मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

किती सुखाचे असेल

क्रान्ति · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
नवे नसे रे प्याद्याचेही वजीर होणे कितीकदा पाहिले नृपाचे फकीर होणे गिळून एकच घोट विषाचा शुद्ध हरावी, हवे कशाला कणाकणाने बधीर होणे? तुला सदोदित आळविले मी स्वार्थासाठी, मला न जमले मीरा होणे, कबीर होणे! असे तसे हे वेड नसे, भलतेच पिसे हे, क्षणात संयम, क्षणात व्याकुळ, अधीर होणे घुमे विठूचा घोष, पंढरी दुमदुमताना तनामनाचे गुलाल, बुक्का, अबीर होणे! स्वतःस उधळुन द्यावे अन् मनमुक्त जगावे, किती सुखाचे असेल वेडा फकीर होणे!

वाचने 3427 वाचनखूण प्रतिक्रिया 16

सागर 15/07/2010 - 18:05
क्रान्ति, सुंदर कविता समर्पक रुपके वापरली आहेत. खास करुन गिळून एकच घोट विषाचा शुद्ध हरावी, हवे कशाला कणाकणाने बधीर होणे? या कडव्यात तर तुम्ही प्राण ओतला आहे :) येऊन द्यात अजून....

स्पंदना 15/07/2010 - 18:35
सुन्दर गझल. =D> =D> =D> =D> =D> शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते

रेवती 15/07/2010 - 19:18
तुझ्या कविता येण्याची वाट बघत असते. ही कविताही छानच आहे. गिळून एकच घोट विषाचा शुद्ध हरावी, हवे कशाला कणाकणाने बधीर होणे? हे ग्रेट! रेवती

मनीषा 15/07/2010 - 19:44
घुमे विठूचा घोष, पंढरी दुमदुमताना तनामनाचे गुलाल, बुक्का, अबीर होणे! खूपच छान !! सुंदर आहे गझल .

राघव 20/08/2010 - 10:07
नेहमी प्रमाणेच. :) गिळून एकच घोट विषाचा शुद्ध हरावी, हवे कशाला कणाकणाने बधीर होणे? तुला सदोदित आळविले मी स्वार्थासाठी, मला न जमले मीरा होणे, कबीर होणे! क्षणात संयम, क्षणात व्याकुळ, अधीर होणे घुमे विठूचा घोष, पंढरी दुमदुमताना तनामनाचे गुलाल, बुक्का, अबीर होणे! ............. हे खास!