येथे मलेशियात 'मेमांडू' म्हणजे ड्रायव्हिंग,मोटारचालकत्व.भारतात असताना आपण गाडी चालवावी,त्याचा निदान परवाना तरी आपल्याकडे असावा असे मला मनापासून कधीच वाटले नव्हते.उलट नवर्याने गाडी चालवावी आणि आपण शेजारच्या सीटवर बसून खुशाल त्याच्या ड्रायव्हिंगवर ताशेरे ओढावेत्,जमल्यास एखादी डुलकी काढावी एवढाच काय तो प्रवासात माझा सहभाग असे.पण इथे मलेशियात आल्यावर मात्र माझी पंचाईतच झाली.पब्लिक ट्रान्सपोर्ट सर्रास नसल्यामुळे सारखेच गाडीसाठी दुसर्यावर अवलंबून राहावे लागे आणि दुसरे म्हणजे माझ्याहून वयाने लहान स्त्रिया मोठ्मोठ्या गाड्या सहजपणे चालवितात हे पाहून मला एक प्रकारचा न्यूनगंड येऊ लागला.आता आपणही कांहीतरी केलेच पाहिजे म्हणून मी घरापासून ५-६कि.मी.अंतरावरील एका मोटार ड्रायव्हिंग स्कूलमध्ये माझे नाव दाखल केले.सुदैवाची गोष्ट एवढीच की माझी प्रशिक्षिका (विमाला)दरवेळेस मला आणायला व पोचवायला गाडीने येत असे.
नांव दाखल केल्यावर पहिली गोष्ट जाणवली की इथे मेमांडू लायसेन (लायसन्स)फारच अवघड आहे.आपल्यासारखी एजंट पध्दत इथे नाही.धडाधड नापास करतात्.पहिल्या दिवशीच रविवारी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत थिअरी होती.व्याख्यानसत्र हे फक्त 'मलायी'(बहासा)भाषेत होते.आमचा भाषेच्या बाबतीत बोजवारा !एक शब्द कळेल तर शप्पथ.केवळ स्लाइडस्वरून अर्थ लावायचा.डोके दुखेपर्यंत मलायी व्याख्याने ऐकून ऐकून आपल्याला हे जमणार नाही अशी खात्री पटून स्वारी घरी !लवकर निघून येणे वगैरे शक्य नाही कारण आपला पासपोर्ट प्रत्येक वेळी त्यांचेकडे ठेवणे आवश्यक आणि शेवटी सही झाल्यावरच पासपोर्ट हातात्.लगेच दुसर्या आठवड्यात शिकवलेल्या भागाची संगणकीय परीक्षा.कसेबसे इंग्रजी अनुवादाच्या प्रतीचा अभ्यास करून परीक्षा दिली आणि ब्रेव्हो! ५० पैकी ४३ गुण मिळवून अस्मादिक पासं !मलाही थोडा आत्मविश्वास वाटू लागला.आता रविवारी पुन्हा सहा तास लेक्चर ,तीच मलायी भाषेतील बडबड आणि तोच कंटाळवाणेपणा .शेवटच्या दोन तासात गाडीची माहिती सांगून थोडी चालवायला दिली.आता लेक्चरबाजी संपून प्रात्यक्षिकाला सुरुवात झाली म्हणून थोडा आनंद वाटत होता पण गाडी प्रत्यक्ष चालवायची य विचाराने दडपणही आले होते. ह्या १४ तासांच्या थिअरी,परीक्षा इ.चक्रातून बाहेर पडल्याशिवाय लर्निंग लायसन्स इथे मिळत नाही आणिते मिळाल्याशिवाय तुम्ही गाडी रस्त्यावर काढू शकत नाही.आता मला एल्.लावलेली फक्त त्यांचीच गाडी प्रशिक्षकाबरोबर आणण्याची मुभा होती.पुढचे प्रात्यक्षिकाचे प्रशिक्षण केवळ ८ तासांचे दिले जाते.त्यात रिव्हर्स पार्किंग्,बुकीट (डोंगर्),थ्री पॉईंटर इ.प्रशिक्षण आमच्यासारख्या नवशिक्यांना आत्मसात करणे अवघडच जाते.त्यात आमच्याच प्रशिक्षकांतर्फे एक परीक्षाही घेतली जाते.कशी काय कोणास ठाऊक मी त्यातही उत्तीर्ण झाले.
आता आठवडाभरात जे.पी.जे.(आर्.टी.ओ)तर्फे परीक्षा होणार होती.आपल्याकडे कमीतकमी एक महिनाभरतरी गाडी रस्त्यावर चालवावी अशी अपेक्षा असते. इथे मात्र फक्त आठ तासात आणि एका जरी भागात गाडी नीट चालविता आली नाही तरी सर्व परीक्षा पुन्हा द्याव्या लागणार ! परीक्षेच्यादिवशी माझ्यादेखत परीक्षक एकापाठोपाठ एक अश्या कित्येकांना नापास करीत होते.माझ्यावरही तीच वेळ येणार याची खात्री ! आधीच 'सीदन्ति मम गात्राणि'अशी अवस्था झाली होती.पण माझ्या आणि परीक्षकांच्या सुदैवाने मला गाडी बंद न पडता परीक्षकांच्या आदेशानुसार सर्व कांही करता आले आणि मी 'मेमांडू'ची परीक्षा पास झाले.आता मी पी .लावून कोठेही ड्रायव्हींग करू शकते.
परदेशात येऊन गाडी शिकणे हेच माझ्या नशिबात होते हेच खरे !
अभिणंदण