कारभारी गोपाळे!
दिवाळीच्या आसपासचे अंगावर काटा मारणारे थंडीचे दिवस. सायकल दामटत शाळेत निघालो होतो. उललेल्या ओठांवर बोचर्या वार्याने चुरचुरत होतं. डोळ्यांना झोंबरं वारं लागून पाणी येत होतं.
पहाटेच्या अंधारात सायकल स्टँडला लावून कुलूप घातले. किल्ली खिशात टाकली. तालमीच्या लाकडी दरवाज्याजवळ दबकत दबकत गेलो. जोर घुमवणार्या पोरांचे आवाज कानावर आले..
"हुंयक हुंय्या!" - "हुंयक हुंय्या!"
"हुंयक हुंय्या!" - "हुंयक हुंय्या!"
हळूच दरवाजा लोटून आत डोकावलो. डावीकडे जमिनीलगत समोरासमोर दोन भलेमोठे आरसे लावलेले होते आणि त्याच्यासमोर दोन्ही बाजूला पोरे एकमेकांकडे तोंडे करुन जोर घुमवत होती!
मला आत आलेले पाहून गोपाळे सरांनी त्यांचे जोर मारणे थांबवून मिस्किल हसत विचारले "या राजे! वाजले का साडेपाच?"
भिंतीवरल्या घड्याळातला मोठा काटा पावणेसहाची वेळ दाखवत होता मी ओशाळून मान खाली घातली.
"चला, चला लवकर या जोर मारायला. सव्वासहा वाजता सुरु करायची आहे प्रॅक्टिस." सर म्हणाले.
लंगोट कसून, त्यावर जांग्या नेसून मी घरुन तयारी करुनच निघालो होतो त्यामुळे झटपट शर्टचड्डी उतरवून त्या पोरांच्यात सामील झालो.
जोर, बैठका, आखाडा खोदणे आणि दोर चढणे असा व्यायाम झाल्यावर खरंतर हातपाय भरुन आले होते पण पहिलाच दिवस असल्याने उत्साह अमाप होता!
तालमीच्या मध्यभागी जमिनीत रोवलेला, साधारण १०-११ फूट उंच, वरच्या बाजूला निमुळता होत गेलेला लाकडी खांब होता, मल्लखांब! तेल प्यालेलं गर्द तपकिरी रंगाचं ते लाकूड चमकत होतं. लाकडाची अंगची नक्षी अगदी नजरबंदी करत होती. त्याच्या भोवती चारी बाजूला गाद्या टाकल्या होत्या. गोपाळे सरांनी हातात एरंडेल तेल घेऊन खांबाला लावले. आम्ही आठ-दहाजण भोवती अर्धगोलात उभे होतो. एकेकाला तेल संपूर्ण अंगाला आणि विशेषतः दंड मांड्यांना लावायला सांगितले. पहाटे-पहाटे एरंडेलाचा तो उग्र वास आणि बुळबुळीत, चिकट स्पर्श अगदी नकोसा झाला पण इलाज नव्हता. सरांनी खांबावरची पहिली पकड समजावून सांगायला सुरुवात केली.
--------------------------------------------------------------
कारभारी गोपाळे. साडेपाच फूटच असतील जेमतेम. मागं वळवलेले केस. व्यायामाचं शरीर. पण आडदांड नाहीत. अतिशय मिस्किल झाक डोळ्यात. तसं बघायला गेलं तर कागदोपत्री सरांचा विषय भूगोल पण त्यांचं मन रमायचं ते खेळात. लेझीम, कुस्ती हे त्यांचे आवडीचे खेळ.
इयत्ता पाचवीत असताना मी पहिल्यांदा मल्लखांब शब्द ऐकला तो त्यांच्याकडूनच. "पहाटे यायला तयार असली पोरं तर मी शिकवायला तयार आहे!" म्हणताच आम्ही आठदहा जण जमा झालो होतो.
कुठल्याही पैशांची अपेक्षा न करता फक्त आवड म्हणून आणि आपली पोरे एका वेगळ्या खेळात चमकावीत म्हणून मास्तरांनी हा उद्योग सुरु केला होता! मुख्याध्यापकांच्या मागे लागून तालमीच्या किल्ल्या स्वत:कडे ठेवायची परवानगी मिळवण्यापासून त्यांनी सगळं केलं.
मल्लखांब शिकवताना त्यांची एकाग्रता बघण्यासारखी असे. ते तल्लीन होऊन शिकवत. एखाद्याचे लक्ष नाही किंवा पोरे एकमेकात खुसफुसत काहीतरी टवाळकी करताहेत असं वाटलं तर ते एकदम गप्प होत आणि रोखून बघत. पुन्हा दुर्लक्ष करण्याची हिंमत नसे, म्हणजे सर मारत वगैरे नसत पण त्यांच्या तळमळीनं शिकवण्याचाच धाक पुरेसा असे.
