श्रीगणेश लेखमाला २०२०- स्नानांतर
Bath is to body what laughter is to soul असे कोणीतरी म्हटलेच आहे, नसेल म्हटले तर मी म्हणतो. जन्माला आल्यावर सर्वप्रथम नर्सबाई काय करतात, तर नवजात बाळाला आंघोळ घालून स्वच्छ करतात. त्याशिवाय खुद्द आईबाबांना तरी दाखवतात का ते बाळ? जन्मल्याबरोबर जे काम आपल्याला चिकटते ते आवडते काम असेल, तर मग त्याचा मन प्रफुल्लित करणारा सोहळा होतो. त्याचे सर्व टप्पे फार आनंददायक होतात आणि हे स्नानसोहळे स्मृतींमध्ये अलगद जाऊन बसतात.
आज पाच दशके भूतलावर काढल्यानंतर कुणी आयुष्याच्या सर्वात आनंदी प्रसंगांबद्दल विचारले, तर मला माझा स्नानप्रवास आठवतो. सकाळी शाळेत जाण्याआधी गारेगार पाण्याने केलेले सचैल स्नान, कडाक्याच्या हिवाळ्यात ऊन-ऊन पाण्याने अंग शेकणारे स्नान, सुट्टीच्या दिवशी आईने खसाखसा घासूनपुसून लख्ख करीत घातलेली आंघोळ, बाबांसोबत जलतरण तलावात केलेले स्नान, सणासुदीचे - प्रसंगविशेष स्नान, आजोळी स्वच्छ नदीपात्रात डुंबत केलेले स्नान... एक ना हजारो आनंदक्षण स्नानाशी जोडले गेले आहेत.
घरी आईचा दिवस सर्वात आधी सुरू होई. तिच्या माहेरी फार धार्मिक वातावरण होते, स्नान केल्याशिवाय ती काही खात-पीत नसे. आम्ही भावंडे अर्धवट झोपेत असताना आईचे स्नान आटोपत असे. हळू आवाजात तिचे गायत्री मंत्राचे पठण ऐकू येत असे. मग चहा-दूध तयार झाले की मला पूर्ण जाग येई. शाळा सकाळची, त्यामुळे आवरून आंघोळ करूनच शाळेत जायचे, असा नियम होता. शेजारीपाजारी सर्व मुलांमध्ये आंघोळ करून वेळेत तयार होण्यात माझा नंबर नेहेमी वर असे. घरी हिरव्या रंगाचा 'हमाम' साबण आम्हा भावंडांचा सामायिक होता. हो, तेव्हा प्रत्येकाला वेगळ्या साबणाची चंगळ नव्हती. त्यामुळे कोरडा साबण मिळावा म्हणून मीच पहिला नंबर लावत असे. ८० वर्षांपेक्षा अधिक वय असलेला शुद्ध हिंदुस्तानी 'लोकल' हमाम साबण आजही ३०० कोटी रुपयाचा ब्रँड आहे! आतासारखे 'आयुर्वेदिक', 'नैसर्गिक', ‘इको-फ्रेंडली’ साबणाचे काही खास कौतुक नव्हते. त्या वेळेपासून (१९३१) नीम, तुळस, अॅलोवेरा अशा नैसर्गिक पदार्थांचा वापर हे हमामचे वैशिट्य टिकून आहे हे खास. आधी टाटा आणि आता हिंदुस्थान युनिलिव्हर बनवतात. आजही महिन्याला काही कोटी हमाम साबण विकले जातात भारतात.
