Skip to main content
लेखक एक_वात्रट यांनी शनिवार, 26/09/2026 00:31 या दिवशी प्रकाशित केले.

दिवस चौथा: अकरा नोव्हेंबर 

आजचा आमचा पहिला थांबा होता नादान महल. खरंतर ही वास्तू फारशी प्रसिद्ध नाही. लखनौला भेट देणारे खूपच कमी पर्यटक या वास्तूकडे वळतात. पण आम्ही पडलो दर्दी पर्यटक, तेव्हा आम्ही आवर्जून ही वास्तू पाहायला निघालो होतो. 

नादान महल म्हणजे मुघल सम्राट अकबर यांच्या काळात अवधचे सुभेदार राहिलेले शेख अब्दुल रहमान यांची कबर होय. एका आख्यायिकेनुसार, या समाधीला "निदान महाल" असं नाव पडलं – कारण अनेक भक्तगण तिथे जाऊन "निदान" म्हणजेच मुक्ती मिळवण्यासाठी प्रार्थना करत असत. ही कबर लखनौमधल्या एका अतिशय गजबजलेल्या भागात, याहियागंज इथं आहे, आपल्या पुण्यातली कसबा पेठ किंवा बोहरी आळीच म्हणाना. खोदलेल्या अरुंद रस्त्यांवरून टक्केटोणपे खात आम्ही कसेबसे या वास्तूजवळ पोहोचलो. गजबजलेल्या, बऱ्याचशा अस्वच्छ भागात असली तरी वास्तू आहे मात्र सुंदर. 











मुख्य कबरीच्या खांबावर केलेले कोरीव काम अतिशय सुबक आणि देखणे आहे. खांबांवर इतके बारीक, देखणे कोरीवकाम मी आधी क्वचितच कुठे पाहिले आहे. 



कबरीचा मुख्य दरवाजाही दगडात जाळी करून बनवलेला, पाहत राहावा असा आहे. शेजारीच 'सोलह खंबा' ही दगडात बनवलेली एक सोळा खांबांची वास्तू आहे, तीही सुंदर आहे. 



इथे १०-१५ मिनिटे घालवून आम्ही निघालो. 

इथून आम्ही निघालो रेसिडेन्सी पाहायला. 

रेसिडेन्सी, ज्याला ब्रिटिश रेसिडेन्सी म्हणूनही ओळखलं जातं, हा लखनऊ शहरातला एक ऐतिहासिक इमारतींचा समूह आहे. अवधच्या नवाबांच्या दरबारातील ब्रिटिशांचे अधिकृत प्रतिनिधी – 'ब्रिटिश रेसिडेंट जनरल' – यांचं हे निवासस्थान. 

इ.स. १७७५ मध्ये, अवधचा तिसरा नवाब असफ-उद-दौला याने राजधानी फैजाबादवरून लखनऊला हलवली. त्यानंतर इ.स. १७८० ते १८०० या काळात रेसिडेन्सीचं बांधकाम सुरू झालं. कामाची सुरुवात असफ-उद-दौलाच्या कारकिर्दीत झाली, आणि ते पूर्ण झालं नवाब सआदत अली खान द्वितीय (अवधचा पाचवा नवाब) यांच्या काळात. भारतीय राजांनी खास ब्रिटिशांसाठी बांधलेली निवासस्थानं माझ्या तरी माहितीत नाहीत, त्यामुळे रेसिडेन्सीचा इतिहास माझ्यासाठी थोडा विस्मयकारक होता. 

१८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात क्रांतिकारकांनी काही काळासाठी का होईना रेसिडेन्सी आपल्या ताब्यात घेतली आणि त्यावर भारताचा झेंडा फडकवला. या चकमकीत आणि त्यानंतर रेसिडेन्सी परत मिळवताना रेसिडेन्सीचं मोठं नुकसान झालं, परंतु नंतर तिची काळजीपूर्वक पुनर्बांधणी करण्यात आली. आज हे संपूर्ण संकुल भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या संरक्षणाखाली आहे. 







'शनिवारवाडा बोलू लागला तर...' असा एक निबंध दहावीला हमखास आम्हाला लिहायला असे. मात्र रेसिडेन्सीमधल्या या वास्तू पाहून पुन्हा पुन्हा एक विचार येत होता, खरंच इथली एखादी वस्तू बोलायला लागली तर! १९५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील ते सगळे प्रसंग जसे घडले तसे ऐकणे हा केवढा रोमांचकारी अनुभव असेल! 







