श्रीगणेश लेखमाला २०२० - विली वोंका कॅडबरी काँटेस्ट (Willy Wonka Cadbury Contest)
छान पत्र लिहिले. फॉर्मवर स्लोगन लिहिले. फॉर्मला आठवणीने मोठ्या कॅडबरी चॉकलेटचा रॅपर जोडला. साध्या पोस्टाने पत्र रवाना केले. तेव्हा कुरियर वगैरे कुठे होते? सुट्टी संपता संपता बहीण आणि कंपनी परत गेले आणि काही दिवसांतच 'कॅडबरी फ्राय' अशी डौलदार अक्षरे मिरवणाऱ्या कंपनीच्या पेडर रोडवरील ऑफिसमधून अभिनंदनपर पत्र! 'पाच सर्वोत्तम एन्ट्रीजमध्ये तुमच्या स्लोगनची निवड झाली आहे. बक्षीस म्हणून तुम्ही जो कॅडबरी चॉकलेटचा रॅपर जोडला होता, ते चॉकलेट तुम्हाला एक वर्ष घरपोच येईल.' परत परत पत्र वाचले आम्ही. पुढील एक तारखेला कंपनीतर्फे फोन आला की आज आमची व्हॅन येईल अकरा वाजता. अभिनंदन! बरोबर अकरा वाजता व्हॅन आली. परत अभिनंदन करून कंपनीचा माणूस चॉकलेटचा बॉक्स देऊन गेला. आमची कॉलनी तशी लहानच. बातमी पसरली होतीच. व्हॅन बघायला गॅलरीत खिडकीपाशी मैत्रीणी! मुलांचेही मित्रमैत्रिणी. आमचाही उत्साह ओसंडून वाहत होता. शेजारीपाजारी, नातेवाईक, मुलामुलींची मित्रमैत्रिणी सगळ्यांना चॉकलेटच्या आनंदात सहभागी करून घेतले. माझा आतेभाऊ म्हणायचा, "चला, काळ्यांकडे कॅडबरी सीझन चालू आहे.” त्या वेळी साठे बिस्किटे, पार्ले बिस्किटे ह्यांची सिंगल चॉकलेट्स होती. कॅडबरीला कोणी कॉंम्पिटिशन नव्हती. आज आपण अमूल, Toblerone, KitKat, Perk, Ferrero Rocher असे अनेक प्रकार मुलांना घेताना बघतोच. त्या वेळी कॅडबरीची शान वेगळीच. कोणी आमच्याकडे आले की कॅडबरी देताना कसे आम्ही स्ट्रँड थिएटरला मुलांना घेऊन Willy Wonka & the Chocolate Factory हा इंग्लिश सिनेमा बघायला गेलो, कसा स्पर्धेचा फॉर्म मिळाला, कसे स्लोगन लिहिले, कोणता रॅपर जोडला ही सगळी स्टोरी सांगताना 'लई भारी' वाटायचे. ऐकणाऱ्यालासुद्धा एक वर्ष कॅडबरी मिळणार ऐकून नवल वाटायचे. चॉकलेटची गोडी आणखीन वाढायची! आमच्या एक लक्षात आले की मुलांचे मित्रमैत्रिणी जास्तच यायला लागले आहेत. हेच ते रम्य बालपण. एक गोष्ट मी कटाक्षाने करायची. चॉकलेट खाल्ल्यावर बेसिनपाशी जाऊन दात स्वच्छ धुवायला लावायची. ती मुलेसुद्धा "Yes Aunty, Yes Aunty” म्हणून ऐकायची. कारण उद्याचे चॉकलेट खुणावत असायचे. पंजाबच्या बहिणीला छान घट्ट झाकणाच्या थ्रेप्टिन बिस्किटाच्या मोठ्या डब्यात कॅडबरी चॉकलेट्स आपल्या भारतीय पोस्ट आणि टेलिग्राफ ऑफिस - म्हणजे Indian Post And Telegraph Officeतर्फे रजिस्टर्ड पार्सलने पाठवली. त्यांना पार्सल अगदी व्यवस्थित व वेळेत मिळाले. त्यांनीही सगळ्यांनी खूप आनंद घेतला. मी घरी कॅडबरी चॉकलेटचा मिल्कशेक, कस्टर्ड, आइसक्रीम असे प्रकार केले. दर महिन्याला कॅडबरी कंपनीची व्हॅन एक तारखेला सकाळी अकरा वाजता हजर! तत्पूर्वी कंपनीतर्फे अभिनंदनपर फोन आणि गाडी येईल असे सांगायचे. ३० दिवसांचा महिना - ३०चॉकलेट्स; ३१चा महिना - ३१चॉकलेट्स; २८चा महिना - २८! + किंवा - अजिबात नाही! कॅडबरी चॉकलेटने अगदी मन तृप्त झाले. मला लहानपणी मनसोक्त खाल्लेल्या कोकणच्या राजाची हापूस आंब्याची आठवण आली. दर वर्षी आमच्याकडे रत्नागिरीहून आंबेवाले मामा यायचे एप्रिलच्या सुरुवातीला आंब्याची ऑर्डर घ्यायला. आमच्या वाडीतील २५-३० टोपल्यांची ऑर्डर तर ठरलेली. मामा माळकरी होते. कपाळावर गंधाचा टिळा. पांढरी टोपी, कुडता, धोतर, पायात कोल्हापुरी वहाणा. त्या वेळी आंबे शेंड्यावर असायचे. कोणाचा शेकडा १००+१०, तर कोणाचा १००+२०.. पण ह्या मामांचा शेकडा मात्र १००+३० इतका! एक एक फळ निवडक. थोडा अॅडव्हान्स घ्यायचे, बाकी विश्वासावर! ते आंबे खाऊन जी तृप्ती यायची, ती दुसरा सीझन येईपर्यंत! इतके छान आंबे! तर असा हा कॅडबरी चॉकलेटचा गोड 'Nostalgic Experience' तुमच्याबरोबर शेअर करताना मला खूप आनंद होतो आहे, जरी ऑनलाइन असला तरी! सध्याची परिस्थिती नसती ना, तर हा गोड अनुभव प्रत्यक्ष चॉकलेट्स देऊनच सांगितला असता. पण आत्ता असाच घ्या!!!!
