Skip to main content

लंडनस्थित मिपाकर

लेखक सोत्रि यांनी बुधवार, 24/09/2025 या दिवशी प्रकाशित केले.
लंडनमधे वास्तव्यास असलेले मिपाकर आहेत का कोणी? लंडनमधे काही कामानिमीत्त २५-३० सप्टेंबर असणार आहे, जमल्यास एका संध्याकाळी भेटून मिपाकट्टा करता येऊ शकेल. कोणी उत्सुक असल्यास कळवा.

वाचने 6095
प्रतिक्रिया 32

प्रतिक्रिया

मिपाधर्माला जागून, मिपाकर कुठेही असला तरीही कट्टे करायचे सोडत नाही. हा धागा वाचून, लंडनमधे असलेल्या स्वधर्म आणि स्वछंदी_मनोज यांनी व्यनी करून भेटायला जमेल असे कळवले आणि मिपा लंडन कट्टा (मिनी) होणार ह्याची खात्री झाली. दोघेही लंडनपासून तासभर दूर असलेल्या उपनगरांमधे वास्तव्यास असल्याने सोयीची वेळ आणि ठिकाण स्वधर्म यांनी ठरवले पण ते माझ्या सोयीनुसार, एकाच सबवे लाईनने प्रवास करता यावा म्हणून. थेम्स नदी किनारी, आयकॉनिक टाउन ब्रीज जवळ असलेल्या एका पब मधे भेटून, कॉफी घेऊन, नदीकिनारी गप्पा मारत कट्टा गाजवायचा असे ठरले. ऑ, पब मधे कॉफी?? असं विचीत्र वाटलं ना? हो, पण कॉफीचाच प्लॅन होता बरं का. :-) लंडनच्या भुरूभुरू पडण्यार्‍या पावसात मी ठरलेल्या पबजवळ पोहोचलो आणि कट्टेकरांची वाट पाहत असताना समोरच्या फूटपाथवर, रस्ता क्रॉस करण्याच्या तयारीत असलेले स्वधर्म दिसले. १ सोशल मिडीयाच्या युगात, कायप्पावर ओळखीसाठी फोटो आधिच शेयर केले असल्यामुळे लगेच ओळखता आले आणि कायप्पावर कॉलही चालू होतेच. दोनेक मिनीटांनी मनोजही आले. रस्त्यावरच गप्पा चालू झाल्या, त्यांचा ओघ आणि आमचा आवाज पबमध्या ब्रिटीश लोकांच्या पचनी पडणार नाही असे एकंदरीत लक्षात आले आणि पबमधे कॉफी घेण्याचा प्लॅन कॅन्सल केला. नदीकिनारी क्वीन्स वॉकवर एखाद्या ब्रिटीश टपरीवर कॉफी घेण्याचे ठरले. पण लंडनच्या पावसाने सगळा चिकचिकाट होऊन किनार्‍यावर बसण्यायोग्य जागाच नव्हत्या. त्यामुळे, बर्‍याच पायपीटीनंतर, कोस्ता नावच्या एका कॉफी हाऊसमधे जाउन बसलो. आपापल्या आवडीच्या कॉफ्या ऑर्डर करून गप्पांचा फड जमवला. ठाणेकर असलेल्या मनोजने गप्पांच्या सुरुवातीलाच, "अहो जाहो न करता अरे तुरे करूयात", असं फर्मान काढून सगळ्या औपचारिकतेला फाट्यावर मारले आणि मूळचा मुंबईकर असलेल्या मला एकदम हायसं वाटल. त्यामुळे पुढे गप्पांना विषयांना कसलेही बंधन नव्हते. पुणे, ठाणे, सांगली ते पार ट्रंपतात्या आणि रशिया युक्रेन असा प्रवास करत स्वैरसंचार चालू होता. पुढे, सिंगापूर आणि कौलालंपूरचं इन्फ्रा लंडनच्या इन्फ्रापेक्षा कसं उजवं आहे ह्यावर अस्मादिकांनी एक परिसंवाद घडवून, स्वधर्मला झीट आणली. :-) कोस्ताच्या स्टाफने, "आता दुकान बंद करायची वेळ झाली", असं येउन सांगिल्यावर वेळेचे भान आले आणि त्या दोघांना लांबचा प्रवास करून घर गाठायचे असल्याने आवरते घेत कट्ट्याची सांगता केली. एक संध्याकाळ थेम्सच्या किनारी यादगार ठरून गेली. 2 (डावीकडून - स्वधर्म आणि स्वछंदी_मनोज) 3 (डावीकडून - स्वधर्म, स्वछंदी_मनोज आणि अस्मादिक) 4 (थेम्स नदी आणि रात्रीचा टाउन ब्रीज) - (कट्टेकर) सोकाजी

