मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बुद्धीवादाचा एक पंथ होउ नये- कै. मा.श्री. रिसबूड

प्रकाश घाटपांडे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
सहज समजेल फलज्योतिष काय आहे व काय नाही? या कै. मा.श्री. रिसबूड यांच्या पुस्तकातील प्रकरण. हे प्रकरण टाकावे कि नाही? याबाबत रिसबूड साशंक होते. अंनिस यावर काय विचार करेल असाही मुद्दा होता. पण मी हे प्रकरण पुस्तकात असावे याबद्दल आग्रही होतो. त्यानुसार त्यांनी हे प्रकरण पुस्तकाच्या शेवटी समाविष्ट केले. बुद्धिवादाचा एक पंथ होऊ नये -मा.श्री रिसबूड भूत-भावी घटना प्रत्यक्ष जाणणे या संदर्भात मी मांडलेले विचार व दुसरेही काही विचार कदाचित काही बुद्धिवादी मंडळींना पटणार नाहीत.माणसाचा स्वभाव असा आहे की तो एकदा एखाद्या पंथात सामील झाला की त्याच्या नकळत त्याची बुद्धी त्या पंथाच्या अधिकृत विचारसरणीला बांधली जाते.मग तो दुसया तहेच्या प्रतिपादनाचा विचार अलिप्तपते करू शकत नाही. निदान बुद्धिवादी मंडळींचा तरी असा कर्मठ पंथ बनू नये असे मला वाटते.मी है। का म्हणतो ते सांगण्यासाठी पुढील उदाहरणे देतो : ‘विश्वाचा गाडा आपोआप आपल्या नियमानुसार चाललेला आहे, त्याच्यामागे कसलीही जाणीवयुक्त प्रेरणा नाही.' ‘स्मृतीचे अधिष्ठान फक्त मेंदूत आहे, अन्यत्र स्मृती असू शकत नाही.' वरील दोन्ही विधाने बुद्धिवादी मंडळी अनेकदा करतात.मी श्रद्धाळू वगैरे नसलो तरी मला ही विधाने पटत नाहीत.का पटत नाहीत ते सांगतो. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या जडवाद' या पुस्तकाचा संदर्भ मी घेत आहे. पृष्ठ ३२ वर त्यांनी असे प्रतिपादन केले आहे की, अचेतन व अजीव द्रव्यातून जाणीवयुक्त सचेतन पिंड निर्माण होतो.द्रव्यात प्रथम जीव निर्माण होतो आणि नंतर जाणीव निर्माण होते.पृष्ठ ६३ वर ते म्हणतात की, ‘विश्वाच्या गतिस्थितीला परमात्म्याची गरज नाही. कारण प्राण्याच्या व मनुष्याच्या देहात पृथक् चैतन्य वस्तू आहे याला कोणतेच प्रमाण उपलब्ध होत नाही.या चैतन्य वस्तूवरूनच विश्वचैतन्याची ‘उत्पत्ति' होते. (उत्पत्तीऐवजी ‘कल्पना उत्पन्न वाचावे असे शुद्धिपत्रात म्हटले आहे) अणूंच्या गर्भात चेतना तर असतेच म्हणून त्यांना अचेतन म्हणता येत नाही. अणू अजीव, जाणीवविरहित असतात इतके खरे. सृष्टीच्या नियमानुसार अणूंचे मॉलीक्यूल बनतात व हे मॉलीक्यूल विशिष्ट तहेने एकत्र जमले की तिथे तत्पूर्वी नसलेला जीव निर्माण होतो. शास्त्रीबुवांचे प्रतिपादन असे आहे की, जीवसृष्टीची पुढची पायरी म्हणजे चेतन सृष्टी. चेतन म्हणजे जिच्या ठिकाणी बुद्धी किंवा जाणीव आहे अशी सृष्टी. (जाणीव हा शब्द महत्त्वाचा आहे) जीव व नंतर जाणीव निर्माण होण्याची क्रिया सृष्टिनियमानुसार आपोआप होते असे त्यांचे म्हणणे आहे. हा त्यांचा युक्तिवाद आपण पुढे नेऊ. गर्भाशयात असलेली एक सजीव पेशी. ती दुस-या एका पेशीशी संयोग पावते व मग तिचे विभाजन सुरू होते.