हिवाळ्यात गरम पाण्यासाठी स्टोव्हवर वेगळा हंडा तापत ठेवलेला असे, त्यातले हवे तेवढे गरम पाणी काढून तेवढेच गार पाणी त्या हंड्यात परत उकळण्यासाठी ठेवले जाई. जुन्या आठवणीत हमखास असणारा पाणी तापवण्याचा बंब मात्र आमच्या घरी कधीच वापरात नव्हता. नळाला पाणी ठरावीक वेळी असल्याने आणि शाळेसाठी उशीर होणे लाजिरवाणे समजले जात असल्याने टाइम वॉज ऑलवेज अॅट प्रीमियम... त्यामुळे आंघोळीची खरी मजा रविवारी असे. त्या दिवशी भरपूर पाणी आणि साबण वापरून मनसोक्त आंघोळ करायला कोणाची ना नसे. फक्त त्याआधी 'केस धुणे' हा गंभीर अत्याचार होत असे. केसांसाठी वेगळ्या 'शिकेकाई' साबणाचा प्रवेश आमच्या घरी झाला नव्हता. तेव्हा रोजच्याच साबणाने किंवा कधी तर सर्फसारख्या पावडरींनी आमचे 'मळके, घाण, चिपचिप' केस 'स्वच्छ' केले जात. साबणाचे पाणी हमखास डोळ्यात जात असल्याने हे मला फार त्रासदायक वाटत असे. एकदा हे झाले की हवा तेवढा वेळ पाण्यात खेळायला परवानगी असे. आम्ही भावंडे एकमेकांवर पाणी उडवून, एकमेकांना ढकलून, दंगामस्ती करत रविवारची सकाळ सार्थकी लावत असू. कधीकधी बाबाही आमच्या कंपूत सामील होत आणि आमच्या जलपंचमीला उधाण येत असे.
उन्हाळ्याच्या सुटीत आमच्या मूळ गावी आणि आजोळी विभागून जात असू. दोन्ही ठिकाणची स्नानवैशिष्ट्ये वेगवेगळी होती. आमच्या गावी पाण्याचे दुर्भिक्षच. घरात विहीर नव्हती. गावातल्या दोन विहिरींनाच काय ते पाणी आणि उन्हाळा म्हणजे तिथेही पाणी कमी. आमचा घरगडी लच्छू विहिरीतून हंडे भरून आम्ही घरचे, गडीमाणसे, जनावरे सर्वांसाठीच पाणी आणीत असे. पाणी जपून वापरावे लागे, आंघोळीसाठी काटकसर करावी लागे. तरी त्या घरी स्नान आवडायचे, कारण विहिरीचे थंडगार पाणी आणि 'लाइफबॉय' साबण. गुलाबी रंगाचा, चौकोनी. बाबांच्या लहानपणापासून तोच एकमेव साबण गावात विक्रीला असे. लाइफबॉय आता सुमारे शंभर वर्षे भारतात विकला जात आहे, अगदी मागच्या एका वर्षातच २००० कोटी रुपयांचे लाइफबॉय साबण विकले गेले भारतात! म्हणजे आजही वट असलेला हा खरा सुपरब्रॅंड! पुढे 'लाइफबॉय है जहाँ तंदुरुस्ती है वहाँ' या जिंगलचे मराठी भाषांतर 'लाइफबॉय ज्याचे घरी आरोग्य तेथे वास मारी' असे करून खिदळणे अनेक वर्षे चालले.
तिकडे आजोळी वेगळीच तर्हा. दररोज पहाटे साधारण ५च्या सुमारास ... नंदिनी नलिनी सीता मालती च महापगा विष्णुपदाब्जसंभूता गंगा त्रिपथगामिनी भागीरथी भोगवती जान्हवी त्रिदशेश्वरी द्वादशैतानि नामानी यत्र यत्र जलाशये स्नानोद्यत: स्मरेनित्यं तत्र तत्र वसाम्यहं…….
सर्व जण साखरझोपेत असताना बाहेर आजोबांचे मोठ्या आवाजात स्तोत्रपाठांसह स्नान सुरू असायचे. आता थोड्याच वेळात दिवस उगवणार आणि आपल्याला बिछाना सोडावा लागणार, हे दुष्ट सत्य हळूहळू मनाला स्पर्श करू लागे. बाहेर पेटवलेल्या बंबाच्या धुराचा, गरम पाण्याचा, मैसूर चंदन साबणाचा, अग्निहोत्रात टाकलेल्या अर्धवट पेटलेल्या गोवऱ्यांचा, पूजेसाठी आणवलेल्या ताज्या फुलांचा एक मिश्र दैवी सुवास पसरत असे.