इयत्ता पाचवी ते नववी असा पाच वर्षे मी मल्लखांब केला. झेप, सुई-दोरा, आकडी, घाणा, बोंडावरचे ताडासन, मयूरासन असे मल्लखांबावरच्या अनेक उड्या आणि पकडींचे विविध प्रकार त्यांनी शिकवले.
मल्लखांबाच्या व्यायामानं अंग अतिशय लवचिक आणि काटक बनतं. शरीराला बाभळीच्या लाकडासारखा घोटीव टणकपणा येतो. पाठीचा कणा अक्षरशः इलॅस्टिकसारखा लवचिक बनतो. मी कुठल्याही क्षणी चटकन पश्चिमोत्तानासान करु शकत असे किंवा कमान/चक्रासन करु शकत असे. (हल्ली आता उभ्यानं आपलीच पावलं दिसणंही मुश्किल झालंय, तो भाग वेगळा! ;)) ह्या शारीरिक फायद्यांबरोबर मानसिक फायदेही पुष्कळ झाले. एकाग्रता वाढली, ठराविक वेळात अचूकतेने आणि वेगानं गोष्टी करण्याचा सराव झाला, वैयक्तिक आणि सांघिक असा दोन्हीस्तरावर हा खेळ असल्यानं दुहेरी फायदा झाला.मल्लखांब सोडून इतकी वर्ष झाली पण त्याचे फायदे मला जीवनभरासाठी साथ देणार आहेत!
---------------------------------------------------------------
आम्ही मल्लखांब सुरु केला त्याआधी राजीव जालनापूरकर हा सरांचा विद्यार्थी होता. त्यावेळी मोजकेच विद्यार्थी ह्या खेळाला येत. त्यामुळे अहमदनगरहून तो बदली होऊन पुण्याला गेला आणि सरांच्या शिकवण्यात खंड पडायचा धोका निर्माण झाला. आमची आठ-नऊ जणांची बॅच मिळाली आणि सरांना पुन्हा हुरुप आला. पुण्याला मल्लखांब जोरात होता. त्याचवेळी मुंबईच्या समर्थ व्यायाममंदिराचा मल्लखांब संघही चमकत होता. एक दिवस सरांनी नोटीसबोर्डावर पत्रक लावलं "मल्लखांब राज्यस्तरीय स्पर्धा." आमचा साताठ जणांचा संघ तयार करायला घेतला. स्पर्धा पुण्यात होत्या, मला वाटतं गुलटेकडीला एक विद्यालय आहे तिथे होत्या. सरांना उत्साह अमाप. आम्ही आदल्या दिवशी संध्याकाळी पोचलो दुसर्या दिवशी सकाळी स्पर्धा. रात्री जेवणं झाल्यावर सगळ्यांना एकत्र बसवून सरांनी सांगितले "तुमच्यापैकी कुणीही बक्षीस मिळवू शकेल असं मला वाटत नाही, पण आपण त्यासाठी आलोच नाहीये. तुम्हाला त्याहूनही मोठं बक्षीस मिळणार आहे ते राज्यातल्या नामवंत खेळाडूंचा खेळ प्रत्यक्ष बघता येणार आहे! एकेक उडी बघून घ्या, पकडी लक्षात ठेवा काय तयारीनं पोरं इथे येतात हे पहा, आज ना उद्या आपल्याला तिथे पोचायचंय!" माझे डोळे आताही हे लिहिताना भरुन आले. कारण हा जो आत्मविश्वास सरांनी जागवला, ध्येय डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल कशी करावी ह्याचं जे शिक्षण नकळत दिलं त्याचा मी ऋणी आहे!
सकाळ वेगळीच उजाडली. पोटात फुलपाखरं नाचत होती. मैदानावर आमचा संघ गेला. आम्ही चांगला पर्फॉर्मन्स दिला. समर्थ व्यायामचा दत्ताराम दुदम हे मुख्य आकर्षण होतं! त्यांची टर्न आली आम्ही श्वास रोखून पहात होतो. शिसवीच्या लाकडासारख्या टणक आणि गोटीबंद शरीराचा बुटकेलासा दत्ताराम येऊन उभा राहिला. टाचा उंच करुन त्यानं हात उंचावला आणि विजेच्या वेगानं पळत येऊन खांबावर झेप घेतली थेट पायात खांब पकडला. एखाद्या चपळ फुरश्यासारखा तो वळसे घेत होता, एका पकडीतून दुसरी पकड, दसरंग झाला, घाणा झाला, सुईदोरा झाला. त्याचे सांधे बहुदा रबराचे असावेत!