एकाचे दोन,दोनाचे चार असे होता-होता लाखो पेशी --सर्व अगदी एकसारख्या - जमून एक पुंज तयार होतो. या पुंजात जीव आहे पण जाणीव नाही असे समजायचे. लवकरच मग असा एक क्षण येतो की त्या क्षणी त्या पुंजातली कुठली तरी एक पेशी ठरवते की मी डोळा हे इंद्रिय बनवणार. हे तिला आपोआपच निसर्गनियमानुसार समजते ! मग ती पेशी दुभंगते व तिची दोन अधुके-दोन्ही एकसारखीच होतात.त्यांतल्या एका अर्धकाला कळते की आपल्याला डावा डोळा व्हायचे आहे. दुस-याला कळते की आपल्याला उजवा डोळा व्हायचे आहे. मग त्या पुंजात कशी कोण जाणे,पण एक मध्यरेषा ठरवण्यात येते व त्या रेषेच्या डावीकडे एक अधुक सरकू लागते व उजवीकडे दुसरे अर्धक सरकू लागते. हेसुद्धा आपोआप होत असते ! त्या दोन अर्धकांना हे ठाऊक असते की त्या काल्पनिक मध्यरेषेपासून किती दूर जाऊन थांबायचे. त्याप्रमाणे ती थांबतात.यामुळे चेहरयावरची सिमेट्री साधणार आहे हे त्यांना ठाऊक असते - आपोआपच ठाऊक असते. कारण तिथे जाणीव नाही ! मूत्रपिंड, कान, फुफ्फुसे, किडन्या, वृषण, हात, पाय हे सगळे जोडीजोडीचे अवयव बनवणाच्या पेशी याप्रमाणेच आपल्या कार्याला प्रारंभ करतात. या सर्वांना डावी बाजू कोणती व उजवी बाजू कोणती याचे भान असते आणि त्याबरोबरच सिमेट्रीचेही भान असते. हे भान त्यांना आपोआप येते. जाणिवेचा इथे काही संबंध नाही ! सृष्टिनियमानुसार ही सर्व मांडणी आपोआप होते. प्रत्येक अवयवाच्या पेशीच्या अर्धकांचा एकमेकांत काहीही संपर्क नसता त्यांना सिमेट्रिकल मांडणी कशा तहेने होईल हे आपोआप समजत असते ! कसलीही जाणीव नसताना हे आपोआप समजते ! | एक डोळा' नावाचे इंद्रिय. त्याच्या घडणीसाठी शेकडो प्रकारच्या पेशी लाखांनी बनवायच्या;त्या योग्य जागी बसवायच्या,सप्त रंगांच्या तरंगांची लांबी ओळखू शकणारे शंकू व शलाका लाखावारी बनवून त्यांची व्यवस्थित मांडणी रेटिनावर करायची ही कामे करण्यासाठी लागणारे आराखडे डोळा बनू पाहणा-या पेशीच्या जीन्समध्ये आलेले असतात. संपूर्ण मनुष्यदेह बनवण्यासाठी लागणारे अब्जावधी आराखडे गर्भाशयातल्या फलित पेशीच्या क्रोमोझोम्सवर असतात, पण त्यांतून डोळ्यांसाठी आवश्यक तेवढेच आराखडे सॉर्ट करून डोळा-पेशीमध्ये घालण्याचे ज्ञान किंवा जाणीव कुठे वावरत असते ? डावा डोळा व उजवा डोळा यांची रचना एकसारखीच असते पण मांडणी कशी आरशातल्या प्रतिबिंबासारखी असते. ही अशी मांडणी करण्याचे भान नेमके कुठे असते ? सिमेट्री राखण्याची जाणीव कोण सांभाळते ? या सगळ्या अॅब्स्टरॅक्ट आयडियाज जर जीन्स सांभाळत असतील तर त्यांच्यात 'जाणीव' नाही हे कसे म्हणता येईल? जाणीव काय किंवा स्मृती काय,एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. गर्भस्थ पेशीपुंजात या दोन्ही गोष्टी नाहीत, सर्व काही आपोआप होते या म्हणण्याचा अर्थ तरी काय? ‘आपोआप सर्व काही घडते हे उत्तर ज्योतिषी लोकांच्या सोयीचे आहे. शनीची पीडा कशामुळे होते ? तर ती आपोआप सृष्टीच्या नियमानुसार होते, असे उत्तर ते देतील तर तेही आता मान्य करावे लागेल ! सजीव पिंडाची वाढ पूर्ण होत आली की तिथे जाणीव आपोआपच निर्माण होते. असे शास्त्रीबुवा म्हणतात. पण पृष्ठ ५६ वर त्यांनी दुसरा सिद्धान्त सांगितला आहे तो असा की, संपूर्ण अभावातून सत् वस्तू उद्भवत नाही.एक सत् वस्तू दुसया कोणत्या तरी सत् वस्तूचीच बनलेली असते. असे जर आहे तर मूळच्या मॉलिक्यूलमध्ये जीव नव्हता, तो नंतर निर्माण झाला किंवा मूळच्या पेशी-पुंजांत जाणीव नव्हती,ती नंतर निर्माण झाली हे म्हणताना तो जीव किंवा जाणीव कोणत्या सत् वस्तूतून निर्माण झाली हे नेमकेपणाने सांगायला हवे. जिवाचा आणि जाणिवेचा मूलस्रोत कोणता? या सत् वस्तू आपोआप सृष्टिनियमानुसार निर्माण होतात' हे या प्रश्नाचे उत्तर नव्हे. एका पेशीपासून प्रारंभ करून संपूर्ण मनुष्यदेह बनवण्याच्या प्रक्रियेत जाणीव या चीजेचा काहीही संबंध नाही.सर्व काही आपोआप होते हे म्हणणे म्हणजे एकतर्हे चा सांप्रदायिक आग्रह आहे असे म्हणण्यावाचून पर्याय नाही. माझे म्हणणे असे की, प्रत्येक वेळी अशी न पटणारी उत्तरे देत बसण्यापेक्षा, एकदाच हे मान्य करावे की जाणीव ही एक विश्वव्यापी सत्ता असून तिचा अंश सजीवात असतो.या सत्तेला मी ईश्वर,आत्मा वगैरे कसलेच नाव देत नाही.निसर्गातलीच ती एक एंटिटी आहे,बस्स,एवढेच ! दुसरी गोष्ट म्हणजे जिथे जाणीव आहे तिथे स्मृतीही आहेच म्हणून स्मृतीचे अधिष्ठान फक्त मेंदू, हे अव्याप्तीचा दोष असलेले विधान ठरते असे माझे म्हणणे आहे. । भूत-भविष्य जाणणे कुणालाही शक्य झालेले नाही व होणार नाही असे विधान मी करणार नाही. अमुक गृहस्थ भूत-भविष्य जाणतात असा बोलबाला आपण पुष्कळदा ऐकतो.मी अशा तीन व्यक्तींची परीक्षा घेतली.एकालाही माझे भूत-भविष्य जाणता आले नाही.(जन्मकुंडलीचा संबंध यात खरोखरी काहीच नसतो, पण तसा थोडासा देखावा हे लोक करतात) माझा हा अनुभव माझ्यापुरता खरा आहे. दुस-या कुणाला निराळा अनुभव आला नसेलच हे मी कशावरून ठरवायचे? जरी भूत-भविष्य जाणण्याची क्षमता कुठे, कुणात असलीच तरी ती त्या व्यक्तीपुरती असणार. त्या क्षमतेचे शास्त्र बनवून त्याचा प्रसार करणे शक्य नाही - जसा फलज्योतिषाचा प्रसार होत आहे. माझे उद्दिष्ट फलज्योतिषाचे अंतरंग एक्स्पोज करणे एवढेच आहे. भविष्य ‘जाणणायाला’ फलज्योतिषाची किंवा दुस-या कुठल्याच शास्त्राची गरज असू नये हा मुद्दा ध्यानात असू द्यावा. -------------------------------------------------------------------------------------------------------

