाळी ग्रॅनडा टेलीव्हिजनतर्फे सादर केल्या होम्सकथा बघायला मिळाल्या. जेरमी ब्रेटचा होम्स पाहिला आणि खरा होम्स असता तर तो असाच असता असे वाटून गेले. तरतरीत नाकाचा, भेदक डोळ्यांचा आणि होम्ससारखाच कमालीचा तीक्ष्ण पण संपूर्ण विक्षिप्त होम्स. स्त्रीदाक्षिण्य आणि मार्दवाचा पुतळा असलेला होम्स. रोमान्ससारख्या कल्पनांना कंटाळणारा, पण तर्क आणि सत्य यांच्या जोडीला आपली विलक्षण बुद्धिमत्ता लावून दुर्जनांचा नि:पात करणारा होम्स. ब्रेटचा होम्स भलताच आवडला. डेव्हिड बर्कचा आणि एडवर्ड हार्डविकचा, दोघांचाही वॉटसन आवडला , एरिक पोर्टरचा प्रोफेसर मोरिआर्टी आवडला, मायक्रॉफ्ट आवडला, मिसेस हडसन आवडल्या, २२१ बी, बेकर स्ट्रीटचे ते घर आवडले आणि 'Once you eliminate the impossible, whatever remains, no matter how improbable, must be the truth. ' हे तर फार म्हणजे फारच आवडले. आधी वाचताना आवडले होतेच, पण आता पुन्हा आवडले. मग रविवारी सकाळी आपापल्या घरात होम्सकथा बघायची आणि ती संपली की पॅराडाईजला येऊन चहा पितापिता त्यावर चर्चा करायची असे काही आठवडे मोठे सुखाचे गेले. मग 'स्पेकल्ड बॅन्ड' मध्ये शास्त्रीय सत्य कसे डोळ्याआड केले आहे, 'ससेक्स व्हॅम्पायर'चे नाव का बदलले असावे, 'ब्रूस पार्टिंग्टन प्लॅन' कशी भारी आहे या आमच्या चर्चांवर त्या हॉटेलवाल्या इराण्याने एका पिढीला पुरेल इतकी माया गोळा केली असेल.
अलीकडेच या होम्सकथांच्या डीव्हीडीजचा संपूर्ण संच उपलब्ध आहे असे कळाले, आणि तो मिळवण्यासाठी जंगजंग पछाडले. क्रॉसवर्डमध्ये आपल्याला पाहिजे ते पुस्तक मिळणे म्हणजे दुपारी तीन वाजता चितळ्यांचे दुकान उघडे असण्यासारखेच. बहुतेक भरवशाच्या ठिकाणी लोकांना हे असले काही आहे हे माहितीच नव्हते. म्हटले, ठीक आहे. आता याची मानसिक तयारी करायला हवी. मस्कतमधल्या ब्रिटीश कौन्सिलमधल्या ग्रंथपालिकेला वुडहाऊस म्हणजे कोण हे माहिती नसते. भारतात एम.बी.ए. करणार्या मुलाला शिवकुमार शर्मा कोणते वाद्य वाजवतात हे सांगता येत नाही. 'मोतिलाल' हा अभिनेता लोकांना माहिती नसतोच, पण मोतिलाल नेहरुही माहिती नसतात. म्हटले, ठीक आहे.
हा संच मिळवण्याची इच्छा सहज एका दोस्ताजवळ व्यक्त केली. थोड्या दिवसांनी त्याचा निरोप आला, संच कुरीयरने पाठवला आहे, मिळाला की कळव. मला काय बोलावे ते सुचेना. बरे, किंमतही काही थोडथोडकी नाही. म्हटले, बाबा, पैसे कसे पाठवू कळव. तर हा पठ्ठ्या पैसेही स्वीकारायला तयार नाही. त्याला म्हटलं, अरे असं करु नकोस, तर पाठीवर एक व्हर्च्युअल थाप मारुन म्हणाला, साल्या, पैशाचा माज दाखवतोस काय मला? बघ, बघ. तुला आवडतात ना, तर मग बघ या डीव्हीडीज.
