यमकं बिमकं, कविता बिविता..

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
30 Dec 2020 - 4:52 pm

तू म्हणालास ,
"यमकंबिमकं, कविता बिविता ऐकून होतो नुसता जाच
माझ्यासाठी कधीतरी तुझीमाझी गोष्ट वाच."
मला खुदकन् आलं हसू, आपली गोष्ट कशी वाचू?
आगा नाही पिछा नाही, गोष्टीला त्या नावही नाही,
अशी गोष्ट सांगतात का? आणि कुणी ऐकतात का?
समजा जर सांगितली तर तुझं नाव घालू कसं?
नावच जर बदललं तर मी पुढं बोलू कसं?
तो तिला कुठं भेटला, सांगताना पापणी थरथरेल.
कसा हात मागितला? ओठाचा कोपरा हळूच हसेल.
हळवा स्पर्श वाचताना गाल होतील लाल लाल,
पुढची गोष्ट गाणंच जणू, पाय हळूच धरतील ताल.
वाचता वाचता मध्ये मध्ये डोळे माझे मिटून जातील,
भांडणांच्या जागी कधी गंगाजमुना दाटून येतील...
तेव्हा गोष्ट काही गोष्ट नाही, लोकांना पटकन कळेल
कोण गं कोण गं मैत्रिणींचा प्रश्न छळेल?
त्याला उत्तर देऊ कशी?कोरडा चेहरा ठेऊ कशी?

त्याच्यापेक्षा कविताच बरी, ख-या खोट्याची मिसळण सारी.
यमकामध्ये वृत्तांमध्ये सहज लपून जाते चोरी.
रमत गमत हसत हसत, कविता छान वाचता येते,
ऐकता ऐकता ऐकणा-याचीच गोष्ट जणू होऊन जाते.
तुला मात्र कवितेमधला ओ की ठो कळत नाही
मला तेही कळतं रे पण काय करू वळत नाही..

प्रेम कविताकवितामुक्तक

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

30 Dec 2020 - 4:59 pm | ज्ञानोबाचे पैजार

त्याच्यापेक्षा कविताच बरी, ख-या खोट्याची मिसळण सारी.
यमकामध्ये वृत्तांमध्ये सहज लपून जाते चोरी.

हा म्हणजे बैलाचा डोळा फोडला आहे.

अतिशय आवडली कविता

पैजारबुवा,

प्राची अश्विनी's picture

30 Dec 2020 - 5:16 pm | प्राची अश्विनी

धन्यवाद पैजारबुवा!

भारीच! खूप सहज आणि सुंदर आहे हे! :-)

मूकवाचक's picture

30 Dec 2020 - 6:51 pm | मूकवाचक

+१

प्राची अश्विनी's picture

31 Dec 2020 - 9:29 am | प्राची अश्विनी

मूकवाचक आणि राघव, धन्यवाद.

मिसळपाव's picture

31 Dec 2020 - 7:23 am | मिसळपाव

काय सुरेख कविता आहे, व्वा!! यमकानी, नादमय शब्दानी कविता होते खरी पण हे सगळं असलेली एखादी रचना कविता असेलच असं नाही. म्हणून तर एखाद्या प्रसंगाला नाही का आपण "It was like a poetry" म्हणत? नक्की काय असतं त्यात ते सांगता येत नाही पण जे आहे ते काव्यमय आहे हे मात्र चटकन उमगतं! बाय द वे, ही वाचल्यावर मला भक्ती बर्वेची "तुला शिकवीन चांगलाच धडा" आठवली. ही कविताही सुरेखशी म्हणता / गाता येईल. असो. अशावेळी नेहेमीप्रमाणे "कीती सुरेख कविता आहे" ते गद्यात सांगण्याचा प्रयत्न करत नाही, त्यापेक्षा परत एकदा वाचतो ती :-)

प्राची अश्विनी's picture

31 Dec 2020 - 9:28 am | प्राची अश्विनी

वा! प्रतिसाद खूप आवडला. धन्यवाद!:)

विजुभाऊ's picture

31 Dec 2020 - 9:34 am | विजुभाऊ

खूप छान आहे कविता
मजा आली

प्रचेतस's picture

31 Dec 2020 - 9:51 am | प्रचेतस

क्या बात है...! एकदम मस्त.

गोंधळी's picture

31 Dec 2020 - 9:59 am | गोंधळी

मस्त..

प्राची अश्विनी's picture

31 Dec 2020 - 2:54 pm | प्राची अश्विनी

विजुभाऊ, प्रचेतस आणि गोंधळी, धन्यवाद.

टवाळ कार्टा's picture

31 Dec 2020 - 4:35 pm | टवाळ कार्टा

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Dec 2020 - 5:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एकदम ख़ास. आवडली कविता....!

-दिलीप बिरुटे

पॉइंट ब्लँक's picture

31 Dec 2020 - 6:04 pm | पॉइंट ब्लँक

गद्य-पद्य संग्राम छान रंगवला आहे

प्राची अश्विनी's picture

1 Jan 2021 - 8:46 am | प्राची अश्विनी

टका, बिरुटे सर , पॉईंट ब्लॅंंक...
धन्यवाद!