In reply to by सोत्रि

एवढ्या प्रवासात असूनही तात्काळ सविस्तर कट्टा वॄत्तांत लिहिणे केवळ तुंम्हालाच जमले! आधी न भेटलेल्या फक्त एक नांव म्हणून माहित असलेल्या मिपाकरांना सदेह भेटण्याचा आनंद आगळाच! मिपाचे गाजलेले लेखक आणि चर्चा हा पण एक महत्वाचा विषय होता. आता पुण्यातल्या मिपाकरांना डिसेंबर मध्ये भेटण्याची ओढ लागली आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

अभ्याही डिसेंबरमध्ये पुण्यात आहेत. पुण्यात खूप मिपाकर असणार असा अंदाज आहे. सगळ्यांना भेटायची उत्सुकता आहे.

In reply to by सोत्रि

अरे वाह... मस्तच झाला की कट्टा 👍 धागा आला तेव्हा वाचला होता, कट्टा वृत्तांत आज वाचनात आला. आयडीने परिचित असलेल्या मिपाकरांना फोटोत बघताना त्यांच्या व्यक्तिमत्वा विषयी मनात बांधलेल्या अटकळी कधी बरोबर ठरतात तर कधी चुकिच्या ठरतात... सोकाजी नानांना आधी प्रोफाईल पिक्चर मध्ये पाहिले होते, पण स्वछंदी मनोज आणि स्वधर्म ह्यांना फोटोत पाहिल्यावर त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी बांधलेल्या अटकळी साफ चुकल्या असल्याचे लक्षात आले... 😀 हे त्रिकूट एकदम भारी वाटले आहे! गेल्या डिसेंबर मध्ये पुण्यात एक अचानक कट्टा झाला होता, ह्या डिसेंबर मध्ये कट्ट्याचा काही कार्यक्रम ठरल्यास त्याला उपस्थित राहण्याचा प्रयत्न नक्कीच करणार...

In reply to by टर्मीनेटर

खाली लिहिल्याप्रमाणे २० किंवा २१ ला केला तर सुट्टीचा दिवस असल्याने बर्‍याच लोकांना जमेल असे वाटते. बाकी तुमची आमच्याबद्दल अटकळ कशी होती ते सांगा तरी.

In reply to by स्वधर्म

करूया की मग कट्टा
तारखेचा मला काही प्रॉब्लेम नाही, पण वेळ काय ठरते ते महत्वाचे आहे. पुण्याला जण्या-येण्यासाठीच आम्हाला जवळपास सहा तास लगतात. त्यामुळे सकाळची वेळ असेल तर अवघड काम होउन जाते 😀 तारिख आणि वेळ ठरवा, प्रत्यक्ष येण्याचा नक्किच प्रयत्न करतो, आणि नाहिच जमले यायला तर व्हिडीओ कॉलवर व्हर्चुअल हजेरी लावतो 👍
बाकी तुमची आमच्याबद्दल अटकळ कशी होती ते सांगा तरी.
जी काय होती ती वाईट तरी नक्किच नव्हती 😀 म्हणजे, स्वच्छंदी मनोज ह्यांचे गड किल्ले / ट्रेकिंग विषयीचे धागे/प्रतिसाद वाचले आहेत त्यामुळे ते एखाद्या सराईत गिर्यारोहकासारखे 'स्पोर्ट्स वेअर' मध्ये वावरणारे, 'अ‍ॅथलीट' सारखे असतील वगैरे... आणि त्यांचा हा 'जॉर्ज क्लुनी' सारखा (अर्थात मला आवडणारा) लूक अजिबात अपेक्षित नव्हता... आणि तुमच्याबाबतीत, 'सडपातळसे, चाळिशीतले, चष्मेवाले गृहस्थ' असावेत अशी अटकळ होती 😀