त्यांच्याकडे एक जादुई कुलूपबंद कपाट होते - फक्त साबणांचे! त्यात वेगवेगळ्या ब्रँडचे अनेक साबण हारीने रचलेले असत. लांबचा प्रवास करून जबलपूरला आजोळघरी पोहोचल्यावर ते कपाट उघडून आम्हा भावंडांना प्रत्येकी एकप्रमाणे हवा तो साबण घेता येई, फक्त मैसूर संदल वगळता. मैसूरवर आजोबांचा एकाधिकार होता आणि तो अन्य कोणालाही वापरायला मिळत नसे. त्याचा राग येई.
पुढे अनेक वर्षांनी बंगळुरूला कर्नाटक स्टेट सोप फॅक्टरीत एका कामासाठी गेलो, तेव्हा तेथे मैसूर संदल साबण आणि त्याचे अनेक नवनवीन प्रकार सुंदर वेष्टनात विकायला होते. आजही पूर्वीसारखेच चंदनाचे शुद्ध तेल वापरतात त्यात. मी अधाशासारखे विकत घेतले, स्वतः भरपूर वापरले आणि घरी-दारी-मित्रांना भेट म्हणून दिले. 'छोटा बच्चा' असलो, तरी मला नाही म्हणतात म्हणजे काय? ते एक सोडले तर भेडाघाट, ग्वारीघाट अशा नर्मदेच्या वेगवेगळ्या घाटांवर स्वच्छ गार पाण्यात तासनतास केलेले स्नान ही आजोळची सर्वोत्तम आठवण.
सौंदर्यतारकांचा म्हणून नावाजलेला 'लक्स' साबण फार प्रसिद्ध होता. मध्यमवयीन-मध्यमवर्गीय स्त्री-पुरुष आधी फारसा वापरत नसत. शेजारपाजारच्या कॉलेजकुमारी-कुमार मात्र तो साबण खास वापरत. त्यांचा हेवा वाटत असे. मी साधारण १० वर्षांचा होतो, तेव्हा केसांसाठी वेगळा साबण दिसू लागला. श्रीमंत नातेवाईक स्त्रिया 'केशनिहार' साबण वापरत. गोदरेज आणि विप्रो ब्रँडचे 'शिकेकाई' साबण आले आणि मग केशनिहारचे कौतुक संपले. शिकेकाई साबण पुरुष मंडळी मात्र वापरत नसत, आम्हा मुलांनासुद्धा केसांसाठी शिकेकाई साबण वापरणे फार 'गर्ली' वाटत असल्यामुळे आम्ही रोजचाच साबण केसांना फासत असू.
मग काही वर्षांनी 'सनसनाती नींबू की ताजगी' देणारा लिरिल, 'सुपर फ्रेश' सिंथॉल आणि नीम की गुणवत्ता लिये 'मार्गो' असे अनेक ब्रँड बाजारात दिसू लागले. टीव्ही रंगीत झाला आणि जाहिरातीत दिसणारी बिकिनीतली सचैल लिरिल कन्या सर्वत्र चर्चेचा विषय झाली. पुढेही अनेक वर्षे लक्सचे 'फिल्मी सितारों का सौंदर्य साबुन' हे स्थान आणि लोकप्रियता कायम राहिली. ९०नंतर विप्रोच्या संतूर साबणाने लक्सच्या इंद्रासनाला बऱ्यापैकी झटके दिले. 'आप की त्वचा से आप की उमर का पता ही नही चलता' हे फार गाजलेले कॅम्पेन. पण तो 'गर्ली' आहे हे माझे मत काही बदलले नाही. आम्हा पुरुष मंडळींसाठी विशेष वेगळे साबण फारसे नव्हते. लाइफबॉय, सिंथॉल आणि ओके याच साबणांना 'पुरुषांसाठी' म्हणून मान्यता होती. पुढे सुपरस्टार शाहरुख खानने 'लक्स'साठी टबबाथ घेत हे बदलण्याचा एक प्रयत्न केला. त्यामुळे लक्स फक्त बायका वापरतात हा समज थोडा कमी झाला.
