जाने कैसे सपनों में खो गई अखियाँ...

Primary tabs

प्रास's picture
प्रास in जनातलं, मनातलं
18 Dec 2019 - 2:23 pm

आपल्याला मेलं त्या संगीतातलं काही कळत नाही. एक सरगम सोडली तर रागांच्या सुरावटी कळत नाहीत, आरोह-अवरोह कळत नाही, आॅर्केस्ट्रेशनच्या ज्ञानाचीही बोंबच पण आपल्याला गाणी ऐकायला आवडतात. गाणी ऐकताना काहीकाही विचारतरंग उमटतात आणि तेच आपल्या आनंदाचं साधन बनतात.

कालपासून एक गाणं मनात गुंजी घालत होतं.

वर्ष 1960 मधला चित्रपट 'अनुराधा', दिग्दर्शक - हृषिकेश मुखर्जी, गीतकार - शैलेन्द्र, संगीत दिग्दर्शक - पं. रविशंकर, गायिका - लता मंगेशकर. बघा, काय काॅम्बिनेशन आहे. अनेकदा दिग्गज एकत्र आले की सुसंवादाच्या अभावाने कार्यहानीच होताना दिसते पण इथेमात्र संगीतातलं जणू वरूळचं कैलास मंदिर उभं राहतं.

पं. रविशंकर भारतीय वाद्य संगीतातलं मोठं नाव. साठच्या दशकात आपले बंधु उदयशंकरांच्या छायेतून बाहेर पडून स्वतःची ओळख निर्माण करू पाहणारे सतारिये. पाश्चात्य आॅर्केस्ट्रेशनची उत्तम जाण असलेले पण भारतीय शास्त्रीय संगीताचा घट्ट पाया असलेले. त्यांनी या गाण्याला संगीत देताना त्यांनी या ज्ञानाचा उपयोग करून पौर्वात्य-पाश्चिमात्य वाद्यांचा एक सुंदर मेळा जमवला. हा संपूर्ण मेळा गाण्याच्या सुरूवातीपासूनच एक द्रूत लय पकडतो. सतार, सारंगी, सरोद, व्हायलीन, चेलो ही सारी तन्तूवाद्ये, बासरी आणि क्लॅरोनेट ही फूंकवाद्ये ठसठशीतपणे ऐकू येतात. त्यांना गती देतो एक कडक ढोलक. या ढोलकच्या कडकडाने संपूर्ण गाण्यातील सुरावटीला एक दणकट आधार मिळतो. यामुळे सुरावट त्यात कुठेही लोंबकळून राहत नाही. तो प्रत्येक कडाका म्हणजे जणू त्या संगीत मालिकेतला स्वल्पविराम, अर्धविराम आणि पूर्णविरामच बनतो.

या द्रूत लयीतल्या प्रवाहातून एक आवाज शैलेन्द्रचं नितांत सुंदर गीत आपल्यापर्यंत पोहोचवतो. लता मंगेशकरांना साजेल अशीच या गाण्याची सुरावट त्यांना दोन्ही सप्तकात गायला लावते. आजूबाजूच्या पार्श्वसंगीतातली द्रूत लय लताबाईंना जराही विचलीत करत नाही. त्यांना दिलेली गीताची लय त्या तसूभरही सैल सोडत नाहीत, जणू त्यांना खात्री आहे, संगीत दिग्दर्शक पार्श्वभूमीवर वेगाने चाललेला वाद्यमेळा त्यांना समेवर बरोब्बर भेटवणार आहे.

चित्रपट हे दृक्-श्राव्य माध्यम असल्यामुळे या गाण्यावर अभिनय करणा-यांचाही प्रभाव त्यावर पडतोच. पडद्यावर सुस्वरूप लीला नायडू हे गाणं म्हणतात. गाण्यातल्या प्रत्येक शब्दाला साजेशा अभिनयाची जोड दिल्याने त्यात फार शोभून दिसतात. बलराज साहनी इथे केवळ सोबतीला आहेत. त्यांची देहबोली, त्यांची नजर याद्वारे त्यांनी पडद्यावरील आपल्या पत्नीच्या गाण्याला दिलेली दमदार सोबत बघून आयुष्यात असा दमदार सोबती बनण्याची कुणालाही इच्छा व्हावी.

हृषीदांच्या दिग्दर्शनाबद्दल, या गाण्याच्या पिक्चरायजेशनबद्दल, टेकींगबद्दल काय सांगायचं? सायंकालीन सूर्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी यात घेतलेल्या फ्रेम्स आदर्श छायाचित्रण म्हणून दाखवता येईल.

एकूणच हे गाणं या सगळ्याचा परिपाक म्हणून आपल्या अन्तरीचा एक ठेवा बनून जातं.

https://youtu.be/b55RygjuITY

आजचा दिवस सुखाचा जावो!

प्रास

संगीतधर्मइतिहासप्रेमकाव्यप्रकटनविचार

प्रतिक्रिया

mayu4u's picture

18 Dec 2019 - 2:31 pm | mayu4u

वेल्कम बॅक, प्रासदा!

गवि's picture

18 Dec 2019 - 3:08 pm | गवि

प्रासभाऊ

नाव वाचून अतीव आनंद जाहला. लेख उत्तम.

पद्मावति's picture

18 Dec 2019 - 3:14 pm | पद्मावति

खूप सुंदर गाणे आणि रसग्रहण. याच चित्रपटातले कैसे दिन बिते हे ही गाणे फार सुरेख आहे. बलराज सहानी हे मुख्य भूमिकेत असलेल्या मोजक्या चित्रपटांपैकी हा एक चित्रपट. अत्यंत गुणी अभिनेता __/\__

पैलवान's picture

18 Dec 2019 - 6:17 pm | पैलवान

नाव वाचूनच आनंद झाला.

आता लेख वाचतो.

मुक्त विहारि's picture

18 Dec 2019 - 7:12 pm | मुक्त विहारि

खूप दिवसांनी हे गाणे ऐकले....

बादवे, एक इंग्रजी गाणे शोधत आहे. आफ्रिकन संगीत आहे. गाण्याचे बोल साधारण असे आहेत. ..

ओचाई ओचाय, ओचाई ओचाय, अलोमा कुलमा अलोमा कुलमा...

देश प्रेमी नावाच्या , अमिताभच्या सिनेमात एका गाण्यात हे गाणं Back Groundला, कोरस मध्ये आहे. ..

https://youtu.be/EP7r05H7dyk

बाकीओचाई ओचाय, ओचाई ओचाय, अलोमा कुलमा अलोमा कुलमा... सापडले तर मलाही कळवा

मुक्त विहारि's picture

19 Dec 2019 - 9:37 am | मुक्त विहारि
मुक्त विहारि's picture

19 Dec 2019 - 9:38 am | मुक्त विहारि

या थीमवरुन तुकडे उचलून आणखी किमान दोन गाण्यांत वापरले आहेत

पग घुंगरू बांध मीरा नाची

आय एम अ डिस्को डान्सर

--- ऐका आणि शोधा..

मुक्त विहारि's picture

19 Dec 2019 - 1:40 pm | मुक्त विहारि

चोरी हमारा काम. ..

जॉनविक्क's picture

19 Dec 2019 - 3:51 pm | जॉनविक्क

सा सा सा ग ग रे रे सा नि नि नि सा सा सा
सा सा सा ग ग रे रे सा नि नि नि सा सा सा
सा सा सा ग ग रे रे सा नि नि नि सा सा सा

ओचाई ओचाsssss

गवि's picture

19 Dec 2019 - 9:03 pm | गवि

आणखी एक आहे यातच

- छम्मक छल्लो पूर्ण बॅकग्राऊंड

जॉनविक्क's picture

19 Dec 2019 - 12:58 am | जॉनविक्क

असे म्हणणार होतो अन तेवढ्यात लिंकवर क्लिक केले गेले....

अविट!

राघव's picture

19 Dec 2019 - 9:52 am | राघव

खूप आवडीचं गाणं. तसंही शैलेंद्र आणि साहिर फार आवडतात. गाणं अप्रतीमच!
बाकी तुम्हाला खूप दिवसांनी लिहितं झालेलं बघून आनंद झाला. आणिक येऊ द्यात! :-)

प्राची अश्विनी's picture

19 Dec 2019 - 4:25 pm | प्राची अश्विनी

सुरेख गीतग्रहण.

नूतन's picture

19 Dec 2019 - 7:16 pm | नूतन

खूप आवडतं गाणं ऐकण्याचं निमित्त दिल्याबद्दल धन्यवाद.
लेख आवडला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Dec 2019 - 9:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पण गाणं फारसं कानावरुन गेलेलं नसल्यामुळे ऐकतांना आणि पाहतांना ज़रा हिरमोडच झाला. :(

लिहिते राहा. पुलेशु

-दिलीप बिरुटे

श्वेता२४'s picture

20 Dec 2019 - 10:20 am | श्वेता२४

आतापर्यंत काही वेळा ऐकलं आहे पण आज पाहिलं ही. काही गाणी सदाहरित असतात त्यापैकीच हे एक. आपला लेखही छानच

जुइ's picture

3 Mar 2020 - 12:27 am | जुइ

अतिशय सुरेल गीत! अनेकदा ऐकले आहे मात्र पाहिले प्रथमच.