मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

छोटा बाहुबली

बिपीन सुरेश सांगळे · · जनातलं, मनातलं
छोटा बाहुबली ----------------- माझी लाडकी खाट अगदी खिडकीजवळ आहे . तिच्यावर बसायचं अन बाहेर पहात राहायचं . केसांमध्ये बोटं घालून गोल फिरवत . हा माझा आवडता उद्योग . काय मस्त वाटतं ! लांबवर नजर जाते . समोर नुसतं मोकळं माळरान आहे आणि निळं निळं आकाश . जोडीला भरभरणारा भन्नाट वारा ! आमचं घर मला खूप आवडतं . मोठं. मातीचं.बैठं . भरपूर अंगण असलेलं . खूपखूप जुनं ! अगदी माझ्या नऊ वारी नेसणाऱ्या , थकलेल्या आजीसारखं ! ते अगदी एकटं आहे . गावापासून लांब. आजूबाजूला एकही घर नाही. तशी वस्ती आहे. पण जवळ नाही . आई - अप्पा शेतात जातात . शेत लांब आहे घरापासून . मी शाळेत जाते . मी सातवीत आहे आता . मला खूप मार्क पाडायचे असतात . म्हणजे मला कित्ती अभ्यास असेल , कल्पना करा . म्हणून मी शेतावर कामाला काही जात नाही . पण गंमतच आहे ! - पुस्तक घेऊन फिरत असते पण डोक्यात काही शिरत नाही . बाहेर पाखरं अन फुलपाखरं ! तऱ्हेतऱ्हेची ! रंगीबेरंगी ! माझं अभ्यासातलं लक्ष सारखं मोडतं ना मग . पावसाचे दिवस असूनही पाऊस नीटसा काही नव्हता . अप्पा काळजीत होते. गणपती गेले आणि आकाश काळं होऊ लागलं . त्यादिवशी अशीच खिडकीतून बाहेर पहात होते , तर समोर एक खोपटं उभं . कालपर्यंत नव्हतं अन आज एकदम ! ते एका पाथरवटाचं घर होतं . पाथरवट म्हणजे दगड फोडणारे . दगडाच्या वस्तू बनवणारे लोक . पाटा - वरवंटा अन काही काही . काळे कभिन्न नवरा - बायको अन त्यांचा तसाच , पण छोटासा गोड मुलगा . थोड्या वेळाने त्यांची चूल पेटली . स्वयंपाक चालला असावा . नुसता पांढरा धूर धूर झालेला . तो कमी झाला अन काय दिसलं असेल ? ... तो छोटा मुलगा हातामध्ये प्रचंड जड हातोडी घेऊन दणादण दगडावर चालवत होता . बाप रे ! मला कमालच वाटली . माझ्यापेक्षा छोटा असलेला तो मुलगा सहजपणे घण चालवत होता . भारीच ! मी त्याला लगेच नाव देऊन टाकलं - बाहुबली , छोटा बाहुबली ! माझी बाहुबलीशी लगेच मैत्री झाली . मी त्याला खाऊ द्यायचे . आम्ही खेळायचो . खिडकीच्या बाजूला दोन-तीन मोठी झाडं होती . खाली फुलांची छोटी झाडं . तिथे एक सुका ओंडका पडलेला होता . सुबाभळीच्या झाडाचा . ती आमची छोटीशी होडी होती . शेजारी सोडलेलं सांडपाणी म्हणजे आमची नदी होती. त्या होडीत बसून आम्ही जगात फिरून यायचो . मी एकेक गावांची -देशांची नावं त्याला सांगायचे . त्याला काहीच माहिती नसायचं . ही एक गंमतच होती . पण त्याचा तो घण ! ... तो मात्र तो सहज उचलायचा ; पण मला ? बाप रे ! अवघड . अति अवघड ! एकदा तो म्हणाला , त्यांचं काम झालं की ते दुसरीकडे जाणार आहेत . मला खूप वाईट वाटलं . माझा तो चांगला मित्र झाला होता एवढ्यात . अन पुन्हा हे ? ... मग एके दिवशी ... सकाळपासून खूप उकाडा होता . पण आकाश स्वच्छ होतं . मला सुटी होती. पण आई - अप्पांना कसली सुट्टी रविवारची ? ते शेतात कामाला गेले होते . घरात मी आणि आजीच . खिडकीतून बाहेर पाहिलं . बाहुबली आणि त्याची आई काम करत होते . त्याचे वडील बाजारात गेले असावेत . खरं तर मला त्याच्याबरोबर खेळायचं होतं . पण - आमची कट्टी झाली होती . थोड्याच वेळात आकाश काळंकाळं झालं . रिपरिप पाऊस सुरु झाला. नंतर पावसाला जोर चढला . हत्तीचा पाऊस होता जणू ! आडवा-तिडवा पाऊस होता . बाहुबली आणि त्याची आई खोपटात गेले . मी खिडकीतुन पहात होते . त्यांच्या झोपडीभोवती तळं साठलं होतं . जणू तलावात एका जागी थांबलेली काळीशी होडीच ! मला वाटलं , आत्ता त्याच्याशी बट्टी असती तर तिथे जाऊन होडी-होडी खेळता आलं असतं. पण नाही . मीही