फेब्रुवारी १९८२ ह्या महिन्यात माझ्या स्नानप्रेमासाठी एक नवे युग अवतरले. आम्ही स्वतःच्या मोठ्या घरात राहायला गेलो. ह्या घरात वेगळे मोठे भिंतभर टाइल्सची सुखद रंगसंगती असलेले कोरे करकरीत स्नानघर होते. पूर्ण बंद होणारा दरवाजा, उत्तम सूर्यप्रकाश आणि मुख्य म्हणजे डोक्यावर भरपूर जलधारांचा 'शॉवर' होता! आजवर स्नान म्हणजे बादलीत किंवा घंगाळात असलेले पाणी अंगावर घ्यायचे असे स्वरूप बदलून जलौघाचे रेशमी तुषार अंगावर झेलत सचैल स्नान करायचे, असा सुखवर्धक बदल झाला. माझे आंघोळीचे तास वाढले. आमचे शहर उन्हाळ्यात प्रचंड तापत असे, पाणीटंचाई मात्र नव्हती. त्यामुळे दिवसातून दोनदा स्नानाचे सुख लुटले जाई. पुढे काही वर्षांनी पाणी तापवायला गीझर आला, गरम पाण्याचा हिवाळी स्नानसोहळा जास्तच लांबल्यामुळे पूर्ण स्नानघरात वाफेचे धुके पसरत असे. त्यातून बाहेर पडताना आपण ढगातून बाहेर पडून जमिनीवर पाय ठेवत आहोत असा फील येत असे.
१९८०पासूनच शाम्पूच्या बाटल्या आमच्या शहरातल्या दुकानांत दिसू लागल्या होत्या. हे महागडे प्रकरण आपल्यासाठी नाही असे सर्वच मध्यमवर्गीय लोक समजत, त्यामुळे ते काही आमच्या घरी आणले गेले नाही. शाम्पू प्रकरणात खरी क्रांती 'चिक - CK' नामक शाम्पूच्या सॅशे पॅकने घडवली. १ रुपया अशी माफक किंमत, तीव्र सुगंध, भरपूर फेस असे सर्व काही त्यात होते. बहुतेक १९८३ साल असावे. हे झाले आणि मग मात्र वेगवेगळ्या सर्वच ब्रॅण्ड्सचे शाम्पू असे सॅशेमध्ये मिळू लागले, जास्त आवाक्यात आले. २-५ वर्षांतच ते स्नानाचा अविभाज्य भाग बनले. आज तर देशातील एकूण शाम्पूविक्रीपैकी ७५% विक्री फक्त 'सॅशे पॅक'ची असते.
माझ्या स्नानसोहळ्यातही शाम्पूचे कौतुक वाढतेच राहिले. साधारण १० वर्षांनी त्याचा धाकटा भाऊ 'कंडिशनर' बाजारात आला. कंडिशनरचा जन्म मात्र पुरुषांच्या गरजेपोटी झाला आहे, 'ब्रिलियंटाइन' ह्या दाढी-मिश्या चमकदार करणाऱ्या उत्पादनाचे दुसरे रूप म्हणजे कंडिशनर. काही ब्रॅंड्सनी आधी शाम्पूसोबत कंडिशनर मोफत वाटले आणि पुढे त्याची सवय कधी लागली ते समजलेच नाही.
* * *
१९९४पासून नोकरीधंद्याला सुरुवात झाली, शहर बदलले. सर्व साबण, शाम्पू स्वतःच्या आवडीचे घेता येऊ लागले. याच वेळी लिक्विड सोपचे पेव फुटले. एकापेक्षा एक सरस सुगंध असलेले हे द्रवरूपी नावीन्य, त्याचा फेसच फेस आणि त्यासाठी वेगळे 'लूफा' असा जामानिमा. एकदम राजेशाही. मुंबईतील अनेक छोट्या घरात राहिलो. इथे जागा कमी आणि बाथरूम तर मी जेमतेम उभा राहून ओला होऊ शकेन एवढीच जागा असलेले. बाहेर घाम आणि प्रदूषण भरपूर, त्यामुळे दिवसातून दोनदा स्नान हा शिरस्ता कायम राहिला, तरी स्नानसुखात व्यत्यय मात्र आला.
