मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काही आत्मचरित्रं! काही व्यक्तिचित्रं! :)

विसोबा खेचर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
नमस्कार, मी इडली!
मी सर्वांना आवडते, हवीहवीशी वाटते. सकाळच्या वेळेला 'वा! काय छान नी गरमगरम इडल्या मिळाल्या, अगदी हलक्या आणि चवीला छान होत्या!' असं माझं वर्णन बर्‍याचदा केलं जातं आणि कुणी असं वर्णन केलं की मला अगदी लाजल्यासारखं होतं बाई! :) पांढरा रंग हे आपल्याकडे शांततेचं प्रतिक मानतात. आपल्या तिरंग्यातला पांढरा रंगही, भारत हा शांतताप्रिय देश आहे, हेच दर्शवतो! मला हा रंग लाभला आहे तोखील कदाचित माझ्या शांत आणि सात्विक स्वभावामुळेच! मीदेखील स्वभावाने अगदी शांत, पचायला हलकी, चवीला सात्विक अशी आहे! अहो इतकंच काय, परंतु डॉक्टर मंडळीदेखील आजारी माणसाला , 'हलकी, ताजी आणि गरमागरम इडली खायला काहीच हरकत नाही' असं सांगतात. म्हणजे बघा, मला किती मान आहे तो! मी मूळची दक्षिण भारतातली आहे असं म्हणतात परंतु आता माझं वास्तव्य सगळीकडेच असतं! आजही सकाळी सकाळी कित्येक लोकं न्याहरी म्हणून माझ्याच गरमागरम चवीला प्राधान्य देतात. (अवांतर - क्वचित प्रसंगी माझा एक मेदूवडा नामक मावसभाऊही असतो माझ्यासोबत! काही लोक आम्हा दोघांना एकत्र खातात. तसा अगदीच अनवट स्वभावाचा आहे माझा हा भाऊ आणि मला खूप आवडतो! असो, सांगेलच तो केव्हातरी स्वत:बद्दल! पण तो बटाटेवडा मेला मात्र मला अगदी मुळ्ळीच आवडत नाही!) पण बरं का मंडळी, तो सांबार नामक उकळता प्रकार माझ्या अंगावर ओततात ना, तो मात्र मला मुळीच आवडत नाही हं! मी त्या सांबारात सगळी भिजून जाते आणि माझं सगळं रूपच पालटून जातं! कध्धी एकदा स्वच्छ पाण्याने अंघोळ करेन असं मला होतं! पण काय करणार? तुम्हाला मी सांबारासोबतदेखील आवडते ना! :( पण सांबारापेक्षा छानशी दक्षिण भारतीय पद्धतीची किंवा आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीची ओला नारळ-लसूण-हिरवी मिर्ची वाटून केलेली चटणी, ही माझी अतिशय प्रिय मैत्रिण! तिच्याशिवाय मला चैनच पडत नाही! आणि आम्हा दोघींची मैत्री इतकी घट्ट आहे की लोकांनाही तिच्याशिवाय मी पसंत नसते! नेमकी दोन विरुद्ध स्वभावाची माणसं एकमेकांना आवडतात असं म्हणतात ना, तसं आहे माझं आणि माझ्या चटणीचं! :) मी तशी शांत आणि सात्विक आणि ती स्वभावत:च जरा झणझणीत आणि चटपटीत! मला नेहमी परोपरी समजावून सांगत असते की, 'बाई गं, हल्लीच्या जगात एवढा शांतपणा, सात्विकपणा उपयोगाचा नाही, तू थोडी माझ्यासारखी झणझणीत, चटपटीत हो!' पण मला मेलीला जमतंच नाही ते. मग मीच तिला म्हणते, 'तुझा चटपटीतपणा आहेच ना