विशेष
वाचने
41581
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
व्वा.!
लेख आवडला. भारी आहे हे, वेगळाच विषय आणि वेगळ्याच आठवणी. मस्त.
छान ! स्मरणरंजन आवडले. आज कॅडबरी ला स्पर्धा असली तरी ती जाणवण्याइतपत नाही. आजही मोठ्ठे चॉकलेट म्हणजे कॅडबरी. नेस्ले / अमूल यांचा कॅडबरी ला टक्कर देण्याचा अनेक वर्षे प्रयत्न चालू आहे.
मस्त लेख !
स्मरणरंजन खूप आवडले.
हे वाचून माझीही एक जुनी आठवण ताजी झाली.
माझ्या लहानपणी डोंबिवली पूर्वेला स्टेशन जवळ एक नवीन आईस्क्रीम पार्लर सुरु झाले होते तेव्हा त्यांनी विद्यार्थ्यांसाठी एक स्पर्धा ठेवली होती. पांढऱ्या कागदावर एक प्राणी, पक्षी, इमारत किंवा नक्षीदार आकार रेखाटलेले असत ते रंगवून देण्याची.
चित्र कसं रंगवलंय हे महत्वाचे नव्हते त्यामुळे सहभाग घेतलेल्या सगळ्यांनाच बक्षीस म्हणुन एक आईस्क्रीमचा फॅमिली पॅक मिळत होता.
एक महिना सुरु असलेल्या ह्या स्पर्धेत घरापासून दुकान जवळ असल्याने रोजच सहभाग घेऊन रोज एक आईस्क्रीमचा पॅक मिळवला होता.
धन्यवाद आणि पुढील लेखनास शुभेच्छा!
अरे वा मज्जाच.
https://twitter.com/misalpav/status/1297077695692419072
व्वा खूपच मस्त लेख!
Charlie and the Chocolate Factory पाहिल्याने लेख अधिक भावला. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ranjan gavala | Female version | new song | by kartikiमस्त आठवणी.
Charlie and the Chocolate Factory अगदी गोड गोड सिनेमा.. तुमच्या Cadbury आठवणी एकदम खास!!
सुंदर लेख.
सुरेख आठवण आणी फोटो . जॉनी देप चा Willy Wonka चा रोल असलेला Charlie and the Chocolate Factory अधुन मधुन केबलवर लागत असतो .
मस्त आठवण! कॅडबरीला अजूनही तोड नाही. आता त्यांनी चॉकलेट या शब्दालाच रिप्लेस केलंय यातच सगळं आलं!
बाकी स्ट्रँड सिनेमाचा फोटू बघून एकदम मूड बनला.. भारीच! धन्यू :-)
व्वा, 'लई भारी' नॉस्टॅलजिक आठवण !
सुपर मस्त लेख !
अश्या गोष्टी नशिबात असायला देखील योग लागतात !
कॅडबरीला ती कॅडबरीच ! कॅडबरी दा जवाब नहीं !
माझा एक नातेवाईक तळेगाव-इंदोरीच्या कॅडबरीत मोठ्या पदावर काम करायचा, काही पॅक्स फुकट आणि काही हजारांचे सवलतीत !
तो तिथं असे पर्यंत कॅडबरीची दिवाळी साजरी केली !
CRUNCH IN A MUNCH
IT IS MY LUNCH
खुपच सुंदर slogan.. आवडले..
लिखान अप्रतिम, सहज.. साधे.. सोप्पे..
वाचुन तुमच्या घरीच ऐकतोय सारे असे वाटले..
म्हणुन ह्या ओळी जास्त आवडल्या..