रेसिडेन्सी परिसरातच असलेलं १८५७ स्मृती संग्रहालय, जे पुरातत्व विभागाद्वारे चालवलं जातं, ते त्या बंडाची संपूर्ण माहिती, चित्रफीत आणि प्रदर्शनांच्या माध्यमातून देतं. त्या काळातील स्वातंत्र्यसैनिकांचं धैर्य, देशभक्ती आणि संघर्ष इथे पाहता, ऐकता आणि अनुभवता येतात. इतिहास अभ्यासणाऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि सामान्य रसिकांसाठीही हे ठिकाण एक अमूल्य ठेवा आहे.





रेसिडेन्सी आणि खास करून आतलं प्रदर्शन पाहतापाहता बराच वेळ गेला होता, तेव्हा आम्ही राहिलेल्या ठिकाणांची यादी पटकन नजरेखालून घातली आणि त्यातल्या काही ठिकाणांवर काट मारायचा निर्णय घेतला. 'सादत अली खान आणि खुर्शीद झाडी' यांची थडगी गुगलवर काही खास वाटत नव्हती, तेव्हा ती यादीतून गळाली. 'सिकंदर बाग' देखील काही विशेष वाटली नाही, तेव्हा ती आम्ही गाडीतूनच पाहिली. आणि आम्ही निघालो अजून एक इमामबाडा पाहायला, शहानजाफ इमामबाडा. 

शहानजाफ इमामबाड्यात गेलो तर तिथे मुख्य दालनात नूतनीकरणाचे काम चालू होते. आतून तरी हा इमामबाडा छोटा इमामबाड्यासारखाच होता, वेगळे काही नव्हते. तीच ती झुंबरे आणि तेच ते ताबूत.







बाहेरून मात्र हा लखनौत आत्तापर्यंत पाहिलेल्या वास्तूंपेक्षा थोडा वेगळा आहे, याला एक भला मोठा घुमट आहे. इथे आल्यावर वाटले, त्यापेक्षा सिकंदर बागेत गेलो असतो तर बरे झाले असते! 

इमामबाडा पाहून आम्ही गेलो दिलकुशा कोठी पहायला. ही वास्तू साधारण १८०० च्या आसपास ब्रिटिश रेसिडेंट मेजर गोर ओझली यांनी बांधली. ते अवधचे शासक नवाब सआदत अली खान यांचे मित्र होते. बांधताना ही वास्तू अवधच्या नवाबांसाठी शिकारीसाठीचे निवासस्थान म्हणजेच हंटिंग लॉज म्हणून बांधण्यात आली होती, नंतर मात्र तिचा वापर नवाबांचा ग्रीष्मकालीन निवास म्हणून होऊ लागला.





इथे १०-१५ मिनिटे थांबून आणि काही फोटो मारून आम्ही निघालो राज्य वस्तुसंग्रहालय बघायला. संग्रहालय बघायला गेलो खरे, पण तिथे पोहोचल्यावर कळले की ते आज सोमवार असल्याने बंद होते. आता? आम्ही कुठेही फिरायला गेलो की तिथली एखादी स्थानिक वस्तू विकत घेतोच. नंतर कधीही त्या वस्तूकडे पाहिलं की त्या सहलीची आठवण होते आणि त्या सगळ्या सुखद आठवणी जाग्या होतात. जरा शोध घेतल्यावर उत्तर प्रदेश सरकार स्थानिक वस्तू विकण्यासाठी गंगोत्री नावाची दुकाने चालवते अशी माहिती मिळाली. मग हे गंगोत्री दुकान शोधत पुन्हा शहराच्या मध्यवर्ती भागात गेलो. तिथे सगळ्यात आधी जेवण केले. छान स्थानिक थाळी मिळाली. बराच वेळ घालवला, पण दुकान काही सापडले नाही. तेव्हा वैतागून शेवटी पुन्हा घरी गेलो. आंघोळी केल्या आणि थोडी विश्रांती घेतली. नंतर बाहेरून जेवण मागवले आणि केले. उद्या सकाळी साडेसातला रेल्वे असल्यामुळे साडेसहाला घरातून निघणे आणि साडेपाचला उठणे भाग होते, तेव्हा जरा लवकरच झोपायला गेलो. उद्या? चलो प्रयागराज! 