माझ्यासोबत? मग झालं तर! आणि तुला तुझा स्वभाव सोडता येतो का ते सांग बरं? तुला कुणी गुळमट चवीची म्हटलेलं आवडेल का? मग मी तरी का माझी चव बदलू, स्वभाव बदलू?' असा माझा आणि चटणीचा प्रेमळ संवाद नेहमीच चालतो आणि शेवटी ती बिचारी हसून पुन्हा आपली कौतुकाने, माझ्या प्रेमापायी माझ्यासोबतच केळीच्या पानात उतरते! :) अहो माणसं जर आपला स्वभाव बदलत नाहीत, त्यांच्या स्वभावाला काही औषध नसतं, तर मी तरी माझा स्वभाव का बदलावा सांगा पाहू! मी जशी आहे तशीच मला राहू दे. शांत, प्रेमळ नी सात्विक! आणि तुम्हीदेखील माझ्या याच साधेपणावर, सात्विकतेवर आजपर्यंत भरभरून प्रेम केलंत तसंच यापुढेही कराल अशीच माझी खात्री आहे! माणसाने सात्विकपणा, साधेपणा, सोबरपणा माझ्याकडनंच शिकावा असेच माझे गुण आहेत! खरं की नाही मंडळी? असो, आपली सुखदु:खातली मैत्रिण, -- इडली. --------------------------------------------------------------------------------------------------- राम राम साहेब! मी बटाटावडा! च्च! सॉरी, स्वत:ला एकेरी का संबोधा? तर साहेब, आपण बटाटावडा! काय ओळखलं का नाय?! :)
आपण साला एकदम बिनधास्त व्यक्तिमत्व आहे बघा साहेब! आपल्याच मस्तीत जगणारा! आपलं नांव पण एकदम लै भारी आहे.."बटाटावडा!" काय? आहे की नाही चांगलं जंक्शन भारीभक्कम नांव? आपल्या गरमागरम स्वरुपापुढे आणि चवीपुढे दुनियेतले सगळे पदार्थ झक मारतात साहेब! साला कुणाची टाप नाय आपल्यापुढे काही बोलण्याची! :) काय म्हणालात? हा माजोरीपणा आहे? बरं मग? आहोतच आम्ही माजोरी! काय म्हणणं आहे तुमचं?? :) त्या इडलीच्या सात्विकपणाचं आणि साधेपणाचं नसतं कवतिक पुरे झालं! माणसाला खर्‍या अर्थाने मस्तीत जगायला आपण शिकवतो साहेब! डाळीच्या पिठात बुडवून उकळत्या तेलात फेकतात बघा साहेब आपल्याला! पण साला फिकीर नाय! आपण त्या उकळत्या तेलातही मस्तपैकी पोहतो आणि चांगले लालसरवजा पिवळसर खरपूस कल्लर घेऊन भाहेर पडतो बघा साहेब! स्वत: उकळत्या तेलाचे चटके सोसून मस्तीत कसं जगायचं ते आपण जगाला शिकवतो साहेब! काय म्हणलात? चव? चविष्टपणा? अर्रे!!! त्या बाबतीत तर साला पब्लिकच्या उड्या पडतात आपल्यावर साहेब! गरमागरम बटाटेवडा म्हटलं की पब्लिकच्या तोंडाला पाणी सुटतं बघा! साले जिभल्या चाटत तुटून पडतात आपल्यावर! अहो साधी वडापावची गाडी लावून लखपती झालेली किती माणसं दाखवू तुम्हाला साहेब? विश्वास नसेल ना, तर जा जाऊन त्या कर्जतच्या दिवाडकराला विचारा! :) तसा आपण मुळचा मराठी बरं का साहेब! अस्सल महाराष्ट्रीय पदर्थात आपला लंबर एकदम टॉपच्या रॅन्कमध्ये लागतो बघा साहेब! पण सिंधी माणसाचं डोसकंच लै अवली बघा! त्यानं प्रथम