तोवर खास पुरुषांसाठी म्हणून साबण आणि स्नानप्रावरणे भारतीय बाजारात दिसू लागली होती, त्यांचा लाभ घेण्याएवढी ऐपत आली होती. 'एक्स्ट्राव्हॅगंटली मेल' अशी खास टॅग लाइन असलेला 'आरामस्क' साबण दिल्लीच्या दिवान वाधवा ग्रूपने आणला. तो आम्हा तरुण मुलांमध्ये फारच लोकप्रिय झाला. वेगळा, थोडा तीव्र सुवास आणि वेगळाच आकार, साबणाच्या वडीवर एक डौलदार A अक्षर कोरलेली पट्टी असे ते आकर्षक प्रॉडक्ट होते. नीश की काय म्हणतात तसे. तो अनेक वर्षे मी वापरला. पुढे क्रेझ ओसरली आणि तो ब्रँड विस्मृतीत गेला. एका मराठी मुलीने ब्रँड रिव्हायव्हल शीर्षकाखाली ह्या साबणावर शोधप्रबंध सादर केला, इतकी त्याची लोकप्रियता. जुन्या गाण्यांचे जसे रिमेक बाजारात येते, तसे काही खास ब्रॅंड्सचे व्हायला पाहिजे.
दिवाळीचा सण आणि 'मोती' साबणाने स्नान हे अद्वैत तर वर्षानुवर्षे उपभोगतोच आहे. तो सुवास आणि दिवाळी एकमेकांना पर्यायवाची जणू.
पितृत्व लाभले, तेव्हा स्नानप्रेमामुळेच नवजात बाळाला आंघोळ घालायची जबाबदारी सहज स्वीकारली आणि पार पाडली. जसजसे वय वाढत गेले, तसतसे साबण आणि आइसक्रीमच्या जाहिराती सारख्याच होत गेल्या - मलाई, बदाम, फळांचे रस दोहोंत असल्याचे कानीकपाळी सांगण्यात येऊ लागले. साबणातून 'नैसर्गिक' सुगंध हळूहळू कमी होत गेला आणि साबण 'दिसायला' सुंदर होऊ लागले. आता 'खादी'सारखी दर्जेदार (आणि महाग) उत्पादने सोडली, तर 'खरे' सुवास दुष्प्राप्य झाले आहेत.
पुढे कामानिमित्त देशभर-जगभर प्रवास करता आला. आलिशान-गेलिशान सर्वच प्रकारच्या गेस्ट हाउस, लॉज, तारांकित-बिनतारांकित अशा हॉटेलातून राहण्याचे प्रसंग वाढले. जणू एक नवीन स्नान-दालन पुढ्यात आले. तेव्हा आणि आताही रूमचा ताबा मिळाला की सर्वात आधी तेथील बाथरूमचे निरीक्षण-परीक्षण करणे आणि तिथले शॉवर-तोट्या उघडबंद करण्याचे विशेष तंत्र समजून घेणे हे प्रचंड आवडीचे काम आहे. त्यामुळे नंतर होणारी फजिती होत नाही हा मोठा फायदा. त्यातही प्रचंड वैविध्य असते हे कळले. उंची हॉटेलातून स्नानागारांच्या रचनेवर भरपूर मेहनत घेतलेली दिसून येई, स्वच्छतेचा, सौंदर्याचा आणि स्नानानुभव समृद्ध करण्यासाठी लागणाऱ्या वातावरण निर्मितीवर भर दिलेला असतो. स्नानाचा आनंद शतगुणित होत गेला.
वेगवेगळ्या शहरात मुक्कामात बाथ टब, बाथ सॉल्ट, बाथ बॉम्ब्स आणि बबल बाथ यासारखे नखरेल प्रकारही पुरेपूर अनुभवले. Wash away your troubles with some bobbles हे ध्येयवाक्य ठेवून स्टीम बाथ, सौना बाथ, व्हिटॅमिन फिल्टर लावलेले शॉवर, पाठीच्या कण्याला सुखद मसाज देणारे प्रेशर शॉवर, जाकुझी असे शरीराचे चोचले करण्यात मागे राहिलो नाही. अत्याधुनिक स्नानगृहांमुळे काहीदा फजितीही झाली. जपानी हॉटेल्समधली स्पेस कॅप्सुलसारखी अरुंद स्नानगृहे आणि माझे सहाफुटी धूड हे व्यस्त प्रमाण सहन न झाल्यामुळे त्यात असलेल्या असंख्य तोट्या-बटणे-रिमोट-अलार्म यांनी वात आणला होता. स्वीडन आणि जपान दोन्हीकडे पारंपरिक बाथहाउसचा अनुभव घ्यायला म्हणून गेलो असता तिथल्या 'दिगंबर ओन्ली' अटीमुळे काही क्षण अवघडलो होतोच.
