टेक्नो सॅव्ही..
लेखनप्रकार
"माझं ज्ञान हे वाळवंटातील एका कणाएवढं आहे" असं प्रत्यक्ष न्यूटन म्हणाला होता. माझं स्वत:चं अज्ञान तर जगातल्या सर्व वाळवंटांइतकं विस्तीर्ण आणि सर्व महासागरांइतकं अथांग आहे.
जुनं माहीत आहे पण नवीन काही माहीत नाही. मी मोबाइल वापरते. पण त्याचा उपयोग आलेले फोन घेणे आणि आवश्यक तेवढे फोन करणे एवढाच मी करते. म्हणजे अलीकडेपर्यंत करत होते. आता कसेबसे व्हाट्सऍप वापरते. बस इतकेच. त्याचे काय झाले, मला माझ्या मुलाने वाढदिवसाला नवा फोन घेऊन दिला. कुणीतरी मला प्रश्न विचारला. 'कोणत्या कंपनीचा आहे?' मी म्हटले मला ठाऊक नाही. फोनवर लिहिलेले शब्द हे कंपनीचं नाव असतं की मॉडेलचं याबद्दल मला खात्री नव्हती. उगीच "स्वच्छ भारत" कंपनीची बस पाहिली असं म्हटल्याप्रमाणे काहीतरी होईल. अगदी पहिला फोन होता तेव्हा मी बीपीएलचा फोन आहे असं म्हटलं होतं.
पुढचा प्रश्न आला, 'स्टोरेज मेमरी किती आहे?'मी म्हटलं "मला ठाऊक नाही."
हे सांगताना मला शरमल्यासारखं होत होतं. गेली बरीच वर्षे मी मोबाइल वापरतेय. वर्षा दोन वर्षात मोबाइल बिघडतो आणि मुलगा मला नवीन घेऊन देतो.
इतके मोबाइल आले आजपर्यंत. पण मी कधीच कंपनीचं नाव विचारलं नाही की ते लक्षात ठेवलं नाही की कुणाला संगितलं नाही. मला असा कुणी प्रश्नच विचारला नव्हता. मला माझ्याच मोबाइलची माहिती करून घ्यावी लागली. त्याची स्टोरेज मेमरी अमुक जिबी आहे. म्हणजे गिगा बाईट. RAM म्हणजे रँडम अॅक्सेस मेमरी. हे मला कळलं. चुकायला नको म्हणून ते पाठ करून टाकलं. याच पद्धतीने काही कंपन्यांची आणि त्यांच्या प्रॉडक्ट्सची नावं पाठ केली. मेलं वयपरत्वे पाठही होत नाही लवकर. व्हाट्सऍपवरचे मेसेज सांगतात की "डॉक्टर असं म्हणतात म्हणे, की म्हातारपणी अल्झायमर टाळायचा असेल तर कोडी सोडवा, सुडोकू सोडवा, काहीतरी पाठ करा, मेमराईज करा."
शिवाय अमुक कोडं सोडवता आलं नाही तर अल्झायमरची सुरुवात, अमुक इतकी उत्तरं ओळखता आली नाहीत तर अल्झायमरची अमुक स्टेज, आणि पूर्ण सोडवता आलं तर अल्झायमर नाही.. असंही काहीबाही वाचायला मिळतं.
अल्झायमरच्या भीतीने मी गीतेचा एक आख्खा अध्याय पाठ केला. तर मी काय सांगत होते? हं ! कंपन्यांची नावे आणि प्रॉडक्ट्स. बघा! मी न विसरता आले की नाही मूळ मुद्द्यावर!म्हणजे अल्झायमर नसावा.
तर मला आज lenovo, acer ,एचपी, oppo ,विवो ,जिओनी, लावा , sansui, बोस अशा काही कंपन्यांची नावं माहीत झाली आहेत. त्यात कोण मोबाइल,लॅपटॉप, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, accesaries, हेडफोन ,माऊस, की बोर्ड, speakers , कॅमेरा, फ्रीज,वॉशिंग मशीन ,टीव्ही तयार करते हेही आठवून पहिले तर आठवते.
जी कथा मोबाइलची तीच कॉम्प्युटरची. पूर्वी मी नोकरीत असताना शेवटी शेवटी क्लासबीसला जाऊन दोनदा कॉम्प्युटर शिकायचा प्रयत्न केला. पण तिथे क्लेरीकल जॉबसाठी आवश्यक ज्ञान शिकवीत होते. एक्सेल, मेलमर्ज, कॅलक्युलेशन, सॅलरी शीट वगैरे. ते शिकून मी काय करू?