कोणी आमच्याकडे आले की कॅडबरी देताना कसे आम्ही स्ट्रँड थिएटरला मुलांना घेऊन Willy Wonka & the Chocolate Factory हा इंग्लिश सिनेमा बघायला गेलो, कसा स्पर्धेचा फॉर्म मिळाला, कसे स्लोगन लिहिले, कोणता रॅपर जोडला ही सगळी स्टोरी सांगताना 'लई भारी' वाटायचे---- आता इतका छान रिप्लाय दिलाय, एक बॉक्स चॉकलेट्स मिळतील काय? :-))
छान आठवणी आणि लेख सुद्धा
आठवणी. स्लोगन तयार करण्यात आपल हातखंडा जाणवतो आहे. सध्या डिक्शनचाच व्यवसाय असल्यास आश्चर्य वाटणार नाही. मस्त प्रवाही वेगवान भाषा. मजा आली. त्या काळी कॅडबरीला तोडीचा पर्याय नव्हता हे खरेच. वर्षभर दर महिन्याला डबा: ग्रेट! वाचतांना जीभ चाळवलीच.
स्ट्रँड चे चित्र पाहून हरखून गेलो. मुंबईतले सगळ्यात छोटे सिनेमागृह. सर्वात आधुनिक ध्वनीव्यवस्था असलेले. मॅकेनाज गोल्ड इथे दीडदोन वर्षे चालला होता. त्यातल्या उत्कृष्ट स्टीरीओ ध्वनीमुद्रणामुळे घोड्याने दगडावर पाय ठेवल्यावर नालाचा होणारा आवाज पण स्पष्ट ऐकू येई. डावीकडचा आवाज डावीकडून आणि उजवीकडचा आवाज उजवीकडून. एवढेच नव्हे तर एकदा आपल्याकडे पाठ केलेला उभा एकजण काचेची बाटली मागे फेकतो तर बाटली आपटून फुटल्याचा आवाज आपल्या मागून येई. हे तेव्हा नवे, थरारक आणि सुखद धक्का देणारे होते.
माझ्या देखील छान आठवणी जागवल्यात. धन्यवाद.
क्या बात है, मस्त आठवणी. आणि लिहिलंय अगदी खुसखुशीत. स्पर्श केलं की सोनं होणार्या वस्तूच्या गोष्टीची आठवण झाली. आपण सहभागी झालात की बक्षीस मिळालं. आपण नशीबवान आहात, लक तुमच्याबाबतीत सतत तुमच्या बाजूने राहीलं हीच गोष्ट मला खुप आवडली. बाकी, आठवणी सुरेखच. लिहिते राहा. मिपावर येत राहा.
-दिलीप बिरुटे
मस्त स्लोगन लिहिले तुम्ही!! सुंदर आठवणी.
मस्त लिहीले आहे. माझ्यासाठी चॉकलेटचे हे विश्व अगदी अपरिचित आहे, कारण मला अगदी लहानपणापासून आजतागायत कधीच चॉकलेट खावेसेच वाटलेले नाही, का कुणास ठाऊक.
In reply to मस्त लिहीले आहे. by चित्रगुप्त
तर मग निदान Charlie and the Chocolate Factory हा चित्रपट जरूर पहा मालक ! जॉनी डेप या नटाने मध्यवर्ती भूमिका जबरदस्त रंगवलीय !
छान आठवणी. सुरेख लिहिलं आहे.
आता बरेच प्रकार आलेत कॅडबरीचे. पण डेअरी मिल्क हे पर्सनल फेवरिट !
अगदी प्रसन्न वाटलं वाचून.
अतिशय वेगळा विषय वाचून खूप छान वाटले. मस्त लिहिलंय आवडलं. माझ्या भविष्यातील हॉस्पिटलसाठी एखादी tagline सुचवाल का ;)
विली वोंका व चॉकलेट फॅक्टरी ही गोष्ट लहानपणी वाचली होती. प्रत्यक्षात ती फॅक्टरी कशी असेल असे बरेच स्वप्नरंजन करुन झाले होते. सिनेमा पाहून जाम भारी वाटलेले. :)
खूप छान लेख!
@ अनुराधा काळे,
अनुभव तुमच्याकडून प्रत्यक्ष ऐकायचे सौभाग्य मला लाभले याचा आनंद होताच पण इथे मिपावर लिहून सगळ्यांनाच चॉकलेटच्या आनंदात सहभागी करून घेतले हे फार आवडले.
पुढच्या भेटीत तुम्हाला चॉकलेट नक्की देईन :-))
कॅडबरी च्या अप्रतिम आठवणी आणि मुंबई म्हणजे गोड स्वप्न.
समोर बसून ऐकतोय आणि सांगून झाले की एक कॅडबरी मिळेल इतके मस्त वाटले वाचताना.
अनुभव सांगण्याची पद्धत आवडली. तुम्ही जे स्लोगन दिले तेही आवडले.
+1
व्वा.!