वाचने 15148 वाचनखूण प्रतिक्रिया 19

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 10/18/2018 - 13:22
माधव रिसबूड एक कठोर फलज्योतिष चिकित्सक या माझ्या लेखात त्यांच्याविषयी अधिक माहीती मिळेल. लेख ब्लॉगवर वाचायला मिळेल. http://faljyotishachikitsa.blogspot.com/

गामा पैलवान Fri, 10/19/2018 - 01:58
प्रकाश घाटपांडे, लेखातलं हे वाक्य रोचक वाटलं :
एकदाच हे मान्य करावे की जाणीव ही एक विश्वव्यापी सत्ता असून तिचा अंश सजीवात असतो.या सत्तेला मी ईश्वर,आत्मा वगैरे कसलेच नाव देत नाही.निसर्गातलीच ती एक एंटिटी आहे,बस्स,एवढेच !
रोचक अशासाठी की उपरोक्त विधान 'सत्य हे अनिर्वचनीय असते' या वैदिक वचनाच्या बरंच जवळ जाणारं आहे म्हणून. बाकी लेखाशी सहमत आहे. पण बुद्धिवादाचा पंथ का होऊ नये हे मात्रं कळलं नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

माणसाचा स्वभाव असा आहे की तो एकदा एखाद्या पंथात सामील झाला की त्याच्या नकळत त्याची बुद्धी त्या पंथाच्या अधिकृत विचारसरणीला बांधली जाते.मग तो दुसया तर्‍हेच्या प्रतिपादनाचा विचार अलिप्तपते करू शकत नाही. यामुळे निदान बुद्धिवादी मंडळींचा तरी असा कर्मठ पंथ बनू नये असे त्यांना वाटत असे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

थोडक्यात पंथ झाला की एक झापडबंदपणा येतो. जस मार्क्सवाद्यांना पोथीनिष्ठ म्हणतात.

In reply to by प्रकाश घाटपांडे

गामा पैलवान Fri, 10/19/2018 - 12:28
प्रकाश घाटपांडे, पंथ ही फार ढोबळ संज्ञा आहे. माझ्या मते बुद्धीवाद्यांनी 'झापडबंद असू नये' असं ते विधान हवं. प्रत्येक पंथ झापडबंद असेलंच असं नाही. बाकी मुद्दे पटले. आ.न., -गा.पै.

In reply to by प्रकाश घाटपांडे

माहितगार Fri, 10/19/2018 - 13:19
....पंथ नेहमीच झापडबंद नसतो पण हळूहळू नकळत तो होत जातो...
बुद्धीवादाचा एक पंथ होउ नये- याचा अर्थ मी बुद्धीवादाने सुधारणा शक्य नसलेल्या स्थितीत बंदीस्त होऊ नये असा घेऊ शकेन का ? बंदीस्त होणे हा स्वभाव मूळ पंथाच्या फिलॉसॉफीत नसेलच असे नाही, पण मूळ फिलॉसॉफीत झापडबंदता नसेल तरी , मूळ पुरुषानंतरचे अनुयायी झापडबंद असणे पहाण्यास मिळू शकते - हि सर्वसाधारण मानवी स्वभावाची मर्यादा समजावी का ? ग्रंथ प्रामाण्य नाकारणार्‍यांच्या ग्रंथ प्रामाण्य करु नये या तत्वा शिवाय इतर प्रत्येक बाबतीत ग्रंथ प्रामाण्य त्यांचे अनुयायी करताना दिसू शकतील. किंवा व्यक्तिपुजा टाळा म्हणून आग्रह धरणार्‍या व्यक्तीची त्यांच्याच अनुयायांनी व्यक्ती पुजा बांधणे अशी आणखी ही वेगळी उदाहरणे असू शकावित. बुद्धीवाद्यांनी 'झापडबंद असू नये' तसेच पंथानेही झापडबंद असू नये असे वाटते.

डाम्बिस बोका Sat, 10/20/2018 - 23:12
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे SCIENTIST आहेत का? त्यांनी लिहिलेले पुरावानीशी त्यांना सिद्ध करता येणार आहे का? शास्त्रीय परिसंवादात भाग घेऊन ते आपले म्हणणे पटवून देऊ शकतात का? तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे चांगले फिलॉसॉफर आहेत आणि असली पुस्तके फक्त अशास्त्रीय पातळीवर असतात. SCIENCE world मध्ये असल्या गोष्टीना किंमत नसते. बुद्धिवादी मंडली तर्कशुद्द विचार करतात आणि त्यांचा पंथ होऊ शकत नाही कारण ती विचारसरणी नाही.