मला पावात भरला आणि 'वडापाव' हे नांवा रातोरात फेमस झालं! तसा आपण हायसोसायटीत फारसा उठतबसत नाय बरं का साहेब! त्या पिझ्झा आणि बर्गरच्या संगतीत आपला तिच्यायला जीवच उबतो! आपण कितीही माजोरी असलो ना, तरी आम पब्लिक आपल्यावरच प्रेम करतं बघा साहेब! साला, ते तुमची फ्यॅशनबिशन आपल्याला काय पण माहीत नाय बघा! उंची प्लेटी नकोत आणि ते काटेचमचे नकोत, की काय पण नको आपल्याला. ४-५ रुपायात आम पब्लिक रस्त्यावरच्या गाडीवर वडापाव खातो आणि समाधान पावतो! अहो गरीबाच्या पोटाची थोडा वेळ तरी आग शमते! काय, खरं की नाय? तुमी तुमचं ते व्यक्तिचित्र की आत्मचरित्र का काय म्हणतात ते सांगा म्हणाले म्हणून एवढा वेळ तुमच्याशी बोललो साहेब! पण आता आपल्याजवळ तुमच्याशी बोलायला जादा टाईम नाय! जाण्यापूर्वी एकच सांगतो, की मस्त मजेत जगा, स्वत:च्या स्वभावात चवदार, चविष्ट, खमंगपणा आणा आणि दुसर्‍याला पण तसंच अगदी मस्त मजेत चवीचवीने जगायला शिकवा! अहो तेलातनं बाहेर पडल्यावर गार होंण्याच्या आत गरमागरम असतांनाच जगून घेतलं पाहिजे, एकदा गार झाल्यावर कोण विचारतो आपल्याला? साली दोन घटकांची जिंदगी आपली! काय? खरं की नाय? तुमचाच, (एक चवदार, चविष्ट, दोस्त!) बटाटावडा! --------------------------------------------------------------------------------------------------- राम राम मंडळी, मी तात्या अभ्यंकर. हां हां, असे दचकून, घाबरून जाऊ नका! इडली आणि बटाटावड्यासारखं मी काही माझं आत्मचरित्र किंवा मनोगत तुम्हाला सांगणार नाहीये,की व्यक्तिचित्रही रंगवणार नाहीये! (साला, आपण पडलो मराठी आंतरजालावरचा एक नंबरचा बदनाम आणि हलकट माणूस! तेव्हा आमचं व्यक्तिचित्र आम्हीच काय रंगवणार कप्पाळ? ते काम आमचे हितचिंतक आणि हितशत्रू करतच असतात!) असो...! :) सांगायचा मुद्दा असा की काल रात्री भाईकाका स्वप्नात आले होते आणि मला म्हणाले, "तात्या, रागांची आणि माणसांची व्यक्तिचित्र बरीच रंगवलीस, आता जरा काही खाद्यपदार्थांची व्यक्तिचित्र रंगवायचा प्रयत्न कर. मी जरा वाचेन म्हणतो!" आता खुद्द भाईकाकांकडनंच हुकूम निघाल्यामुळे आम्ही चुपचाप हे लेखन केलं! आपल्याला कसं वाटलं ते सांगा, म्हणजे पुढच्या भागात साक्षात "मिसळ" आणि "गोडाचा (प्रसादाचा) शिरा" यांची जरा भारीभक्कम व्यक्तिचित्र रंगवायचा प्रयत्न करणार आहे! :) भाईकाकांचा आशीर्वाद तर आहेच पण तुम्हा मायबाप वाचकांचाही हवा! असो.. आपलाच, तात्या. आगामी : (अर्थात, सवडीने, मूड लागेल तसं!) १) मिसळीचे व्यक्तिचित्र/आत्मकथन! २) प्रसादाच्या शिर्‍याचे व्यक्तिचित्र/आत्मकथन! ३)" आम्ही दडपे पोहे!" धन्यवाद!

वाचन 18801 प्रतिक्रिया 0