विशेष
वाचने
89323
वाचनखूण
प्रतिक्रिया
86
लाफ्टर आणि बाथ तुलना एकदम झकास. स्नानमहात्म्य, स्नानप्रवास, मस्त. साबणप्रवास एकदम सुवासिक. केश निखार कधी पाहिला नाही तर अॅरामस्कची आठवण कळ देऊन गेली. लिरीलची सुरुवातीची बॅच अफलातून होती. नंतर सुगंध मृदु केला गेला.
साबण आणि टॉवेल पांढरा असेल तर चकाचक स्नानगृहाची ऐट खुलते. असा मस्त अलीशान स्नानगृहासारखा आनंददायी लेख. धन्यवाद.
In reply to सुंदर, अप्रतिम ...... by सुधीर कांदळकर
@ सुधीर कांदळकर
तुम्ही बरोबर टिपले आहे, केश निखार नाव होते ते. लेखात चुकून केश निहार टंकले आहे.
लिरिलचा सुगंध नंतर सौम्य करण्याबद्दल सहमत. सुरवातीला खरंच 'सनसनाती निम्बू की ताजगी' होते ते प्रकरण. नवीन मिपाकर अनुराधा काळे (त्यांचा एक लेख आहे या गलेमात) यांना लिरिलकडून उत्कृष्ट स्लोगनसाठी पहिले बक्षीस मिळाले होते.
टॉवेल इत्यादींचा पांढरा रंग घरी कितीही स्वच्छ धुतले तरी त्या हॉटेलवाल्यांसारखा धवल शुभ्र होत नाही हे खरे आहे :-)
प्रतिसादाबद्दल आभार.
_/\_
सुगंधी आठवणी. शेवट मात्र दुखावणारा.
In reply to छान लेख by स्मिताके
@ स्मिताके,
आभार.
... शेवट मात्र दुखावणारा ...
चार धागे सुखाचे...
In reply to आनिन्द्य, by सन्दीप बोराळकर
@ सन्दीप बोराळकर,
मी इथे तुमचे नाव २-३ दा बघितले, खात्री करून घेतली :-) व्हॅट्सऍपवर तुमचा सुंदर प्रतिसाद आला होताच. FMCG क्षेत्रातील तुमचा अधिकार माहिती असल्यामुळे तुमचा प्रतिसाद बहुमूल्य आहे. मलाच पुन्हा-पुन्हा वाचण्यासाठी इथे डकवतो आहे :-)
===============
Anindya, this is just fantastic. Despite day-to-day rush, you never forget to appreciate and enjoy smaller joyful moments of life. I enjoyed reading it for one more reason. I spent major part of my professional life in different capacities, in making many products you spoke about and they are very close to my heart. Especially Hamam, Lifebouy, Lux, Moti, Santoor, Wipro Shikakai, Sachets of Clinc, Sunsilk shampoo and so on. One more product I like so much due to my deep professional involvement, not sure how it failed to find place here was Pears ☺
But great experience reading your article. Thanks for writing and sharing. Want to share this with some of my friends.
Another point I must mention is the end of this article is very touching. I could feel it and will remain in my mind for a long time.
संदीप बोराळकर
===================
अनेक, अनेक आभार. _/\_
_/\_
In reply to _/\_ by स्वराजित
थँक्यू
_/\_
मस्त लेख. आता साबणांना तो पूर्वीचा वास येत नाही हे खरं आहे. हल्ली उटण्याला पण काहीच वास नसतो किंवा बाहेरून कृत्रिम वास घातलेला असतो.
मेडीमिक्सचा उल्लेख राहिला. उशिरा आला असला तरी त्याने आपला एक चाहता वर्ग निर्माण केला होता आणि अजूनही आहे. बाकी ते आंबा,चेरी,द्राक्ष आणि इतर फळांचे रस असल्याचा दावा करणारे साबण गोड गोड वासामुळे नको वाटतात.