प्राची ताई, अतिसुंदर लिहीलत...
लिहीण्याच्या तंत्राच्या मागची हळवी प्राची पाहीली तर असं अलवार, संवेदनाक्षम मन असलेली युवा-कवयीत्रीला मी थेट 'इंदिरा संत' यांच्या पंक्तीला नेवून ठेवीन.
( bf डोले-शोले मसलवाला dumb पैलवानगडी असेल तर तुमचं कठीण आहे, just kidding)

कुछ नही बदला,
मला वाटलं होतं, fastfood खाणारी, रात्री जागणारी,सदानकदा मोबाईल मधे तोंड खुपसून बसलेल्या युवा पिढीत संवेदना हरवली आहे,
तू मला खोटं ठरवलसं....मला आवडलं ते !!

प्राची अश्विनी's picture

3 Jan 2021 - 2:33 pm | प्राची अश्विनी

:) धन्यवाद!पण इंदिरा संत??? हे जरा अतिच झालं ना.:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Jan 2021 - 1:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इंदिरा संतांच्या कवितेतला साधेपणा आणि स्त्रीसुलभपणा त्याचबरोबर वयाच्या सत्तराव्या वर्षीही त्यांनी उत्तम प्रेमकविता लिहिली म्हणून म्हणत असावे. आपल्या कवितेच्या धाग्यावर आपली परवानगी न घेता इंदिरा संतांची एक कविता लिहितो. आपली कविता अशीच साधी, स्त्रीसुलभ, सुंदर भाव व्यक्त करणारे असते आणि ती कविता वाचतांना आनंद मिळतो.

पत्र लिही पण-

पत्र लिही पण नको पाठवू
शाई मधूनी काजळ गहिरे
लिपीरेषांच्या जाळीमधूनी
नको पाठवू हसू लाजरे.

चढण लाडकी भूवई मधली
नको पाठवू वेलान्टीतून
नको पाठवू तीळ गालीचा
पूर्ण विरामाच्या बिंदूतून

नको पाठवू अक्षरातून
शब्दांमधे अधिरे स्पंदन
कागदातूनी नको पाठवू
स्पर्शामधला कंप विलक्षण

नको पाठवू वीज सुवासिक
उलगडणारी घडीघडीतून
नको पाठवू असे कितीदा
सांगितले तू हट्टी पण

पाठवीशी ते सगळे सगळे पहिल्या ओळीमधेच मिळते.
पत्र त्या नंतरचे मग वाचायचे राहून जाते.

आपल्या मोजक्या निवडक कवितांचं प्रकाशन करा असे आम्ही मागेच सुचवले आहे. बघा कसे जमते ते....!

-दिलीप बिरुटे
(वाचक)

प्राची अश्विनी's picture

5 Jan 2021 - 6:12 pm | प्राची अश्विनी

किती हळवी आणि रेखीव कविता. मला खूप आवडते ही.
आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद. ( आणि या सुंदर कवितेची आठवण आली हे माझ्यासाठी compliment:)).
पण कविता लिहिल्यानंतर मीच जेव्हा परत वाचली तेव्हा मला बात निकलेगी.. वरना चेहरे की तासुर से समझ जायेंगे..." हे आठवलं.
असो.
तुमची सूचना विचाराधीन आहे.
पुन्हा एकदा धन्यवाद.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

1 Jan 2021 - 6:11 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

मस्त रोमँटिक कविता-बिविता

गोरगावलेकर's picture

2 Jan 2021 - 9:13 am | गोरगावलेकर

कविता बिविता यांच्या वाटेलासहसा जात नाही. पण ही आवडली .

Jayagandha Bhatkhande's picture

2 Jan 2021 - 3:31 pm | Jayagandha Bhat...

कविता खूप आवडली..!

मस्तच ...खूप सुंदर लिहिता तुम्ही..अलवार भावना असतात.

प्राची अश्विनी's picture

3 Jan 2021 - 2:04 pm | प्राची अश्विनी

सगळ्यांंना मनापासून धन्यवाद!

स्मिताके's picture

4 Jan 2021 - 10:20 pm | स्मिताके

मस्त आहे कविता. खूप आवडली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Jan 2021 - 1:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुनर्वाचनातही पुन्हा पुन्हा आवडली. धन्यवाद.
असंच लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

Jayant Naik's picture

6 Jan 2021 - 7:29 pm | Jayant Naik

आशय तर सांगायचा पण सत्य थोडेसे लपवूनच ठेवायचे ..याला कविताच हवी.

अनन्त्_यात्री's picture

7 Jan 2021 - 10:46 am | अनन्त्_यात्री

"गुलजार" घराण्याची कविता!

प्राची अश्विनी's picture

17 Jan 2021 - 9:04 am | प्राची अश्विनी

अनंतयात्री आणि जयंतक्षनाईक... धन्यवाद!