In reply to by डाम्बिस बोका

चुकीचे संदर्भ देउ नका हे आपले म्हणणे मला अयोग्य वाटते. फार तर आपण म्हणू शकता कि रिसबुडांनी दिलेले संदर्भ हे मला पटत नाही व आपण त्यावर आपले मत मांडू शकता.

In reply to by डाम्बिस बोका

गामा पैलवान Sun, 10/21/2018 - 12:49
डाम्बिस बोका, SCIENTIST म्हणजे नेमके कोण? खुद्द ज्यात नारळीकर काय म्हणतात पहा :
विज्ञानात एखादी गोष्ट अपवादात्मक आढळली, तर त्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. पण, ती दडपून टाकली जाते आणि तसे करण्यातच आम्ही आनंद मानतो.
आगोदर SCIENTIST म्हणजे काय ते ठरवायला पाहिजे. नंतर लक्ष्मणशास्त्र्यांचं मूल्यमापन करू. आ.न., -गा.पै.

Jayant Naik Tue, 10/30/2018 - 09:24
मानव हा जाणीव असलेला प्राणी आहे. पण त्याची जाणीव हि त्याच्या ज्ञानेन्द्रीयावर विसंबून असते. तिला वेगळे अस्तित्व असते पण काहीच जाणण्या सारखे नसेल तर ती फक्त असते. एकदा पंथ निर्माण झाला किवा तुम्ही एखादा मार्ग माझा असा ठरवलात ...म्हणजे मी बुद्धिनिष्ठ आहे वगैरे ..तर तुम्ही त्याच चष्म्यातून पाहणार. नकारात्मक विचारसरणीतील माणसाला जसे सगळेच नकारात्मक दिसते तसेच. तुम्ही खिडकीत उभे राहून मला आता फक्त काळ्या मोटारी दिसणार असे मनाला बजावले तर तुम्हाला त्याच दिसणार . तुमचे मन जाणीवपूर्वक बाकीच्या मोटारी दूर करेल .. मुद्दा हा कि तुम्हाला दिसते ..जाणवते ते ज्ञानेद्रियाने ...त्याला परत तुम्ही तुमची चाळण लावणार . तेव्हा हे जे जग तुम्हाला दिसते ते तुमच्या जाणीवेतील आहे....दुसऱ्याला ते तसे दिसेल असे नाही ...तेव्हा काही गोष्टी या कायम अज्ञात राहणार ..जो पर्यंत आपण ज्ञानेन्द्रीयाच्या चौकटीत असू तो पर्यंत .. भविष्य हा नेहमीच उत्तर नसलेल्या प्रश्नाचा उहापोह असणार.

In reply to by Jayant Naik

अज्ञाताचा शोध घेण्यामुळेच माणसाचा विकास झाला. काही प्रश्नांची उत्तरे मिळत जातात तर त्या प्रवासात नवे काही प्रश्न पडत जातात. मानवाचा हा प्रवास असाच चालू आहे निरंतर.

शशिकांत ओक गुरुवार, 11/01/2018 - 22:42
मी बुद्धिनिष्ठ आहे वगैरे ..तर तुम्ही त्याच चष्म्यातून पाहणार. नकारात्मक विचारसरणीतील माणसाला जसे सगळेच नकारात्मक दिसते तसेच.
बुद्धिवादी 'हम नहीं सुधरेंगे' म्हणणारे असतात... नाडी ग्रंथ भविष्य विषयावर रिसबुड नेमके हेच करत होते आणि आपली साथ होती... आम्हाला नाडी भविष्य पहाण्यासाठी जायची गरज नाही. कारण 'आम्ही आधीच ठरवले आहे' की ते सर्व थोतांड आहे... एकदा वाटले की बिनबुडाच्या रिसबुडांच्या पत्र व्यवहारावर लिहावे...

In reply to by अत्रुप्त आत्मा

शशिकांत ओक Sat, 12/22/2018 - 19:16
https://play.google.com/store/apps/details?id=naadi.project.com.rationalist बिनबुडाचे रिसबुड... इथे नाडीग्रंथ भविष्यात त्यांचे म्हणणे कसे बी प्रेमानंद उडवून लावतात ते वाचायला आवडेल आपल्याला.