मला शिकायचं होतं ते रेकॉर्डिंग आणि डबिंग. पण ते त्या नेहमीच्या क्लास मध्ये कुठून येणार? मग ऑफिसतर्फे आम्हा जुन्या लोकांना दिल्लीला ट्रेनिंगला पाठवले . पण तिथे पाच /सहाजणांत एकाच कॉम्प्युटर होता. ज्यांना थोडंफार आधीच येत होते, ते कॉम्प्युटरवर ताबा मिळवायचे आणि रेकॉर्डिंग करत बसायचे. फारसं काही न शिकताच मी परत आले.
कॉम्प्युटरमध्ये सुद्धा किती बदल होताहेत. किती advanced कॉम्प्युटर येताहेत. थिअरीपेक्षा प्रॅक्टिकल महत्वाचं आहे. नुसत्या नोट्स लिहून घेऊन किंवा पुस्तक वाचून किती शिकणार व्यवहारातला कॉम्प्युटर?
कॉम्प्युटरवर हात असा बसलाच नाही. अमुक बटन दाबावं का? काही चुकणार तर नाही? अशी भीती वाटते. काहीही संदेश दिसला की एररच वाटते. अनेकदा काय झालंय तेच न कळल्याने ओके दाबावं की कॅन्सल ते कळत नाही.
एकदा वाटतं, ही सगळी माहिती मिळवून ,कॉम्प्युटर शिकून मी आता काय असा तीर मारणार आहे? माझ्या मर्यादित अनुभवविश्वात त्याचा काय उपयोग आहे? मी technosavvy बनून असा काय फरक पडणार आहे ? मला कॉम्प्युटर येत नाही, फोटोशॉप येत नाही, videos बनवता येत नाहीत, माझ्या मोबाइलचा इंटरनेटचा स्पीड मला माहीत नाही, मला खूप काही माहीत नाही. प्रचंड वेगाने पुढे जाणार्या जगाबरोबर धावताना माझी दमछाक होतेय. माझ्या अचानक लक्षात आलं, निरक्षरांना साक्षर होताना किती त्रास होत असेल?किती कंटाळा येत असेल? बाय द वे, "निराक्षरांनो साक्षर व्हा" असं एका भिंतीवर लिहिलेलं बघितल्याचं आठवलं.
तर ऋ,क्ष ,ज्ञ ,ळ हे अक्षरे आणि ए ,ऐ ,ओ ,औ हे स्वर शिकताना ते किती हताश होत असतील?शिवाय इतके मोठे होऊनही आपल्याला हे येत नाही ह्याचा न्यूनगंड. त्यांचं दैनंदिन जगणं यावर मुळीच अवलंबून नसतं. जे काही शिकायचे ते लहानपणी, तरुणपणी शिकावं. म्हातारपणी ते अवघड जातं. तरीही जे शिकतात त्यांना हार्दिक सलाम.
तरी मी पूर्ण निराश नाही. कधीतरी मला कॉम्प्युटर येईल अशी मला आशा वाटते. मी लॅपटॉप उघडते. शिकायचा प्रयत्न करते. आता मला लॅपटॉप सुरू करता येतो. फाइल ओपन करता येते. नवीन फाइल तयार करता येते. नोटपॅड मध्ये जाता येते. माझं लिखाण टाइप करता येतं. नंतर तपासून दुरुस्त करता येतं. ईमेल करता येते.
गुड स्टार्ट ! चांगली सुरुवात म्हणजे अर्धं यश असे कुणीसं म्हटलंय. सतत केलं की येतं. प्रॅक्टीस मेक्स मेन {विमेन ऑल्सो } पर्फेक्ट..
वाचने
8692
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
छान!
लेखन वाचून तुम्हाला मी ओळखतो
खरं आहे. जग पुढे जातं तसं
मेलमर्ज: खुप वर्षांनी हा शब्द
नेहमीप्रमाणेच छान लिहिले आहे.
CamScanner app फार भारी आहे.
In reply to CamScanner app फार भारी आहे. by कंजूस
CamScanner app गुगलने प्ले
In reply to CamScanner app गुगलने प्ले by सतिश गावडे
होय.
आजी
येस, प्रॅक्टिस मेक्स पीपल पर्फेक्ट.
अल्झायमरच्या भीतीने मी गीतेचा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Coca-Cola's plastic secrets | DW Documentaryआजी लेख आवडला.
लेख आवडला!
आजी आम्हाला ऊल्लु बनवु नकोस,
In reply to आजी आम्हाला ऊल्लु बनवु नकोस, by जालिम लोशन
अधून मधून सहमत.
आनन्दा-थँक्यू
In reply to आनन्दा-थँक्यू by आजी
स्वतःला टेक्नोसॅव्ही समजणार्या