रागाने खिडकी लावून घेतली आणि एक कसलासा आवाज आला , कर्रर्रर्र धडाड ... ! मला संकट जाणवलं. मी मला जे सुचलं ते केलं . मी आजीचा हात धरून ओढला आणि दोघी खाटेखाली शिरलो . दुसऱ्या मिनिटाला आमचं जुनं मातीचं घर थोडं कोसळलं . पण माझ्या लाडक्या खाटेने आम्हाला आधार दिला . वरचे पत्रे न माती खाटेवर पडली. पण-आम्ही बचावलो. बचावलो असं वाटलं ... पण उलट आता आम्ही सगळीकडून अडकलो होतो. बाहेर काही पडू शकत नव्हतो . भिजलेल्या मातीचा वास येत होता . मातीचा वास मला ना खूप आवडतो . पण आत्ता या क्षणाला ? ... श्वास कोंडू लागला . आजी ओरडू लागली . मी रडू लागले . आई - अप्पांची आठवण येऊ लागली . ते कुठं अडकले असतील , असंही वाटायला लागलं . त्याच वेळी भर पावसात बाहुबली आणि त्याची आई आमच्या घराकडे धावले . त्याच्या आईच्या हातात एक बांबू होता तर बाहुबलीच्या हातात घण होता. बाहुबली मला हाका मारू लागला … आमची कट्टी विसरून ! मी ' ओ ' दिली . त्याच्या आईला कळलं , आम्ही कुठे आहोत ते . ती दगड - माती बाजूला करू लागली . थोडं मोकळं झालं . श्वास घेता येऊ लागला. फक्त एक वासा खाटेमध्ये अडकला होता . तो होता म्हणून खाट बाजूला सरकत नव्हती . अन आम्हाला बाहेर पडता येत नव्हतं . मी मोकळं होण्यामध्ये फक्त तो एक वासा होता - फक्त एक ! बाहुबलीच्या आईने त्याला हात घातला . सगळी शक्ती लावली . तो ओढला आणि हाय ! ... तो तिच्या हातातून निसटला . ती घसरली आणि धडपडली . तिचं डोकं एका दगडावर आपटलं अन ती बेशुद्ध झाली . झालं ! आता तर मी सुटकेची आशाच सोडली . बाहुबलीचा 'आई आई' , असं ओरडण्याचा आवाज आला. मग तोही शांत झाला. एकेक क्षण सरत नव्हता . अचानक दाणदाण आवाज येऊ लागला . छोटा बाहुबली हिंमत हरला नव्हता . त्याच्या छोट्याशा हातामध्ये आता विलक्षण बळ संचारलं होतं . तो वासा त्याला ढकलून सरकवता येईना , म्हणून तो त्याच्या घणाने त्याचे तुकडे-तुकडे करायला लागला होता . थोड्याच वेळात त्या लाकडी मजबूत वाशाचे दोन तुकडे झाले . त्याने मला हात दिला व मी बाहेर आले. मी छोटी असल्याने ते जमलं पण आजीला बाहेर येता येईना. तिला बाहेर घेणं आम्हा दोघांनाही जमेना . तेवढ्यात बाहुबलीचे वडील आले . त्याची आईही शुद्धीवर आली . त्याच्या वडलांनी शक्ती लावून ती खाट ढकलली व दाबून धरली . त्यांची शक्ती केवढी ? - बाहुबलीचे वडीलच की ते ! त्याच्या आईने आजीला अलगद बाहेर काढलं. त्या दोघींनाही फार काही झालं नव्हतं . पाऊस कमी झाला . आई - अप्पाही आले . पुढे सगळं नीट झालं . अप्पा म्हणाले , ' बाहुबली देवासारखाच धावून आला ! ' अन ते खरंच होतं . मग आम्ही दोन घरं बांधली . एक आमचं आणि शेजारी बाहुबलीचं . आता ते आमच्याकडे कामासाठीच राहिले आहेत . आणि छोटा बाहुबली माझ्याबरोबर शाळेत येतो . त्याच्या घण चालवणाऱ्या हातात आता पेन्सिल आहे . या पेन्सिलचं वजन त्याला घणापेक्षा जास्त वाटतं . डोकं चालवावं लागतं ना ! ... पण शिकेल हळूहळू ! -------------------------------------------------------------------------------------------------------------

वाचने 5216 वाचनखूण प्रतिक्रिया 11

ज्योतीजी तुमचा प्रतिसाद मोलाचा आहे खूपच आभारी आहे . कारण बालकथा फार कोणी वाचत नाही किंवा प्रतिक्रिया तरी देत नाही - कल्पना नाही

शलभ Mon, 04/05/2021 - 20:42
खूप सुंदर गोष्ट. तुमच्या बालकथा आवडतात. माझ्या मुलाला वाचून दाखवतो. त्यालाही आवडतात. तुम्ही लिहीत रहा. आणि अशा सुंदर गोष्टींसाठी धन्यवाद.

In reply to by बिपीन सुरेश सांगळे

शलभ Fri, 04/09/2021 - 10:28
वय वर्षे 6. अजून एक, तुम्ही नावातच बालकथा असं लिहिलं तर आवर्जून वाचले जाईल.