शेवटी तो क्षण आला. खांबाच्या बोंडावर दोन्ही हात टेकवून दत्तारामनं त्याचे पाय हळूहळू पाठीमागे न्यायला सुरुवात केली. सगळं मैदान श्वास रोखून बघत होतं एखाद्या मशीनप्रमाणे सावकाश कमरेतून वर जात जात शेवटी त्यानं हँडस्टँड पूर्ण केला. ११ फुटी खांबाच्या सरळ रेषेत तो खांबावर उलटा उभा होता, तसूभरही न हालता!! पुढच्या सेकंदात त्यानं सरळ वरुन उलटी झेप घेतली आणि खाली येतायेताच खांब मांड्यात पकडला आणि लँडिंग केलं! टाळ्यांचा कडकडाट झाला. सरांनी जाऊन त्याचं अभिनंदन केलं, त्याच्या शिक्षकांचंही केलं.
-----------------------------------------------------------------
आम्ही परत आल्यावर आमच्या सरावात नवीन उड्यांचा समावेश झाला. आमच्यातल्या दोन जणांना हा हँडस्टँड शिकवलाच सरांनी. ज्यादिवशी तो जमला त्यादिवशीचा आनंद काय वर्णावा सरांचे डोळे चमकत होते! मग मशालीचा मल्लखांब सरांनी स्वतःच्या जबाबदारीवर शिकवायला घेतला. दंड, हात, मांड्या ह्यांना पेटत्या मशाली बांधून मी स्वत: शाळेच्या स्नेहसंमेलनात तो केला. मी सुखरुप लँडींग केलं आणि सर रडायला लागले आनंदाने!
-----------------------------------------------------------------
पुढे काही कारणाने ह्या सगळ्या खेळांवर गदा आली. बोर्डात पोरे चमकावणे ह्या एकाच नादापायी पालकांचंही सगळ्याच खेळांकडे हळूहळू दुर्लक्ष होऊ लागलं. आमचीही शाळा सोडण्याची वेळ आली होती. बारावी झाल्यावर इंजिनिअरिंगला जायच्या आधी सरांना शाळेत जाऊन भेटलो होतो. त्याही वेळी मला म्हणाले "ए उंटा (मी किडमिडीत आणि उंच असल्याने माझं नाव त्यांनी उंट ठेवलं होतं), मल्लखांब विसरु नकोस. तू करत रहा तुझ्या पोरांनाही शिकव!" त्यानंतर बरेच वर्षांनी सर भेटले, वाकून नमस्कार केला. तसे मिठी मारुन म्हणाले "तुमची बॅच भारी होती राव. तुमच्यासारखी पोरं परत काय मिळाली नाईत. आजकाल सगळे माना मुरगाळून फक्त पुस्तकंच वाचत्यात!" सरांच्या डोळ्यातली वेदना मला अस्वस्थ करुन गेली.
----------------------------------------------------------------
माझा मुलगा आजकाल जिमनॅस्टिक्सला जातो त्याच्या उड्या बघून मला माझा मल्लखांब आठवला आणि मग सहाजिकच गोपाळे सर आठवले. आता सर निवृत्त आहेत त्यांच्या गावी गेलेत. बरेच वर्षात सरांची गाठ नाही पण आजही कुठे मल्लखांब शब्द ऐकला, किंवा चित्र बघितलं तरी डोळ्यांसमोर येतात कारभारी गोपाळे!
-चतुरंग
वाचने
14776
वाचनखूण
प्रतिक्रिया
41
सही...
छान
छान लेख.
In reply to छान लेख. by विंजिनेर
सहमत..!
व्वा..
भारी
पर्फेक्ट
खूप छान!!
अत्तिशय
सुन्दर!
मस्त लिहिले आहे
मस्त
सुंदर आठवणी
मस्त
सुंदर
सहजसुंदर लेखन
क्या बात
सुंदर लेख...
>>> म्हणजे
छानच
वा! डोळ्यात पाणी आलं.
वा
वा मस्त!
In reply to वा मस्त! by बोका-ए-आझम
अरे वा बोका तुम्ही
In reply to अरे वा बोका तुम्ही by चतुरंग
अरे वा! मस्तच!
सुरेखच... धन्यवाद!!
चतुरंग मस्त लेख.
छान
अतिशय सुंदर लिहिलंय. फार छान
सुर्रेख!!!!!
काही काळ मिरजेला रहात असताना
In reply to काही काळ मिरजेला रहात असताना by एक सामान्य मानव
हो भानू तालमीत आम्ही देखील
सुरेख व्याक्तीचित्रण
गोपाळे सरांच्या अजून काही
In reply to गोपाळे सरांच्या अजून काही by मनो
गोपाळे सर आठवले . आम्हाला
आतिशय सुंदर काळजाला भिडणारा
वाह, नॉस्टॅल्जिक लिखाण!!
या लेखात उल्लेख केलेलं
शिसवीच्या लाकडासारख्या टणक
In reply to शिसवीच्या लाकडासारख्या टणक by अभ्या..
अॅथलीट बॉडी शेवटपर्यंत साथ
सुरेख लिहिलंय.