In reply to मस्त लेख. आता साबणांना तो by तेजस आठवले
@ तेजस आठवले,
मेडीमिक्स !
सर्व 'जीवा' 'प्राणा' 'आरोग्यम' अशी नावे असलेल्या स्पा मध्ये नक्की असतो हा साबण.
प्रतिसादाबद्दल आभार.
लेख सुंदर आणि सुवासिक साबणासारखाच आनंददायी आहे. मला नेहमीच आंघोळ ही उरकण्यासाठीच असते असं वाटत आलंय, हा लेख वाचून एक वेगळा दृष्टिकोन मिळाला.
भारावल्यासारखी लेख वाचत होते आणि शेवटचे वाक्य वाचून एकदम डोळे भरून आले.
In reply to सुंदर आणि सुवासिक by स्मिता.
@ स्मिता.,
सुंदर प्रतिसादाबद्दल अनेक आभार.
सुंदर लेख ! तुमचे आधीचेही लेख वाचत आहे! तुमची लेखन शैली अलौकिक आहे. मनाला भिडणारी आहे. वाचतांना आपण तिथेच आहोत असे वाटते.
या लेखाचे शिर्षक स्नानांतर खुपच छान
In reply to सुंदर लेख ! तुमचे आधीचेही लेख by शारदा १३
@ शारदा १३,
कौतुकाच्या शब्दांबद्दल आभारी आहे.
शीर्षक आवडल्याचे कोणीतरी सांगेल याची वाट पाहत होतो मी :-)
खूप छान लेख. एक सुगंधी सफर घडवून आणलीत. आमच्या लहानपणी वडील कायम रेक्सोना साबण आणायचे. तोच परवडायचा. तसा त्याला एक सौम्य सुगन्धहि असायचा. मग मला नोकरी लागल्यावर मी लक्स आणायला लागले. वेगवेगळे साबण आणावे असं सुचलंच नाही.
In reply to खूप छान लेख. एक सुगंधी सफर by अनिता ठाकूर
@ अनिता ठाकूर,
थँक्यू !
रेक्सोना आणि लिरिल दोन्ही लिंबाच्या फ्रेश वासामुळे पॉप्युलर साबण होते. लक्स तर 'सुपरब्रॅंण्ड' आहेच
माझेही आजोबा म्हैसूर सॅंडल फक्त स्वतः च वापरायचे. व ते तसे करत याचं काही कुणाला वाटत नसेल. लहानपणी लाईफबॉय, ज्याला फेसही यायचा नाही, मग काही काळानंतर हमाम, संतूर, अशी स्थित्यंतरे मीही पाहीली आहेत. मोती केवळ दिवाळीतच. त्याचं फार अप्रूप वाटायचं. आजही दिवाळीला त्याने आंघोळ नाही केली तर दिवाळी असल्यासारखे वाटतच नाही. शेवट मात्र हळवा करुन गेला. नेहमीप्रमाणेच अप्रतिम लिखाण!
In reply to नॉस्टॅल्जिक झाले by श्वेता२४
@ श्वेता२४,
... माझेही आजोबा म्हैसूर सॅंडल फक्त स्वतः च वापरायचे. ....
Maybe that was their way of feeling special .... breadwinner's previlage सारखे काहीसे असेल. आता समजू शकतो, त्यावेळी मात्र राग-राग करत असे मी.
तुम्ही स्नानातली स्थित्यंतरे माझ्यासारखीच अनुभवली याचा आंनद झाला.
In reply to नॉस्टॅल्जिक झाले by श्वेता२४
@ श्वेता२४,
... माझेही आजोबा म्हैसूर सॅंडल फक्त स्वतः च वापरायचे. ....
Maybe that was their way of feeling special .... breadwinner's previlage सारखे काहीसे असेल. आता समजू शकतो, त्यावेळी मात्र राग-राग करत असे मी.
तुम्ही स्नानातली स्थित्यंतरे माझ्यासारखीच अनुभवली याचा आंनद झाला.