महिनाभर उलटून गेला. पार्सलचा पत्ता नाही. हा म्हणाला, डीव्हीडीज बर्याच वेळा कुरीयरवाले लंपास करतात. बघ आता, तुला मिळाल्या तर नशीब तुझे. नाही मिळाल्या तर ज्याला मिळतील त्याला त्या बघताना बरे वाटेल अशी आशा करुया आपण. नाही का? अखेरीस एक दिवस ते पार्सल मिळाले. त्या डीव्हीडीज कोणत्या फॉर्मॅटमध्ये आहेत, त्या इथल्या डीव्हीडी प्लेअरवर चालतात की नाही या सगळ्या कुशंका दूर झाल्या आणि 'प्ले' बटण दाबल्यावर व्हायोलिनची एक चिरपरिचित सुरावट कानावर आली. एका कोपर्यावरुन एक घोडागाडी वळताना दिसली, रस्त्यात दंगामस्ती करणारी मुले आणि त्यांना दटावणारा 'बॉबी' दिसला. कॅमेरा वर गेला आणि पडदा बाजूला करुन खिडकी बाहेर बघणारा ब्रेट दिसला. त्याने किंचित वळून कॅमेर्याकडे पाहिले आणि त्याच्या सडपातळ अंगकाठीवर, फिकुटलेल्या चेहर्यावर, चापूनचोपून मागे वळवलेल्या केसांवर आणि उंच, सरळ कपाळावर कॅमेरा 'फ्रीज' झाला. पडद्यावर अक्षरे आली 'दी अॅडव्हेंचर्स ऑफ शेरलॉक होम्स.'
त्या दोस्तासाठी मी ग्लास उंचावला.
अलीकडे संध्याकाळी दमून घरी परत आलो, की काय करावे हा प्रश्न पडत नाही. १९८४ साली चित्रीकरण झालेल्या 'स्कॅन्डल इन बोहेमिया' पासून १९९४ सालच्या 'कार्डबोर्ड बॉक्स' पर्यंत ४१ कथा. आणि ही मर्यादा धरली तरी प्रत्येक कथा किती वेळा बघावी याला मर्यादा नाही. प्रत्येक वेळी ब्रेट अधिकाधिक आवडत जातो, प्रत्येक वेळी आर्थर कॉनन डॉईलला अधिकाधिक कडक सलाम केला जातो. As a rule, the more bizarre a thing is the less mysterious it proves to be. It is your commonplace, featureless crimes which are really puzzling, just as a commonplace face is the most difficult to identify असले काय किंवा I have seen too much not to know that the impression of a woman may be more valuable than the conclusion of an analytical reasoner असले काय... ही वाक्ये मनात मधाचे थेंब टपकावे तशी टपकत राहातात. प्रत्येक कथा प्रत्येक वेळी नव्याने आनंद देऊन जाते. 'दी फॅकल्टी ऑफ डिडक्शन इज सर्टनली कॉन्टॅजिअस' यातल्या 'फॅकल्टी' या शब्दाच्या निवडीत इंग्रजी भाषेची जादू कळत जाते. डॉईल आणि ब्रेट आज जिवंत असते, तर त्यांना घट्ट मिठी मारली असती, असे वाटते.
या होम्सानंदापरता दुसरा आनंद नाही.
प्रतिक्रिया
सुंदर
उत्तम लेख
मुक्तसुनीत भौ पहिंल्यांदाच या
मस्त
मीही !
प्रकाशक
+१
लेखाची भट्टी छान जमलीये
मलाही मुळातुन होम्स वाचणं
अपेंडिक्स
मस्त!
होम्स च्या कथा सगळ्याच नाही
हा आपला शेरलॉक.. याच्यावर फार्र फार्र जीव हो....
मस्त
वा वा होम्स!
२२१ बी बेकर स्ट्रीट..
मराठीतून
अदितीचा ब्लॉग
सन्जोपरावांनी केलेला एक खूप
मस्त
होय. फॉक्स हिस्टरीवर जेरेमी
छान लेखन
वाह
छान लिहीलयत राजेश तुम्ही.
ग्रेनाडा टेलिव्हिजनचे बरेचसे
मस्त
मस्त!
लेख आवडला...हल्ली इथे
एलिमेंटरी, माय डिअर वॉटसन, एलिमेंटरी...
होम्सकथांचा मराठी अनुवाद
वा
मस्तच..
लेख आवडला.
वरील सर्वांशी सहमत
सुंदर लेख!
वेलकम
कट्ट्याचे फोटो मिपावर चढवा ही
होम्सानंद :)
सुरेख
होम्स
आमचं पण असंच आहे... आता घेतो
शेरलॉक होम्स . कोणीतरी
मालक, मालक !!!! काय आठवणी
होम्स मलाही आवडतो
आनंदाने
ग्लास योग्य नव्हे
होम्स
खुलासा.
तुला
तिथले द्रव्य किंवा द्राव
Pagination