नवअस्पृश्य!
काहि प्रसंग:
१.
स्वाईन फ्लूमुळे शाळेला सुट्ट्या. घराजवळच्या मंदीराच्या आवारात ७-८ मुलींचा घोळका काहितरी खेळत बसला होता. एक चिमुरडी मात्र एवढंस्स तोंड करून बाजुला बसलेली. मला बघवलं नाही म्हणून त्या खेळणार्या मुलींपैकी एकीला विचारावं म्हणून संवाद सुरु केला
"काय गं शाळेला सुट्टी?"
"होऽऽऽ" (एकीला प्रश्न घाऊक उत्तरे :) )
"ती 'क्ष' का तिथे बसलीए? लिंबु टिंबु आहे? का तिला येतच नाहि हा खेळ?"
"श्शुऽ!! बसुदे तिला तिथे.. ती आली तर आई ओरडेल मला"
"का बॉ? भांडलात की काय?"
"नाऽहीऽ!!! ती आहे ना तिच्या चुलत बहिणीला ताप आलाय"
"मग?"
"म्हणून आई म्हणालिए तिच्यापासून दूर रहा.. 'स्पाईनचा ताप' नको व्हायला"
मी क्ष कडे पाहिलं.. ती तोंड फिरवून बिचारी घरी निघून गेली
२.
काल उसाच्या रसाच्या दुकानातही हाच विषय... फक्त एका १२-१५ वर्षाच्या मुलाला त्याची आई ओरडत होती
"गधड्या.. कोणी सांगितलं होतं काकुंना सांगायला की बेबीला ताप आलाय"
"अग पण तीला आलाय ना ताप?!"
त्या काकु ओळखीच्या असल्याने मी चौकशी केली. मलाही कळलेलं बघुन त्या अजून हवालदिल झाल्या
"अरे बोलु नकोस रे कुणाजवळ प्लिज. माहिती आहे ना लोक कसे वागतात मग!. त्या 'य' ना ताप आला. नंतर तो उतरला तरी ऑफीस कामावर घेईना. त्यांना तर स्वाईन फ्लु पण नव्हता. डॉ. सर्टीफिकेटनंतर ते ऑफिसला जाऊ शकतात तर ऑफीसात त्यांच्या क्युबमधे आता कोणी बसायलाही तयार नाहि.. जाम वैतागले आहेत ते"
३.
स्वाईन फ्लूमुळे गाड्यांना कमी गर्दी. या कमी गर्दीच्या समाधानात असतानाच समोरच्या मित्रद्वयीमधील पुढील संवाद कानावर पडला
"अरे दोन दिवस स्टेशनवर आपल्या(!) आयटमला बघितलं नाय!"
"कुठल्या? ९:३२च्या?"
"हो"
"अरे तिला सर्दी-खोकला-ताप आलाय"
"तुला काय माहित? "
"आरे तिची ती मैत्रिण आहे ना.."
"कोणती?"
"तीच रे ती डब्बल ब्याटरी.. आपल्या राजावर लाईन मारते.. हा त्तीऽऽ.. तर ती राजाला सांगत होती....(एक पॉज).....
.... आणि म्हायतीए.. तिचा साखरपुडा मोडला!!!!"
"अरेच्या (चेहेर्यावर अरे वा! चे भाव)..? कसा? का?"
"म्हणे तिला स्वाईन फ्लु झालाय"
"च्यामारी!..... तरीच ती त्यादिवशी रडत होती.. मला वाटलच काहितरी लफरा असणार"...................
===========
ही उदाहरणे ऐकल्यासारखी वाटताहेत का? तुमच्या ओळखीत कुणाला ताप आला तर त्याच्याशी तुम्ही असेच वागाल/वागता का?
हा काथ्याकुट फक्त स्वाईन फ्लू मुळे निर्माण झालेल्या नवअस्पृश्यांबद्दल न रहाता एकुणच अनेक रोग आहेत ज्यांच्या पेशंटना हे अनुभव येतात.
तर ह्या वैद्यकीय नवअस्पृश्यतेबद्दल तुम्हाला काय वाटतं? अश्या रोगांपासून वैद्यकीय सुरक्षा/काळजी आणि ही अपृश्यता यांचा ताळमेळ कसा बसवावा/बसवाल/बसवता?
वाचने
2519
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
ऑड म्यान
असेच काही प्रसंग
हा
मला पण असाच अनुभव आला
या स्वाईन फ्ल्यु फोबियामुळे
मला काहि
ऋषिकेश