चांगल्या लेखाबद्दल धन्यवाद
स्नाना संदर्भात पाण्यात Dettol ,u d cologne आणि सुगंधी तेले (essential oils) टाकून स्नान करण्याची पण एक पद्धत आहे आणि त्याने पटकन उरकले जाते
पूर्वी नवनवीन साबण जाहिराती बघून उत्साहाने आणले जायचे पण त्वचा संवेदनशील असल्याने साबणाच्या एक दोन वापरानंतर लगेच चेहऱ्यावर फोड यायचे
त्यामुळे नंतर साबण वापरणं बंदच केले घरी म्हैसूर सॅंडल वापरतात
सध्या dettol मॉम्स साबण चांगला वाटतोय पतंजलीचे पण चांगले असतात पण लवकर संपतात
In reply to चांगल्या लेखाबद्दल धन्यवाद by Prajakta२१
Prajakta२१
.... पाण्यात Dettol ,u d cologne आणि सुगंधी तेले (essential oils) टाकून स्नान ....
हो तर ! मला वाटतं निम्मा युरोप असेच स्नान करत असावा.
प्रतिसादाबद्दल आभार !
आहाहा, मस्त आठवणी !!! वाचूनच ताजतवानं झाल्यासारखं वाटलं, आता अंघोळीला सुट्टी मारायची असेल तर हा लेख वाचायला हरकत नाही :D . कृ . ह . घे .
In reply to आहाहा, मस्त आठवणी !!! वाचूनच by वीणा३
हा हा :-))
थँक्यू @ वीणा३
दिवाळीचा सण आणि 'मोती' साबणाने स्नान हे अद्वैत तर वर्षानुवर्षे उपभोगतोच आहे.तंतोतंत! - (अंघोळीचा कंटाळा न करणारा) सोकाजी
In reply to झक्कास! by सोत्रि
@ सोत्रि / सोकाजी,
जय हो !
मोती साबण आणि दिवाळी निदान महाराष्ट्रात तरी एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत :-)
उत्तम लेख.
आमचे वडील नेहमी दर महिन्याला वेगवेगळा साबण आणत असत कारण तोच तोच सुगंध वापरून तुम्हाला त्याचा कंटाळा येऊ शकतो.
त्यामुळे सगळ्या तर्हेचे साबण वापरून झाले आहेत. मुळात साबण नवीन काढला की जितका छान वास येतो तितका तो अर्धा झाल्यावर येत नाही.
In reply to उत्तम लेख. by सुबोध खरे
.... साबण नवीन काढला की जितका छान वास येतो तितका तो अर्धा झाल्यावर येत नाही.....
होय. कदाचित त्यामुळेच अर्धवट संपलेल्या- झिजलेल्या साबणाची रवानगी 'तिकडचे' हात धुण्यासाठी होत असे. त्यासाठी हँडवॉश बराच नंतर आला :-)
अप्रतिम
In reply to अप्रतिम by मोगरा (verified= न पडताळणी केलेला)
थँक्यू @ मोगरा
वर्णन आवडले.
लहानपणीच्या आन्घोळीच्या जोडीनेच लक्षात राहिलेले काही "सुगन्ध" : न्हाणीघरच्या चुलीत अनेक गोष्टी (काहीवेळा वडीलधार्यान्च्या नजरा चुकवून) भाजल्या जायच्या, जसे भुइमुगाच्या शेन्गा, रताळी, हरभरा आणि तो "सुगन्ध" नन्तरही काही काळ दरवळत रहात असे. अहाहा. असे पदार्थ "बारबेक्यु नेशन"ला माहीतही नसतील.
In reply to वर्णन आवडले. by शेखरमोघे
आयडियाची कल्पना झकास !
अंघोळ झाली की लागलीच बार्बेक्यू तयार 😋
प्रतिसादाबद्दल आभार 🙏
एकदम वेगळा विषय, लेख तर सुगंधित अन् मुलायम... आवडला.
In reply to एकदम वेगळा विषय, लेख तर by प्राची अश्विनी
शुक्रिया, आभार, थँक्यू !
आज सहज बघितले तर स्नानांतराला तीस हजारी मनसबदारी !
वाचकसंख्या बघून फार आनंद झाला, हे फक्त मिपावर शक्य आहे _/\_
सुंदर, अप्रतिम ......