दिवस पाचवा: बारा नोव्हेंबर 

सकाळी लवकर उठून लखनौच्या प्रसिद्ध चारबाग रेल्वे स्टेशनवर पोहोचलो. हे एक खूप जुने, ब्रिटिशकालीन स्टेशन आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात जी काही भव्य आणि देखणी रेल्वे स्थानके बांधली गेली त्यापैकी हे एक. 

साडेअकराच्या सुमारास प्रयागराजला पोहोचलो. ई रिक्षातून घरी जाताना जाणवलेला पहिला बदल म्हणजे हॉर्नचा कर्णकर्कश्य आवाज. हा आवाज लखनौतही होता, पण एवढा भयानक नव्हता. इथे म्हणजे कुठली गाडी आपल्या गाडीसमोर एक सेकंद जरी उभी राहिली, तरी प्रत्येक वाहनचालक हॉर्न वाजवून परिसर अगदी दणाणून सोडत होता. 

रूमवर पोहोचलो, जरा फ्रेश झालो आणि शहराच्या मध्यवर्ती भागात अगदी शेजारीशेजारी असलेली प्रेक्षणीय स्थळे आनंद भवन आणि स्वराज भवन बघायला निघालो. आमचे राहायचे ठिकाण शहराच्या मध्यवर्ती भागापासून बरेच दूर होते. कुठल्याही शहरात राहायचे ठिकाण शोधताना शक्यतो मी शहराच्या मध्यवर्ती भागातले, प्रेक्षणीय स्थळांपासून जवळ असलेले हॉटेल किंवा घरच निवडतो, पण यावेळी चूक झाली होती खरी. पण आता काय करणार? चालवून घेणे भाग होते. नाविलाज को क्या विलाज? 

आज ज्या घराला 'स्वराज भवन' असं संबोधलं जातं ती वास्तू इ.स. १८७१ मध्ये बांधून पूर्ण झाली. इ.स. १९०० मध्ये, मोतीलाल नेहरू यांनी हे घर आणि त्याला लागून असलेली जागा १९,००० रुपयांना विकत घेतली, आणि त्याला नाव दिलं "आनंद भवन" – म्हणजेच आनंदाचं निवासस्थान.



 

त्या काळात मोतीलाल नेहरू हे एक प्रख्यात वकील आणि काँग्रेस पक्षाचे प्रभावी नेते होते. त्यामुळे अनेक प्रसिद्ध नेते आणि काँग्रेस कार्यकर्ते नेहरूंच्या घराला भेट देत असत. जेव्हा त्यांचा मुलगा, जवाहरलाल नेहरू यांचा उदय झाला, तेव्हा हे घर भारतीय स्वातंत्र्य चळवळीचं केंद्र बनलं. १९२०च्या दशकात हे घर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचं अनौपचारिक मुख्यालय होतं.





१९३० मध्ये मोतीलाल नेहरूंनी हे घर काँग्रेस पक्षाला दान केलं, जेणेकरून ते अधिकृत मुख्यालय म्हणून वापरता येईल. 

नंतर नेहरू कुटुंबाने जुन्या घराच्या शेजारी एक नवीन घर बांधलं आणि त्यालाच 'आनंद भवन' हे नाव दिलं, तर जुन्या घराचं नाव बदलून 'स्वराज भवन' ठेवलं.

स्वराज भवन 


आज या दोन्ही घरांचं रूपांतर संग्रहालयांमध्ये करण्यात आलेलं आहे. स्वराज भवनात आपल्याला इंदिरा गांधींचा जीवनप्रवास आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास पाहायला मिळतो तर आनंद भवनात आपल्याला पंडित जवाहरलाल नेहरूंचा जीवनप्रवास पाहायला मिळतो. पंडित नेहरूंची खोली आज जशीच्या तशी जतन केलेली दिसते.





त्यांच्या वापरातल्या काही वस्तू बाजूलाच एका दुस-या खोलीत ठेवल्या आहेत. तसेच नेहरूंकडे उतरत तेव्हा गांधीजी जी खोली वापरत ती खोलीही आपल्याला इथे दिसते. 



गांधीजी ज्या गादीवर बसत आणि ज्या बसक्या मेजाचा वापर करून पत्र लिहीत त्या गोष्टी पाहिल्यावर अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहत नाही. 

दोन्ही संग्रहालये पाहून आम्ही जाम थकलो होतो, तेव्हा आणखी काही पहायच्या फंदात न पडता थेट घरी निघालो.


वाचने 1
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया