मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर...

सृष्टीलावण्या · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
प्रिय गुरुजी, सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात, नसतात सगळीच सत्यनिष्ठ हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी मात्र त्याला हे देखील शिकवा जगात प्रत्येक बदमाशागणिक असतो एक साधूचरित पुरुषोत्तम. स्वार्थी राजकारणी असतात जगात तसे असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे नेते असतात टपलेले वैरी तसे जपणारे मित्रही. मला माहित आहे सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत... तरीही जमलं तर त्याच्या मनावर ठसवा घाम गाळून कमावलेला एकच छदाम आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे. हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा आणि शिकवा त्याला विजयाचा आनंद संयमाने घ्यायला तुमच्यात शक्ती असली तर त्याला द्वेष मत्सरापासून दूर राहायला शिकवा शिकवा त्याला आपला हर्ष संयमाने व्यक्त करायला गुंडांना भीत जाऊ नकोस म्हणावं, त्यांना नमवणं सर्वात सोपं असतं ! जमेल तेवढं दाखवित चला त्याला ग्रंथ भाण्डाराचं अद्भुत वैभव, मात्र त्या बरोबरच मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा सृष्टीचं शाश्वत सौंदर्य अनुभवायला. पाहू दे त्याला पक्षांची अस्मान भरारी... सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर... आणि हिरव्यागार डोंगरउतारावर डोलणारी चिमुकली फुलं. शाळेत त्याला हा धडा मिळू दे -फसवून मिळवलेल्या यशापेक्षा सरळ आलेलं अपयश श्रेयस्कर आहे. आपल्या कल्पना आपले विचार यांच्यावर दृढविश्वास ठेवायला हवा त्यानं बेहत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी. त्याला सांगा त्यानं भल्यांशी भलाईनं वागावं आणि टग्यांना अद्दल घडवावी. माझ्या मुलाला हे पटवता आलं तर पहा जिकडे सरशी तिकडे धावत सुटणार्‍या भाऊगर्दीत सामील न होण्याची ताकद त्यानं कमवायला हवी. पुढे हेही सांगा त्याला ऐकावं जनांचं अगदी सर्वांचं... पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून, आणि फोलपट टाकून निव्वळ सत्य तेव्हढं स्वीकारावं. जमलं तर त्याच्या मनावर बिंबवा - हसत राहावं उरातलं दु:ख दाबून. आणि म्हणावं त्याला, आसू ढाळायची लाज वाटू देऊ नको. त्याला शिकवा तुच्छतावाद्यांना तुच्छ मानायला अन् चाटुगिरीपासून सावध राहायला. त्याला हे पुरेपुर समजवा की करावी कमाई त्यानं ताकद आणि अक्कल विकून पण कधीही विक्रय करू नये हृदयाचा आणि आत्म्याचा ! धिक्कार करणार्‍यांच्या झुंडी आल्या तर काणाडोळा करायला शिकवा त्याला, आणि ठसवा त्याच्या मनावर – जे सत्य आणि न्याय्य वाटते त्याच्यासाठी पाय रोवून लढत रहा. त्याला ममतेनं वागवा पण लाडावून ठेऊ नका. आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय लोखंडाचं कणखर पोलाद होत नसतं. त्याच्या अंगी बाणवा अधीर व्हायचं धैर्य, आणि धरला पाहिजे धीर त्यानं जर गाजवायचं असेल शौर्य. आणखीही एक सांगत राहा त्याला – आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर तरच जडेल उदात्त श्रद्धा मानव जातीवर. माफ करा गुरुजी ! मी फार बोलतो आहे, खूप काही मागतो आहे... पण पहा.. जमेल तेव्हढं अवश्य कराच. माझा मुलगा - भलताच गोड छोकरा आहे हो तो. - श्री. अब्राहम लिंकन अनुवाद - कवि श्री. वसंत बापट

वाचने 3257 वाचनखूण प्रतिक्रिया 4

विसोबा खेचर Fri, 02/15/2008 - 10:59
आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय लोखंडाचं कणखर पोलाद होत नसतं. अप्रतिम कविता...! लिंकन साहेबांना आमचा दंडवत आणि त्यांच्या कवितेचं थेट हृदयाला भिडणारं भाषांतर करणार्‍या बापट साहेबांनाही प्रणाम! धन्यावद सृष्टीलावण्य! अवांतर - बाय द वे, तुमचा हा आयडी फारच छान आहे! तात्या.

सृष्टीलावण्या Fri, 02/15/2008 - 17:50
हे तर संस्कृत कविता पण लिलया करीत असत. मुंबई विद्यापीठाचे सुश्राव्य संस्कृतगीत त्यांनीच तर लिहिले आहे.

प्रभाकर पेठकर Fri, 02/15/2008 - 18:44
अतिशय सुंदर, आदर्शवादी कविता.आम्ही खूप प्रयत्न केले पण मुलगा बाहेरून नवननिन गोष्टी शिकून येतो आणि आम्हालाच चकित करतो. तरी पण अजून बरं चाललं आहे.