In reply to by टर्मीनेटर

टर्मिनेटर सर, माफ करा जरा घरची राहिलेली कामे उरकत असल्याने मिपावर आठवडाभर फिरकलो नव्हतो. रविवार २१ डिसेंबर २०२५ ला जमवले तर बरेच मिपाकर येऊ शकतील असे वाटते. अभ्या पण असणार आहेत असे वाटते. तुंम्ही खास कट्ट्याकरता लांबून येणार असाल तर तुंम्हाला सॅल्यूट आहे. त्यामुळे तुंम्ही जबरदस्त डॅशिंग व उत्साही असणार असा आमचा होरा आहे :-) आपली एखाद्या व्यक्ती विषयीची कल्पना व प्रत्यक्ष दर्शन यात फरक असतोच पण कधी कधी एकदम बरोबर ठरतो.

भारीच सोकाजीनाना ऐन वेळी धागा काढून त्यानंतर कट्टा होऊन त्याचा वृत्तांत पण आला. मिपा इतिहासातील हा पहिलाच असा कट्टा असेल, सहीच

चेष्टरला असतं तर आलो असतो. ;) असो मस्त कट्टा वृत्तांत. धन्स. -दिलीप बिरुटे

मस्तच. कुठल्याच प्रकारचा अहं मध्ये न आणता केवळ मिपाकर म्हणून आवर्जून वेळात वेळ काढून भेटणे फारच आवडले. तुम्हां तिघांनाही एक कडक सॅल्युट.

मला भारतात यावे लागले होते एमर्जन्सीला, नाहीतर मधला फ्रान्स आणि इंग्लिश खाडी पार करायचीच होती एकदा. व्हीजाचा थोडा प्रॉब्लेम आला असता पण नानाला भेटायचेच होते. सोबतच स्वधर्म शेठ आणि मनोजराव भेटले म्हणजे मोठीच संधी गमावली. असो. नेक्स्ट टैम

In reply to by अभ्या..

लेका असा कसा रे नेमक्या वेळी परत गेला होतास? आपली भेट लैच दिसांपासून पेंडींग आहे! - (भेटीचा बॅगलॅाग भरून काढण्याची आस असलेला) सोकाजी

झक्कासं कट्टा तोही थेम्स नदी किनारी!!

सर्व कट्टेकर्‍यांचे मनःपूर्वक अभिनंदन. मुळा-मिठी-उल्हासच्या तट्टांना या टेम्सचे पाणी पाजा... जय जय मिपाधर्म माझा... जय जय मिपाधर्म माझा...!!

In reply to by श्रीरंग_जोशी

आमचे तट्टू भीमथडी चे. भीमा सीना गोदावरी कृष्णा पंचगंगा मिठी आणी पवना करून सध्या लेक कॉन्स्टन्स चे गोडे पाणी पिते आहे.

अतिअवांतर: सध्या लंडनची काय अवस्था आहे? स्थलांतरीत लोकांनी लंडन, पॅरिस बकाल केले आहे हि सद्यस्थिति आहे. यादवी युद्धाची शक्यता आहे का? स्थानिक लोकांची काय स्थिति आहे? लंडनस्थित मिपाकर: क्रुपया वेळ काढून लिहिते व्हा. वेगळा धागा टंका हि विनंती !!

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

मागे लिहिल्याप्रमाणे मी पुण्यात असणार आहे. दि २० किंवा २१ डिसेंबरला शनिवार रविवार आहे. तेंव्हा कट्टा झाला तर नक्की हजेरी लावू शकेन. खरं तर पुण्यात कोण कोण मिपाकर आहेत ते नक्की माहित नाही आणि कोणाला खर्‍या नावाने ओळखतही नाही. जर भेटता आले तर नक्की आवडेल. राजेंद्र सर, आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.